অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लढाईची सांगवी

लढाईची सांगवी

वेशीवरच्या पाऊलखुणा : लढाईची सांगवी

नद्यांचा संगम हे पवित्र स्थान मानलं जातं. संगमाचं वलय लाभल्यानं त्या गावचं वैभवही वेगळं असल्याचं जाणवतं. संगमावरील लोकसंस्कृती अन्‌ तिच्या परंपराही तेवढ्याच वेगळ्या. पूराच्या जाचाला सहन करीत पुढे पुढे जात राहणारी ही गावे वेगळ्या धाटणीतली वाटतात.असाच अनुभव गोदावरी व देवनदीच्या संगमावर वसलेल्या सिन्नर तालुक्यातील सांगवीत येतो. पुरामुळे विखुरलेलं गाव आपलं वेगळेपण टिकून आहे, ते हजार वर्षांचा इतिहास सांगणारे हेमाडपंती मंदिर, नृसिंह सरस्वतींची आख्यायिका, गाढवाचं लग्न अन्‌लोकपरंपराच्या खजिन्यामुळे. या खजिन्याला भागोजी नाईकांच्या पराक्रमाची जोड मिळाल्याने संगमावरची लढाईची सांगवी भावते.

१८५७ चा उठाव म्हटला की, सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोट्याचे क्रांतीवीर भागोजी नाईक नावाचे वादळ मनावर गारूड घालते.इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारक भागोजी नाईकांनी स्वातंत्र्याची धग पेटवत ठेवण्यात मोठी भूमिका निभावली आहे. अकोले, संगमनेर, सिन्नर,कोपरगाव, निफाड, पेठ या भागातील महादेव कोळी व भिल्लांनी केलेल्या उठावाचे प्रेरणास्थान होण्यात भागोजी नाईकांचे नाव आघाडीवर होते. नांदूरशिंगोटेतील चास खिंडीत४ ऑक्टोबर १८५१ रोजी इंग्रज अधिकारी जेम्स हेन्रीबरोबर झालेल्यालढाईत भागोजींनी विजय मिळवित हेन्रीला ठार केले. यामुळे संतापलेले इंग्रज भागोजींच्या मागावर होते.सिन्नर तालुक्यातील मिठसागरे,पंचाळे व सांगवी या भागातइंग्रजांविरुद्ध भागोजीची शेवटची लढाई झाली. इंग्रजांना भागोजीवर विजय मिळविणे शक्य नसल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी फितूरीचा मार्ग अवलंबला.पंचाळेतील एका फितुराने मिठसागरे येथील इंग्रज अधिकारी फ्रँक सुटरयाला भागोजी नाईक पंचाळेत असल्याची खबर दिली. इंग्रजांनी रात्रीतून पंचाळेला वेढा दिला. तो दिवस होता ११ नोव्हेंबर १८५१.सकाळी काळेंच्या घरातून बाहेर पडताना इंग्रजांनी घेरल्याची कल्पना भागोजी नाईकांना नव्हती. इंग्रजांनी अचानक गोळीबार सुरू केला.

यावेळी इंग्रजांना प्रतिउत्तर देत भागोजी नाईक व त्यांचे साथीदार सांगवीच्या दिशेने निघाले.नांदूरशिंगोटेचे हे वादळ देवनदी व गोदावरीच्या संगमावरील सांगवीतशमले. इंग्रजांच्या गोळीने भागोजींचा ठाव घेतला. भागोजींचे सहकारी खंडेराव काळे यांनी भागोजी नाईकांच्या पार्थिवावर संगमावरच अत्यंसंस्कार केले व या ठिकाणी भागोजी नाईकांची चीरा उभारली. या घटनेनंतर इंग्रजांनी सांगवीकरांना बरेच छळले. अत्याचार करीत गाव पेटवून दिले. भागोजी नाईकांसाठी सांगवीकरांनी ही लढाईही लढल्याने तेव्हा सांगवीला लढाईची सांगवी असेही म्हटले गेले. या घटनेनंतर खंडेराव काळेंनीही गाव सोडले मात्र ते कोठे गेले याचा नंतर पत्ता कधीच लागला नाही. दरम्यानच्या काळात पूरामुळे हा इतिहास गाडला गेला होता. मात्र सांगवीच्या ग्रामस्थांच्या हाता धनुष्यबाण घेतलेल्या व्यक्तीची चीरा व तुटलेली तलवार हाती लागल्यानंतर भागोजी नाईकांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. आता तो चीरा पुन्हा स्थापन करून येथे भागोजी नाईकांचे स्मारक बांधण्याची त्यांची धडपड सुरू आहे, अशी माहिती विनायक घुमरे यांनी दिली.संगमावरील चीरेतील घोड्यावर बसलेल्या योद्ध्याला पाहिले की,क्रांतीवीर भागोजी नाईकांचा वैभवशाली इतिहास डोळ्यापुढे उभा राहतो. म्हणूनच सांगवीचा हा प्रवास ऐतिहासिक ठरतो.

सिन्नरहून शिर्डी महामार्गावर १४ किलोमीटरवर डाव्या हाताला पांगरी बु. गावचा फाटा लागतो. तेथून दहा किलोमीटरवर सांगवी हे गाव आहे.सिन्नर ओलांडत पुढे जाणारी देवनदी सांगवी गावात गोदावरीला येऊन मिळते. या संगमामुळे गावाला सांगवी म्हटले गेले असावे.संगमावरील घाट अन्‌ दोन नद्यांचा मिलन सोहळा वातावरण प्रसन्न करतो. डाव्या हाताला भागोजी नाईक यांचे समाधीस्थळ आहे. तर उजव्या हाताला काही अज्ञात व्यक्तींच्या चीरा व समाधी आहेत. या समाधींमागे गावचे मारूती मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या हाताला पांढरीचे टेकाड आहे. हे टेकाड म्हणजे पूर्वीच्या गावच्या खाणाखुणा व नदीलगतच्या लोकसंस्कृतीचे प्रतिक म्हणता येईल.मात्र नदीचे पर्यावरण धोक्यात आल्याने त्याचा फटका पूर रूपाने नदीलगतच्या या गावाला बसला.१९६९ च्या पूरामुळे संगमावरचे गाव विखुरले गेले. १९७२ ला गावाला नवीन गावठाण मिळाले. मात्र आता गावकरी आपापल्या मळ्यांमध्ये स्थिरस्थावर झाल्याने गावचा विखुरलेपणा मनाला अस्वस्थ करतो. मात्र अख्या गावाला एकत्रित ठेवले आहे.

ते गावातील मारूती व महादेव मंदिराने. मारूती मंदिरासमोर मोठा सभामंडप बांधण्यात आल्याने येथे नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यावेळी प्रत्येकाला पांढरीच्या टेकाडामुळे आपल्या अस्त‌ित्वाच्या पाऊलखुणा अनुभवायला मिळतात. मात्र हे गाव नेमके कधी वसले असावे, याचा शोध ग्रामस्थही घेत आहेत. भांटांकडील नोंदीनुसार पूर्वी गवळी लोकांचे वास्तव या गावात होते. या नोंदी गावाचे वय तीनशे-चारशे वर्षे मागे घेऊन जातात. मारूती मंदिरासमोर डाव्या हाताला असलेले महादेव मंदिर गावाला सुमारे हजार वर्षे मागे घेऊन जाते. अकराशे-बाराशेच्या सुमारास हेमाद्री पंताने सांगवी गावात सुंदर असे हेमाडपंती मंदिर उभारले आहे. यावरील नक्षीकाम अप्रत‌िम आहे. हे मंदिर आज महादेव मंदिर म्हणून ओळखले जात असले तरी ते मुळात महादेव मंदिर नाही.वास्तुरचना व शैलीनुसार हे मंदिर देवी मंदिर असावे, असे पुरातत्त्व अधिकारी सांगतात. मंदिरातील महादेवाची पिंड नंतरच्या काळात बनविली गेली असावी. कारण तिची रचनाही चुकीची आहे. मात्र हे कोणत्या देवीचे मंदिर होते, याबाबत संशोधनाची गरज आहे. हे मंदिर आतापर्यंत पुरातत्त्व अंतर्गत नसल्याने त्याची वाताहात झाली आहे. या मंदिराला पुनर्वैभव मिळाल्यास हे एक पर्यटन केंद्र होऊ शकते, इतका हा सुंदर व निसर्गसंपन्न परिसर आहे.

सांगवी गावाला जसे ऐतिहासिक संदर्भ आहेत तसेच पौराणीक व अध्यात्म‌िक संदर्भही आहेत.गोदावरी परिक्रमेसाठी निघालेले नृसिंह सरस्वती चातुर्मासात शिष्यासह संगमावरील सांगवीत थांबले. सांगवी गावासमोर गोदेच्या दुसऱ्या बाजूला कडगंजी (कोळगाव)आहे. येथील एक ब्राह्मण पोटशूळेमुळे (पोटदुखीमुळे) वैतागून नदीवर आत्महत्या करायला आला होता. नृसिंह सरस्वतींनी शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला आत्महत्येपासून परावृत्त करीत शिष्यांसह त्याच्या घरी भोजनास जाण्याचे ठरविले. भोजनादरम्यान,नृसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणासही भोजनास बसण्यास सांगितले. मात्र काही खाल्यास माझे पोट दुखायला लागते, असे त्या ब्राह्मणाचे म्हणणे होते. मात्र सरस्वतींनी ग्राहकपूर्वक ब्राह्मणाला जेवायला बसविले तेव्हापासून ब्राह्मणाची पोटदुखी शमली. त्यामुळे तो ब्राह्मण नृसिंह सरस्वतींचा शिष्य झाला, अशी कथा श्री गुरू चरित्राच्या तेराव्या अध्यायात सांगितली गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. सांगवीतील दत्त मंदिरात सांगवीचे स्वामीजी ब्रम्हलीन १००८ स्वामी अद्वैतानंदजी महाराज यांनी बारावर्षे तपस्या केली. त्यांनी अध्यात्माचे शिक्षण घेतले. स्वामीजी पुढे दिल्ली येथील विश्वनाथ विश्वविद्यालय येथे प्राचार्य म्हणून रूजू झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.येथील दत्त मंदिरात आता आनंदवन आश्रम उभारण्यात आला असून, दत्त जयंतीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

गावात धनगर समाजाबद्दलही एक अख्यायिका सांगितली जाते. नद्यांचा संगम तसेच निसर्गसंपन्नतेमुळे मेंढरे वळणारा धनगर समाज मोठ्या प्रमाणात गाव परिसरात वास्तव्यास आला. यातील एक वृद्ध महिलेला स्वप्नात गावात बिरोबा देव आल्याचा साक्षात्कार झाला. तिने याची माहिती सहकाऱ्यांना दिली व तेथेच एका दगडाची शिळा उभारून बिरोबाची स्थापना केली. कालांतराने धनगर समाज मेंढरांसह गावातून जाण्यास निघाला मात्र ते गावची सीमा ओलांडून जाऊ शकले नाही अन्‌ तेथेच स्थिरावरले. बिरोबाच्या महिमेची अनुभूती एका ग्रामस्थाने घेतल्यावर त्याने १३६ एकर जमीन धनगर समाजाला दान केली. ही अख्यायिका आजही बिरोबाच्या यात्रेत सांगितली जाते. अशीच एक वेगळी परंपरा सांगवीकरांनी शंभर वर्षांपासून जपली आहे ती म्हणजे वडगावचा (ता. कोपरगाव जि. नगर)शनी उत्सवाचा रथ. वडगावमध्ये शनी मंदिर असून, त्याच्या उत्सवात रथाचा मान सांगवीकरांकडे आहे.असे असण्यामागे नेमके कारण काय हे ग्रामस्थांना माहिती नाही अन्‌त्यांनी ते जाणून घेण्याचा प्रयत्नही कधी केलेला नाही.

पण गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा राबविली जात असल्याने ती आजही कायम आहे.वडगावच्या शनी उत्सवासाठी सांगवीकरांकडे असलेले रथ (पूर्वी लाकडी रथ होता. आता लोखंडी आहे.) थाटामाटात सजवून सांगवी-वडगावच्या सीमेपर्यंत सांगवीकर घेऊन जातात. त्यानंतर त्यात शनीची स्थापना केली जाते व तो रथ वडगावात मिरविला जातो.यात्रेनंतर पुन्हा हा रथ वडगावकर सांगवीच्या सीमेपर्यंत आणतात व सांगवीकर तो रथ पुन्हा गावात आणून पुढील उत्सवापर्यंत सांभाळतात. हा अनोखा सोहळा पाहण्यासारखा असतो. रथाचा जुना लाकडी रथ मोडकळीस आल्याने त्या रथाच्या चाकांचा लिलाव करण्यात आला. एका शेतकऱ्याने ती चाके घेतली व बैलगाडीला लावली. मात्र ती चाके बैलांकडून हलली नाहीत म्हणून ती पुन्हा ग्रामस्थांकडे सोपविल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामागे लोकदैवतांबाबतची अफाट श्रद्धा अन्‌ लोकपरंपरेचा अभिमान पाहता येतो.

सिन्नर परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना नेहमीच करावा लागतो. यावर मात करण्यासाठी सांगवीकरांनी पुराणांचा आधार घेत एक अनोखा तोडगा काढला आहे.अशोक घुमरे यांनी पुराणांमध्ये सांगितलेली पावसासाठी गंधर्व विवाह करण्याची आख्यायिका वास्तवात आणली. पाऊस पडावा म्हणून सांगवी गावात आतापर्यंत तीन वेळा गाढवाचे लग्न लावण्यात आले आहे. वधू सांगवीची असते तर वर शेजारच्या गावचा. विशेष म्हणजे तिन्हीवेळा गंधर्व विवाहानंतर दोन तासात पाऊस पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.

खंडोबा यात्रा, दत्त जयंती व बिरोबा यात्रेचा उत्साह आजही गावात कायम आहे. मात्र यात्रेत व होळीत होणारी आखाडी (बोहाडे) पद्धत पंचवीस वर्षांपासून बंद पडली आहे.मात्र भागोजी नाईकांचा पराक्रम,हेमाडपंती मंदिराचे वैभव घेऊन पुढे जात असलेले सांगवी पुन्हा गावठाणातील सांगवी वसविण्यासाठी धडपडत आहे.जुन्या पाऊलखुणांच्या जोरावर सांगवी नवीन इतिहास साकारेल,असा विश्वास ग्रामस्थांच्या डोळ्यात लुकलुकताना पाहताना हायसे वाटते.

 

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 5/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate