অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपला चंद्रपूर

आपला चंद्रपूर

आपला चंद्रपूर

  • क्षेत्रफळ– १०,६९० चौ.कि.मी.
  • उपविभाग – चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, राजुरा
  • तालुके - चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी, राजुरा, सावली, कोरपना जिवती.
  • गावांची संख्या - १,७९२
  • लोकसंख्या – एकूण- २१,९४,२६२
  • पुरुष -     ११,२०,३१६           महिला- १०,७३,९४६
  • ग्रामीण -   १४,२४,४२४           शहरी- ७,६९,८३८
  • स्त्री / पुरुष   गुणोत्तर –  ९५९    महिला प्रती १०००
  • घनता – १९० माणसे / चौ.कि.मी.

आज चंद्रपूर हे नाव प्रचलीत असलेला हा जिल्हा प्राचीन काळी लोकापूर या नावाने ओळखला जात असे. याचेच नामांतर काही काळानंतर इंद्रपूर आणि त्यानंतर चंद्रपूर असे झाले. ब्रिटीशांच्या कारकीर्दीत हा जिल्हा चांदा या नावाने ओळखला जाऊ लागला. सन १९६४ मध्ये चांदा हे नाव बदलून पुन्हा चंद्रपूर असे करण्यात आले. या प्रदेशावर ब-याच काळापर्यंत  हिंदू आणि बुद्ध राजाची सत्ता होती. या भागावर राज्य करीत असलेल्या वैरागडच्या मान राजाकडून नवव्या शतकात गोंड राजांनी सत्ता हस्तगत केली. सन १२४० ते १७५१ पावेतो म्हणजे येथे मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होईपर्यंत गोंड राजांचीच सत्ता होती. मराठे राजे रघूजी भोसले हे सन १८५३ मध्ये विनावारस मृत्यू पावल्यानंतर नागपूर प्रांतासहीत चंद्रपूर हे ब्रिटीश साम्राज्याला जोडण्यात आले.

सन १८७४ पासून चंद्रपूर जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा म्हणून गणला जाऊ लागला. सन १८७४ पावेतो जिल्ह्यात मूल, वरोरा व ब्रम्हपुरी ह्या तीन तहसिली होत्या. त्यानंतर सन १८७४ मध्ये मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपूष्टात येऊन त्यातून चार तहसिली  चंद्रपूर जिल्ह्याला जोडण्यात आल्यात व या तहसिलीचे मुख्यालय सिरोंचा ठेवण्यात आले. सन १९०५ मध्ये गडचिरोली मुख्यालय असलेली नवीन तहसील निर्माण करण्यात आली. सन १९०७ मध्ये नव्यानेच निर्माण झालेल्या दुर्ग जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनदारीचा काही भाग स्थानांतरीत करण्यात आला. याच वर्षी लोअर सिरोंचा तहसिलीतील केरला, अवलका आणि नुगूर या या तीन विभागांचा जवळजवळ १५६० चौ.कि.मी. हिस्सा संलग्न मद्रास राज्यांना स्थानांतरीत करण्यात आला. सन १९११ ते १९५५ या काळात जिल्ह्यांच्या सिमांमध्ये व त्यांच्या  तहसिलींमध्ये कोणतेही फेरबदल झाले नाही. सन १९५६ मधील राज्य पुनर्रचनेचा परिणाम म्हणून पूर्वी मध्यप्रदेशात असलेला हा जिल्हा मुंबई राज्यात विलीन करण्यात आला. याच वर्षी हैद्राबाद राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तहसील ही नांदेड जिल्ह्यास जोडण्यात आली. त्यानंतर ती नांदेड जिल्ह्यातून वगळून सन १९५९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यास जोडण्यात आली.

सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याचा निर्मिती झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा म्हणून गणल्या जाऊ लागला. या वेळी जिल्ह्यात एकूण सहा तहसिली होत्या. हा जिल्हा आकारमानाने भारतात दुस-या व महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा होता. दिनांक १ मे १९८१ पासून जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना तहसिलींचा दर्जा देण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात सहा ऐवजी एकूण अठरा तालुके झालेत. नंतर प्रशासकीय सोयीसाठी जिल्ह्याची दिनांक १६ ऑगस्ट १९८२ रोजी विभाजन करण्यात येऊन गडचिरोली, धानोरा, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी आणि एटापल्ली या आठ तहसिली नवीन निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट झाल्यात. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मुल, गोंडपिपरी आणि राजुरा या दहा राहिल्यात. १५ ऑगस्ट १९९३ पासून मूल आणि राजुरा या दोन तहसिलींचे विभाजन होऊन सावली आणि कोरपना या दोन स्वतंत्र तहसिलींची निर्मिती झाली, तसेच १५ ऑगस्ट २००० पासून चंद्रपूर आणि गोंडपिपरी या दोन तहसिलींचे परत विभाजन होऊन बल्लारपूर व पोंभुर्णा या दोन तहसिलींची निर्मिती झाली. पुन्हा ऑक्टोबर २००४ पासून कोरपना व राजुरा तहसिलींमधून नवीन जिवती तहसील निर्माण झाली. अशा प्रकारे  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण १५ तहसिली निर्माण झाल्या आहेत.

 

स्रोत: शिक्षक मंच

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate