অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चलनसंघ

चलनसंघ

सारखेच चलन वापरणारा दोन किंवा अधिक राष्ट्रांचा गट. ज्यावेळी दोन किंवा अधिक राष्ट्रांचे आर्थिक हितसंबंध अत्यंत घनिष्ट होतात, त्यावेळी त्या राष्ट्रांमध्ये निरनिराळी चलने न वापरता एकच समान चलन वापरण्याची इच्छा प्रबळ होते आणि तीतूनच चलनसंघाचा प्रादुर्भाव होतो. मित्रराष्ट्रांचे हितसंबंध एकसारखे कसे आहेत, हे दाखविण्याच्या हेतूनेदेखील चलनसंघ काही वेळा अस्तित्वात आले. शिवाय चलनसंघांमुळे संघातील राष्ट्रांमध्ये एकमेकांना भांडवल पुरवठा करून मदत करण्याची प्रवृत्तीसुद्धा वाढली. ग्रीक नगर-राज्यांनी असे चलनसंघ प्रथम अस्तित्वात आणले. परंतु नगर-राज्यांची जागा मोठ्या राष्ट्रांनी घेतल्यावर नाण्यांच्या टांकसाळी जरी स्थानिक सत्तेखाली राहिल्या, तरी चलनांचे नियंत्रण केंद्रसत्तेकडे सोपविले गेल्यामुळे चलनसंघांची जरुरी भासली नाही.

मध्ययुगीन काळात जर्मनीत विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस जोर आल्याने लहानलहान राज्ये अस्तित्वात आली व म्हणून जर्मनीत मध्ययुगात चलनसंघ पुन्हा स्थापले गेले. चौदाव्या शतकात फ्रॅंकोनिया, स्वाबीया आणि अपर ऱ्हाईन यांचा एक चलनसंघ अस्तित्वात आला. या चलनसंघाचा हेतू समान नाणी पाडून त्यांचा संघातील राज्यांमध्ये सारखा वापर करणे हा होता. सोळाव्या शतकानंतर जर्मन साम्राज्याने नाणी पाडण्याचे हक्क स्वतःसाठी राखून ठेवले. येनामधील काही प्रबळ राजांनी १६६७ मध्ये एक वेगळा चलनसंघ स्थापल्यामुळे जर्मन साम्राज्यात दुसरे चलन सुरू झाले. १८३८ मध्ये ‘झोलव्हेरीन’ची स्थापना झाल्यावरच जर्मनीत पुन्हा एकमेव चलन सुरू झाले.

८५७ च्या व्हिएन्ना चलनसंघामुळे जर्मनीचे एकछत्री चलन काही काळ नाहीसे झाले, तरी १८७१ मध्ये एकछत्री जर्मन साम्राज्याची स्थापना फ्रान्स, बेल्जियम, स्वित्झर्लंड, इटली यांनी एकत्र येऊन केली. या संघाने फ्रॅंक हे द्विधातुचलन स्वीकारले होते. जर्मनीने व स्कॅंडिनेव्हियाने सुवर्णमानक स्वीकारल्यानंतर लॅटिन संघाच्या द्विधातुचलनाच्या वापरात अडचणी उत्पन्न झाल्या. पहिल्या महायुद्धात या संघातील निरनिराळ्या राष्ट्रांनी कागदी चलन सुरू केल्यानंतर संघाच्या अडचणीत भरच पडली आणि १ जानेवारी १९२७ पासून संघातून निघून जाण्याचे बेल्जियमने १९२५ मध्ये जाहीर केल्यामुळे हा लॅटिन संघ मोडकळीस आला.

विसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय आर्थिक देवीघेवीत, नाण्यांच्या व्यवहारास कमी महत्त्व असल्याने चलनसंघाची जरुरी भासत नाही. आंतरराष्ट्रीय मूल्यविषयक सहकार्य आता आंतराष्ट्रीय चलननिधी या संस्थेमार्फत अंमलात येते.

 

लेखक - ए. रा. धोंडगे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate