অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चित्रकाच

स्टेन्ड ग्लास

रंगीत चित्रण केलेल्या काचांचा वापर खिडक्यांची तावदाने म्हणून केला जातो. या कलात्मक काचांना चित्रकाच असे म्हणतात. चित्रकाचेचा वापर प्रामुख्याने चर्चसारख्या धार्मिक वास्तूंमध्ये केल्याचे दिसते. बायझंटिन काळात धार्मिक वास्तूंमध्ये कुट्टिमचित्रणात वापरल्या गेलेल्या काचांची झळाळी चित्रकाचेमध्ये शिगेला पोहोचली. चित्रकाच हे कुट्टिमचित्रणाचेच एक विकसित स्वरूप मानावे लागेल. हे दोन्ही प्रकार वास्तुसौंदर्याचेच घटक मानले जातात. चर्चमधील उंच उंच खिडक्यांमध्ये बसविलेल्या चित्रकाचांतून दिसणारी चित्रांची विलोभनीय प्रकाशरूपे ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव तीव्रतेने करून देतात. त्यामुळेच धार्मिक वास्तूंच्या आश्रयानेच चित्रकाचेसारखा प्रकाशमान वास्तुघटक विकसित झाला.

चित्रकाचनिर्मितीचे जुने तंत्र थोड्याफार फरकांनी तसेच कायम आहे. चित्रकाचेसाठी लागणाऱ्या काचा फुंकून केलेल्या असतात. काचेचा लांबट फुगा कापून आणि परत तापवून त्याचे सपाट तुकडे करतात. चौकोनी पेटीतही फुगा फुगवून त्याच्या बाजूच्या सपाट काचा वापरतात. अशा काचा एकाच जाडीच्या नसतात; त्यामुळे त्यांच्या उपयोगामुळे प्रकाशाच्या स्वरूपात विविधता येते. काचेचा फुगा फिरवून फिरवून सपाट चकती करण्याची पद्धती आहे. त्या काचा मध्यभागी जाड व बाजूस पातळ असतात. या काचेला ‘क्राऊन ग्लास’  म्हणतात.

रंगीत काच

काच रंगीत करण्यासाठी काचद्रवात निरनिराळी ऑक्साइडे घालतात. उदा., तांब्याच्या ऑक्साईडमुळे निळा किंवा मोरपंखी रंग येतो. काचद्रव्याचे घटक, तपमान आणि लागणारा वेळ यांच्या फरकाने निरनिराळ्या रंगच्छटा मिळू शकतात. प्रत्येक ऑक्साइडापासून अशा पद्धतीमुळे विविध रंग तयार होतात. एकाच वेळी दोन रंगांचे काचद्रव्य वापरून दुरंगी काचही तयार करतात. चित्रकाचांसाठी चित्ररचना करताना, ही चित्रे प्रकाशामुळेच पूर्ण स्वरूपात दिसणार आहेत, ही जाणीव ठेवावी लागते. वास्तूचा एक भाग म्हणून ही चित्रे असतात. पहिल्या स्थूल रेखनानंतर खिडकीच्या पूर्ण आकारात त्याचे चित्रण केले जाते. काचतुकडे जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शिशाच्या पट्ट्या कशा व कोठे येणार, यांचे रेखन नंतर करतात. यानंतर या आराखड्यानुसार काचेचे तुकडे कापून घेतात. हे तुकडे एका मोठ्या काचेवर चित्राच्या नमुन्याप्रमाणे मेणाने एकमेकांना चिकटवून बसवितात. यानंतर तांब्याच्या किंवा लोखंडाच्या ऑक्साइड मिसळलेल्या आणि वितळवलेल्या, काचेच्या द्रवांत रंग मिसळून त्यांच्या साहाय्याने रंगच्छटा व छायांकन रंगवितात. नंतर हे सर्व तुकडे ४००°  ते ५००°  से. तपमानात भट्टीत तापवितात. त्यामुळे वरील रंगकाम तुकड्याशी एकरूप होते. यानंतर तुकड्याच्या मागील बाजूस सिल्व्हर क्लोराइड लावतात. त्यामुळे पिवळी रंजकता येते. नंतर पुन्हा सर्व तुकडे भट्टीत तापवितात. हे तयार तुकडे आराखड्यावर योग्य जागी ठेवतात व शिशाच्या पट्ट्याने एकमेकांना जोडतात. पाणी आत जाऊ नये, म्हणून ही काळजी घेतात आणि मग जागेवर चित्र बसवितात.

काचचित्रांचा उगम

काचचित्रांचा उगम अनिश्चित आहे. परंतु इ.स. नवव्या शतकापूर्वी हा प्रकार नव्हता, असे मानण्यास हरकत नाही. यूरोपमध्ये हा प्रकार पूर्वेकडून आला असावा, असेही एक मत आहे. ही कला इटलीमध्ये प्रसृत झाली. दहाव्या शतकात व्हेनिस शहर या कलेचे एक मोठे केंद्र मानले जाई. अकराव्या व बाराव्या शतकांतील चित्रकाचा बहुधा एकाच खिडकीत एकाच भव्य आकृतीत दाखविलेल्या असत. बाराव्या शतकाच्या मध्यापासून तीन खिडक्यांचा एक भाग कल्पून त्यात येशू ख्रिस्त किंवा इतर ख्रिस्ती संतांच्या आयुष्यातील प्रसंग चित्रित केले जाऊ लागले. अशा खिडक्यांचे आकार वास्तुरचनेतील बदलाबरोबर मोठे होऊ लागले. या सुरुवातीच्या काळातील कारकासॉन येथील चित्रकाचा सुप्रसिद्ध आहेत. तेराव्या शतकात रंगांच्या विविधतेत व बारकाव्यात भर पडली. चित्राभोवती काढलेल्या आलंकारिक काठांच्या चित्रणातही फरक होऊ लागला. पाने किंवा द्राक्षे दाखविताना आलंकारिकतेऐवजी त्याच्या नैसर्गिक यथातथ्यतेवर भर देण्यात आला. करड्या किंवा एकरंगी आलंकारिक चित्रणाची प्रथा आली. यासाठी काचेवर रंगविणे जरूर झाले. पूर्वी काचा रंगविण्यावर भर नसे. चक्रनेमिक्रमाने पंधराव्या शतकात नैसर्गिक चित्रणाला ओहोटी लागली व सांकेतिक अलंकरणाला चालना मिळाली. सोळाव्या शतकात चित्रकाच मोठ्या रंगविलेल्या चित्रासारखीच करण्यात येऊ लागली. चित्रकाच करणारे कुशल कारागीर यूरोपात ठिकठिकाणी आपल्या विशिष्ट संप्रदायाप्रमाणे काम करू लागले. स्वित्झर्लंडमध्ये तर घरोघरी चित्रकाचा वापरात आल्या. एकोणिसाव्या  शतकात चित्रकाचांत धार्मिक विषयांबरोबर वाङ्‌मयीन व अद्‌भुत कथाविषयही रंगविण्यात आले. भारतात हा प्रकार तुरळकच आहे. वास्तविक भरपूर सूर्यपक्राश असलेल्या आपल्या देशात या कलाप्रकाराचा उत्कर्ष व्हावयास हवा. युरोपातही चर्चसारख्या धार्मिक वास्तुपुरतेच या कलेचे अस्तित्व उरले आहे.

लेखक :ज. द. गोंधळेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate