অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तंत्रज्ञानावर आधारित कृषी क्षेत्रात अभियंता म्हणून संधी…

तंत्रज्ञानावर आधारित कृषी क्षेत्रात अभियंता म्हणून संधी…

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या भारत देशात कृषी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. बहुसंख्य जनतेच्या उदरनिर्वाहाचे साधन हे कृषी आहे. निरंतर विविध नाविन्यपूर्ण प्रयोग आणि प्रगती करणारा कृषी व्यवसाय आहे. नव-नवीन तंत्रज्ञानामुळे शेती करणे अधिक सोपे झाले आहे. पाणी आणि वीज या समस्येवरही नैसर्गिक उपाययोजना आखाण्यात येत आहेत. कृषी व्यवसायात वापरली जाणारे नवीन तंत्रज्ञान या व्यवसायाला नवे वळण देत आहे.

शेतीसोबत नव तंत्रज्ञानाचा मेळ म्हणजेच कृषी अभियांत्रिकी. आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांची मागणी वाढत आहे. जागतिक अहवालानुसार २०२० पर्यंत कृषी अभियंत्यांची मागणी वाढणार आहे. कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग आणि अन्न उद्योगासाठी यंत्रे व उपकरणे यांची मागणी वाढत असून, त्यांची संरचना आणि ते बनविण्यासाठीचे निर्देश देण्याकरिता तज्ञांची गरजही वाढत आहे.अभियांत्रिकी क्षेत्रातील कृषी अभियांत्रिकी हा एक भाग असून, कृषी अभियांत्रिकी शिक्षणक्रम पूर्ण करून तुम्ही या क्षेत्रात इंजिनिअर म्हणून काम करू शकता. शेतीसंदर्भातील अवजारे व यंत्रांची डिझाईन, बांधणी आणि त्यात नव-नवीन सुधारणा करण्याचे कौशल्य विकसीत होत जाते. वैज्ञानिक सिद्धांत आणि तंत्रज्ञान याचा वापर करून सर्व शेती उत्पादन टिकवून ठेवणे आणि त्यात वाढ करण्यासंदर्भातील संशोधन करणे मुख्य उद्देश आहे.

शेती आणि संबंधीत पूरक उद्योगांसाठी लागणारी अवजारे, उपकरणे, यंत्र यांचे आराखडे तयार करणे ते विकसीत करणे. इलेक्टॉनिक आणि इलेक्ट्रीकल अभियंत्यांशी समन्वय साधून यंत्रे बनवणे. कृषी विषयक साहित्य, यंत्र, यंत्राचे भाग बनविण्यासाठी सुपरवायझरचे काम करणे. अशा विविध जबाबदाऱ्‍या पार पाडता येतात. याचबरोबर जलसिंचन प्रकल्पावर काम करण्याची संधीही प्राप्त होते. कृषी उद्योग, प्रकल्प, सांडपाणी यंत्रणा, मातीची सुपिकता वाढविण्यासंदर्भातील प्रकल्पांवर योजना तयार करणे. अन्न नियंत्रण आणि मातीची धूप रोखणे, सुपिकता वाढविणे यासंदर्भातील प्रकल्पावरही काम करण्याची संधी प्राप्त होते. धान्य प्रक्रिया, धान्य पॅकेजींग उद्योगांना धान्य प्रक्रिया प्रणालीचे डिझाईन तयार करणे, संशोधन आणि विकास-विक्री आणि प्रसिद्धीसाठीही काम करण्याची संधी प्राप्त होते.

कृषी अभियांत्रिकी शिक्षणक्रमानंतर कृषी अभियांत्रिकी विभाग, जल व्यवस्थापन विभाग, छोटे जलसिंचन प्रकल्प, कृषी यंत्र उत्पादन संस्था, टीगार्डन, फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया, राष्टीय धान्य महामंडळ, दुग्ध, धान्य, शेती उद्योग, राष्टीय दुग्ध विकास बोर्ड, नाबार्ड आणि अन्य शेतीविषय बँक, वैज्ञानिक परिषद आणि औद्योगिक संशोधन, कृषी विद्यापीठे, अशासकीय स्वयंसेवी संस्था, कृषी अवजारे उत्पादन, कौन्सिल ऑफ फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन कौन्सिल ऑफ नेसले, अमूल, मदर डेअरी इत्यादी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

ॲग्रीकल्चर इंजीनिअरींग बी.टेक. कोर्समध्ये ॲग्रीकल्चर सिस्टम मॅनेजमेंट, एक्वाकल्चर इंजीनिअरींग, डेअरी ॲण्ड फुड इंजीनिअरींग, इरिगेशन ॲण्ड ड्रेनेज इंजिनिअरींग, पारंपारिक ऊर्जास्त्रोत, वॉटर रिसॉर्सेस डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट फार्म मशिनरी ॲण्ड पावर, सॉईल आणि शेती संरचना या विषयांचा समावेश शिक्षणक्रमात असतो.

ॲग्री इंजिनिअरींग शिक्षणक्रमासाठी इंडीयन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च नवी दिल्ली संपूर्ण भारतभर एक सामाईक परिक्षा घेते. राज्यात गव्हर्नमेंट ॲग्री कॉलेज धंतोली, नागपूर, खुर्ड येथे अभियांत्रिकी आणि संशोधन शासकीय महाविद्यालय, वसंतराव नाईक कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट कॉलेज इन वाघपूर येथे असून, राज्यभर विविध जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

लेखिका - श्रद्धा मेश्राम

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate