অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गालिचा

गालिचा

गालिचा हा एक कलात्मक विणकामाचा आजवर विकसित होत आलेला प्राचीन प्रकार आहे. जमिनीवर अंथरण्यासाठी, दारावरील पडद्यांसाठी, भिंतीवरील शोभाप्रावरण आणि सौंदर्यपूर्ण भेटवस्तू म्हणून गालिचे उपयोगी पडतात. पांघरूण, छत्र, पायघड्या व थडग्यावरील आच्छादन म्हणून तसेच प्रार्थना व धार्मिक विधी यांसाठीही गालिच्यांचा वापर होतो.

स्थूल इतिहास

प्राचीन मानव हातरी म्हणून प्राण्यांची कातडी वापरत असे. नंतर प्राण्यांचे केस व सुताचे धागे एकत्र गुंफून आणि त्यांस गाठी मारून थोड्याफार प्रमाणात कलात्मकता आणली गेली. पुढे कपडे विणण्याचे व सूत रंगविण्याचे तंत्र अवगत झाल्यावर गालिचासारखा प्रकार निर्माण झाला. रासायनिक आणि वनस्पतिजन्य रंगांची त्यात आकर्षक भर पडली. ही कला प्रथम मध्यपूर्वेकडील देशांत विकास पावली. यानंतर गालिचा विणताना लांबीरुंदीबरोबरच गालिच्यांच्या गुबगुबीत जाडीचे प्रमाण कसे आणावे, याचा भारतात शोध लागला. यासाठी ज्यूट, लोकर आणि कापूस इत्यादींचा वातीसारखा मिश्र जाड धागा व लोकरीचा झुबकेदार पुंजका यांचा वापर सुरू झाला. पौर्वात्य देशांत गालिच्यांमध्ये अशा पुंजक्यांच्या गाठी एक चौ. सेंमी. मध्ये जितक्या जास्त तितका तो अधिक मूल्यवान समजतात. विणण्याची कला अवगत झाल्यापासून कापडावरील उठावाचे तंत्र निर्माण झाले. त्यातून आटऱ्या, गाठी व पोत निर्माण करणार्‍या विविध विणींचे प्रकार निघाले. अशा विणकामात मग नक्षी, चित्रे इ. गुंफण्यात येऊ लागली. आशियाई देशांत सुरुवातीला सतरंजीसाठी एका धाग्याची गाठ निर्माण झाली आणि तेथून हे तंत्र यूरोपात गेले. विविध उंचवटे किंवा उठाव साधून गालिचे गुबगुबीत बनविण्यात येऊ लागले. हातमागावर विणलेले गालिचे तर्‍हेतर्‍हेच्या नक्षीकामांनी व रंगसंगतीने युक्त असतात.

इराण, तुर्कस्तान, अरब राष्ट्रे, सोव्हिएट रशियाचा काही भाग, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत व चीन या देशांतील कलापूर्ण गालिचे पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. इराण आणि काश्मीर येथे गालिचानिर्मितीचे मोठे उद्योग आजही चालू आहेत. अलीकडे पाश्चात्य राष्ट्रांत गालिचे व जाजमे यांत्रिक पद्धतीने तयार करतात.

गालिचा या प्रकारात परंपरागत सात वाण आहेत : (१) तुर्की, (२) कॉकेशियन, (३) इराणी, (४) मध्य आशियाई, (५) भारतीय, (६) चिनी आणि (७) फ्रेंच (टॅपेस्ट्री). पश्चिम आशियाई देश, तुर्कस्तान इ. ठिकाणी इ. स. पू. सहाव्या शतकाच्या सुमारास उत्कृष्ट गालिच्यांची निर्मिती सुरू झाली व ती फेल्ट अथवा वातघाग्यांच्या विणीची होती. हे गालिचे फार मोठे असत. यांत इतर धाग्यांबरोबर सुवर्ण व चांदीच्या तारांचा समावेश असे. मधूनमधून त्यांत मूल्यवान रत्नेही गुंफीत असत. या गालिच्यांवर सुंदर उद्याने, वृक्षवेली, पर्णफुले, झरे इत्यादींची दृश्ये विणलेली असत. पुढे इस्लाम धर्माचे वर्चस्व या प्रदेशात प्रस्थापित झाल्यावर गालिचानिर्मितीस बरीच चालना मिळाली. राजे लोकांच्या आश्रयाखाली मोठ्या प्रमाणावर हा उद्योग विकसू लागला व इतर देशांत या गालिच्यांची निर्यात होऊ लागली. नक्षीतील लयबद्धता व गुंतागुंतीचा आकृतिबंध या बाबतींत इराणी व मध्यपूर्वेतील मुस्लिम विणकर फारच तरबेज होते. गालिच्यांसाठी लागणारी उत्तम प्रकारच्या लोकरींची पैदास कॉकेशियस लोक करीत असत.

रंगसंगती

हिरवट निळा रंग हा मुस्लिम लोकांचा पवित्र रंग. हा हमखास त्यांच्या गालिच्यांत असतोच. याखेरीज हिरवा, भडक तांबडा, चॉकलेटी, गुलाबी, स्वच्छ पांढरा, केशरी व काळा या रंगांचा इराणी व तुर्की गालिच्यांमधून सढळ वापर केलेला असतो. यांतील बरेच रंग वनस्पतींपासून बनवितात. उदा., मंजिष्ठ (मॅडर) वनस्पतींच्या मुळांपासून तांबडा, निवडुंगावरील भुंग्यांपासून चकचकीत काळपट तांबडा, नीळ (इंडिगो) या वनस्पतीपासून निळा, केशराच्या देठांपासून पिवळा, हिरवी फळे अथवा विलो वनस्पतीच्या पानांपासून हिरवा आणि हेन्ना (मेंदी) अगर नरसिंगार याच्या फुलांपासून किंवा फणसाच्या झाडापासून नारंगी रंग बनविण्यात येतो. पांढऱ्या व काळ्या धाग्यांसाठी लोकरीचा आणि तपकिरी रंगासाठी उंटांच्या केसांचा उपयोग करतात. वर सांगितलेले वनस्पतिजन्य रंग योग्य प्रकारे व पक्के झाले किंवा नाही, हे केवळ डोळ्यांनी व तर्काने ओळखणारे कसबी रंगारी अजूनही आहेत. या रंगाऱ्यांना गालिचाव्यवसायात फार मोठा मान असतो. वर वर्णिलेल्या विविध रंगांनी विणलेल्या गालिच्यांचे रंग पक्के होण्यासाठी ते नदीच्या किंवा पाण्याच्या प्रवाहात बुडू शकतील अशा बेताने ताणून बांधून ठेवतात व त्यांच्यावरून पाणी वाहू देतात किंवा ते पाण्याच्या हौदात बुडवून ठेवतात व त्यांना पायांनी तुडवितात. नंतर ते बाहेर काढून वाळत घालतात आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात पूर्णपणे वाळवितात.

सूतकाम

वातीसारखे फुगीर व मऊ धागे बनविण्यासाठी उंटांचे केस व लोकर यांच्या पुंजक्यापासून कारागीर लोक चातीवर सूत काततात. हा धागा २५ ते ४५ सेंमी. लांब झाल्यावर त्याच्या एका टोकाला कच्च्या ओल्या मातीची गोळी चिकटवितात व धाग्यास पीळ देतात. असे अनेक धागे एकत्र जोडून मोठे धागे तयार करतात.

 

विणकाम

यासाठी प्रथम आडवे धागे विणलेला एक चौकटीचा भाग उभा केलेला असून त्याच्या एका बाजूस धोट्या (रोलर) असतो. या आडव्या धाग्यांवर निरनिराळ्या रंगांच्या लोकरीचे गुंडे लटकविलेले असतात. त्यांच्या साहाय्याने कारागीर हव्या त्या विणीचे व वाटेल त्या नक्षीचे विणकाम विणून तयार करतात. हे धागे अस्तर धाग्याला मागून घट्ट बांधून पुढील बाजूस सैलसर विणतात व ज्या जाडीचा गालिचा हवा असेल, तसे ते वरून कात्रीने कातरतात. कधी कधी या गालिच्यांच्या विणींत दोन प्रकार असतात. एका प्रकारात भौमितिक आकृत्या, गुंतागुंतीची नक्षी व सांकेतिक प्रतीके उठवलेली असतात. दुसऱ्या प्रकारात फुले, वनस्पती, प्राणी, महिरपी, वेलबुट्ट्या व ऐतिहासिक प्रसंग, कुराणातील वचने व धार्मिक दृश्ये विणलेली असतात. मध्यपूर्व देशांत नमाज पढण्यासाठी व घोड्यावरील खोगिरांसाठी खास नक्षीचे छोटेछोटे गालिचे तयार करतात. श्रीमंत अमीरउमरावांच्या कबरीवरही खास प्रकारचे गालिचे पांघरतात. प्रार्थनेच्या गालिच्यांवर एकाच बाजूने दोन टोके एकत्र मिळणारी महिरप असते. तीवर कुराणातील वचनेही विणलेली असतात.

पाश्चिमात्य गालिचे

सु. दहाव्या शतकापासून स्पेनमध्ये मूर लोक गालिचे बनवू लागले. तेथून ते इंग्लंड, फ्रान्स व इतर यूरोपीय देशांत वापरात येऊ लागले. तेराव्या शतकात व्हेनिस शहरी मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सुंदर नक्षीकाम विणणारे कुशल कारागील आपल्या पदरी ठेवून त्यांच्याकडून उत्तमोत्तम गालिचे तयार करवून घेतले. तेथूनच पुढे सर्व यूरोपभर या प्रकारच्या गालिच्यांचा प्रसार झाला. पोलंडमधील गुबगुबीत रेशमी फूल गालिचे अतिशय मुलायम असतात. कधी कधी यांत सुवर्ण आणि रुप्याच्या बारीक तारांचे विणकामही केलेले असते. फ्रान्समध्ये लुव्ह्‌र येथे सतराव्या शतकाच्या प्रारंभी पौर्वात्य पद्धतीचे गालिचे विणणारी उद्योगशाळा सुरू करण्यात आली. याच सुमारास फुलम, अ‍ॅक्समिन्स्टर व विल्टन येथे सरकारी प्रोत्साहनानेही अनेक कारखाने सुरू झाले. एकोणिसाव्या शतकापासून यंत्रमागावर गालिचे विणण्यास आरंभ झाला. इंग्लंड, जर्मनी, हॉलंड, ऑस्ट्रिया, अमेरिका इ. देशांत आधुनिक आकृतिबंध असलेले गालिचे यंत्रमागावर तयार होतात व त्यांची जगभर विक्री होते. पूर्वी फ्रान्समधील गालिच्यांवर मानवी जीवनातील प्रसंगचित्रांचे बहारदार रंगीत विणकाम हातमागावरच होत असे; परंतु या विसाव्या शतकात मात्र कातीव व सोप्या रंगसंगतीचे गालिचे यंत्रमागावर तयार होऊ लागले.

चिनी गालिचे

अतिपूर्वेकडे मुख्यत: मंगोलियामध्ये लाटीव गालिच्यांच्या बऱ्याच प्रमाणात प्रसार होता. त्यात चिनी विणकरांनी रेशमी विणकामाची भर घालून व इराणी पद्धतीचे अनुकरण करून नव्या तंत्राची निर्मिती केली. चिनी गालिच्यांत अनेकदा मध्यभागी चिनी चित्रकला-पद्धतीने

डोंगर, निर्झर, पशू, पक्षी इत्यादींच्या प्रतिकृती विणून कडेला ड्रॅगनच्या नक्षीकामाचा काठ विणलेला असतो. अशा प्रकारच्या चिनी गालिच्यांचा प्रसार ख्मेर प्रजासत्ताक, कोरिया, सिंगापूर व जपान इ. देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अलीकडे जपानमध्येही यंत्रमागावर सुबक गालिच्यांची निर्मिती होऊ लागली आहे.

भारतीय गालिचे

भारतात सु. ३००० वर्षांपूर्वीपासून गालिचे, दऱ्या, नमदे, सतरंज्या, चटया वगैरे विणण्याची कला रूढ आहे; परंतु तंत्रशुद्ध गालिच्यांचे विणकाम, त्यातील नक्षी, रंग वगैरे गोष्टी कुर्दिस्तान, खोरासान, केरमान या प्रदेशांतून आल्या आहेत. मोगल बादशाहांनी इराण, तुर्कस्तान येथून उत्तम विणकर भारतात आणले आणि गालिचे विणण्याची शाही केंद्रे सुरू केली. विशेषतः सम्राट अकबराने आपल्या देखरेखीखाली ही कला भरभराटीस आणली.

भारतीय गालिच्यांतील सूत हे लोकरीचे धागे, रेशीम, ज्यूट व कापसाचे धागे यांच्या मिश्रणाने करतात; परंतु उत्तम गालिचा फक्त उत्तम लोकरीचे धागे व रेशीम यांचाच बनविलेला असतो. पुष्कळदा भारतीय गालिच्यांत अनेक भारतीय सांकेतिक प्रतीके वा कुराणातील वचने गुंफलेली असतात. उदा., वर्तुळे सनातनत्व दर्शवीत असतात, तर नागमोडी रेषा झुळझुळणारे पाणी व विद्युल्लतेचे अस्तित्व दाखवितात. स्वस्तिक, ओम् ही चिन्हे अंधारातून उजेडाकडे नेणारी ज्ञानपूजक प्रवृत्ती प्रकट करतात, तर वक्राकार धावणाऱ्या रेषा जीवनसातत्य दर्शवितात. वृक्ष, लता, फुले ही उदारतेची प्रतीके असून एकूण पूर्ण गालिच्यांवरील सूचक आकृतिबंधातूनच जीवनाचे धावते दर्शन होते. भारतात गालिचे विणण्याची केंद्रे म्हणून श्रीनगर, अमृतसर, होशियारपूर, मुलतान, आग्रा, अलाहाबाद, मिर्झापूर, जबलपूर व जयपूर ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. या भागात आजही गालिच्यांचे सु. दीडशेहून अधिक कारखाने आहेत. सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर  मिर्झापूर (सिंध) या केंद्रांचाही यांत समावेश होत असे. नक्षीकामासाठी वापरलेली ठसठशीत वक्राकार देठांची वळणे; सौम्य पण तजेलदार रंगसंगती , त्यांतही काळसर हिरवा रंग व गर्द निळ्या रंगाच्या मनोहर छटा यांमुळे भारतीय गालिचे वेधक वाटतात. गालिच्यांच्या जाडसर ठसठशीत नक्षीकलेमुळे मध्यभागातील नाजूक महिरप खुलून दिसते. सुंदर रंगसंगती व कलाकुसरीची प्रमाणबद्धता यांमुळे भारतीय गालिचे कलावैभवाची साक्ष देतात.

एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतातील परंपरागत पद्धतींचे गालिचे जगप्रसिद्ध होते. विसाव्या शतकात मात्र त्यांत बदल होत आहेत. अतिशय मेहनतीचे व दीर्घकालचे विणकाम, भारी किंमत, वस्त्रकलेतील आधुनिक तंत्रे, शोभावस्त्राबद्दलच्या बदलत्या कल्पना इ. अनेक कारणांनी गालिचानिर्मितीचा पारंपरिक व्यवसाय खालवत चालला आहे.

ग्राहक मिळणे दुरापास्त व दुसरे म्हणजे नवकलेतील नव्या नक्षीमुळे, तसेच एकाच गालिच्यावर काळजीपूर्वक काम न करण्याची कारागिराची वृत्ती वगैरे गोष्टींमुळेही गालिचाविणकाम व्यवसायातील स्थैर्य दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामतः गालिच्यांचा दर्जाही उणावत चाललेला आहे. मच्छलीपटनम्, वेरूळ, वेल्लोर, औरंगाबाद, हैदराबाद, बंगलोर, वरंगळ व अय्यमपेट्टई येथेही गालिचे तयार होतात. म्हैसूर आणि मद्रास येथे रेशीम आणि कापड यांपासून गालिचे बनवितात. तसेच मद्रास व त्याच्या परिसरात चित्राकृतींच्या भक्कम विणीच्या सतरंज्या फार मोठ्या प्रमाणावर तयार करतात. यासाठी लागणारे रंग वनस्पती, फळे, फुले व फुलांचे देठ यांपासून मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात. हल्ली काही ठिकाणी रासायनिक रंग वापरले जातात, पण त्यांमुळे भडकपणा वाढतो व पर्यायाने नक्षीतील नाजुकपणा लोप पावतो. अलीकडे खादी व ग्रामोद्योग आयोगातर्फेही गालिचे बनविण्यात येतात. भारतातून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर इ. देशांना गालिचे निर्यात केले जातात.

गालिच्यांचे काही प्रसिद्ध प्रकार

गालिच्यांचे काही प्रसिद्ध प्रकार पुढीलप्रमाणे आहेत

दरी

ही जाड असल्यास अंथरतात व पातळ असल्यास पांघरतात. यावर आडव्या सरळ रेघांचे सोपे, पण मोहक आकृतिबंध असतात. तांबड्या, निळ्या व काळ्या रंगांत ते विणतात. हल्ली असे दरीकाम बंगाल व आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होते. ही विणकामाची कला आर्यकालापासून चालत आलेली आहे, असे म्हटले जाते.

नमदा अगर बुर्णूस

हादेखील गालिच्यांचाच एक प्रकार आहे. नमद्यासाठी लोकरीचे धागे व तंतू एखाद्या वजनी वस्तूच्या साह्याने लाटून चौकोनी आकारात तयार करतात व मग त्यावर लाल, हिरवा, काळा आणि निळा या रंगांत माफक नक्षी विणलेली असते. पूर्वी घोड्यावरील खोगीर नमद्याचेच असत.

गब्बा

गब्बा हा प्रकार खास काश्मीरी आहे. अनंतनाग येथे गब्ब्याच्या विणकामाचे अनेक लहान मोठे कारखाने आहेत. गब्बे तयार करण्याची पद्धत सु. १०० वर्षांपूर्वी प्रचारात आली. आज हा व्यवसाय काश्मीर व अमृतसर येथे फार भरभराटीस आलेला आहे. जुन्या गरम कापडांचे तुकडे एकमेकांस जोडून त्यांचे लांबरुंद कापड बनवितात. हे सर्व तुकडे प्रथम साबणाने धुऊन ते पूर्ण वाळल्यावर गर्द काळ्या, किरमिजी अगर निळ्या रंगात रंगवितात. नंतर त्याला वापरलेल्या कापडाचेच अस्तर शिवतात अगर खळीने चिकटवतात. हे सर्व कापड जमिनीवर अंथरून सुती व लोकरी धाग्यांनी साखळी पद्धतीने विणतात. विणकामाच्या कलाकृतीचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहजस्फूर्त आकार विणला जात असून दुसऱ्या प्रकारात प्रथम सर्व कलाकृती एका मोठ्या कागदावर आखून ती त्या कापडावर टाचून ठेवतात व नंतर रंगीत भुकटींनी ती कलाकृती त्यावर उठवितात. तसेच निसर्गदृश्ये, पानाफुलांचे गुच्छ, पशू, पक्षी, काश्मीरी चिनार वृक्षांची पाने, शिकारीची दृश्ये, वक्राकार वर्तुळाची नक्षी इ. भडक रंगांच्या लोकरींनी सुबक रीतीने त्यावर विणतात. गब्बाप्रकारातील गलदार गब्बा तुकडेजोड पद्धतीने नक्षीच्या आकाराचे कापड एकमेकांस जोडून तयार करतात. या प्रकारात मध्यभागी चांदण्यांची नक्षी व कडेला वेलबुट्टी असते. काही नक्षीप्रकार पुढीलप्रमाणे असतात : कचवती (चौकोन), बंदीरूम (दीर्घ वर्तुळाकार), चार गोळा, खुतूम बूंद, तारांकन, सलीम, हशिया व मेहताब सिंधी इत्यादी. हे सर्व विणकाम झाल्यावर या कापडामागे संपूर्ण अस्तर शिवतात. काही वेळा हे मूळ कापड आणि अस्तर यांमध्ये पातळ कापसाचा थर भरतात, त्यामुळे अशा गब्ब्याचा स्पर्श मुलायम ठरतो.

उपयोग

प्रामुख्याने ऐश्वर्याचे द्योतक म्हणूनच प्राचीन काळापासून गालिच्यांचा उपयोग झाल्याचे दिसते. त्यामुळे राजप्रासाद, सरदार-जहागिरदारांची व धनिकांची दालने, राजदरबार, देवस्थाने व तत्सम पूज्यस्थाने, सार्वजनिक स्वरूपाच्या वास्तू इ. ठिकाणी गालिच्यांचा वापर करण्याची पद्धत रूढ होती. त्या त्या काळातील त्या त्या समाजाच्या गृहशोभनाच्या कल्पनांनुसार गालिच्यांचा विविध प्रकारे उपयोग केल्याचे दिसते. बॅबिलोनियन लोक टेबलावरील आच्छादन म्हणून त्याचा वापर करीत, तर इराणमध्ये राजमार्गावर पायघड्या म्हणून त्यांचा उपयोग होई. भिंतीवरील शोभावस्त्र, पूजा-प्रार्थना आदींसाठी बैठक, थडग्यांवरील आच्छादन, घोड्यावरील खोगीर इत्यादींसाठी गालिच्यांचा उपयोग केला जाई. गालिचे गुंडाळता येत असल्याने त्यांत वहनसुलभता होती. एक मूल्यवस्तू म्हणूनही त्याकडे पाहिले जाई. राजेलोक तसेच सरदार, जहागिरदार परस्परांना नजराणे म्हणून गालिच्यांचा उपयोग करीत. पौर्वात्य देशांत गालिच्यांचा वापर सर्वसामान्य लोकही करीत, असे आढळते. अशा प्रकारे सौंदर्यवर्धन आणि उपयुक्तता या दुहेरी हेतूंनी गालिच्यांचा पूर्वापार उपयोग होत आल्याचे दिसते. आधुनिक काळातही ऐश्वर्याचे प्रतीक व प्रतिष्ठाचिन्ह म्हणून असलेले गालिच्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट निवासी खोल्यांत, कार्यालयांत व मोठमोठ्या दालनांतून गालिचे वापरतात. जमिनीवर आंथरण्याखेरीज गृहशोभनाच्या  दृष्टीने ते भिंतीवर अथवा अन्यत्रही वापरले जातात.

निगा

गालिच्यांची योग्य निगा राखल्यास ते दीर्घकाळ टिकतात. यासाठी गालिचा दररोज व्यवस्थित साफ करून मधूनमधून त्याला प्रकाश व ऊन दाखवावे लागते. निर्वात-ध्रुवकाने त्यातील कचरा वरचेवर काढता येतो. तो फार घाण झाला असल्यास तंत्रशुद्ध रीतीने स्वच्छ करून घ्यावा लागतो. रोज ब्रशाने साफ करून अधूनमधून साबण व गरम पाण्याने साफ केल्यास गालिचा चांगला राहतो. ब्रशिंग गाठींच्या दिशेविरुद्ध करीत नाहीत. गालिचा जळल्यास अगर फाटल्यास एखाद्या निष्णात कारागिराकडून तो त्वरित दुरुस्त करणे इष्ट असते. गालिच्यांच्या कडा व कोपरे लवकर खराब होतात म्हणून त्यांत वेळीच दुरुस्ती करणे इष्ट असते. मध्यभागी तो खराब झाल्यास तेथे गाठी मारून घेणे आवश्यक असते. त्यातील छिद्रे सांधून ध्यावी लागतात. खराब झालेला मोठा गालिचा कापून छोटा केल्यास त्याचा चांगला उपयोग करता येतो.

तंबू ठेवण्याची गालिचावजा पिशवी. १९ वे शतक.तंबू ठेवण्याची गालिचावजा पिशवी. १९ वे शतक.

हाताळणी

वापरामुळे, कसरीमुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळेही गालिचे खराब होतात. म्हणून ते वारंवार हलवून आणि सूर्यप्रकाशात ठेवून त्यांचे काही प्रमाणात रक्षण करता येते. साठवणीतले गालिचे वारंवार तपासावे लागतात. वापरात असलेल्या गालिच्यांना सहसा कसर लागत नाही . तथापि ठेवणीतील गालिच्यांना ती लागू नये म्हणून कसरप्रतिबंधक रसायने वापरतात. बाष्पामुळे धागा खराब होऊन कापड नष्ट होते. ते तसे होऊ नये यासाठी खास उपाय योजतात. गालिचे तयार करताना त्यात काही दोष राहिल्यास ते लगेच दुरुस्त करणे आवश्यक असते, नाहीतर गालिचे लवकर खराब होतात. वारंवार वापरून गालिच्यांची टोके आणि बाजू खराब होतात. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असते. गालिच्यांचे रंग पक्के नसतील, तर ते स्वच्छ करताना काळजी घ्यावी लागते. गालिचे गरम पाणी व साबणाने धुऊन कठीण ब्रशाने साफ करतात; पण ते वाळविण्यासाठी जागा भरपूर लागते, धुळीपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी ब्रश किंवा निर्वात-ध्रुवक यांचा वापर करतात.

गालिचानिर्मिती

गालिचे तयार करण्याचे काम प्राचीन काळापासून हाताने करण्यात येत आहे. तथापि आधुनिक गालिचानिर्मितीत यंत्रांचा, तसेच इतर बऱ्याच प्रकारच्या साहित्याचा वापर करण्यात येतो. विविध प्रकारचे लोकरीचे तंतू वरच्या पृष्ठाभागासाठी तर कापूस, लिनन व तागाचे कापड यांचा अस्तरासाठी उपयोग करतात. लोकरी गालिचे पांहिजे तितक्या जाडीचे तयार करता येतात तसेच त्यांना पाहिजे त्या रंगांच्या छटा देता येतात. हे गालिचे दीर्घकाळ टिकतात व त्यांचा दिखाऊपणाही नष्ट होत नाही. रेशमी गालिचे दिसावयास सुंदर असून त्यांना असामान्य चमक असते; पण ते लवकर मळतात व लोकरीच्या गालिच्यां पेक्षा कमी पेक्षा कमी टिकतात. मात्र रेशमी गालिचे अधिक किंमती असतात. कापसाच्या धाग्याचा उपयोग सर्व गालिच्यांत साखळीसारखा उभा धागा म्हणून करतात. अ‍ॅक्समिन्स्टरमध्ये साखळी धागा असून विल्टन व ब्रुसेल्समध्ये आडवा धागा सूत म्हणून वापरतात. प्लॅक्स धाग्याचा उपयोग कधी कधी टॅपेस्ट्रीकरिता व ब्रुसेल्समध्ये आडवा धागा म्हणून करतात. ताग व हेंप यांचा उपयोग भर म्हणून व गालिच्याला वजन येण्यासाठी, तसेच अ‍ॅक्समिन्स्टरमध्ये आडवा धागा म्हणून बऱ्याच प्रमाणात करतात. तसेच मोहेर, गाय व घोडा यांचे केस वरच्या पृष्ठभागासाठी, तर रॅमीचा उपयोग अस्तरासाठी करतात. पीळ दिलेल्या कागदी धाग्याचा उपयोग आडवा धागा व साखळी धागा म्हणून करण्याचा प्रयत्‍न करण्यात आला होता. लोकरीऐवजी रेयॉन वापरून तयार केलेला गालिचा जास्त काळ टिकतो. अशा गालिच्यांवर टिटॅनियम डाय-ऑक्साइडाचा थर दिल्यास त्यावर धूळ साचून राहत नाही. नायलॉन धागा वापरल्यास गालिचे घर्षणरोधी व जास्त ताणशक्तीचे बनतात. हे गालिचे कमी बाष्पशोषक असून अग्‍निरोधक असतात, पण ते फार महाग असतात. अशा मिश्रधाग्यांचे गालिचे फार लोकप्रिय झालेले आहेत; पण त्यांवर तेलाचे व मेणाचे डाग जलद पडतात व टिटॅनियम डाय-ऑक्साइड वापरल्यास रंग उठावदार होत नाहीत. अ‍ॅक्रिलीन, पॉलिप्रोपिलीन, पॉलिएस्टर इ. धागेही गालिच्यांसाठी वापरले जातात.

रंजनक्रिया

गालिचानिर्मितीत पृष्ठभागाकरिता वापरावयाच्या धाग्याच्या रंजनास फार महत्त्व आहे. रंजनासाठी पक्के रंग वापरतात. प्राथमिक रंजनापूर्वी धागे तैलहीन करणे जरूर असते, नाहीतर रंग व्यवस्थित बसत नाहीत; म्हणून साबण व गरम पाणी यांनी ते व्यवस्थित धुतात व पूर्ण वाळण्यापूर्वी ते रंजनयंत्राकडे नेतात. पुढील सर्व रंजनक्रिया नेहमीच्या रंजनक्रियेसारख्याच आहेत [रंजनक्रिया].

हातगालिचा

हातगालिचा हा सर्वांत जुना प्रकार असून अजूनही काही देशांत तो बनविण्यात येतो. यात उभे धागे दोन आडव्या दांड्यांवर गुंडाळलेले असतात. या दोन दांड्यांमध्ये धागे. उभे असतात. हे दांडे दोन उभ्या खांबांनी जोडलेले असून त्या खांबांमधील अंतर हे गालीच्यांची रुंदी असते. विणकर पुढच्या बाजूस बसतो. तयार होणारा गालिचा खालच्या दांडीवर गुंडाळला जातो. पाच सेंमी. लांबीच्या धाग्याने दोन आडव्या धाग्यांनी सभोवताली गाठी मारतात. ह्या गाठी गालिच्यावरील नक्षीप्रमाणे मारण्यात येतात. नंतर त्यामधून दोन आडवे धागे ओवतात. ह्यांपैकी एक एका रंगछटेत असून तो साखळीच्या मागे अर्धा व पुढे असतो, तर दुसरा दुसऱ्या रंगछटेत असून विणकर साखळीच्या मागून अर्धा ओढून घेतो. नंतर आणखी एक आडवा धागा सरळ ओवतात. यामुळे गालिच्यांची पाठीमागची बाजू तयार होते. गालिच्यांतील गाठींचे काही प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. ह्या शिवाय ट्रॅपेस्ट्री पद्धतीनेही हातगालिचे तयार करतात. हे गालिचे तयार करण्यास फार वेळ लागतो, त्यास फार कुशलता लागते व ते फार महाग असतात.

हातगालिचे हे इतर गालिच्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. ते मागणीनुसार विविध आकारांत व आकारमानांत, तसेच विविध नक्षींचे, रंगांचे व गुणधर्मांचे करण्यात येतात. असे गालिचे भारत, इराण, ईजिप्त, तुर्कस्तान, चीन, मेक्सिको व ग्रीस या देशांत आजही तयार केले जातात व तेथून त्यांची इतरत्र निर्यातही केली जाते.

यंत्रनिर्मित गालिचे

यंत्रनिर्मित गालिच्यांचे अनेक प्रकार आहेत. मुख्यतः ब्रुसेल्स, विल्टन, अ‍ॅक्समिन्स्टर, शनिल, टॅपेस्ट्री, इनग्रेन हे प्रकार त्यांत आढळतात. औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रनिर्मित गालिच्यांची निर्मिती सुरू झाली. ह्यामध्ये प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अमेरिकेत बरेच संशोधन करण्यात आले. अमेरिकेत उत्पादन सुरू होण्यापूर्वीच यूरोपात यंत्रनिर्मित गालिच्यांच्या विणी व प्रकार रूढ झाले होते. यांपैकी काही नावे, ज्या शहरातून हे प्रकार प्रथम सुरू झाले त्या शहरांच्या नावांवरून देण्यात आली. उदा., अ‍ॅक्समिन्स्टर, विल्टन (इंग्लंड), ब्रुसेल्स (बेल्जियम). १८४१ मध्ये इरॅस्टस बिगेलो ह्यांनी गालिच्यांकरिता यंत्रमाग तयार केला. त्यांचा माग प्रथम इनग्रेन गालिच्यांसाठी वापरला गेला. त्यांनी विल्टन, ब्रुसेल्स व टॅपेस्ट्री गालिच्यांसाठीही यंत्रमाग तयार केले. हॅलसिअन स्किनर यांनी १८७६ मध्ये अ‍ॅक्समिन्स्टरसाठी एक माग तयार केला व अलेक्झांडर स्मिथ यांनी त्यात सुधारणा केली. त्यांनी हातगालिच्यांचे तंत्र ह्यासाठी वापरले. इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे यंत्रनिर्मित गालिच्यांची निर्मिती होते. इंग्लंडमधून त्यांची निर्यात होते, तर अमेरिकेतून होत नाही.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ब्रुसेल्स व इनग्रेन प्रकारचे गालिचे वापरात होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आलेला अ‍ॅक्समिन्स्टर हा प्रकार अद्यापिही लोकप्रिय आहे. ब्रुसेल्स प्रकारची जागा विल्टनने घेतली, तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इनग्रेन प्रकार लोकप्रिय होऊ लागला. टॅपेस्ट्री प्रकार मखमली (व्हेल्व्हेट) प्रकार म्हणूनही ओळखला जातो. गुच्छाकार (टफ्टेड) प्रकार वापरेपर्यंत, मखमल व विल्टन प्रकारांतील निर्मितीत काहीच फरक नव्हता. गुच्छाकार प्रकारांतील वर आलेला राशिधागा हा पूर्वी विणलेल्या अस्तरात शिवलेला असतो. हा प्रकार १९३० मध्ये वापरात आला. विणकामाने अस्तर व राशिधागा एकाच वेळी विणल्याने गालिचानिर्मितीत आणखी  महत्त्वाची भर पडली. शनिल हा महाग प्रकार अद्यापिही काही प्रमाणात तयार करतात. १९०० पर्यंतचे गालिचे ६८–९० सेंमी. रुंदीचे होते. नंतर ते ३६० सेंमी. रुंदीचे झाले. आता ते ३६०, ४५० व ५४० सेंमी. रुंदीचे बनविले जातात.

गालिच्यांच्या सर्व प्रकारांत काही निर्मितिगुण सारखे असतात. त्यांच्यातील उभ्या धाग्यास साखळी धागा म्हणतात. जादा आडव्या धाग्यास भरधागा म्हणतात. हा धागा राशिधाग्यास पकडतो, तसेच गालिच्यांत जादा भर घालतो.

मखमल (टॅपेस्ट्री) प्रकार

ह्या प्रकाराच्या मागावर तयार केलेले बहुतेक गालिचे पीळ दिलेल्या पद्धतीसारखे असतात. यात तीन आडवे धागे वापरतात. एक धागा गालिच्यांच्या विणीत असतो, दुसरा राशिधागा व तिसरा भरधागा असतो. मखमली प्रकार फक्त गडद रंगांसाठी वापरला जातो, तरी त्यावर विविधरंगी गालिचे तयार करता येतात. राशिधागा कापलेला व न कापलेला अशा दोन प्रकारांत हे गालिचे तयार करतात. राशिधागा हा विविध रंगांचे दोन किंवा अधिक धागे एकत्र मिळून तयार करतात. काही वेळा एका संचाऐवजी दोन संच वापरून विणकामातून जादा छटा आणता येतात .

विल्टन प्रकार

ह्या प्रकारचा माग मखमलीच्या मागासारखा चालतो. पण ह्यामध्ये जकार्ड (झाकार) तंत्राचा वापर केलेला असतो. ह्यामध्ये एकाच वेळी सहा विविध रंगांपर्यंत राशिधागे वापरून वरील पृष्ठावर पाहिजे ती नक्षी तयार करता येते. विविध पोतांचेही  गालिचे विणता येतात. हे गालिचे ब्रुसेल्स प्रकारासारखे असतात. यांतील राशिधाग्यांची उंची अशी ठेवतात, की त्यामुळे विविध जाडीचे गालिचे, तसेच राशिधागा कापलेला व न कापलेला अशा प्रकाराचे तयार करता येतात. काही वेळा एकाच वेळी दोन गालिचे विणता येतात. यासाठी एकाच वेळी दोन कापड विणतात व पुढच्या व मागच्या कापडातून राशिधागा मागे-पुढे जातो. सर्व विणून झाल्यावर राशिधागा चाकूने बरोबर मध्ये कापून दोन गालिचे करतात.

अ‍ॅक्समिन्स्टर प्रकार

हा प्रकार चाती (स्पूल)-अ‍ॅक्समिन्स्टर, ग्रीपरअ‍ॅक्समिन्स्टर व चाती-ग्रीपर अ‍ॅक्समिन्स्टर या तीन तऱ्हेच्या मागांवर बसविता येतो. चाती मागात राशिधागा लहान चातीतून घेतला जातो. ह्या चातीवर विविध रंगांचे धागे गुंडाळलेले असतात. ही चाती मागाच्या रुंदीवर चौकटीत आडवी बसविलेली असते. अशी चौकट गुच्छासाठी धागा पुरवते. ग्रीपर मागात विल्टनपेक्षा जास्त पण चाती पेक्षा कमी रंगांचे धागे वापरतात. ही प्रथम किडरमिन्स्टर येथे वापरण्यात आली. यात गुच्छांच्या संख्येएवढी गालिच्यांची रुंदी असते. यातील वाहक उभे व सरकते असून ते जकार्ड यंत्रणेने वरखाली करता येतात. मागामागील चातीमधून वाहकाच्या आठ भोकांतून राशिधागा घेतला जातो. दोन्ही प्रकारच्या मागांतील फायद्यांचा विचार करून तयार केलेला चाती-ग्रीपर मागही वापरला जातो.

शनिल

हा प्रकार दोन मागांवर बनवितात. एका मागावर राशिधागा रगमध्ये विणतात व नंतर तो लांब व फरसारख्या पट्टीत कापतात. दुसऱ्या मागावर अस्तर विणतात. त्याच वेळी पूर्वी विणलेल्या पट्ट्या घालतात. ह्या प्रकाराचे गालिचे तयार करण्यासाठी उत्तम दर्जाचे कारागीर लागतात. हा प्रकार कोणत्याही आकारात, आकारमानात व रंगात बनवितात. ह्याची रुंदी ९० सेंमी. असते. हा गालिचा महाग असतो.

गुच्छाकार प्रकार

यामध्ये सुईचा व पूर्वी  विणलेल्या अस्तराचा वापर राशिधाग्यासाठी करतात. गुच्छ यंत्रातून अस्तर जात असताना सुया राशिधाग्याचे गुच्छ अस्तरात खुपसतात. गालिच्यांची रुंदी होईल एवढ्या सुया वापरतात. गुच्छ शिवणतंत्राने अस्तरात बसवितात व चिकासारख्या पदार्थाचा (लॅटेक्सचा) थर देऊन ते पक्के करतात. यंत्राची रुंदी ५४० सेंमी. पर्यंत असते. इलेक्ट्रॉनीय व यांत्रिक नियंत्रणाने राशिधाग्याची वेगवेगळी उंची असलेले, विविध पोतांचे व नक्षींचे गालिचे तयार करतात. ट्वीड प्रकारची नक्षीही त्यावर आणता येते.

विणलेले (निटेड) गालिचे

अस्तराचा धागा, वेढा घालावयाचा धागा व राशिधागा यांचे विणकाम एकाच क्रियेने एकाच वेळी तीन विविध सुयांच्या संचांनी करून हा गालिचा तयार करताता. होजिअरी  तयार करताना वापरावयाचे तंत्रच येथे वापरतात. यात विविध रंगांची वलये तयार होतात. तसेच राशिधाग्याची उंची वेगवेगळी ठेवता येते. राशिधागा न कापता किंवा कापून वापरतात. याने उत्तम पोतांचे गालिचे तयार होतात. याशिवाय लोकरीचे जाड कापड विणून त्यावर कोरीव काम करणाऱ्या यंत्रांनी आधी काढलेल्या आकृत्या कोरून गालिचे तयार करण्यात येतात.

अंतिम संस्कार

सर्व गालिच्यांवरील अंतिम संस्कार सारखेच असतात. प्रथम गालिचा ताणतात व त्यास वाफारा देतात. त्यातून गुच्छ निसटला आहे काय ते पाहतात व योग्य आकाराचे तुकडे कापतात. गालिचा रगाच्या आकाराचा असेल, तर त्याच्या कडा शिवतात. बऱ्याच गालिच्यांच्या अस्तरांना चीक किंवा खळ लावतात. गुच्छाकार गालिचा पूर्वरंजित नसेल, तर त्यावर ठिकठिकाणी रंजनक्रिया करतात. तसेच एक-दोन चिकाचे थर देतात व आणखी कापडाचे अस्तर देतात. विणलेल्या व गुच्छाकार प्रकारासाठी फोम रबराचा थर अस्तरावर देतात.

संदर्भ :1. Allard, M. Rug Making : Techniques and Design, Philadelphia, 1963.

2. Chattopadhyay, Kamaladevi, Indian Carpets and Floor Covering, New Delhi.

3. Crossland, A. Modern Carpet Manufacture, 1958.

4. Dilley, A. U. Oriental Rugs and Carpets, New York, 1959.

5. Dimand, M. S. Peasant and Nomad Rugs of Asia, New York, 1961.

6. Schlosser, Ignaz, European and Oriental Rugs and Carpets, London, 1963.

7. Turkhan, K. H. Islamic Rugs, London, 1968.

लेखक :अ.दि.कोकड, जयंत खरे, हि.तु.लोखंडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate