অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सफर केंजळगड किल्ल्याची...!

सफर केंजळगड किल्ल्याची...!

भटकंतीमध्ये अनेक गोष्टींचे ज्ञान सहज मिळते. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या परिसरात असेही काही किल्ले आहेत. ज्यांची नांवे देखील आपणास माहिती नाहीत. परंतू या किल्ल्यांवर इतिहासात पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेलेल्या आहेत. वाई आणि रायरेश्वरच्या दरम्यान असलेल्या महादेव डोंगर रांगेवर एका उंच टेकडावर केंजळगड उभारलेला आहे. त्याची उंची 4 हजार 269 फूट इतकी आहे. किल्ल्याची मोक्याची जागा आणि परिसरातील हिरवाईने नटलेला महादेव डोंगर पाहून केंजळगड निश्चितच मनमोहक असा वाटतो. त्यामुळेच केंजळगडास शिवाजी महाराजांनी खास मनमोहनगड असे नाव दिले आहे. तसेच या किल्‍ल्याला केळंजा असे देखील म्हणतात. या गडावर भटकंती झाली.

केंजळ गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता असल्यामुळे आपण वाहन घेऊन जाऊ शकतो. पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोर गावी जाण्यासाठी स्वारगेटहून बस आहेत. भोरहून आंबवडे गाव मार्गे बसने अथवा खाजगी वाहनाने कोरले गावाला जाता येते. कोरले गावातून एक मार्ग केंजळगडला तर दुसरा रायरेश्वरकडे जातो. कोरले गावातून केंजळगडाच्या पायथ्यापर्यंत असलेल्या डोंगरातील नागमोडी वाटेने पायथा गाठता येतो. केंजळगडाच्या पायथ्याजवळ आठ ते दहा घरांची वस्ती, एक मंदिर आहे. तसेच एक शाळा देखील आहे. इथे मंदिरात मुक्कामाला जागा आहे. पायवाटेने रस्ता शोधत केंजळगडाच्या मुख्यद्वाराजवळ गेल्यानंतर कोरलेल्या भक्कम आणि लांबच लांब पायऱ्‍या दिसतात. केंजळगडाच्या डोंगर शिखरावरील दगडात चोपन्न लांबच लांब पायऱ्‍या खोदून काढल्या आहेत. या अशा रानात पायऱ्‍या कशा खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते. त्या काळातील स्थापत्य अभियांत्रिकी बद्दल आश्चर्य वाटते.

कातळात कोरलेल्या पायऱ्‍या चढून वर जाण्यापूर्वी आपल्याला एक गुहा दिसते. या गुहेचा वापर ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून बचाव करण्यासाठी होत असावा. गुहेच्या जवळ गेल्यानंतर ती आतमध्ये किती दूरपर्यंत खोदलेली आहे, हे लक्षात येते. गुहेच्या थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाकी आहे. गडावर केंजाई देवीचे मंदिर आहे. तसेच केंजळा गडावर दोन चुन्याचे घाणे आपल्याला दिसतात. चुन्याच्या घाण्यापासून थोडे पुढे गेल्यानंतर एक इमारत दिसते. इमारतील फेरफटका माल्यानंतर येथेपूर्वी दारुगोळा कोठार असावे असा अंदाज बांधता येतो.

केंजळ किल्ल्यापासून रायरेश्वर किल्ला 16 कि.मी. लांब पसलेला आहे. त्यामुळे केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वरकडे सुणदरा वाटेने जाता येते. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते. रायरेश्वरावरून सर्व दिशांना नजर फिरवली की, त्या उंचीवरून कमळगड, केंजळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड दुर्ग दिसतात. तर नाखिंदा या रायरेश्वरच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगलगडही दिसतो. रायरेश्वर किल्ल्यावरून कमळगडाचा माथा, महाबळेश्वराचे विलोभनीय दृश्य पाहण्याची मज्जा काही वेगळीच आहे. एका दिवसात तुम्हाला भन्नाट ट्रेक करण्याचा आनंद लुटायचा असेल, तर ‘किल्ले केंजळगड-रायरेश्वर’ हा पर्याय उत्तम ठरू शकेल.

लेखक: हर्षा थोरात

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate