অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्ही. शांताराम

व्ही. शांताराम

व्ही. शांताराम : (१८ नोव्हेंबर १९०१ – ३० ऑक्टोबर १९९०). भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार. संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. जन्म कोल्हापूर येथे. त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते व कुटुंबाची आर्थिक स्थिती यथातथाच होती. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी अल्प वेतनावर नोकरी केली. अशा प्रतिकूल काळातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय व पाश्चात्त्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले आणि परिश्रम, कल्पकता व स्वयंप्रेरणा यांच्या बळावर शिकत जाऊन श्रेष्ठ दिग्दर्शक बनले. १९१४ साली त्यांनी बालगंधर्वांच्या ‘गंधर्व नाटक मंडळी’त नट म्हणून प्रवेश केला. १९२० साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापलेल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त ते सामील झाले. बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट कलेची मूळाक्षरे तेथे त्यांनी गिरविली.

नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये (स्पेशल इफेक्ट्‌स) अशा प्रत्येक शाखेतील बारकावे व्ही. शांताराम यांनी तेथे अभ्यासले. याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे ‘व्ही. शांताराम’ असे चित्रपटीय नामकरण केले.

हाराष्ट्र फिल्म कंपनीने त्या काळात अनेक मूकपट काढले. त्यांपैकी सुरेखाहरण (१९२१) या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. विशेषतः सावकारी पाश (१९२५) या सामाजिक वास्तवाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणाऱ्या मूकपटाचा शांतारामबापूंवर सखोल परिणाम झाला.

१९२९ साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या नव्या कंपनीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एका सुवर्णयुगाला प्रारंभ झाला. या कंपनीने व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण (१९२९), खुनी खंजर (१९३०), रानीसाहिबा (१९३०), उदयकाल (१९३०), जुलूम (१९३१), चंद्रसेना (१९३१) इ. पौराणिक व देमार (स्टंट) मूकपट निर्माण केले. १९३२ साली आयोध्येचा राजा हा मराठी (हिंदी अयोध्याका राजा) पहिला बोलपट निर्माण करण्यात आला. त्याचे संगीतदिग्दर्शक गोविंदराव टेंबे होते व प्रमुख भूमिका दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक इ. नामवंत अभिनेत्यांनी केल्या होत्या. या बोलपटातील इंद्रदरबाराचे नेपथ्य अतिशय नेत्रदीपक होते.

भारतीय चित्रपटसृष्टीत ‘बायपॅक’ पद्धतीने तयार केलेला पहिला रंगीत बोलपट म्हणजे शांताराम दिग्दर्शित सैरंध्री (१९३३). १९३३ मध्ये ‘प्रभात’चे स्थलांतर कोल्हापूरहून पुणे येथे झाले. अमृतमंथन (१९३४) या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले.

चमत्कृतिपूर्ण थरारक दृश्ये, तसेच नामवंत अभिनेते यांमुळे हा भारतातील पहिला रौप्यमहोत्सव साजरा करणारा चित्रपट ठरला. शांताराम दिग्दर्शित चंद्रसेना हा पौराणिक चित्रपट (१९३५) मराठी, हिंदी, तमिळ अशा तीन भाषांत होता. सागरी वातावरणाची भव्य कलात्मक दृश्ये हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य होय. त्याचे संगीतदिग्दर्शक  केशवराव भोळे होते व प्रमुख भूमिका नलिनी तर्खड, शांता आपटे, सुरेशबाबू माने यांच्या होत्या. बालगंधर्वांची संत एकनाथांची प्रमुख भूमिका असलेला धर्मात्मा (मूळ नाव महात्मा) हा चित्रपट १९३५मध्येच व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केला. अमरज्योती (१९३६) हा दऱ्यावर्दी जीवनाची पार्श्वभूमी असलेला पहिला भारतीय चित्रपट शांतारामबापूंनी दिग्दर्शित केला.

पार्श्वप्रक्षेपण (बॅक प्रोजेक्शन) पद्धतीचे चित्रिकरण, पार्श्वगायनाच्या प्रथेचा प्रारंभ ही या चित्रपटाची ऐतिहासिक महत्त्वाची वैशिष्ट्ये होत. कुंकू (हिंदी - दुनिया न माने, १९३७); माणूस (हिंदी - आदमी, १९३९) व शेजारी (हिंदी - पडोसी, १९४१) हे दृश्य माध्यमातून सामाजिक आशय अत्यंत प्रभावीरीत्या प्रकट करणारे, शांतारामबापू दिग्दर्शित चित्रपट खूप लोकप्रिय व यशस्वी ठरले. प्रभात फिल्म कंपनीने व्यंग्यपट (जंबुकाका, १९३५), चरित्रपट (उमर खय्याम, १९४२) असे या क्षेत्रातील वेगळे प्रयत्नही यशस्वी करून दाखविले. त्यांचे दिग्दर्शनही व्ही. शांताराम यांनीच केले होते.

व्ही. शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि ‘राजकमल कला मंदिर’ या चित्रसंस्थेची स्थापना केली. शकुंतला हा राजकमलचा पहिला चित्रपट (१९४३). हा हिंदी चित्रपट मुंबईच्या स्वस्तिक चित्रपटगृहात १०४ आठवडे चालला. अमेरिकेत व्यापारी दृष्ट्या प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होय. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक   वसंत देसाई होते व जयश्रीने त्यात शकुंतलेची भूमिका केली होती. डॉ. कोटणीस की अमर कहानी (१९४६) हा हिंदी चरित्रपट या प्रतिभावंत कलावंतांच्या कारकिर्दीतील एक यशोशिखर होय. यातील प्रमुख भूमिकाही शांताराम यांनीच केली होती. या चित्रपटाच्या द साँग ऑफ बुद्ध या इंग्लिश आवृत्तीचे प्रदर्शन अमेरिकेत व्यापारी तत्त्वावर करण्यात आले.

१९४७ साली शकुंतला या चित्रपटास व्हेनिस चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट पटकथेचे पारितोषिक मिळाले, तर पुढील वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात तेच पारितोषिक डॉ. कोटणीस की अमर कहानीला प्राप्त झाले.

राजकमलचे शांताराम दिग्दर्शित आणखी काही उल्लेखनीय चित्रपट असे– अपना देश (हिंदी, १९४९; तेलुगूमध्ये नमनाडू), दहेज (हिंदी, १९५०), अमर भूपाळी (मराठी, १९५१), परछाई (हिंदी, १९५२), तीन बत्ती चार रास्ता (हिंदी, १९५३), सुबह का तारा (हिंदी, १९५३), सुरंग (१९५३), झनक झनक पायल बाजे (हिंदी, १९५५), तुफान और दिया (हिंदी, १९५६), दो आँखे बारह हाथ (हिंदी, १९५७), नवरंग (हिंदी,१९५९), स्त्री (हिंदी, १९६१), सेहरा (हिंदी, १९६३), गीत गाया पत्थरोंने (हिंदी, १९६५), इये मराठीचिये नगरी (मराठी; लडकी सह्याद्री की - हिंदी, १९६६), बुंद जो बन गई मोती (हिंदी, १९६८), जल बिन मछली नृत्य बिन बिजली (हिंदी, १९७१), पिंजरा (मराठी, १९७२; हिंदी–पिंजडा, १९७३) इत्यादी. अमर भूपाळी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर चरित्रपट मानला जातो.

यातील घनःश्याम सुंदरा ही होनाजींची भूपाळी या चित्रपटाने अमर केली. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटास सर्वोत्कृष्ट ध्वनिलेखनाचे ‘ग्रां प्री’ पारितोषिक मिळाले. झनक झनक पायल बाजे हा प्रख्यात कथ्थक नर्तक गोपीकृष्ण व संध्या यांच्या प्रमुख भूमिका असलेला नृत्यसंगीतप्रधान, झगमगीत रंगीत चित्रपट होता.

त्यास राष्ट्रपतिपदकासह अनेक पारितोषिके मिळाली. दो आँखे बारह हाथ (१९५७) या संध्या व व्ही. शांताराम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सामाजिक समस्याप्रधान चित्रपटास आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपतिसुवर्णपदक; सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक म्हणून पारितोषिक; बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन बेअर’ हे पारितोषिक; बॉस्टनच्या चित्रपट महोत्सवातील सन्मान्य पारितोषिक; तसेच कॅथलिक, सॅम्युएल गोल्डविन, हॉलिवुड अशी अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके या चित्रपटास मिळाली.

पिंजरा हा व्ही. शांताराम यांचा मराठी सामाजिक चित्रपट अतिशय गाजला. समर्थ पटकथा, उत्कृष्ट अभिनय व सुरेल संगीत यांमुळे तो अत्यंत लोकप्रिय ठरला. व्ही. शांताराम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळजवळ ८० चित्रपट निर्माण केले आणि सु. ६० चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी फुल और कलियॉं (१९६१), राजा रानी को चाहिए पसीना (१९७९) यांसारखे काही बालचित्रपटही निर्माण केले.

चित्रपटकला आणि तंत्र यांच्या विकासासाठी त्यांनी १९७७ साली ‘व्ही. शांताराम चलच्चित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान’ ही सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली. चित्रपटव्यवसायास उपयुक्त अशी यंत्रसामग्री तयार करणे, तसेच समाजाभिमुख व नावीन्यपूर्ण चित्रपट आणि चांगले बालचित्रपट यांना ‘राजकमल’तर्फे सुवर्ण व रौप्य बोधचिन्हे आणि रोख रकमेची पारितोषिके देऊन त्याद्वारे निर्माते व दिग्दर्शक यांना उत्कृष्ट रंजक चित्रपटनिर्मितीसाठी प्रोत्साहन देणे, हे संस्थेचे उद्दिष्ट होते. १९७९ साली मुंबईमध्ये प्रथमच व्ही. शांताराम यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बालचित्रपट-महोत्सव भरवला. पुढे चेन्नई (मद्रास-१९८१) व कोलकाता (कलकत्ता - १९८३) येथेही त्याचे आयोजन केले.

चित्रपट-विषयक अनेक व्यावसायिक संस्थांचे ते संस्थापक-सदस्य होते. मुंबईतील ‘प्लाझा’ हे त्यांचे चित्रपटगृह चित्ताकर्षक आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘चित्रपती’ हा सन्मानीय किताब दिला, तर नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली (१९८०). ‘पद्मभूषण’ हा किताब (१९९२) आणि प्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ही (१९८६) त्यांना लाभला.

शांतारामा हे त्यांचे आत्मचरित्र (१९८६). या चित्रप्रचुर आत्मचरित्रात या प्रतिभाशाली कलावंताची जडणघडण कशी झाली हे तर समजतेच, पण मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रदीर्घ परंपरेची मर्मस्थानेही त्यातून लक्षात येतात. ‘सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌’ हे तीन देदीप्यमान मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. त्यांची प्रतीकात्मक चित्रे राजकमल कलामंदिरातील एका कलागृहावर असून ती प्रत्येक कलाकृतीवर नजर ठेवीत आहेत'', असे शांताराम म्हणतात. त्यांच्या आत्मचरित्राची संकल्पना-शब्दांकन शांताराम यांची कन्या मधुरा जसराजने केले आहे.

व्ही. शांताराम यांचे तीन विवाह झाले. त्यांची पहिली पत्नी विमल (अंबू मुगलखोड– १९२२), दुसरी जयश्री (जयश्री कामुलकर - १९४१) आणि तिसरी संध्या (विजया देशमुख१९५६) होय. यांपैकी जयश्री व संध्या या ख्यातकीर्त अभिनेत्री म्हणून गणल्या जातात. पुढे जयश्रीशी त्यांनी घटस्फोट घेतला (१९५६). त्यांना दोन मुलगे (प्रभातकुमार व किरणचंद्र) आणि पाच मुली (सरोज, मधुरा, चारुशीला, राजश्री व तेजश्री) आहेत. प्रभातकुमार आणि किरणचंद्र यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, तर मुलींपैकी राजश्रीने अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

किरणचंद्र हे डॉ. व्ही. शांताराम चलत्‌चित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राजकमल कलामंदिर (स्टुडिओ) या संस्थांचे एक विश्वस्त आहेत. त्यांनी शेरीफ, ज्यूरी (फिल्म फेस्टिव्हल – १९९६), सदस्य (सेन्सॉर बोर्ड), अध्यक्ष (एम्. पी. एस्. आर. अँड सी. एफ. आणि एशिअन फिल्म फाउंडेशन– २००६), संचालक (एम्. एफ्. एस्. अँड सी. डी. सी.) इ. पदे भूषविली.

सुश्राव्य संगीत हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपटनिर्मितीच्या यशातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रामलाल, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर इ. नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले.

व्ही. शांताराम यांच्या ठायी असलेल्या औदार्याचे व माणुसकीचे विलोभनीय दर्शनही काही प्रसंगांतून घडते. भारतीय चित्रपटाचे पितामह चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे उत्तरायुष्य अतिशय विपन्नावस्थेत गेले.

त्या काळात व्ही. शांताराम यांनी आत्मीयतेने त्यांचा उदरनिर्वाह काही काळ चालविला. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रातील या दोघांचा पत्रव्यवहार हृदयद्रावक तर आहेत, परंतु समस्त कला क्षेत्रातील मान्यवरांना अंतर्मुखही करणारा आहे.

या श्रेष्ठ चित्रपतीचे मुंबई येथे निधन झाले.

 

लेखक : विजय दीक्षित

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

सैरंध्री : पहिला भारतीय रंगीत मराठी चित्रपट, १९३३

झनक झनक पायल वाजे : हिंदी , १९५५
जल बिन मछली नृत्य बिन बिजली : हिंदी, १९७१
दो आंखे बारह हाथ चित्रपटाच्या इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड समवेत - व्ही. शांताराम गीत गाया पथरॉने : हिंदी, १९६५ पिंजरा : मराठी , १९७२

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate