অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जामिनी राय

जामिनी राय

(एप्रिल १८८७ – २४ एप्रिल १९७२). थोर भारतीय चित्रकार. बेलियातोड (जि. बांकुरा, प. बंगाल) येथे एका जमीनदार कुटुंबात जन्म. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी कलकत्त्याच्या ‘गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट अँड क्राफ्ट’ मध्ये कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथील काटेकोर व शिस्तबद्ध अभ्यासक्रमामुळे त्यांना तांत्रिक कौशल्य व पाश्चात्त्य चित्रशैलीवर प्रभुत्व संपादन करता आले. सुमारे दहा वर्षे त्यांनी या प्रभावाखाली चित्रनिर्मिती केली. या शैलीतील चित्रांमुळे त्यांना व्यावसायिक यश व नावलौकिक प्राप्त झाला. तथापि त्यांना या पाश्चात्त्य शैलीतील आविष्कारात आंतरिक समाधान वाटत नव्हते. या आंतरिक संघर्षातून मार्ग काढून त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी पाश्चात्त्य तंत्र-शैलीचा अव्हेर केला व प्रामुख्याने व्यक्तिचित्रे रंगविणे सोडून दिले व स्वतःची स्वतंत्र व सुलभ शैली शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाश्चात्त्य शैलीत काम करताना मिळणारे प्रोत्साहन व व्यावसायिक यश त्यांना मिळेनासे झाले. मानसिक एकाकीपण व आर्थिक ताणही सोसावा लागला. तरीही स्वतःचे प्रयोग व स्वतंत्र वाटचाल त्यांनी सुरूच ठेवली. १९३०च्या दरम्यान त्यांच्या ह्या स्वतंत्र कलाविष्कारांना मान्यता मिळू लागली. चित्रातील आकारिक मूल्यांचा नव्याने विचार करण्याची त्यांना गरज भासू लागली व त्यातून ते खेड्यापाड्यांतून जिवंत असलेल्या लोककलेकडे वळले. त्यांचे लहानपण खेडेगावात गेल्यामुळे ते स्वाभाविकही होते. कलकत्त्याच्या कालीघाटावर यात्रेकरूंना विकली जाणारी देवादिकांची व पशुपक्ष्यांची पारंपरिक बाजार-चित्रे आणि चित्रकथींनी (पटुआंनी) चितारलेली पटचित्रे ह्यांचा त्यांच्या कलाशैलीवर प्रामुख्याने परिणाम झाला. ह्याव्यतिरिक्त ‘कंथा’ (कशिदायुक्त रजई) व ‘अलिपना’ (रांगोळी प्रकार) यांवरील आकृतिबंधही त्यांच्या चित्रनिर्मितीत प्रेरक ठरले.

लोककला व कलाकार यांच्याशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क होता. लोककलेचे निरीक्षण व स्वतंत्र विचारांद्वारे संशोधित आकारांचे साधारणीकरण यांतून हळूहळू त्यांची स्वतःची शैली विकसित झाली. त्यास बंगालमधील तत्कालीन स्वदेशीची चळवळ व हॅवेल आणि गगनेंद्रनाथ टागोर यांचे आपल्या परंपरा जोपासण्याचे आवाहन हेही कारणीभूत झाले. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा कलकत्त्यातील नाट्यचळवळींशी संपर्क आला. त्यांतून वास्तवता व भासमानता यांतील सीमारेषा स्पष्ट झाल्या व ते चित्रकार म्हणून उपकारक ठरले. कालांतराने त्यांचे विचार आणि अभिव्यक्ती याचे महत्त्व भारतीय कलाजगताला पटले.

त्यांच्या चित्रांचे विषय हे सभोवतीच्या जीवनातून घेतलेले असत. उदा., ‘बाउल’, ‘संथाळ’, ‘माला’ या चित्रांतील व्यक्तिरेखा. तद्वतच कृष्ण-बलराम, गोपी, शिव, राम यांसारख्या पौराणिक व्यक्तिरेखा तसेच प्राणिजगतातील मांजर, गाय, घोडा, मासा, पक्षी इ. विषयही त्यांच्या चित्रांत आढळतात. मुख्यत्वे माता आणि बालक या विषयांवर व ख्रिस्त जीवनावरही त्यांनी चित्रे रंगवली. या त्यांच्या चित्रांतून येणारे आकार, घटना, व्यक्ती, वस्तू, प्राणी हे आभास निर्माण न करता चित्राचा घटक म्हणून ठसठशीतपणे साकार होताना दिसतात. कालीघाट शैलीचा प्रभाव असलेल्या ठसठशीत, वक्राकार व जोरकस लय असलेल्या रेषा हे त्यांच्या चित्रांचे एक खास वैशिष्ट्य. तैलरंग व कॅन्व्हास व्यतिरिक्त त्यांनी भारतीय परंपरेतील मृण्मय, वनस्पतिजन्य रंग, तसेच चुन्याचा थर असलेले वस्त्र अथवा लाकडी फलक वापरले. ज्यावेळी त्यांनी तैलरंगाऐवजी जलरंग हे माध्यम स्वीकारले, त्यावेळी त्रिमितीय आभास ही संकल्पनाच बाजूला पडून त्याची जागा मर्यादित रंग आणि मर्यादित रेषा यांद्वारे निर्माण होणाऱ्या चित्रांनी घेतली. चित्रासाठी वापरलेले रंग मृण्मय किंवा वनस्पतिजन्य असूनही संपूर्ण चित्र तेजस्वी रंगसंगतीचे वाटते. या मर्यादित रंगच्छटा हिंगूळ, हरिताल, खडू, चुनखडी इ. पदार्थांपासून तयार केलेल्या असत. बंधकद्रव्य म्हणून अंड्याचा बलक व मुख्यतः चिंचोक्याचा डिंक वापरीत. वेगवेगळ्या माध्यमांविषयीच्या आकर्षणामुळे त्यांनी मृत्तिकाशिल्प व कोरीवकामही केले आहे.

रूढ प्रस्थापित पाश्चात्त्य शैलीचा त्याग करून त्यांनी लोककलेचा केलेला आविष्कार हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत कलाजीवनालाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय कलाजीवनालाच नवे वळण देणारा ठरला. म्हणूनच भारतीय कलेचा प्रारंभीचा आधुनिक कालखंड घडविण्यात ज्यांचा हातभार लागला, त्यांत जामिनी राय यांचे स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान आहे. कलेतील भारतीयत्वाच्या प्रसारासाठी, जास्तीत जास्त घरांतून चित्रे पोहोचावीत म्हणून आपल्या एकाच कलाकृतीच्या अनेक प्रती ते स्वतः रंगवीत असत व त्या अत्यंत अल्प किंमतीला विकत असत. कला व तिच्या शुद्धतेसाठी असलेल्या असीम निष्ठेचेच हे द्योतक आहे.

त्यांच्या चित्रांची प्रदर्शने लंडन (१९४६) व न्यूयॉर्क (१९५३) येथे भरली होती. पद्मभूषण (१९५५), ललित कला अकादमीचे फेलो (१९५६), रवींद्र भारती विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट्. (१९६७) इ. मानसन्मान त्यांना लाभले. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. त्यांची चित्रे ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न म्यूझियम’ व अनेक खाजगी संग्रहांत संग्रहीत केली आहेत.

लेखिका : साधना  खडपेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate