অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ताजमहाल

ताजमहाल

ताजमहाल व त्याचा रम्य परिसर

ईजिप्तमधील पिरॅमिड, ग्रीसमधील पार्थनॉन अशा अद्वितीय व जगातील सात आश्चर्यात भारतातील ‘ताजमहाल’ या वास्तूची गणना होते.

स्थूलतः १५५६ ते १६५५ ही शंभर वर्षे हा भारतातील मोगल राजसत्तेचा वैभवाचा काळ समजला जातो. याच काळात अकबर, जहांगीर व शहाजहान या तीन बादशहांनी उत्तर भारतावर राज्य केले. तिघेही राजे रसिक, दृश्य कलांची आवड असणारे व कला आणि कलावंतांबद्दल आदर बाळगणारे होते. वास्तुकलेला तर हा काळ फारच भाग्याचा होता. अकबराने वसविलेली फतेपुर सीक्री येथील नवीन राजधानी, सलीम चिश्तीचा मकबरा, सिकंदरा, पंचमहाल; जहांगीराने वसविलेल्या काश्मीर प्रदेशातील शालिमार व निशात या बागा, आग्रा येथील इतमाद उद्दौलाची कबर, शहाजहानने बांधविलेली दिल्लीची जामा मशीद व लाल किल्ल्यातील दिवाण–इ–आम, दिवाण–इ–खास या इमारती याच काळातल्या होत. वास्तूकलेतील पर्शियन–मोगल–भारतीय अशा या परंपरेचा मुगुटमणी म्हणजे शहाजहानने आग्रा येथे बांधविलेली ताजमहाल ही वास्तू होय.

जहांगीर बादशहाचे लग्न मिर्झा गियासउद्दीनच्या मुलीशी झाले. हीच पुढे नूरजहान म्हणून प्रसिद्धीस आली आणि तिने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ आग्रा येथे इतमाद उद्दौलाची कबर बांधविली. वास्तुयोजनेचे संकल्पन, देखणेपणा आणि पृष्टभागावरील कलाकुसर यांत ही ताजमहालच्याच तोडीची वास्तुकृती आहे व हिचीच वास्तुपरंपरा ताजमहालने पुढे नेली आहे. जहांगीरचा पुत्र खुर्रम याचे लग्न नूरजहानचा भाऊ असफखान याच्या अर्जुमंद बानू नावाच्या मुलीशी झाले. राज्यरोहणानंतर ही दोघे शहाजहान व मुमताज महल म्हणून प्रसिद्धीस आली. मुमताज १६३१ साली बऱ्हाणपूर येथे पुत्रजन्मात मृत्यू पावली. तिच्या स्मरणार्थ शहाजहानने राजा जयसिंगाकडून विकत घेतलेल्या यमुना तीरावरील एका जागेत, त्याच साली ही वास्तू बांधावयास सुरुवात केली. तिच्या बांधकामात २०,००० माणसे २२ वर्षे खपत होती आणि तिला त्या काळात ६ कोटी रुपये खर्च आला, अशी माहिती बादशाहनाम्यातून मिळते.

ताजमहालच्या वास्तुयोजनेत ‘ताजमहाल’ हा प्रमुख घटक आहे; पण त्याचबरोबर त्या योजनेत इतरही अनेक घटक आहेत. आपल्या मनावर या वास्तुयोजनेचा जो परिणाम होतो, त्यात या सर्वांचाच वाटा असतो. यासाठी या संपूर्ण वास्तुयोजनेकडे प्रथम बघणे जरूर आहे. (आ. १) : यमुनेच्या तीरावर, प्रवाहाला काटकोनात असलेला ५७९·१२ मी. (१,९०० फूट) X ३०४·८० मी. (१,००० फूट) असा दक्षिणोत्तर पसरलेला लंबचौकोन. त्यातल्या मधल्या ३०४·८० मी. X ३०४·८० मी. या समचौकोनात विस्तीर्ण बाग, तीरावरील १३७·१६मी. (४५० फूट) X ३०४·८० मी. या चौकोनात मध्यभागी ताजमहाल व त्याच्या दोन्ही बाजूंना ‘मशीद’ व ‘जवाब’ अशा दोन इमारती; अलीकडील १३७·१६ मी. X ३०४·८० मी. या चौकोनात प्रवेशद्वार, चौक, ओसऱ्या व बाजार. या सर्वांभोवती एक उंच, लाल दगडांतून बांधलेली भिंत. आग्र्यावरून येताना ताजमहाल पूर्णपणे दिसतच नाही, त्याचा घुमट फक्त दिसतो. पुढच्या प्रवेशद्वारातून आत गेले व चौकातून डावीकडे वळले, की ताजमहालासमोरील विस्तीर्ण बागेचे प्रवेशद्वार दिसते. या प्रवेशद्वाराच्या चौकटीतूनच ताजमहाल संपूर्ण असा प्रथमच दृष्टीस पडतो. या लाल दगडांतून बांधलेल्या भव्य प्रवेशद्वारातील टोकदार कमानीभोवती पांढऱ्या संगमरवरी अक्षरांनी कुराणातील आयते कोरेलेले आहेत. प्रवेशद्वारापलीकडे असलेल्या चौथऱ्यावरून बघतांना खाली पसरलेली विस्तृत बाग दिसते. गर्द हिरवळींचे चौकोन; बहुरंगी फुलांनी बहरलेल्या वृक्षवेली; पूर्व–पश्चिम व उत्तर–दक्षिण मध्यरेषांवर, कारंजी असलेले वाहत्या पाण्याचे पाट; या पाटाभोवती लाल दगडांच्या पाउलवाटा आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना रांगेने लावलेली निरुंद, उंच सुरुची झाडे. पश्चिम वाट्यांच्या टोकांवर भिंतीतील प्रवेशद्वारे; बागेच्या मध्यभागी थोडा उंच असा पांढऱ्या संगमरवरातील चौथरा, त्यात सुंदर तळे; समोर रुंद लाल दगडांचा चौथरा, त्यावर दोन्ही बाजूंना दोन इमारती व त्यामध्ये एका उंच पांढऱ्या संगमरवरी चौथऱ्यावर ताजमहालची मुख्य वास्तू; मागे निळे आकाश व ढग. ज्या चौथऱ्यावर ताजमहाल उभा आहे, तो ९५·४० मी. (३१३ फूट) X ९५·४० मी. व ६·७० मी. (२२ फूट) उंच. ताजमहालची वास्तू ही ५६·७० मी. चा (१८६ फूट) घनचौकोन. मूळ चौकोनाकृती; तथापि कोन छाटल्यामुळे अष्टकोनी झालेली. चार दिशांच्या चार प्रमुख बाजूंना २८ मी. (९२ फूट) उंचीची टोकदार कमानीची प्रवेशद्वारे आणि कोपऱ्यांच्या बाजूंत खोल महिरपी आणि वर छोट्या घुमट असलेल्या चार छत्र्या. वास्तूच्या आत मध्यभागी दोन कबरी (या दर्शनापुरत्या; खऱ्या कबरी खाली तळघरात) आणि वास्तूवर १७·६७ मी. (५८ फूट) व्यासाचा, २२·५५ मी. (७४ फूट) उंचीचा कंदाकार घुमट. सर्व प्रमुख पृष्टभागांवर संगमरवर कोरून आत रंगीत खडे बसवून केलेले मीनाकाम व इतर पृष्टभागांत कोरीव संगमरवरी जाळ्या. प्रमुख वास्तूच्या चौथऱ्याच्या चारी कोपऱ्यांवर ४१·७५ मी. (१३७ फूट) उंचीचे तीन सज्जे व अगदी वर खांबावर घुमट असलेले चार मनोरे .

ताजमहालच्या वास्तुयोजनेतील भिंत, प्रवेशद्वारे, पाउलवाटा, चौथरा, मशीद व जवाब या इमारती हे सारेच घटक फत्तेपुर सीक्रीच्या लाल दगडांतून बांधलेले आहेत. प्रमुख वास्तू, तिच्या खालील चौथरा, मनोरे, सर्व लहानमोठे घुमट व बागेच्या मध्यभागी असलेल्या तळ्याभोवतीचा चौथरा हे घटक मक्रानाहून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरातून घडविलेले आहेत.

असे हे सगळे या वास्तुयोजनेचे घटक. प्रवेशद्वारातून होणारे ताजमहालचे पहिले दर्शन हा एक अनुभव असतो. बाजूच्या उंच दगडी भिंतीमुळे आतील संपूर्ण विश्व बाहेरच्या विश्वापासून विलग केले जाते, स्वयंपूर्ण होते व प्रेक्षकाला ताब्यात घेते. समोरच्या हिरव्या, पिवळ्या, निळ्या रंगसोहळ्यात ताजमहालची शुभ्र संगमरवरी वास्तू ‘न’ कारात्म भासते, ‘वास्तू’ म्हणून न जाणवता कमानीतील एक ‘चित्र’ म्हणून जाणवते. या वास्तूला वजनच नसावे, ती हलकेच जमिनीवर टेकलेली असावी, असे वाटून दृष्टिभ्रम होतो व दुरून पाहताना तिचा आकार प्रत्यक्षात केवढा असावा, याचा अंदाज करता येत नाही. हलत्या पाण्यात सततच दिसणाऱ्या प्रतिबिंबामुळे वास्तूचा ‘वास्तुपणा’ सततच कमी होत जातो. वास्तूतील घुमट–कमानींच्या लपेटदार रेषा भुरळ घालतात (आ. ३). बहुरंगी खड्यांतून केलेल्या कोरीवकामामुळे त्याचा संगमरवरी पृष्टभाग दिवस–रात्रीच्या निरनिराळ्या प्रहरांत हलकेच छटा बदलतो. सकाळच्या धुक्यात दुरून बघताना ताजमहाल काचेवरील अस्पष्ट प्रतिबिंबासारखा वाटतो. दुपारच्या उन्हात बाग, शांतता, वाहते पाणी, गर्द फुलांमागील शुभ्र ताजमहाल हे सारे वातावरणच अद्‌भूत, परिकथेसारखे वाटते आणि रात्रीच्या मंद चंद्रप्रकाशात ‘दुःखाच्या नयनांतील एक अश्रू,’‘पृथ्वीवर उतरलेला पांढरा मेघ’, ‘संगमरवरी स्वप्न’ अशी त्याची केली जाणारी वर्णने खरीच वाटू लागतात. रेषा, आकार, घनता, पृष्टभाग, छायाप्रकाश, अवकाश, निसर्ग–वनश्री, पाणी याच साधनांच्या या योजनेत केलेल्या अतिनाजुक, सुजाण उपयोगातून एका अद्वितीय वास्तूकृतीची निर्मिती झाली आहे.

ताजमहालचा वास्तुशिल्पी कोण असावा, याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही; परंतु उपलब्ध माहितीवरून तो उस्ता इफांदी नामक एक पर्शियन असावा, असे मानायला जागा आहे. अकबराच्या काळातील  वास्तुकलेत–त्याच्या धर्मविषयक कल्पनांत होते, तसेच–मोगल व हिंदू अशा दोन्ही शैलींचे मिश्रण आढळते. परंतु योजनेचे संकल्पन, वास्तूतील व बाहेरील अवकाशाची विशिष्ट अशी जाणकारी, भूमितिबद्ध आकारांचा उपयोग, प्रमाणशीलता, घनता व द्विपरिमाणी चित्रात्मकता यांचा एकत्र उपयोग, पृष्टभागावरील रंगीत मौल्यवान खड्यांतून केलेले कोरीवकाम व त्यातही केवळ पाने, फुले, वेली यांचाच केलेला वापर, मध्यरेषांभोवतीची समभाग मांडणी, वाहते पाणी या घटकाला योजनेत दिलेले महत्त्व, बागेचा उपयोग आणि अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन विचार करता, ताजमहालची वास्तुपरंपरा ही पर्शियन वास्तुकलेचीच परंपरा आहे. फक्त लाल दगड व पांढरा संगमरवर यांच्या एकत्र अशा उपयोगाने, तसेच सर्वच कलावंत आणि कामगार हे भारतीय असल्याने योजनेत अपरिहार्यपणे आलेले हिंदू, मोगल वास्तुशैलींतील बारकावे यांच्यामुळे ताजमहालच्या मूळ पर्शियन संकल्पनेचे प्रत्यक्षातील रूप ‘पार्शियन–मोगल–भारतीय’ असे झालेले आढळते.

लेखक : माधव आचवल

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate