অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राधानगरी

संततधार पावसाच्या धारा अन् आल्हाददायक मंजूळ वारा पावसाळ्यातल्या या गोष्टी बहुतेक सर्वांनाच भुरळ घालतात. चोहीकडे आनंदी वातावरण असतं. अशा वेळी हमखास कुठे तरी फिरायला जायचा बेत आखला जातो. पावसाच्या सहलीची एक वेगळीचं मज्जा असते. हाच आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक राधानगरीला येतात. संततधार पडणारा पाऊस, हिरव्यागार वृक्षांनी नटलेला निसर्ग, दऱ्याखोऱ्यातून खळखळत वाहणारे पाणी आणि उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यातून उडणारे तुषार, यामुळे आपोआपच पर्यटकांची पावले इकडे वळतात...

राधानगरी हा कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तालुका. निसर्गाची मुक्त उधळण, सगळीकडे सह्याद्रीच्या रांगा, हिरवळीतल्या रानवाटा, घनदाट जंगल, अंगाला बोचणाऱ्या पावसाच्या धारा, थंडी आणि खायला रान मेवा ही राधानगरीची वैशिष्ट्ये. विशेष म्हणजे आठवड्यात शनिवार आणि रविवार हे दिवस राधानगरी परिसर पर्यटकांनी भरलेला असतो.

राधानगरी येथे पर्यटक आणि तरुण वर्ग हा दाजीपूर अभयारण्य, काळम्मावाडी, हसणे, राधानगरी व तुळशी धरण परिसर, राऊतवाडी, म्हसोबा, भैरी हे धबधबे, फोंडा घाट या ठिकाणी पावसात फिरण्यासाठी तर दाजीपूर काळम्मावाडी या मार्गावर पदभ्रमंती करण्यासाठी येतात.

म्हसोबाचा धबधबा

खिंडी व्हरवडे येथून राधानगरी गैबी तिट्टा याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा धबधबा आहे. खिंडी व्हरवडे या गावाजवळ ५०० फुटाजवळ असणारा म्हसोबाचा धबधबा अवघ्या ५० फुटावरून पडतो. जून पासून राधानगरीत पाऊस सुरु होतो ते एप्रिलपर्यंत हा फेसाळत्या पाण्याचा मारा करतच असतो. याचे फेसाळणारे पाणी आपल्याला मिनी दूधसागर धबधब्याची आठवण करून देते. लोकांच्या आकर्षणापासून अजून लांब असणारा हा धबधबा निरव शांततेत असल्याने मोठ्या आवाजात कोसळतो. खळखळण्याचा आवाज, पावसाच्या सरी, पक्षांचा चिवचिवत यामुळे हा परिसर मनात उत्साही, आनंदी, वातावरण निर्माण करतेच तर इतर धबधब्याप्रमाणे कोणताच धोका इथे नसल्याने पर्यटकांची इथे रेलचेल दिसते.

कसे जाल

कोल्हापूर येथून राधानगरी बसने खिंडी व्हरवडे गाव पर्यंत जाता येत. तेथून चालत जाव लागतं.

राऊतवाडी-कारिवडेचा धबधबा...

सर्वत्र पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, दाट जंगल, सतत बेभान होऊन कोसळणारा धुवाँधार पाऊस, वेगळ्या जगात नेणाऱ्या रानवाटा, बोचरी थंडी, दाट धुक्यातून वेड्या-कड्या वळणे आणि खळखळाटाच्या आजाने दीडशे फुटावरून अव्याहतपणे कोसळणारा राऊतवाडी हा धबधबा... भर पावसात बाईक वरून भिजत जाऊन धबधब्याखाली एकदा चिंब भिजल्यावर मन भरत नाही आणि म्हणूनच पुनःपुन्हा भिजण्याची मजा व उर्मी या ही राऊतवाडी धबधब्यामुळेच येतेच. इतकेच काय तर कोल्हापूरच्या भविष्यासाठी दूरदृष्टी ठेऊन धरण बांधलेल्या राधानगरीचे बॅकवॉटरही येथून पाहता येतं.

राधानगरी धरणाजवळच अवघ्या ६ किमी अंतरावर हा धबधबा आपल्याला राऊतवाडी गावाजवळ हिरव्यागार डोंगरातून वाहताना दिसतो. हा धबधबा १५० फुटावरून कोसळत असल्याने किमान १० ते १२ फुटांचा पायथ्याला डोह तयार झालेला आहे. त्यामुळे भिजण्याबरोबरच पोहण्याचाही आनंद लुटता येतो. जसे आपण शहरात ‘वाटर पार्क’ मध्ये पोहण्याचा व वाहत जाण्याचा आनंद लुटतो तसाच अनुभव आपल्याला येथे येतो. राऊतवाडी धबधबा हा दोन टप्प्यांचा असल्याने येथे तरुणाई खूप मौज मज्जा करत असते. येथे धबधब्याच्या आत गुहा असल्याने अनेकांना जलधारांच्या पातळ पदराआड लपून खेळ खेळण्याचा आनंद घेता येतो. या वाटेवरच गैबी घाटातून येताना करंजफेण, कुडुत्री तर रामणवाडीतील अनेक धबधब्यांच्या रांगा दुरून पाहता येतात. आपल्याला विश्रांतीसाठी येथे जागोजागी छोटी-मोठी हॉटेल्स आणि खासगी व सरकारी विश्रांतीगृहे आहेत.

लेखक:अस्लम शानेदिवाण

मो.क्र.८३०८२७५६२५

माहिती स्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate