অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पैसा

पैसा : विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा. आधुनिक अर्थव्यवस्था श्रमविभागणी व देवघेव ह्यांवर आधारलेली आहे. उप्तादक घटकांचा मोबदला देण्याकरिता, कर्जाचे व्यवहार पुरे करण्याकरिता पैशाचा उपयोग केला जातो. वस्तू किंवा सेवा यांची देवघेव सर्वमान्य विनिमय माध्यमाद्वारे होण्यापूर्वी वस्तूंची किंवा सेवांची प्रत्यक्षपणे देवघेव होत असे. मीठ देऊन कापड घेणे, गवंडीकामाचा मोबदला धान्याच्या रूपात देणे अशा पद्धतीचे वस्तुविनिमयावर आधारलेले व्यवहार प्रगत मानवजातीस गैरसोयीचे वाटू लागले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून एखादी वस्तू वापरणे. पिसे, हाडे, धान्य, हत्तीचे दात, वाघाचे कातडे, मेढी, घोडे, हत्ती आदी वस्तूंचा आणि जनावरांचा जगाच्या विविध भागांत विनिमय माध्यम म्हणून उपयोग करण्यात येत असे. पैशाच्या उत्क्रांतीमधील पुढील टप्पे म्हणजे नाणी, कागदी चलन आणि पतपैसा हे होत. नाणी व कागदी चलन सरकारमान्य पैसा होय. बँकनिर्मित पतपैशाचा देवघेवीचे साधन म्हणून उपयोग होत असला, तरी त्यास सरकारी पाठबळ नसते. त्यामुळे तो स्वीकारलाच पाहिजे असे कायदेशीर बंधन नसते.

पैशाची कार्ये

विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा सर्वग्राह्य असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होते. मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुसरे महत्त्वाचे कार्य होय. दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैसा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे, तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पुरे करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. पैशाच्या या गुणामुळे दीर्घमुदतीचे व्यवहार करणे शक्य आणि सुलभ होते. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैशामध्ये खरेदीशक्ती असते. तीमुळे वस्तू व सेवा पैशाच्या साहाय्याने खरेदी करून त्यांचा साठा करण्यापेक्षा पैशाच्या स्वरूपातच संपत्ती ठेवली, तर त्या शक्तीचा केव्हाही उपयोग करता येतो. संपत्तीचे हस्तांतर करणे पैशामुळे सोपे होते.

द्रव्यराशी सिद्धांत

पैशाचे मूल्य पैशाच्या खरेदीशक्तीवर अवलंबून असते. वस्तू महागल्या म्हणजे पैशाची खरेदीशक्ती कमी होते. एका रुपयात पूर्वी जेवढ्या वस्तू खरेदी करता येत असत, त्यापेक्षा कमी वस्तू मिळू लगतात. उलटपक्षी वस्तूंच्या किंमती खाली आल्या म्हणजे पैशाची खरेदीशक्ती वाढते. वस्तूंच्या किंमतींचा व पैशाच्या मूल्याचा असा परस्पसंबंध असतो. वस्तूंच्या किंमती का बदलतात याचे विश्लेषण केले, तर पैशाचे मूल्य बदलते, हे अप्रत्यक्षपणे समजून येते. पैशाचा पुरवठा कमी-जास्त झाला, की वस्तूंच्या किंमती कमी-जास्त होतात, असे प्रतिपादन करणाऱ्या सिद्धांतास पैशाचा ‘द्रव्यराशी सिद्धांत’असे म्हणतात. पैशाचा पुरवठा वाढला, म्हणजे वस्तूंच्या किंमती वाढतात म्हणजेच पैशाची किंमत कमी होते. उलटपक्षी पैशाचा पुरवठा कमी झाला, की वस्तूंच्या किंमती कमी होतात आणि पर्यायाने पैशाची किंमत वाढते, असा हा सिद्धांत आहे. पूर्ण रोजगारीच्या गृहीत तत्त्वावर हा सिद्धांत आधारलेला आहे. द्रव्यराशी सिद्धांत सोळाव्या शतकातील अर्थशास्त्रज्ञांना अस्पष्टपणे प्रतीत झाला होता.

अठराव्या शतकात जॉन स्ट्यूअर्ट मिलने आपल्या पोलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात या सिद्धांताचा उल्लेख केला असला, तरी बीजगणितातील समीकरणाच्या साहाय्याने सिद्धांताची नेमकी मांडणी अर्व्हिंग फिशर या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने केल्यामुळे त्या सिद्धांताशी त्याचे नाव निगडित झाले आहे. फिशरच्या म्हणण्याप्रमाणे वस्तूंचा पुरवठा कायम राहिला आणि चलनातील पैसा दुपटीने वाढला, तर वस्तूंच्या किंमती दुप्पट होतात आणि पैशाचे मूल्य निमपट होते; तसेच चलनातील पैसा निमपट झाला, तर वस्तूंच्या किंमतीही निमपट होतात आणि पैशाचे मूल्य दुप्पट होते. फिशरच्या मते अन्य वस्तूंचे मूल्य जसे त्या वस्तूला असलेली मागणी व त्या वस्तूचा पुरवठा यांवरून ठरते, त्याप्रमाणे पैशाचे मूल्यदेखील पैशाला असलेली मागणी आणि पैशाचा पुरवठा यांवरून ठरते. वस्तू व सेवा यांच्या खरेदीविक्रीसाठी पैशाची मागणी केली जाते. वस्तूंचा पुरवठा स्थिर राहिला म्हणजे पैशाला असलेली मागणीही स्थिर राहते. सारांश, पैशाचे मूल्य पैशाच्या पुरवठ्यावरून म्हणजे द्रव्यराशीवरून ठरते. फिशरच्या या विवेचनास ‘रोख व्यवहार दृष्टिकोण’असेही म्हटले जाते. फिशरचा दृष्टिकोण पिगू, मार्शल, रॉबर्टसन आदी केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांना मान्य नाही. त्यांच्या मते लोक पैशाची मागणी करतात, ती वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून नव्हे. पैशाची मागणी प्रामुख्याने मूल्यसंचयासाठी केली जाते. रोख पैसा जवळ बाळगणे म्हणजे पर्यायाने वस्तू व सेवा जवळ बाळगणे होय. लोक रोख पैसा तीन कारणांसाठी जवळ बाळगतात. दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी, भविष्यकाळात उद्‌भवणाऱ्या संभाव्य अनपेक्षित अडचणींना तोंड देण्यासाठी आणि सट्टेबाजीच्या हेतूसाठी लोकांना पैसा हवा असतो. पैशाचे मूल्य हे पैसा रोख स्वरूपात ठेवण्यासाठी लोकांची जी पैशाला मागणी असते तीवर अवलंबून असते. लोकांनी आपल्याजवळील द्रव्यसंचय वाढविण्याचे ठरविले, तर वस्तूंच्या खरेदीविक्रीवरील खर्च कमी होईल. परिणामी वस्तूंच्या किंमती खाली येतील, म्हणजेच पैशाचे मूल्य वाढेल. उलटपक्षी लोकांनी आपल्याजवळ कमी प्रमाणात पैसा बाळगण्याचे ठरविले, तर वस्तूंच्या खरेदीविक्रीवरील खर्च वाढेल, वस्तू महागतील आणि पैशाचे मूल्य घटेल. केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांच्या या विवेचनास 'रोकड शिल्लक सिद्धांत' असेही म्हणतात.

केन्सने फिशर आणि केंब्रिज अर्थशास्त्रज्ञ या दोघांच्या दृष्टिकोणांवर कडाडून टीका केली. प्रारंभी त्याने केंब्रिज दृष्टिकोणाचा पाठपुरावा केला;परंतु १९२९ च्या महामंदीमुळे सनातन द्रव्यराशी सिद्धांताच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि केन्सने आपले विश्लेषण पुन्हा पारखून घेतले. पैशाच्या पुरवठ्याचा आणि किंमतींतील बदलाचा संबंध इतका प्रत्यक्ष व सहज नसतो, असे केन्सने दाखवून दिले. केन्सला पूर्ण रोजगारीचे गृहीतकृत्य मान्य नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण रोजगाराची पातळी गाठली जाईपर्यंत पैशाच्या पुरवठ्यातील वाढ वस्तूंच्या उत्पादनात वाढ घडवून आणील आणि त्यानंतर मात्र किंमती वाढू लागतील. ही प्रक्रिया एकदम घडून येणार नाही, टप्प्याटप्प्याने येईल. पैशाचा पुरवठा वाढला की व्याजदर खाली येईल, गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल, उत्पादन वाढेल, अर्थव्यवस्था हळूहळू पूर्ण रोजगारीची पातळी गाठण्याचा प्रयत्न करील. दरम्यान देशातील उत्पादन खर्च वाढेल आणि मग किंमती वाढू लागतील, असे केन्सने म्हटले आहे. पैशाचा पुरवठा वाढला किंवा पैसे अधिक प्रमाणात खर्च होऊ लागले, की लागलीच भाववाढ होत नाही. ही प्रक्रिया इतक्या सहजासहजी घडून येत नाही, यावर केन्सने भर दिला आहे.

केन्सने अधिक खोलवर जाऊन किंमती मुळात का वाढतात किंवा घसरतात, याचा शोध घेतला आहे. लोकांचे उत्पन्न वाढले वा कमी झाले म्हणजेच क्रयशक्तीत बदल घडून आला की, मागणीत चढउतार होतात आणि त्यांचा वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होतो. उत्पन्नाची पातळी कायम राखण्याकरिता समाजाची बचत व गुंतवणूक समान असली पाहिजे. कोणत्याही कारणाने गुंतवणूक बचतीपेक्षा कमी झाली, तर राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी घसरते, रोजगारी कमी होते आणि किंमती खाली येऊ लगतात. याउलट गुंतवणुकीचे प्रमाण बचतीहून जादा असेल, तर उत्पन्न व रोजगारी वाढते, समाजाची क्रयशक्ती वाढते आणि किंमती वर जातात. किंमतींची पातळी स्थिर राखण्यासाठी द्रव्यराशी सिद्धांतावर आधारलेल्या चलननीतीपेक्षा उत्पन्न-खर्च सिद्धांतावर आधारलेली राजकीय नीती अधिक प्रभावी ठरते, असे केन्सने दाखवून दिले आहे. अर्थशास्त्रीय विचारांवर केन्सच्या विश्लेषणाचा पगडा बराच काळ होता. १९६०च्या सुमारास शिकागो विद्यापीठात सनातन सिद्धांताला पुन्हा उजाळा मिळाला आहे. नोबेल पारितोषिक विजेते मिल्टन फ्रीडमन यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन पैशाचा पुरवठा आणि किंमतींची पातळी यांमधील अन्योन्य संबंधांवर बोट ठेवले आहे. द्रव्यराशी सिद्धांताकडे सिद्धांत म्हणून न पाहता एक दृष्टिकोण म्हणून पाहिले पाहिजे, असे त्यांनी सुचविले आहे.

 

 

संदर्भ : 1. Crowther, Geoffrey, An Outline of Money, London, 1963.

2. Friedman, Milton, Ed. Studies in the Quantity Theory of Money, New York, 1956.

3. Keynes, J. M. The General Theory of Employment, Interest and Money, London, 1936.

4. Keynes, J. M. A Treatise on Money, 2 Vols., London, 1930.

लेखक - भेण्डे सुभाष

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate