অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानसशास्त्रातील करिअरच्या संधी

मानसशास्त्रातील करिअरच्या संधी

मानवी मनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य मानसशास्त्र या विषयात केले जाते. मानवी मनाची उकल करण्याचा प्रयत्न अनेक कवी, तत्वज्ञ, लेखक, समाजशास्त्रज्ञांनी केले आहे. समाजातील प्रत्येकासाठी मानवी मन हे कुतूहलाचा विषय राहिला आहे. एखादी तरल भावकविता असो अथवा मनाची गुंतागुंत असो अबोध मन नेहमीच माणसाला खुणावत असते. मानवी मनाचा आणि मानवी वर्तणुकीचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून केलेला शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र त्यालाच सायकॉलॉजी असेही संबोधले जाते.

तसे पहिले तर मानसशास्त्राच्या अभ्यासाचा उगम ग्रीक संस्कृतीत सापडतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानसशास्त्र हा तत्त्वज्ञान शास्त्राचाच एक भाग मानला जात असे. आणि त्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचा अभ्यास सुरु झाला. भारतातही त्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच म्हणजे १९१६ साली झाली. अलिकडे जागतिकीकरण होत असताना झपाट्याने होणारे शहरीकरण, आरोग्य सेवा उद्योगात होत असलेली मोठ्या प्रमाणातील वाढ, मानवी आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता, वाढते वैयक्तिक आणि सामाजिक ताणतणाव, वाढती गुन्हेगारी या सर्व घटकांचा विचार केल्यास मानसशास्त्राच्या अभ्यासकांना काम करायला मोठा वाव आहे. तणावाचे व्यवस्थापन होत नसल्याने वाढत जाणारे नैराश्य, मोठ्या प्रमाणात वाढत जाणाऱ्या आत्महत्या पाहता समुपदेशक म्हणून करिअरचे मार्ग उपलब्ध होतायत.

या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मानवी भावनांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा अर्थ लावण्याची मनापासून आवड हवी. संवेदनशीलता, तारतम्य, सतत निरीक्षणे घेण्याची आणि त्यातून निष्कर्षांप्रत पोहोचण्याची चिकाटी आणि संयम, मेहनत या गोष्टी खूप आवश्यक ठरतात. मनाविषयी आणि त्याचा खोल शोध घेण्याची जिज्ञासू वृत्ती हवी. सहकार्यवृत्ती असेल तर चांगल्या पद्धतीने काम करता येईल. संघभावना आणि सामंजस्य हेही स्वभावात असणे गरजेचे ठरते. अनेक महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठ स्तरावर मानसशास्त्रातील विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध असलेले दिसतात. सामान्यत: कोणत्याही अभ्यासशाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसशास्त्रातील पदवी शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. तसेच मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणात अनेक अभ्यासशाखा समाविष्ट झालेल्या दिसून येतात.

विविध अभ्यास शाखा


कौन्सेलिंग सायकॉलॉजी (समुपदेशन मानसशास्त्र)

विषयातील तज्ज्ञ समाजातील सर्व घटकांच्या (स्त्री, पुरुष, वृद्ध) कौटुंबिक किंवा नातेसंबंधांतील अडचणींवर समुपदेशन करतात. सहकार्यवृत्ती असेल तर चांगला समुपदेशक म्हणून आपण नाव कमवू शकता.

क्लिनिकल सायकॉलॉजी

या प्रकारातील तज्ज्ञ रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी काम करतात. भावनिकदृष्ट्या दुर्बल, मनोरुग्ण किंवा प्रदीर्घ आजारामुळे त्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट करतात. रुग्णाच्या मानसिक समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर ते उपाय सुचवतात. तसेच मानवी मनाच्या अबोध अवस्थेचा अभ्यास करतात.

क्लिनिकल न्यूरो सायकॉलॉजी

मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मनोवस्था सांभाळणे किंवा त्यासंबधीच्या अडचणी सोडविणे. विक्षिप्त वर्तणूक असणाऱ्या, विकृतीकडे झुकलेल्या मानवी मनाचा सखोल अभ्यास यात येतो.

शैक्षणिक मानसशास्त्र

शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्या तसेच पालक, पाल्य, शिक्षक यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांचा अभ्यास करून मुलांच्या सक्षम, निकोप वाढीसाठी योग्य समुपदेशन करतात. विशेषतः मानसिक कल चाचणीने मुलांच्या भावविश्वातील अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो.

इंडस्ट्रियल सायकॉलॉजी (औद्योगिक मानसशास्त्र)

या शाखेतील तज्ज्ञ सरकारी, खासगी तसेच अन्य व्यवसायातील निगडित समस्यांचा अभ्यास करून कामगारांच्या कार्यपद्धतीत, मानसिकतेत सुधारणा घडवून आणत उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमतेत सुधार घडवतात.

स्पोर्टस् सायकॉलॉजी (क्रीडा मानसशास्त्र)

या विषयातील तज्ज्ञ खेळाडूंच्या मनोवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करतात. तसेच क्रीडा विश्वातील अनेकांच्या मानसिक स्थित्यंतराविषयी अभ्यास यात केला जातो.

क्रिमिनल सायकॉलॉजी (गुन्हे तपासासाठी मानसशास्त्र)

गुन्हेगार, कैदी, आरोपी शोधण्यासाठी गुन्हा कोणत्या मानसिकतेतून घडला असेल हे शोधून काढत या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती गुन्हे तपासात योगदान देतात. गुन्हेगार किंवा गुन्ह्याने पीडित व्यक्तींचे समुपदेशनही या अंतर्गत केले जाते. कैद्यांच्या मानसिक अभ्यासासाठी आता जगभरात संशोधन केले जात आहे. गुन्हेगार हा कायमचा गुन्हेगार नसतो त्याच्या पाठीमागे असणाऱ्या मानसिक समस्यांचा अभ्यास करून त्या भूमिकेतून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची उकल केली जाते.

करिअरच्या संधी


मानसशास्त्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करता येते तसेच अनेक रूग्णालयात समुपदेशक म्हणून नोकरी करता येते. तसेच स्वयंसेवी संस्थामध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. अनेक उद्योगक्षेत्रे तसेच माध्यमातील अनेक संधी या शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध होतात. किवा स्वत:चे समुपदेशन केंद्र देखील सुरु करता येईल. उत्तम पगाराच्या संधी आता या क्षेत्रात निर्माण होत आहेत. महाविद्यालये, मनोरुग्णालये, समुपदेशन केंद्रे येथे शिक्षक, सल्लागार म्हणून करिअर करता येईल.

मानसशास्त्राचे शिक्षणक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था


सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई. ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई. रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, मुंबई. मुंबई विद्यापीठ, कलिना. (मानसशास्त्र विभाग) – पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (क्लिनिकल सायकॉलॉजी, कौन्सेलिंग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी), अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन कौन्सेलिंग सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सायकॉलॉजी हे विषय उपलब्ध आहेत. त्याचा कालावधी एक वर्ष आहे. यासाठी अर्हता मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी.

मुंबईच्या रुपारेल, कीर्ती, के. जे. सोमया आणि जयहिंद महाविद्यालयात मानसशास्त्र विषयक अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सायकॉलॉजी, मुंबई. सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स, पुणे, फर्ग्युसन कॉलेज, पुणे इथेही मानसशास्त्राचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.विस्तारत जाणारे जग आणि पुसल्या जाणाऱ्या सीमारेषा यातून विविध लोकसमूह एकत्र जोडले जात आहेत.

विविध संस्कृतींचे परस्परावरील आक्रमण आणि भौतिक वादाच्या बदलत जाणाऱ्या संकल्पना यात मानवी मनाची अवस्था आणि घुसमट मोठ्या प्रमाणात होते आहे. रोजच्या जीवनात वाढलेली गुंतागुंत आणि न सोडवता येणारे अनेक प्रश्न यात मानवी मनाचे प्रश्न सोडवण्यासाठी मानसशास्त्र ही शाखा कार्यरत असते. कालानुरूप मानवी मनाच्या अनेक समस्या भेडसावणार आहेत आणि यातील मनुष्यबळाची निकड भासणार आहेच तेव्हा रस आणि चिकित्सकवृत्ती असणाऱ्यांसाठी करिअरचा हा मार्ग फलदायी ठरू शकतो. 

लेखक - सचिन पाटील

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate