অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कलासमीक्षा

कलासमीक्षा व सौंदर्यशास्त्र


सामान्यत एखाद्या चित्रशिल्पादी कलाकृतीच्या कलात्मक मूल्यांसंबंधी चिकित्सापूर्वक दिलेला निर्णय, म्हणजे कलासमीक्षा होय. अशा मूल्यनिर्णायक समीक्षेला एखाद्या कलात्मक मानदंडाचा किंवा निकषाचा अथवा कलात्मक मूल्यमापनाच्या एखाद्या पद्धतीचा आधार असतो.

सौंदर्यशास्त्रात सौंदर्यविषयक संकल्पनांचा, मूल्यांचा, मानदंडांचा किंवा निकषांचा विचार केला जातो. तसेच कलाकृतिविषयक विधानांच्या स्वरूपाविषयी तात्त्विक चिकित्सा केली जाते. अर्थातच सर्वच कलांना समान अशा संकल्पनांची फोड करून त्यांची व्यवस्थित मांडणी सौंदर्यशास्त्र करते. कला किंवा सौंदर्यविषयक अनुभूतीचा किंवा प्रत्ययाचा ज्ञानशास्त्रदृष्ट्या त्यात विचार असतो. या प्रत्ययामध्ये कलावंताच्या वा रसिकाच्या कलानिर्मितीच्या प्रेरणेचाही अर्थ सांगितलेला असतो. याउलट कलासमीक्षेचे कार्य मुख्यतः विशिष्ट कलाकृतींच्या प्रत्यक्ष स्वरूपाची मीमांसा करणे, हे असते. अर्थात सौंदर्यशास्त्रातील संकल्पनांचा उपयोग कलासमीक्षेत केला जातो व कलासमीक्षेतील मूल्यनिर्णायक विचारांचाही सौंदर्यशास्त्रास उपयोग होतो.

कलासमीक्षा आणि कलेचे तत्त्वज्ञान

कलेचे तत्त्वज्ञान भाष्यात्मक असून, त्यात सर्वसामान्य कलाक्षेत्रातील तत्त्वे, त्यांतील प्रतीकात्मक अर्थ आणि अर्थवत्ता यांसारख्या विषयांचा अंतर्भाव होतो. याउलट कलासमीक्षेत विशिष्ट कलाकृतीच्या गुणवत्तेचे विवेचन महत्त्वाचे असते. तथापि हे दोन्हीही विषय परस्परपूरकच आहेत.

कलासमीक्षेचे कार्य

कलासमीक्षेचे कार्य साहित्यसमीक्षेसारखेच विशिष्ट कलाकृतींच्या प्रत्यक्ष स्वरूपाची मीमांसा करणे, विशिष्ट निकष लावून त्यांचे मूल्यमापन करणे, इतर कलाकृतींशी त्यांची सांगोपांग तुलना करणे, कलापरंपरांशी असलेला त्यांचा संबंध तपासणे, त्यांच्या तंत्रांची वैशिष्ट्ये सांगणे, त्यांच्या प्रेरणांचा मागोवा घेणे, त्यांच्या परिणामांचे वर्णन करणे, त्यांच्या रसग्रहणाचे संभवनीय मार्ग सांगणे या स्वरूपाचे असते. कलासमीक्षेत कलाकृतींच्या अभ्यासावर व अनुभवांवर आधारलेल्या निकषांनुसार आणि पद्धतींनुसार विशिष्ट कलाकृतीचे परीक्षण करण्यात येते. पहिल्यावहिल्या कलाकृतीवर ज्या अनामिक समीक्षकांनी मते व्यक्त केली असतील, तेव्हापासून कलासमीक्षेची सुरुवात झालेली आहे. मात्र साहित्यसमीक्षेच्या आणि तात्त्विक सौंदर्यशास्त्राच्या मानाने कलासमीक्षेची वाढ फार उशीरा सुरू झाली, असे म्हणावे लागेल. युरोपातील प्रबोधनकाळातच आजच्या कलासमीक्षेचा उगम शोधावा लागेल.

कलासमीक्षेचे प्रकार

सामान्यत: कलासमीक्षा लिखित स्वरूपात किंवा प्रत्यक्ष कृतिस्वरूपात प्रकट होते. कृतिस्वरूपातील कलासमीक्षेचे स्वरूप कलाकृतींचा संग्रह करणे, कलावंतांना आश्रय देणे, कलाकृतींचे संवर्धन करणे, त्या दृष्टीने त्यांची पुनःस्थापना करणे किंवा कलाकृतींचा विध्वंस करणे इ. प्रकारे व्यक्त केले जाते. या कृतिरूप कलासमीक्षेमागे धार्मिक, राजकीय वगैरे विचारसरणी असू शकतात.

लिखित स्वरूपातील कलासमीक्षा दोन प्रकारची संभवते

एक म्हणजे विवेकात्म कलासमीक्षा व दुसरी म्हणजे भावनात्म व कल्पनात्म कलासमीक्षा. विवेकात्म कलासमीक्षा तर्कसंगत विवेचनावर आधारित असते व पुष्कळदा ती सौंदर्यशास्त्रीय तत्त्वांचे उपयोजन करते. दुसर्‍या प्रकारची कलासमीक्षा एखाद्या कलाकृतीमुळे होणार्‍या कलासमीक्षाच्या भावनात्मक प्रतिक्रियांची निदर्शक असते. अशी समीक्षा पुष्कळदा दृक्‌प्रत्ययवादी किंवा अभिव्यक्तिवादी ठरते. परंतु हे दोन्ही प्रकार परस्परव्यावर्तक वा परस्परविरोधी असत नाहीत. प्रत्यक्षात हे दोन्ही प्रकार एकाच विवेचनात मिसळून गेल्याचेही दिसून येते. याशिवाय ऐतिहासिक दृष्टीने कलाकृतींचा विचार करून त्यांच्या सामाजिक वा सांस्कृतिक महत्त्वावर भर देणारी; तसेच कलावंताच्या व्यक्तिमत्त्वास महत्त्व देऊन त्याच्या कलाकृतींचा अभ्यास करणारी आणि एखाद्या कलाकृतीच्या अस्सलपणाचा शोध घेणारी, असे कलासमीक्षेचे विविध प्रकारही संभवतात.

कलासमीक्षेचे घटक कलासमीक्षेला अनेक अंगे

त्यांतील पहिले कलाकृतीच्या विविध घटकद्रव्यांच्या अभ्यासाशी व त्या द्रव्यांचा उपयोग करण्याच्या तंत्रांशी निगडित आहे. चित्रकलेत रंगद्रव्ये, पाणी, तेल इ. माध्यमे यांचे अनेक प्रकार असतात. भिंती, कागद, चित्रफलकइ. अनेक प्रकारचे पृष्ठभाग वापरले जातात. रेखनाच्या आणि लेपनाच्या विविध पद्धती आणि तंत्रे संभवतात. या सर्वांचा सूक्ष्मपणे आणि व्यवस्थितपणे कलाकृतीत साधलेल्या परिणामांशी संबंध लावता येतो. हा संबंध अनुभवाने, म्हणजे वस्तुनिष्ठपणे, सिद्ध करता येतो. कलासमीक्षक जेव्हा कलाकृतीचे तांत्रिक विश्लेषण करतात, तेव्हा ते रंगद्रव्ये, माध्यमे, पृष्ठभाचे अथवा फलकाचे गुणधर्म, लेपनपद्धती अथवा रेखनपद्धती यांचे संदर्भ देऊन कलाकृतीचे वर्णन करतात. ज्याप्रमाणे संगीतसमीक्षेत वाद्यांची, वादनपद्धतींची इ. आणि साहित्यसमीक्षेत शब्दयोजनेची व रचनापद्धतींची चर्चा केली जाते; त्याप्रमाणे शिल्पसमीक्षेत शिल्पद्रव्यांची आणि स्थापत्यसमीक्षेत स्थापत्यद्रव्यांची चिकित्सा केली जाते.

कलासमीक्षेचे दुसरे अंग म्हणजे दृश्यसंघटनेच्या तत्त्वांचा विचार. ह्या तत्त्वांना भौतिक आणि मानसशास्त्रीय मज्जातंतुशास्त्रीय असा दुहेरी आधार शोधला जातो. चित्रफलकावरील अवकाशाची संघटना, त्यांतील आंतरभेद, त्यांतील रेषांचे व घनाकारांचे गुणधर्म, त्यांतील पोताचे गुणधर्म, त्यांतील रंगांच्या परस्पराकर्षी व विकर्षी प्रवृत्ती इ. विविध दृश्यतत्त्वांचा विचार करण्यात येतो.

कलासमीक्षेचे तिसरे अंग म्हणजे नैसर्गिक जगातील विविध गोष्टींच्या दृश्यगुणांची कलाकृतीतील दृश्यरूपांशी तुलना करणे. प्रतिरूप अथवा वास्तवानुसारी कलाकृतीत मनुष्यदेह, पशुपक्षी, व्यक्तीचा चेहरा, नैसर्गिक देखावा, स्थिरदृश्य इत्यादींचे चित्रण करतात. दृश्य प्रमाणबद्धतेचे तत्त्व वास्तवानुसारी पद्धतीने किंवा प्रतिभानुसारी पद्धतीने पाळले जाते. वास्तवाशी असलेले कलाकृतीचे साम्य संदर्भ म्हणून विचारात घेतले जातेच.

अप्रतिरूप कला हा आधुनिक कलेतील एक प्रवाह आहे. अशा कलाकृतीच्या समीक्षेत साहजिकच विशुद्ध दृश्यगुणांचाच विचार केला जातो. पण यांतही आलंकारिक आकृतींपासून विशिष्ट संस्कृतिनिष्ठ अथवा व्यक्तिनिष्ठ दृश्यप्रतीकांपर्यंत नाना प्रकारच्या अप्रतिरूप दृश्याकृती आढळतात. कधी कधी वास्तवसदृश आकृती आणि अप्रतिरूप आकृती यांची सरमिसळही आढळते. वेगवेगळ्या कलासमीक्षकांनी अशा कलाकृतींच्या रसग्रहणाच्या व मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबिलेल्या दिसतात.

कलासमीक्षेचे एक चौथे अंगही आढळून येते. पुष्कळदा विशिष्ट कलाक्षेत्रातील चळवळींचा, घराण्यांचा आणि विशिष्ट चित्रकारांच्या चित्रांचा सूक्ष्म अभ्यास करून किंवा विशिष्ट संस्कृतीच्या वा परंपरेच्या चित्रकलेचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांची विशिष्ट प्रतीकव्यवस्था, रंगस्वभाव, रचनाप्रवृत्ती, अवकाशसंघटनापद्धती, पोत इत्यादींची छाननी करून त्यांची वैशिष्ट्ये साधार व सापेक्ष रीतीने दाखवून दिली जातात.

कलासमीक्षेचे अखेरचे महत्त्वाचे अंग म्हणजे मूल्यमापनाचे. हे मूल्यमापन अनेकदा कलासमीक्षकाने कलाकृतीच्या केलेल्या वर्णनात अध्याहृत असते. कलासमीक्षक जी विशेषणे वापरतात, ती अनेकदा भावनारंजित आणि म्हणून व्यक्तिगत प्रतिक्रियेची निदर्शक असतात. कित्येकदा कलासमीक्षक इतर मान्यवर कलाकृतींचा मानदंड वापरून एखाद्या कलाकृतीचे मूल्यमापन करतात. प्रकल्भ समीक्षेत ‘मला अमुक कलाकृती सुंदर वाटली’, ‘अमुक कलाकृती थोर आहे’ यांसारखी आत्मनिष्ठ विधाने क्वचितच केली जातात. कलासमीक्षा ही एक शिस्त आहे; तिचा वाचक किमान रसिक आहे, हे गृहीत धरूनच ती केली जाते. पुष्कळदा जागतिक चित्रकलेच्या परंपरा आणि त्यांतील आधुनिक प्रवाह यांच्याशी आपल्या वाचकाची ओळख आहे, असेही गृहीत धरले जाते. यामुळे कलासमीक्षकाचे विवेचन कित्येकदा संबंधित कलाक्षेत्राची प्रत्यक्ष माहिती नसलेल्या सौंदर्यशास्त्रज्ञाला कळणे अवघड गेले, तरी जाणकार रसिकाला सहज कळते.

कलासमीक्षेतील विवाद्यता

कलासमीक्षेची अशी सर्वमान्य सामान्य परिभाषा नसली, तरी तांत्रिक बाबी आणि दृश्यरचनातत्त्वे यांच्या बाबतीत अशी परिभाषा प्रचलित आहे. लाल रंगाला कोणताही समीक्षक शीत रंग म्हणणार नाही; किंवा अमुक दोन रंगांमधील संबंध विकर्षी आहे, हे सांगणारे विधान सर्व कलासमीक्षकांत निर्विवाद ठरू शकेल. दृश्यकला ह्या प्रत्यक्ष असल्यामुळे त्यांतील कलाकृतींच्या दृश्य स्वरूपाची वस्तुनिष्ठ व अचूक वर्णने करता येतात आणि ती वादग्रस्त ठरणारही नाहीत. मात्र या वर्णनांत जेव्हा भावनारंजित शब्दप्रयोग येतात किंवा मूल्यवाचक विधान केले जाते किंवा विशिष्ट अभिरुचीचा आग्रह व्यक्त केला जातो, तेव्हाच वाद उपस्थित होतात. भावनारंजित शब्दप्रयोग, मूल्यवाचक विधाने आणि विशिष्ट अभिरुचीचे आग्रह हे कलासमीक्षेत अपरिहार्य असतातच; त्याशिवाय कलासमीक्षा संभवतच नाही. अशा वादग्रस्त गोष्टींमागे कोणत्या संकल्पना आहेत व त्यांचे परस्परांशी व वस्तुस्थितीशी काय संबंध असू शकतील, यांचा विचार मात्र सौंदर्यशास्त्रात मोडतो.

भारतात ज्याप्रमाणे संगीत आणि साहित्य यांचा सूक्ष्म विचार प्राचीन काळी केला गेला, त्याप्रमाणे चित्र, शिल्प, स्थापत्यादी दृश्यकलांचा केला गेला नाही. तसेच आधुनिक इहलोकनिष्ठ दृष्टिकोनातून एक स्वायत्त मानवी व्यवहार म्हणून दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा भारतीय परंपरेला परकी असावी.

लेखक : १) दिलीप चित्रे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate