অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सातवाहनांचं सातपूर

सातवाहनांचं सातपूर

सातवाहनांचं सातपूर

अनेकदा प्राचीन संस्कृतीचं अधिष्ठान लाभलेल्या गावात प्रगतीच्या वेगामुळे ‘त्या’ संस्कृतीच्या खाणाखुणा मिळत नाहीत. मात्र गाव ते उपनगर हा प्रवास केलेल्या सातपूरने (Satpur) आपल्या नावातून तो प्राचीन इतिहास अजूनही जपला आहे. सातवाहनांचे अधिष्ठान असलेले सातपूर अजूनही गुढीपाडव्यातून दोन हजार वर्षांपूर्वीच्या पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसते.

सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी दख्खनही (आताचा महाराष्ट्र) एक होता. त्यानंतर सुरू झालेला सातवाहन कालखंड महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आरंभ ठरला. सातवाहनांचा साम्राज्य विस्तार गोदाखोऱ्यात व्यापलेला होता. म्हणून त्यांच्या राजवटीस गोदासंस्कृती म्हटले गेले. सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा अतिशय व्यापक होत्या. गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील शिवस्वातींकडे तेव्हाच्या महाराष्ट्राचा कारभार होता अन्‌ त्यांची वसाहत गोवर्धन येथे होती. म्हणजे आताचे गंगापूर-गोवर्धन गाव. उत्तरेकडून आलेले परकीय क्षहरात घराण्यातील भूपक आणि नहपान या क्षत्रपांनी शिवस्वातीवर आक्रमणे करून महाराष्ट्र ताब्यात घेतला अन् महाराष्ट्रावर राज्य करणारे प‌हिले परकीय घराणे ठरले.

नाशिक-जुन्नर परिसरावर क्षहरात घराण्याचे राज्य होते. भूपक क्षत्रपानंतर नहपानाच्या हातात सत्ता एकवटली. दरम्यान, क्षत्रपांनी सातवाहनांना नाशिक परिसरातून हुसकावून लावले व सातवाहन पैठणला वसले. सातवाहन घराण्यातील गौतमीमीपुत्र सातकर्णीने अथक प्रयत्नांनंतर नहपान या क्षत्रपावर नाशिक येथे पूर्ण तयारीनिशी युद्ध केले अन् या युद्धात विजय मिळवित महाराष्ट्र प्रदेश स्वतंत्र केला. हे युद्ध अतिसंहारक असल्याच्या नोंदी पांडवलेणीतील (त्रिरश्मी लेणी) शिलालेखात मिळतात. सातकर्णीने नाशिकमध्ये नहपानाच्या सैन्यावर मात केली. नहपान युद्ध भूमीतून सह्याद्री पर्वतात आश्रयाला गेला. सातकर्णीने त्याचा पाठलाग करून नहपानाचा समूळ उच्छेद केला. पांडवलेणीतील शिलालेखात याचा उल्लेख ‘क्षहरात वंश निर्वंश करस’ म्हणजेच ‘नहपान क्षत्रपाचे क्षहरात घराणे नष्ट करणारा’ असा केला आहे. सातवाहनाने महाराष्ट्र राज्यलक्ष्मी त्यांच्याकडे खेचून आणली. या काळात गौतमीपुत्र सातकर्णी इतका बलाढ्य राजा भारतात अन्य नव्हता म्हणून त्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले होते, असे गौरोवोद्गार पांडवलेणीतील शिलालेखात आहेत.

तर या युद्धाचे वर्णन भद्रबाहू या जैन साधूच्या ग्रंथातही आढळते. इ. स. ७८ मध्ये झालेले हे युद्ध म्हणजे पहिले स्वातंत्र्यसमरच ठरले. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा विजयोत्सव सातवाहनांनी गुढ्या उभारून साजरा केला. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो, असे इतिहास अभ्यासक मानतात. हा पराक्रम नाशिकमध्ये घडल्याने हा सण नाशिकनेच जगाला दिला, असे म्हणायलाही हरकत नाही. सातवाहनांनी चार शतकांहून अधिककाळ महाराष्ट्रावर राज्य करीत समृद्धीचा सुवर्णकाळ दाखविला. याच काळात सातवाहन व क्षत्रपांनी पांडवलेणी (त्रिरश्मीलेणी) खोदण्यासाठी दाने दिली. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोवर्धन (गोवर्धन गंगापूर) येथे व्यापाऱ्यांचे संघ स्थापन झाले होते. सातवाहनांच्या या इतिहासाची छाप जशी लेणीतील शिलालेखांतून उमटली आहे तशीच गुढीपाडवा सणामुळे गेल्या दोन हजार वर्षापासून हा अज्ञात इतिहास घराघरात बहरताना दिसतो. त्यातच सातवाहनांची वसाहत असलेल्या सातपूरलाही गुढीपाडव्यांलाच यात्रा भरते. ही परंपरा दोन हजार वर्षांपासून चालत आली असावी, असे सातवाहनांचा पराक्रम सांगून जातो.

औद्योगिक वसाहतीमुळे सातपूर आता नाशिक शहराचे एक महत्त्वाचे उपनगर बनले आहे. पूर्वी ते सातवाहन या भारतातील एका बलाढ्य राजाची वसाहत होते, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही अन् ते साहजिकही आहे. पण दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास अन् त्या इतिहासाचा घटनाक्रम आपल्याला सातपूर या नावामागील कथा उलगडून सांगतो. सातपूरमध्ये उत्खननात (खोदकामात) सातवाहनकालीन हत्यारांचे अवशेष मिळाले आहेत. तांबड्या रंगांची हत्यारांची पाती पाहताना त्यावेळी घडलेले युद्ध डोळ्यासमोर उभी राहतात. या हत्यारांचे अवशेष त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील नाणे संशोधन केंद्रात ठेवण्यात आली आहेत. म्हणूनच या परिसरात सातवाहन राहत असावेत म्हणून गावाला सातपूर नाव पडले असावे, याला बळ मिळते.

सातपूरचे पूर्वीचे नाव सतीपूर होते, असे सांगताना ग्रामस्थ एक अख्यायिका सांगतात. श्रीराम या परिसरात अग्न‌ियज्ञ करत होते. यावेळी पार्वती सीतेचे रूप घेत यज्ञस्थळी श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी आली. मात्र श्रीरामाने महादेवाच्या पार्वतीला ओळखले व माता तू येथेच थांब, अशी विनंती केली. तेव्हा पार्वतीने नंदिनी नदीच्या (आताची नासर्डी) रूपात येथेच राहील, असे सांगितले. तेव्हापासून सातपूरला सतीपूर असे नाव पडले व नंदिनी या सतीपूरातून वाहते, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. सतीपूर या गावाचे नाव मुगलांच्या काळात सय्यदपूरही झाले अन् पेशवाईत सातपूर असेही ग्रामस्थ सांगतात. सय्यदपूरचे सातपूर होण्यामागेही राजेबहाद्दर नारोशंकरांच्या पराक्रमाची अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.

त्र्यंबकरस्त्यालगत अन् नंदिनीच्या कुशीत वसलेल्या सातपूरच्या मुख्य बाजार रस्त्याने या उपनगरात प्रवेश करताना डाव्या हाताला समोर हनुमानाचे मंदिर लागते. तीन मजली दिसणारे हे हनुमानाचे मंदिर पूर्वी सातपूर गावच्या वेशीबाहेर होते अन् त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी पडावाचे ठिकाण असे. मंदिरासमोर सातपूर गावची वेस होती. आज ती नाही. मात्र तिच्या आठवणी ज्येष्ठांच्या मनात दिसतात. वेशीतून आत गेल्यावर सातपूर गावात अजूनही दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीचे वाडे असतील याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण सोनवणे वाडा, जैन वाडा, भंदूरेंचा वाडा, निगळांचा वाडा, बंदावणे वाडा अशी काही उदाहरणे पहायला मिळतात. हे वैभव अनुभवून पुन्हा हनुमान मंदिराकडे यायचे अन् हनुमान मंदिरासमोरून उजव्या हाताने माळी गल्ली, बंदावणे गल्ली, निगळ गल्लीतील जुनी घरे व काही शिल्लक राहिलेले लहान लहान वाडे पाहत स्वारबाबा नगरमधील अग्निमंदिरापर्यंत जायचे. अग्निमंदिरात अरविंद पतंगे अग्निपूजेबद्दल माहिती देताना दंग होऊन जातात. ‘पूर्वी सातपूर गावात कोण आलं तरी कळायचं, आता हे गाव शहर झालं आहे. कोण येत जातं यावर आता नियंत्रण नाही,’ असे सातपूरच्या बदलेल्या स्वरूपाबद्दल दत्तू पंढरीनाथ मौले तळमळीने सांगतात. ‘आम्ही काशीमाळी मध्यप्रदेशातून सातपूरमध्ये आलो. याला आता दोनशे-तीनशे वर्ष झाली असतील. सातपूर पूर्वी नजरेत भरावं एवढं गावासारखं होतं.’ असेही मौले आवर्जून सांगतात.

सातपूरला निगळांचं सरदार घराणंही लाभलं आहे. निगळांचा बाराशे सालापासूनचा वंशवृक्ष राजस्थानच्या भाटांकडे नोंदविलेला दिसतो. ‘राजस्थानातील प्रतापगडचे निगळ औरंगाबादच्या देवगिरीची लढाई लढले. ही लढाई जिंकल्याने त्यांना नारायणगावची जहागिरीत पाटीलकी मिळाली. तेथून १३३५ मध्ये पुण्यातील ओडेगावी आले. तेथे निगळांनी मोठा गढीवजा वाडाही बांधला. मुगलांच्या त्रासापासून धर्म वाचविण्यासाठी निगळ परिवार १५०५ मध्ये कोकणात स्थिरावले. तेथून पेशवाईत महादुपा या एका भावाला ओझाची तर तुकाराम या दुसऱ्या भावाला सातपूरची पाटीलकी मिळाली. तुकाराम निगळ १७०७ मध्ये सातपूरला आले.’ असे शांताराम निगळ भाटांकडील नोंदीच्या आधारे सांगतात. तर ‘भंदुरे कुटुंब राजस्थानातून काशीला आले व तेथून ते जलालपूर येथे शेती व्यवसायात स्थिरावले. भंदुरेनंतरच्या काळात जलालपूरहून सातपूरला स्थिरावले. भंदूरेंचे दोनशे-तीनशे वर्षापूर्वीचे दोन जुने वाडे या इतिहासाची साक्ष आजही देतात,’ असे डॉ. झुंबर भंदुरे सांगतात. गावातील अनेक कुटुंबांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सातपूरची ग्रामदेवता सप्तशृंगी माता आहे.

तिला भवानी माताही म्हटले जाते. मातेचे मंदिर औद्योगिक वसाहतीतील एका टेकडावर वसले आहे. हे मंदिर व वणीचे सप्तशृंगी मंदिर समोरासमोर असल्याचे दिसते. अग्नि मंदिर, गणेश मंदिरातील गणपतीची शिळा व बारागाड्या ओढणाऱ्या गणेशाची सुंदर मूर्ती पाहून मरीमाता मंदिराकडे जायचे तेथून पुन्हा निगळगल्ली, बंदावणे गल्ली व माळी गल्लीतून हनुमान मंदिर व शेजारचे खंडोबा मंदिर पहायचे. हनुमान मंदिराशेजारी पूर्वी तालीम होती. ती आता नाही. मंदिरातून तालमीत जाणारा दरवाजा मात्र अजूनही तालमीची आठवण करून देतो. मंदिरातील पुजेचा मान असलेल्या यमुनाबाई पोटींदे या आजीबाई येणाऱ्या जाणाऱ्याला शुभआशीर्वाद देताना दिसतात. त्यानंतर दुर्गामाता मंदिर, सातपूरचा बाजार, बाजारामागील सप्तशृंगीचे छोटेखानी मंदिर, राममंदिर व पूर्वी घाटावर असलेले महादेव मंदिर दगडी बांधणीचे आहे. नंदिनीला पूर्वी सुंदर घाट होता. याच घाटावर महादेव मंदिर होते. येथे पूर्वी दशक्रियाविधी देखील व्हायचे. मात्र आता नंदिनीचा नासर्डी नाला झाल्याने घाट हरविला आहे. महादेव मंदिर पाहून नंदिनी अनुभवली की पूर्वी नंदिनी किती सुंदर असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. १९५० पर्यंत सातपूरचे ग्रामस्थ नंदिनीचे पाणी पिण्यासाठी वापरायचे, असे शांताराम निगळ सांगतात. जवळच बंद पडलेली शिवटॉकीज आहे. तेथून भवानी मातेच्या मंदिरात जाता येते

. हे मंदिर राजर्षी शाहू महाराज विद्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे देवीची चिरा आहे तर मंदिराबाहेर एका कोपऱ्यात अनेक वीरगळी पहायला मिळतात. तेथून आई गडदवणी माता मंदिर व पीरबाबांचे ठाणेपाहून सातपूर रस्त्यातील वेताळ मंदिरातील लाकडी मुखवटे सातपूर गावात पूर्वी बोहाड्यांच्या सोंगांचा उत्सव होत असल्याचा इतिहास सांगतात. बोहाडे आता होत नाहीत. मात्र सातवाहनांनी याच गावातून सुरू केलेला गुढीपाडवा उत्सव ग्रामस्थ आजही जल्लोषात साजरा करतात. सातपूरकर दरवर्षी गुढीपाडव्याला भवानी मातेचा उत्सव व बारागाड्या ओढण्याचा अनोखा सोहळा साजरा करतात. बारागाड्या ओढणाऱ्याला गणेशा म्हटले जाते. मानपान ठरलेल्या कुटुंबातील पुरूषाला म्हणजेच गणेशाला साडी, चोळी, पीतांबर फेटा हातात तलवार अशी पारंपरीक वेशभूषा केली जाते.

त्यानंतर गणेशाला गावातून मिरवले जाते व दारोदारी सुवासिनी गणेशाचे औक्षण करतात. सर्व मंदिरांमध्ये गणेशा दर्शन देवतांचे पूजन करीत सप्तशृंगी माता मंदिरातून गणेशा बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी येतो. गणेशा बारागाड्यांना प्रदक्षिणा घालतो व बारागाड्या ओढतो. गणेशाची मिरवणूक गावातील पीराला नेवैद्य दाखवून संपते. बारागाड्यांचा सोहळा, पोळा, होळी व निवृत्ती महाराजांची पालखी असे सातपूरचे मुख्य सोहळ्यांचा मानपान ग्रामस्थ एकत्रित येऊन ठरवितात. निगळ, घाटोळ, बंदावणे, भंदुरे, मौले आदी कुटुंबांचा व ग्रामस्थांचा गावातील उत्सवांमधील सहभाग सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवितो, असे डॉ. झुंबर भंदुरे व शांताराम निगळ सांगतात.

सातपूरमध्ये १९४६ पर्यंत इंग्रजांची निग्रोंच्या पलटनीचा कॅम्प होता. याच्या खाणाखुणा अजूनही सातपूरमधील पपया नर्सरी चौकात इंग्रजांनी बांधलेल्या बराकीच्या माध्यमातून पहायला मिळतात. या बराकींचा आता कार्यालयासाठी खुबीने वापर केलेला दिसतो. हा कॅम्प त्यानंतर देवळालीत वसला. त्यानंतर १९६१ मध्ये सातपूर औद्योगिक वसाहत आली अन् सातपूरचे गावपण शहराकडे वळले. मात्र सातपूरने वेगवेगळ्या उत्सव आणि सुप्तगुणांतून दोन हजार वर्षांपासूनचा जपलेला इतिहास थक्क करतो. म्हणूनच सातवाहनांचे सातपूर पाहताना दोन हजार वर्ष मागे गेल्यासारखे वाटायला लागते. असं काही सातपूरमध्ये अनुभवयाला मिळेल, ही कल्पना मात्र नक्कीच कोणी केली नसणार!

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate