অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोपुर

गोपुर

‘गोपूर’ या संस्कृत शब्दाचा अर्थ नगराच्या तसेच मंदिराच्या प्राकाराचे प्रवेशद्वार. रामायण  व महाभारत या ग्रंथांत ‘गोपूर’ हा शब्द या अर्थाने वापरला आहे. मात्र त्यापूर्वी वापर केलेला आढळत नाही. इ.स. १००० नंतरच्या काळातही ह्याच अर्थाने गोपुर हा शब्द वास्तुशास्त्रात वापरात असला, तरी आज तो सामान्यपणे दक्षिण भारतातील मंदिरांच्या आवारांमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंना उद्देशून वापरला जातो. मंदिराभोवती एकाबाहेर एक अशी अनेक आवरणे घालण्यात येतात. ही संख्या सातापर्यंतही असते. सगळ्यात बाहेरच्या प्रकारातील गोपुरे आकाराने सर्वांत मोठी असतात आणि आत आत जावे, तसतसा गोपुरांचा आकार लहान लहान होत जातो. यामागे, तसेच मंदिराच्या शिखरापेक्षा गोपुरांचा आकार मोठा ठेवण्याच्या संकेतामागे कोणता अर्थ आहे, हे स्पष्ट होत नाही. गोपुराची मूळ वास्तू सर्वसाधारणपणे अगदी साधी असते. त्याचे विधान आयताकार असून आयताची दीर्घ बाजू प्राकाराला समांतर असते व त्यातूनच प्रवेशद्वार असते. रुंदीच्या दुप्पट उंची हे दाराचे प्रमाण सर्वत्र कायम आहे. त्याभोवती अनेक शाखा असतात व त्यांवर शिल्पही असते. त्याच्या

श्री नटराज मंदिराचे पूर्वेकडील गोपुर, चिदंबरम्.श्री नटराज मंदिराचे पूर्वेकडील गोपुर, चिदंबरम्.दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या मूर्ती कोरण्यात येतात. दाराच्या उंचीपेक्षा थोडा जास्त असा तळमजला असतो. त्यावर आकाराने लहान होत जाणारे मजले बांधण्यात येतात. त्यांचे विधानही आयताकारच असते. सर्वांत वरच्या मजल्यावर गजपृष्ठाकार छप्पर आणि त्यावर ‘स्तूपी’ (कळस) बसवितात. वरच्या मजल्यावर भिंतीभोवती ‘कूट’ (चौरस) व ‘शाला’ (आयत) या वास्तूंच्या छोट्या प्रतिकृती असतात आणि त्यांत देवदेवतांच्या मूर्ती बसवितात. तळमजला दगडी बांधणीचा असतो, तर वरचे मजले चुना व विटा यांचे असतात. यांवरील मूर्तिकामही चुनेगच्चीचे असून ते चित्रविचित्रपणे नटविलेले दिसते. सध्या अवशिष्ट असलेली चिदंबरम्‌च्या पांडवकालीन (११००–१३५०) श्री नटराज मंदिराची गोपुरे, विजयानगरची तसेच श्रीरंगम्‌ची गोपुरे ही या वास्तूच्या उत्क्रांतीचे विविध टप्पे दाखवितात. ह्या सर्वांत तिरुमल नायकाने १६२३–५९ मध्ये बांधलेली, मदुरेच्या मीनाक्षी मंदिरातील सर्वांत बाहेरच्या म्हणजे सातव्या प्राकाराची गोपुरे प्रेक्षणीय आहेत. त्यांतही दक्षिण प्रवेशावरील गोपुराची बाह्याकृती वेधक आहे. लक्ष्य मध्यभागी किंचित आत खेचून घेतल्यामुळे या आकृतीच्या ऊर्ध्वरेषेला विलक्षण गती प्राप्त झालेली दिसते. सु. ४५·७२ मी. उंचीच्या या गोपुराशी बरोबरी करणाऱ्या वास्तू अन्यत्र सापडत नाहीत.

 

 

 

 

 

 

संदर्भ : Harle, James C. Temple Gateways in South India, Oxford, 1963.

लेखक :म. श्री. माटे,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate