অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेहेकूरी काळवीट अभयारण्य

रेहेकूरी काळवीट अभयारण्य

हे काय आपल्या वाटेवरचं गाव आहे, ती बघ फाट्यावर माणसं कशी बसली आहेत… अशी वाक्य लहानपणापासून ऐकत आल्याने वाटेवरची गावं आणि फाट्यावरची माणसं याविषयी मनात एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला तो कायमचाच. नोकरीनिमित्ताने बीडहून मुंबईला आले खरी पण बीड-मुंबई प्रवासातील सगळी गावं माझी झाली. आपल्याच वाटेवरचं गाव आहे हे सांगतांना स्वर आनंदाने नाचू लागला. असंच फाट्यावरच्या माणसांबाबतही झालं.

मुंबईहून बीडला जातांना नगर सुटलं की बस आष्टी, जामखेड, पाटोदा अशी थांबत जाते. बऱ्याचदा बसमधील माणसं एखाद्या खेड्याच्या फाट्यावर उतरून जातात. दिसतं की त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बैलगाडी घेऊन घरची मंडळी आली आहेत किंवा गाडी आहे, कार आहे. थोडक्यात यामुळे का होईना फाट्यावरच्या माणसांशीही माझी मैत्री झाली. या प्रवासातले काही महत्वाचे टप्पेही मनाच्या खूप जवळ जसे चिचोंडी पाटील गावची भेळ, मग कड्याच्या मातीच्या गढी, आष्टीचा लिंबटाकीचा गणपती, जामखेड-पाटोदा गावादरम्यानचा घाट, मध्येच सौताड्याचा धबधबा आणि महादेवाचं मंदिर, पुढे नायगाव मयूर अभयारण्य आणि करवंदाची रोहतवाडी. करवंदाची आणि सीताफळाची जाळी पहायला मिळणं हा ही विलक्षण आनंददायी प्रकार. या करवंदाना आम्ही लहानपणी ‘काळी मैना’ म्हणायचो. करवंदाच्या जांभळ्या लाल रंगांनी ओठ रंगून जायचे.

पाटोद्याच्या पठारावर ऊंच उड्या मारत एकामागून एक धावणारी हरणं आणि काळवीट पाहणं तेव्हा जितकं मजेशीर वाटत होतं तेवढाच आनंद त्याबद्दलची माहिती मिळवतांनाही झाला. खरं तर अहमदनगर-बीड शेजारचे जिल्हे. अहमदनगरमधल्या रेहेकूरी काळवीट अभयारण्याला जाण्याचा योग तेंव्हा नाही आला पण अलिकडेच या अभयारण्याला भेट दिली तेंव्हा या छोट्याशा अभयारण्याने चकित केलं.

काळवीट

काळवीट… ज्याला स्थानिक लोक कृष्णमृग असंही म्हणतात, त्याची वळणदार शिंगं पाहणं, त्यांच्या आपसातील टकरा पाहणं थरारक वाटतं. शिंग मोडतील की काय, मनात भीती दाटून जाते. पण असं काही होत नाही. आपण उगीच घाबरून जातो.

काळवीट किंवा कृष्णमृग हा एक देखणा आणि अस्सल भारतीय प्राणी आहे. काळवीट कळपाने राहणारा प्राणी असून एका कळपात 10 ते 30 काळवीट असतात. क्वचित ही संख्या शंभरापर्यंतही जाऊ शकते अशी माहिती येथील वनाधिकाऱ्यांनी सांगितली. गवताळ व खुरटी झुडपे असलेल्या क्षेत्रात प्रामुख्याने काळवीटांचे अस्तित्त्व आढळते. काळवीट घनदाट तसेच डोंगराळ जंगलात राहण्याचे टाळतात. प्रौढ नराच्या पाठीचा रंग राखाडी किंवा पूर्ण काळा आणि पोटाकडील भाग पांढरा असतो. नराची लांबी 120 ते 130 से.मी व ऊंची खांद्याजवळ 80 सें.मी आढळते. माद्या नरापेक्षा लहान असतात आणि त्यांना शिंगे नसतात. त्यांच्या पाठीचा रंग पिवळसर बदामी आणि पोटाचा भाग नराप्रमाणे पांढरट असतो. नरांना पीळदार आणि डौलदार शिंगे असतात. काळवीट हा जगातील एक वेगाने धावणारा प्राणी असून तो ताशी 100 कि.मी. वेगाने धावू शकतो अशी माहितीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काळवीटांचे आयुष्यमान अंदाजे 12 ते 15 वर्षे असते.

घोषणा

महाराष्ट्र शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात रेहेकूरी परिसरातील 2.17 चौ.कि.मी चे व लगतचे 391.03 हेक्टरचे क्षेत्र दि. 29 फेब्रुवारी 1980 रोजी देऊळगाव-रेहेकूरी काळवीट अभयारण्य म्हणून घोषीत केले.

येथे मिळालेल्या माहितीनुसार काळवीट हा भारतीय संस्कृतीचे महत्वाचे प्रतीक मानला जातो. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये तसेच मध्य भारतातील प्राचीन दगडी चित्रात काळवीटाचे अस्तित्त्व आढळून आले आहे. वन विभागाच्यावतीने 2015 साली झालेल्या वन्यजीव सर्वेक्षणात रेहेकूरीत काळवीटांची संख्या 450 ते 500 च्या आसपास असल्याचे दिसून आले.

वनस्पती

गवताळ कुरणे व बाभळीच्या वनाने अभयारण्याचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. हिवर, खैर, तरवड, बाभूळ, बोर, कडुलिंब ही येथील प्रमुख झाडे आहेत. तर मारवेल, पवन्या, फुली, शेड्या, कुसळी, डोंगरी, या गवती वनस्पती देखील येथे आढळतात.

प्राणी

काळवीट, लांडगे, कोल्हे, तरस, चिंकारा, साळींदर, मुंगुस, खोकड हे वन्य प्राणी तर धामण, नाग, अजगर, सरडे, घोरपड हे सरपटणारे प्राणी येथे बघायला मिळतात. मोर, लावा, तितर, माळढोक, सातभाई, कापशी, घार, सुतार, चंडोल, भारद्वाज हे पक्षी देखील येथे आहेत.

रेहेकुरी येथे निरीक्षण कुटी असून विश्रांतीसाठी दोन कक्ष व युथ हॉस्टेलमध्ये पर्यटकांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. सिद्धटेक हे अष्टविनायक यात्रेतील प्रमुख गणपती मंदिर येथून ४० किमी अंतरावर आहे, तर राशीन येथील यमाई देवीचे मंदीर २५ किमी अंतरावर आहे.

पर्यटनाचा उत्तम कालावधी :- मार्च ते मे

कसे जाल-

विमान- लोहगाव- पुणे 165 कि.मी

पुणे – पाटस – दौंड – वालवड मार्गे रेहेकुरीस जाता येते. पुणे (१६० कि.मी ), श्रीगोंदा (३५ कि.मी), वालवड (३ कि.मी).

रेल्वेने : पुणे – सोलापूर मार्गावरील दौंड हे जवळचे रेल्वे स्टेशन (८० कि.मी ) तर श्रीगोंदा रोड रेल्वे स्टेशन (३८ कि.मी) आहे.

लेखक - डॉ.सुरेखा मधुकर मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate