অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औदयोगिक समेट

औदयोगिक समेट

औदयोगिक समेट: (कन्सिलिएशन, इंडस्ट्रिअल ). अनेक औदयोगिक कलह समेट यंत्रणेव्दारा सोडविले जातात. समेटामध्ये कोणी एक तटस्थ यंत्रणा काहीही दबाव न आणता उत्पादक व कामगार यांच्यामध्ये पारस्परिक करार घडवून आणते. या तटस्थ यंत्रणेला आर्थिक व सामाजिक धोरणांचा विचार करावा लागत असल्याने, तिचे काम निश्चितच अवघड व दुष्कर बनते. या तटस्थ व्यक्तीचे काम लवाद देणारा (आर्बिट्रेटर) वा न्यायनिर्णय करणारा (अ‍ॅडज्युडिकेटर) या दोहोंपेक्षा अतिशय वेगळे असते. कलह करणाऱ्या दोन व्यक्तींमधील वा पक्षांमधील भांडणाची दरी शक्यतो कमी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या कामात त्याला यश आले नाही, तर दोन गटांमधील मतभेदांचे प्रमाण त्यांना सल्ला देऊन जास्तीतजास्त कमी करण्याचा, त्याचबरोबर त्यांच्यात तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करणे असा असतो.

औदयोगिक कलहाचा परिणाम संपात व टाळेबंदीतच होतो, असे नसून बरेचसे कलह वाटाघाटींच्या मार्गाने सोडविण्यात येतात. मालकांचे व कामगारांचे प्रतिनिधी एकत्रित बसून वादगस्त प्रश्नांचा विचार करतात आणि या चर्चेतून अनेकदा तडजोडीचा मार्ग निघतो. तडजोडीने कलह मिटविणे, हे मालकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. विशेषत: उदयोगधंदयांच्या भरभराटीची अथवा तेजीची स्थिती असताना कामगार सर्वसाधारणपणे उदयोगांमध्ये तणावाची परिस्थिती टोकापर्यंत जाऊ न देता तेदेखील तड-जोडीला तयार होतात. अशा रीतीने औदयोगिक कहलाची परिणती सन्मान्य तडजोडीमध्ये होणे, हेही उदयोगधंदयांच्या व देशाच्या दृष्टीने हितप्रद असते. कारण प्रत्येक वेळेस कलहाचे फलस्वरूप संप अगर टाळेबंदी घडण्यात झाले, तर उदयोगधंदे मरगळ अवस्थेत जातील; त्याचबरोबर देशाच्या औदयोगिक प्रगतीमध्ये कुंठितता येईल.

सुरूवातीला शासकीय यंत्रणा औदयोगिक कलहांकडे मालक आणि कामगार यांच्यामधील अंतर्गत झगडे म्हणून अजिबात लक्ष देत नसे. परंतु उत्तरोत्तर कलहांचे प्रमाण व संख्या यांत वृद्धी होत गेली आणि तिचा परिणाम सामाजिक झळींमध्ये होईल की काय, अशी भीती निर्माण झाल्यावर मात्र शासनाच्या भूमिकेत बदल होत गेले. औदयोगिक कलहांवर कायमची बंदी घालावी येथपासून ते कलह तडजोडींच्या श्रेयस्कर मार्गाने सोडविण्यात यावेत येथपर्यंतचे, विविध उपाय निरनिराळ्या देशांत वापरण्यात आले.

अनेक औदयोगिक कलह समेट यंत्रणेव्दारा सोडविले जातात. समेटाच्या बाबतीत तटस्थ व्यक्तीचे काम लवाद देणारा किंवा न्यायनिवाडा करणारा यांच्यापेक्षा निराळे असते. भांडणाऱ्या दोन पक्षांमधील भांडणाची दरी मिटविण्याचा प्रयत्न करणे तिच्या हातात असते. जर तिला त्यात अपयश आले, तर त्या व्यक्तीने दोन्ही पक्षांकडील माणसांना उपदेश करून दोन्ही पक्षांमधील मतभेदांची दरी शक्यतो मिटविण्याचा प्रयत्न करणे व दोन्ही पक्षांना तडजोडीच्या जवळ आणणे, असा असतो.

लवाद अधिकारी अथवा लवाद मंडळाचा अध्यक्ष यांनी केलेल्या सूचना व शिफारशी या दोन्ही पक्षांनी दिलेल्या माहितीवर पूर्णपणे आधारित असतात. त्याने त्या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना पूर्णतया विश्वासात घेऊन शांतता आणि सामंजस्य यांचे वातावरण निर्माण करणे जरूरीचे असते. लवाद अधिकाऱ्यांचे ‘फिरते रूग्णवाहिका पथक’ म्हणून वर्णन करण्यात येते.

औदयोगिक शांतता व सुसंवाद यांना जेव्हा केव्हा धोका पोहोचेल आणि त्यायोगे मालक व कामगार ह्यांमध्ये तणाव निर्माण होईल, तेव्हा तेव्हा लवाद अधिकारी आपले कार्य सुरू करतो.

कामगार समस्यांच्या सोडवणुकीकरिता तो केंद्रस्थानी उभा राहतो. औदयोगिक कलहांचा प्रतिबंध करून नंतर समझोता करणे, हेच खरे तर समेटाचे कार्य होय. औदयोगिक कलहाची चाहूल लागताक्षणी किंवा संप वा टाळेबंदी घोषित होताक्षणी समेटयंत्रणा कार्यान्वित होते. थोडक्यात औदयोगिक समेट म्हणजे औदयोगिक कलहात गुंतलेल्या दोन्ही पक्षांना एकत्रित आणणे आणि कलहाचा शेवट सलोख्यात करणे हे होय.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate