অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दादासाहेब फाळके

दादासाहेब फाळके

दादासाहेब फाळके : (३० एप्रिल १८७०-१६ फेब्रुवारी १९४४) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. जन्म त्र्यंबकेश्वर (जि. नासिक) येथे. पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व मातोश्रींचे नाव द्वारकाबाई. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर १८८५ साली ते तेथील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. १८८६ मध्ये त्यांचा पहिला विवाह झाला. पुढे १८९० साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच वास्तुकला व साचेकाम यांचाही त्यांनी अभ्यास केला. याच सुमारास प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफ्‌टोन ब्‍लॉक करणे याचा त्यांना छंद जडला. कलाभवनाचे प्राचार्य गज्‍जर यांच्या उत्तेजनाने रतलाम येथे तीनरंगी ठसे बनविण्याची प्रक्रिया (थ्री कलर प्रोसेस), प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथो) व छायाचित्रण इ. क्षेत्रांत प्रयोग करण्याची त्यांना संधी मिळाली होती. त्यानंतर काही दिवस बडोदा येथे धंदेवाईक छायाचित्रकार तसेच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केले. हौशी कलावंतांना अभिनय शिकविणे, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे यांचीही त्यांना आवड होती. अहमदाबादला १८९२ मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी पाठविलेल्या आदर्शगृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले होते. १८९५ साली गोध्रा (गुजरात) येथे छायाचित्रकार म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता; परंतु १९०० मध्ये प्‍लेगने त्यांच्या पत्‍नीचे देहावसान झाले म्हणून ते परत बडोद्याला गेले. तेथेच १९०१ साली त्यांनी एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पतकरले.

पुष्कळ ठिकाणी जादूचे प्रयोगही करून दाखविले. प्रो.‘केल्फा’ (फाळके या नावाचा उलटा क्रम) यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले. १९०२ मध्ये त्यांचा दुसरा विवाह झाला. १९०३ साली भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून त्यांना नोकरी लागली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. १९०६ साली त्यांनी वंगभंग चळवळीच्या निमित्ताने आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.

१९०८ साली लोणावळ्याला ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था त्यांनी सुरू केली. ती पुढे दादर येथे हलविली. तिचेच रूपांतर नंतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ मध्ये झाले.

१९०९ साली फाळके जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्यायावत तांत्रिक शिक्षण घेऊन आले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पुढे दादासाहेबांनी १९१० मध्ये सुवर्णमाला नावाचे अत्यंत कलापूर्ण असे मराठी-गुजराती मासिकही सुरू केले; परंतु १९११ च्या प्रारंभी भागीदारांशी मतभेद झाल्यावर या व्यवसायाशी त्यांनी आपला संबंध तोडून टाकला.

उद्विग्न मनः स्थितीत असतानाच मुंबईत गिरगावमधील अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ या तंबूवजा चित्रपटगृहात (हल्ली तेथे हरकिसनदास हॉस्पिटल आहे) १५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपटनिर्मितिविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.

मध्यंतरीच्या काळात परदेशातून चित्रपटविषयक वाङ्‍मय मागवून त्याचा अभ्यास त्यांनी चालू ठेवला. पुढे आपली बारा हजार रूपयांची विमा पॉलिसी गहाण टाकून १ फेब्रुवारी १९१२ रोजी ते इंग्‍लंडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्‍या फिल्मची मागणी नोंदवून १ एप्रिल १९१२ रोजी ते भारतात परत आले. सर्व सामग्री १९१२ च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले.

भांडवलासाठी पत्‍नीचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. आपल्या चित्रपटासाठी त्यांना स्त्रीकलावंतही मिळू शकली नाही. अशा अडचणी असूनही फाळक्यांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर आपले चित्रपटनिर्मितिगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्रसहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला. दादासाहेब पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात व चित्रपट दाखवीत.

पौराणिक चित्रपटासाठी योग्य अशी देवळे, घाट, लेणी व वाडे तसेच नैसर्गिक परिसर नासिकला असल्याने फाळके यांनी ३ ऑक्टोबर १९१३ रोजी मुंबईहून नासिकला स्थलांतर केले. राजा हरिश्चंद्रानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली व तो १९१४ च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा एक विनोदी लघुपटही ते दाखवीत.

पुढे सत्यवान सावित्री नावाचा आणखी एक चित्रपट तयार करून तो त्यांनी १९१४ च्या जून महिन्यात प्रदर्शित केला. या दोन्ही चित्रपटांना भरघोस यश प्राप्त झाल्यामुळे फाळक्यांनी नवीन यंत्रसामग्री आणण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याच वर्षी इंग्‍लंडला प्रयाण केले. भारतीय चित्रपटाला परदेशात बाजारपेठ मिळावी, हाही एक उद्देश फाळक्यांनी मनात बाळगल्यामुळे आपल्या सोबत त्यांनी मोहिनी भस्मासुर, सत्यवान सावित्री व अन्य चित्रपटांच्या प्रती घेतल्या होत्या. इंग्लंडच्या वास्तव्यात तेथील दोन निर्मात्यांनी फाळके यांना भारतीय कथाप्रसंगावर इंग्‍लंडमध्ये चित्रपटनिर्मिती करण्याचा आग्रह धरला, त्यासाठी लागणाऱ्या भारतीय कलाकारांचा व संबंधित नोकरांचा खर्च करण्यासही ते तयार होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्यांना भारी पगाराची नोकरी व नफ्यात भागीदारी देऊ केली होती, परंतु फाळके यांनी स्वदेशीच्या ओढीमुळे ती मान्य केली नाही.

भारतात १९१४ मध्ये परतल्यावर फाळके लघुपट-व्यंगपटांकडे वळले. उदा., आगकाड्यांची मौज, नाशिक-त्र्यंबक येथील देखावे, तळेगाव काचकारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी, चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक-पूर्णिमा उत्सव, धांदल भटजीचे गंगास्‍नान, संलग्न रस, स्वप्नविहार हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट त्यांनी दोन वर्षांत तयार केले. त्यामुळे अनुबोधपटांच्या जनकत्वाचाही मान त्यांच्याकडेच जातो.भांडवल उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी लहानमोठ्या संस्थानिकांच्या भेटी घेतल्या.

औंध व इंदूर संस्थानांकडून देणगीच्या रूपाने आणि इतर स्‍नेह्यांकडून कर्जाऊ स्वरूपात आर्थिक साहाय्य घेतले व आपला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट ३ एप्रिल १९१७ रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच लंकादहन हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून तोही त्यांनी १९ सप्टेंबर १९१७ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतभर लोकप्रिय ठरून त्याने मुंबई, पुणे, मद्रास व इतरत्रही उत्पन्नाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले.

फाळक्यांचे हे यश पाहून त्यांची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक साहाय्याने ५ लाख रुपये भांडवल उभे करून ‘फाळकेज फिल्‍म लिमिटेड’ ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली; परंतु ती काही कारणांमुळे कार्यान्वित होऊ शकली नाही.

तथापि कोहिनूर मिल्सचे वामन श्रीधर आपटे, माया शंकर भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत १ जानेवारी १९१८ रोजी ‘फाळकेज फिल्मस’चे रूपांतर त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ मध्ये केले व त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत १९१४ पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितिगृहही नासिक येथे त्यांनी उभारले. या संस्थेचे श्रीकृष्णजन्म (ऑगस्ट १९१८) व कालिया मर्दन (मे १९१९) हे फाळकेदिग्दर्शित दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले; परंतु या चित्रपटानंतर फाळक्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून मनःशांतीसाठी ते १९१९ अखेर सहकुटुंब काशीला निघून गेले. येथील वास्तव्यात त्यांनी रंगभूमि हे नाटक लिहून काढले.

अनेक विद्वानांना तसेच लोकमान्य टिळक व दादासाहेब खापर्डे यांनाही त्यातील काही प्रवेश त्यांनी ऐकविले. तथापि दोन भागांत सादर केल्या जाणाऱ्या या सात अंकी नाटकाला व्यावसायिक यश मात्र मिळू शकले नाही. १९२२ साली हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीच्या भागीदारांशी तडजोड होऊन फाळक्यांनी निर्मितिप्रमुख व दिग्दर्शक म्हणून कामाला पुनश्च सुरूवात केली. या संस्थेसाठी महानंदा (१९२३) सारख्या दर्जेदार अशा एकूण ३८ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. १९१८ ते १९३४ या १६ वर्षांच्या काळात हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यांत फाळकेदिग्दर्शित ४० चित्रपट होते. तसेच गंधर्वाचा स्वप्‍न विहार, खंडाळा घाट, विंचवाचा दंश, विचित्र शिल्प, खोड मोडली, वचनभंग इ. लघुपटही फाळक्यांनी त्या संस्थेसाठी दिग्दर्शित केले.

दादासाहेब फाळकेदिग्दर्शित सेतुबंधन हा हिंदुस्थान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट. हा चित्रपट प्रकाशित होईपर्यंत चित्रपटसृष्टीत भारतीय बोलपटाचे आगमन झाले होते. (१९३१) म्हणून माया शंकर भट्ट यांनी दृश्यध्वनिमेलन तंत्राने त्याचे रुपांतर त्याच वर्षी बोलपटात केले.

अशा या भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाला त्यानंतर मात्र व्यवहार विन्मुखतेमुळे निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली; तरीपण त्याही अवस्थेत वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी पूर्वीचा आपला अनुभव जमेस धरून एनॅमल बोर्ड प्रॉडक्शन सुरू केले. तेवढ्यातच कोल्हापूरवरून चित्रपटनिर्मितीसाठी पुन्हा त्यांना निमंत्रण करण्यात आले. कोल्हापूर सिनेटोनसाठी फाळक्यांनी दिग्दर्शित केलेला गंगावतरण(१९३७) हा पहिला बोलपट होय.

भारतीय चित्रपट व्यवसायाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून १९३९ च्या एप्रिल-मेमध्ये मुंबईत एक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी फाळक्यांचा सत्कार करून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना पाच हजार रूपयांची थैली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे नासिक येथे विपन्‍नावस्थेत निधन झाले.

दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून (१९७०) चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो.

 

संदर्भ : 1. Rangoonwalla, Firoze, Ed. Phalke Commemoration Souvenir, Bombay, 1970.

२. मुजावर, इसाक, दादासाहेब फाळके, पुणे, १९७०.

लेखक : बापू वाटवे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate