অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एलिमेंटरी व इंटरमिजीएट परिक्षेतील यशासाठी

एलिमेंटरी व इंटरमिजीएट परिक्षेतील यशासाठी

राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला ड्रॉईंग ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा) या परिक्षेची तयारी कशी करावी, या विषयीचे सविस्तर मार्गदर्शन करणारा श्रीमती व्ही.एस.आर.वारेगावकर यांचा लेख..

ड्रॉईंग ग्रेड परिक्षांची प्रमाणपत्रे दृककलांच्या विशेष उच्च अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता म्हणून मानली जातात. तांत्रिक, अभियांत्रिकी आणि इतर संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करु इच्छिणाऱ्या तसेच जीवनातील इतर व्यवसाय अंगीकारणाऱ्या विद्यार्थ्यांना या ड्रॉईंग ग्रेड परीक्षा अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.

ड्रॉईंग ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा) दरवर्षी होते.सर्वसामान्यतः इ. 7 ते 10 वी या वर्गांतील विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र असतात.एकुण सहा विषयांच्या प्रश्नपत्रिका या परिक्षेसाठी असतात.या परिक्षेत आधी कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात असे,मात्र नविन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि विचारांच्या प्रकटीकरणाला भरपुर वाव आहे .गुण देताना देखिल या दोन गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंटरमिजीएटला बसायला हवे. विद्यार्थ्याने सर्व म्हणजेच सहाच्यासहा विषयांच्या परीक्षा देणे गरजेचे आहे. एका विषयात जरी विद्यार्थी गैरहजर असेल आणि बाकी पाच विषयात 'अ' श्रेणी संपादन केली असेल तरी तो विद्यार्थी या परिक्षेत अनुत्तीर्ण ठरतो.

परिक्षेला जाताना आवश्यक साहित्य सामग्री सोबत असणे आवश्यक आहे. यात ए - 4 साइजच्या ड्रॉईंग पेपरपेक्षा किंचीत मोठा बोर्ड किंवा कार्डबोर्ड, पेन्सील एच बी, 2 बी, 4 बी, 6 बी, शार्पनर, सर्व साहित्य असलेला कंपास बॉक्स, 12 इंचाची पट्टी (स्केल), वॉटरबॅग, पाण्यासाठी वाटी, रंग बनविण्यासाठी पांढरी प्लेट,गोल व चपटे मोठे ब्रश व लहाण ब्रश,लहान सुती कापड किंवा स्पंज, वॉटर कलर्स, पारदर्शक व अपारदर्शक क्रेयॉन कलर, लहान रबर इत्यादी सामग्री सोबत असावी. परिक्षेत रबरचा उपयोग कमीत कमी करावा. रंग आवश्यक तेवढेच घ्यावेत. ब्रश वेळोवेळी धुवावा. पाणी वेळोवेळी बदलाव. रफ स्केच बुक सोबत ठेवावे. स्केच आत्मविश्वासाने करावीत. चित्रे मोठी काढण्याचा प्रयत्न करावा.

एलिमेंटरी व इंटरमिजीएट या दोन्ही परिक्षेचे सहा पेपर यामध्ये 1.मुक्त हस्तचित्र (free hand drawing), 2.स्थिर चित्र (still life ), 3.स्मरण चित्र (memory drawing and colouring), 5.निसर्ग चित्र (nature drawing and colouring), 6.कर्तव्य भूमिती (plane geometry) या विषयांचा समावेश आहे.

1.मुक्त हस्तचित्र –

या चित्रात भौमितीक साधनांचा वापर करण्यास मज्जाव आहे. या विषयात स्केल आखून आलेख काढलेले आढळल्यास किंवा ट्रेस पेपर किंवा छापण्याचा प्रयोग केल्यास या विषयात अनुत्तीर्ण केले जाते. त्यामुळे एकुण निकालावरच अनिष्ट परिणाम होतो. दिलेल्या छापलेल्या ड्रॉईंगपेक्षा दीड-दोन पटीने पेपरच्या आकाराला साजेशा आकाराचे चित्र काढावे. संपूर्ण चित्राच्या प्रमुख रेषा प्रथम अतिशय हलक्या हाताने म्हणजे पेन्सिलवर आवश्यकतेनुसार ते गडद करावे. हा नियम पाळल्यास रबराची यत्किचितंही जरुरी भासत नाही. चित्र स्वच्छ दिसण्याच्या हेतूनेच केवळ रबरचा वापर करावा. एलिमेंटरी परिक्षेत शक्यतो कृष्णधवल चित्रे दिले जाते. इंटरमिजीएट परिक्षेत रंगीत चित्र दिले जाते. छापील रंग असतील तर रंगाला साजेसे रंगकाम करावे लागते. जलरंगानेच चित्र रंगवणे बंधनकारक असते. अचूक ड्रॉईंग व प्रमाणबद्धता महत्त्वाची ठरते. दोन्ही परिक्षांसाठी वेगवेगळे चित्र दिले जाते. पण चित्र दिले आहे तसेच बनवायचे असते.

2. स्थिर चित्र (still life)

या विषयात मानवनिर्मित वेगवेगळ्या अंदाजे चार ते पाच वस्तू आणि नैसर्गिक तीन ते पाच वस्तू अशा एकूण सर्व मिळुन सात ते दहा वस्तुंचा समूह स्थिरपणे दिसेल अशा ठिकाणी नजरेच्या थोड्याखाली ठेवलेल्या असतात. एलिमेंटरीपेक्षा इंटरमिजीएट परिक्षेत दोन ते तीन वस्तू जास्त असतात. समोर ठेवलेल्या वस्तू आपल्या नसलेल्या जागेवरुन जशा दिसतात तशा आपल्या कागदाच्या आकाराला शोभेल अशा रेखाटाव्यात. लहान आकाराचे चित्र उत्कृष्ट असूनही त्या चित्राचा विचार केला जात नाही.त्याला ‘ड ’ श्रेणी दिल्या जाते.

चित्र रेखाटताना पेन्सिल व रबर यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही भौमितीक साधन साहित्याचा वापर करण्याची परवानगी नसते. स्थिर चित्राचे डिझाईन होता कामा नये. झाल्यास त्याचा विचार केला जात नाही. दिलेल्या कागदाच्या सर्व बाजूने अंदाजे एक इंचा इतकी बॉर्डर काढावी. वस्तूचे चित्र त्या आयतात सुसंबद्ध व प्रमाणित असणे महत्त्वाचे. वस्तुचा घाट परस्परांशी संबंधित चित्रनिर्मितीला सुयोग्य असाच असावा. वस्तुवरील छायाप्रकाश, पोत स्वतःला जाणवत असेल, त्याप्रमाणे दाखविण्याचा प्रयत्न तुमच्या रेखाटनातून व्हायला हवा. सौंदर्य अधिक उठावदार करण्यासाठी जलरंग व क्रेयॉन यापैकी एक किंवा अनेकाचा वापर आवश्यकतेप्रमाणे करु शकता.

3.स्मरणचित्र (memory drawing)

या विषयात कल्पना व प्रत्यक्ष प्रसंगातील आपल्याला जाणवणारी स्मृती या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. या चित्रातही भौमितीक साधनांचा वापर करु नये केल्यास त्या चित्राचा विचार केला जात नाही. काही घटक, किंवा दोन ते तीन विषय दिले जातात.त्यातून आपणास योग्य तो विषय निवडून त्याचे एक शीघ्र स्केच करावे चित्र कागदाला शोभेल एवढे मोठे असावे. रंगकामासाठी जलरंग किंवा क्रेयॉन रंगाचा वापर करावा. इंटरमिजीएटला विद्यार्थ्यांकडुन घटक व विषयांची सूक्ष्म निरीक्षण व सुयोग्य रंगकामाची अपेक्षा असते. विषय वास्तवरुपात रेखाट्याला हवा. या विषयाला दीड तास वेळ असतो.

4. संकल्पचित्र (design)-

या विषयाचे चित्र रेखाटताना भौमितीक साधनांचा वापर करता येतो. मात्र हा वापर योग्य तिथे गरजेनुसार करावा. संकल्पचित्रात वेगवेगळ्या आकाराचे, विषयाचे, वस्तूंचे डिझाईन बनविण्यास सांगतिले जाते. त्यात कसा काय व किती घटकांचा वापर करावा याबाबत विद्यार्थ्याला पूर्ण स्वातंत्र्य असते. उदा.पिशवी, पतंग, पॉट, पर्स, साडीची किनार असे विषय दिले जातात. अलंकारिक, भौमितीक, नैसर्गिक, अर्मूत अशा कोणत्याही वस्तूला शोभेल असा आकार बनवावा. एक वस्तू रेखाटुन दुसरी ट्रेस करुनही त्याचा उपयोग करायला सांगितला जातो. तसा ट्रेसपेपरही दिला जातो. त्यानुसार आकार तयार करुन योग्य समर्पक रंगसंगती करुन संकल्पचित्र पूर्ण करावे. योग्य त्या ठिकाणी पोत निर्माण करुन संकल्पचित्राला उठावदार करावे.

5. निर्सगचित्र (nature drawing and colouring ) –

विद्यार्थ्यांना रेखाटनासाठी देण्यात आलेल्या डहाळीला एका ठिकाणी स्थिर स्थितीत आपल्यासमोर घट्ट ठेवावी. ड्रॉईंग काळजीपूर्वक करावे.सूक्ष्म निरीक्षण करुन हलक्या हाताने पेन्सिलच्या साहाय्याने चित्र पूर्ण करावे. रबराचा उपयोग टाळावा. केलेल्या रेखांकनात शक्य तेवढे हुबेहुब पारदर्शक व अपारदर्शक जलरंगानेच चित्र रंगवावे. डहाळीचा कोणताही एक भाग मोठ्या आकारत काढा. यावेळी भौमितीक साधनांचा वापर करता येतो.उदा.त्याचे सांधे, देठ, शिरांसह एखादे पान.

दोन्ही चित्रांची मांडणी दिलेल्या कागदाच्या एकाच बाजूस सुव्यवस्थितपणे करावी. डहाळीच्या मुख्य चित्राला उठाव येईल, अशाप्रकारे मांडणी करावी. एलिमेंटरीपेक्षा इंटरमिजीएटमध्ये डहाळीला फुले हे असतेच. दिलेल्या फुलाचे व डहाळीचे कोणत्याही भागावर आधारित अलंकारिक ,भौमितीक व अर्मूत आकारांपैकी आकृतिबंधाचे एक चित्र मात्र आवश्यक असते.

6.कर्तव्य भूमिती (plane geometry)-

रेषा व रेषेचे भाग, कोन, कोनाचे प्रकार व कोनाचे भाग, कंस व कंसाचे प्रकार, त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार, चौरस व चौरसाचे प्रकार, आयत व आयताचे प्रकार,वर्तुळ व वर्तुळाचे प्रकार व वर्तुळाचे भाग करणे. बहुभूजाकृतीसारखे पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन बनविणे तसेच वरील सर्वात बाजू व कोन दुभागणे, त्रिकोणात गोल व अर्धगोल, चौकोनात चार गोल, अर्धगोल, बर्हिगोल पंचकोनात पाच गोल व सप्तकोनात सात गोल, वर्तुळात चौरस, इंटरमिजीएट परीक्षेत या व्यतिरीक्त पट्टी (स्केल ) ,देवनागरी व रोमन लिपीत अक्षरलेखन असते.

आकृती रचनेच्या सर्वच्या सर्व रेषा असाव्यात.त्या पूसून टाकू नयेत. विद्यार्थ्यांनी आकृती काढताना नीटनीटकेपणा आणि काटेकोरपणा याकडे प्रामुख्याने विशेष लक्ष द्यावे. प्रश्नाचे उत्तर काळी शाई किंवा डार्क पेन्सिलने स्पष्ट दाखवावे.

या सहा प्रश्नपत्रिकांविषयीची माहिती झाल्यामूळेुप्रत्येक विषयाची तयारी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे समजते. समजून उमजून केलेल्या नियमित सरावाने यश हमखास मिळणारच.इच्छुक विदर्थ्यांनी परिक्षेसाठी आपल्या चित्रकला शिक्षकांकडे संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. सगळ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा…..

- श्रीमती व्ही.एस.आर.वारेगावकर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate