অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गेसोकाम

गेसोकाम

‘गेसो’ हा इटालियन शब्द असून त्याचा अर्थ जिप्सम व पर्यायाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस असा आहे. गेसोकामात चिकणरंगाने वा तैलरंगाने चित्रे काढण्यासाठी लाकूड, धातू वा अन्य पदार्थांवर प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा खडूची भुकटी आणि डिंक यांच्या मिश्रणाचा लेप देऊन पृष्ठभाग तयार करतात. हा पृष्ठभाग गुळगुळीत, कमी रंगशोषक व टणक असतो. त्यावर कधी रंगचित्रण करतात, तर कधी सोनेरी वा रुपेरी वेलबुटीचे जडावकाम करतात. सरस किंवा डिंकाचा पातळ द्रव गरम करून त्यात व्हायटिंग, खडूची भुकटी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिससारखा पदार्थ टाकून मिश्रण तयार करतात. हे मिश्रण पातळ व मऊ लोण्यासारखे असते. ते गरम असतानाच वस्तूच्या पृष्ठभागावर कुंचल्याच्या साह्याने त्याचे लेपन करण्यात येते व ते सुकल्यावर त्यावर हस्तिदंती गुळगुळीत मुलामा येईपर्यंत त्याला पॉलिश करण्यात येते. कधीकधी गेसोचा पातळसर थर वस्तूच्या संपूर्ण पृष्ठभागावर देऊन त्यातून हाताने पाने-फुले वगैरेंचे मनोहर आकृतिबंधही निर्माण करतात. नंतर त्यावर व्हार्निश किंवा रंग देऊन सुबकता आणतात. यूरोप अमेरिकेत एक घरगुती हस्तव्यवसाय म्हणून गेसोकाम लोकप्रिय आहे.

भारतात ही कला ‘मोमबत्ती’ किंवा ‘लाजवर्दी’ या नावांनी ओळखली जाते. पहिल्या प्रकारात नक्षीकाम उठावदार असते, तर दुसऱ्या लाजवर्दी प्रकारात ते सापेक्षतः कमी उठावदार असते. या दोन्ही प्रकारांत

रंगकाम केलेले असते. गेसोकामाचा उपयोग बहुधा चित्रे, छायाचित्रे अथवा आरसे इत्यादींच्या चौकटी, लाकडी कलावस्तू किंवा चिकणरंग चित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या इत्यादींसाठी करण्यात येतो.

भारतातील विविध भागांत विविध प्रकारे गेसोकाम करण्यात येते. त्यांच्या लेपाच्या मिश्रणातही विविधताआढळून येते. पुष्कळदा त्यात व्हायटिंग किंवा खडू या वस्तूंऐवजी विटकरीची भुकटी अथवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात. शंखशिंपल्यांचे चूर्ण किंवा खडूची भुकटी तसेच बेलफळाचा गर इत्यादींत मिसळून केलेले मिश्रण अथवा डाळीच्या पिठाची खळ व मऊ चुना यांचे मिश्रण असेही प्रकार यात आढळतात. वरील विविध प्रकारच्या घट्टसर मिश्रणावर कोरून काढलेले आकृतिबंध नंतर कुंचल्याच्या साह्याने रंगविण्यात येतात. कधी वस्तूंच्या पृष्ठभागावर डिंकाचा पातळसर द्रव लावून नंतर त्यावर कोरीव फर्मे (स्टेन्सिल) ठेवतात व त्यांवर विविधरंगी कोरडी भुकटी टाकून आकृतिबंध उठविण्यात येतात; तर कधीकधी या रंगलेपनाऐवजी सोनेरी वा रूपेरी वेलबुटीचा आकारच त्या वस्तूच्या संपूर्ण पृष्ठभागावर सरस, खळ, कांजी अथवा व्हार्निश यांच्या साह्याने चिकटविण्यात येतो. बिकानेर हे गेसोकामाचे एक नावाजलेले केंद्र आहे. बिकानेरी कुप्या उंटाच्या मऊ कातड्यापासून बनविलेल्या असून त्यांवर मुलामा चढविलेला असतो किंवा रंगीत गेसोकाम केलेले असते.

भित्तिचित्रण हेदेखील एकप्रकारचे लेपनकलाकामच आहे. भारतात व विशेषतः राजस्थानात ‘चुनम’ म्हणजे चुन्यातील भित्तिचित्रण विशेष प्रगत झालेले आढळते.

आंध्र प्रदेशातील तबके, पंखे, थाळ्या यांवरील गेसोचे रंगीत नक्षीकामही प्रसिद्ध आहे.

लेखक : १) चंद्रहास जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate