অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धातुकलाकाम

धातुकला कामाच्या पद्धती

विविध धातूंच्या वस्तूवर केलेले कलाकाम या अर्थी धातुकलाकाम ही संज्ञा वापरली जाते. धातूचा रंग, चकाकी,प्रसरणक्षमता आणि पुनर्घटक्षमता या गुणविशेषांमुळे धातूंचा उपयोग नित्योपयोगी वस्तूंबरोबरच दागदागिन्यांसारख्या आलंकारिक वस्तू तयार करण्याकडे होऊ लागला. तांबे, पितळ, कासे, सोने, चांदी, लोखंड, शिसे अशा निरनिराळ्या धातूंच्या वस्तू बनविण्याची पद्धत अत्यंत प्राचीन काळापासून रूढ आहे. या वस्तूंमध्ये धार्मिक विधींसाठी लागणारी उपकरणे व भांडी, दागदागिने तसेच शोभादायक वस्तू, नक्षीकामाचे नमुने व हत्यारे इत्यादींचा समावेश होतो.

धातुकला कामाच्या विविध पद्धती प्राचीन काळापासून प्रचलित असून त्यांचे स्थूल स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :

(१) प्राचीन काळी धातू हातोडीने ठोकून वस्तू बनविण्यात येत असत व जोडकाम रिबिट वापरून केले जाई. याच पद्धतीने सोन्याचांदीसारख्या मूल्यवान धातूंचे कामही होत असे.

(२) इ. स. पू. २५०० च्या सुमारास ईजिप्तमध्ये मेणाच्या वस्तू करून व त्यांवर साचा बांधून त्यात धातूचा रस ओतीत आणि नंतर त्यापासून वस्तू बनवीत. अशा रीतीने ओतकामाचे तंत्र अवगत झाले, पुढे इ. स. पू. २५०० नंतर पूर्वीच्या या दोन्ही पद्धती अधिक विकसित झाल्या असल्या, तरी कालांतराने ओतकामात सुधारणा होऊन रिबिटाचे जोडकाम मागे पडले. जोड देण्यासाठी पुढे डाखकामाचा शोध लागला व धातुकलाकाम अधिक सफाईदार आणि सुबक होऊ लागले.

(३) पार्श्वोत्थित (रपूसे) नक्षीकाम पद्धतीने म्हणजे धातूच्या पत्र्यावर उलट्या बाजूने ठोकून उठाव दिला जातो व त्याच्या दर्शनी बाजूने नक्षीकाम केले जाते. या कामात निरनिराळ्या हातोड्या व विविध आकारांचे छापटंक (पंचेस) वापरले जातात. प्राचीन ईजिप्त, ग्रीस, मेसोपोटेमिया वगैरे देशांत या पद्धतीने केलेल्या कामाचे उत्कृष्ट नमुने आजही पहावयास मिळतात.

(४) मुद्रांकना (चेसिंग) चे काम छापटंक व हातोडी यांच्या साह्याने पत्र्याच्या दर्शनी बाजूवर करतात. (५) उत्कीर्णन (एन्ग्रेव्हिंग) च्या पद्धतीने पत्र्याच्या दर्शनी बाजूवर विशिष्ट धारदार व टोकदार खिळ्यांनी नक्षीकाम करतात. अशा कामात हातोडी वापरीत नाहीत. या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत नाजुक व रेखीव नक्षीकाम हे होय.

(६) तक्षण अथवा तासकाम हे धारदार व टोकदार खिळे आणि हातोडी यांच्या साह्याने करतात.

(७) जडावकामात लोखंड, पोलाद वा कासे या धातूंच्या पृष्ठभागावर सोन्याचांदीच्या तारा जडवून नक्षीदार आकृतिबंध उठविण्यात येतो. प्रथम ज्यावर जडावकाम करावयाचे असेल त्यावर नक्षीचा आकृतिबंध खोदून घेतात व त्या खोदलेल्या भागांत सोन्याचांदीच्या तारा बसवून त्या एकजीव ठोकून घेतात. या कामाच्या दुसऱ्या प्रकारात धातूचा पृष्ठभाग खोदून त्यांत हिऱ्यांसारखे मूल्यवान खडे, मोती वगैरे बसवितात. यालाच कोंदणकाम असेही म्हणतात.

(८) मुलामाकामामध्ये हलक्या धातूवर व लाकूड वगैरे अन्य पदार्थांवर सोन्यारुप्याच्या पत्र्याचा अथवा वर्खाचा मुलामा देतात व त्यावर नक्षीकाम करतात. सोन्याचे पाणी देण्याची व सुवर्णवर्खाचा मुलामा चढविण्याची कला फार प्राचीन काळापासून ईजिप्शियन, चिनी व ग्रीक कलाकारांना अवगत होती.

(९)मीनाकारीमध्ये सोने, चांदी व तांबे या धातूंच्या वस्तूंवर उष्णतेच्या साहाय्याने काचसदृश रंग विरघळवून अनेक आकर्षक आकार उठवितात वा अलंकरण करतात. प्राचीन ईजिप्तच्या धातुकलाकामात या पद्धतीचा अत्यंत कल्पकतापूर्ण उपयोग केल्याचे दिसून येते [क्लॉयझने].

ऐतिहासिक आढावा

प्राचीन काळी (ख्रि. पू. २६५० ते २५००) तांब्याच्या पत्र्याच्या घडविलेल्या वस्तू फार सुबक असत. त्यांचे पुरावशेष सुमेरमधील अर येथील शाही कबरींतून सापडले आहेत. विशेष उल्लेखनीय वस्तूंपैकी सोन्याचे शिरस्त्राण, पेला, बलिवेदीवरचा मेंढा व बैलाचे सोन्याचे डोके हे होत. ईजिप्तमधील प्राचीन धातुकलाकाम उच्च दर्जाचे होते. तत्कालीन कलाकार तांबे व कासे यांच्या जोडीला सोन्याचांदीच्याही वस्तू बनवीत. तत्कालीन प्रत्येक ईजिप्शियनाजवळ धातूच्या पत्र्याचे झिलईदार आरसे असत. तांब्याचे कलश व पात्रे कबरींतून मृताजवळ ठेवीत. दुसऱ्या तूतांखामेनच्या थडग्यात मिळालेल्या अनेक धातूंच्या वस्तूंपैकी तूतांखामेनच्या ममीवरील सोन्याचे मुखवटे, सोन्याच्या पत्र्यावर उठाव पद्धतीने व मीनाकारी चित्रांनी सजविलेल्या पेट्या आणि खुर्चीची पाठ व पाय, सोन्याचे मानवी मुखवटे व प्राण्यांचे पुतळे, खंजीर वगैरे विविध वस्तू, त्यांचे धातुकलाकामावरील प्रभुत्व दर्शवितात (ख्रि. पू. २००० ते १५००). मेसोपोटेमियातील धातुकलाकामात प्राणी आणि मनुष्याकृतींनी युक्त असे नक्षीकाम तसेच जडावकाम यांवर भर होता. उदा., सुवर्णाचे उठावकाम केलेला सिंहमुखी पेला. इ. स. पू. पहिल्या सहस्त्रकात ग्रीक व रोमन कलाकार धातुकलाकामात प्रवीण असल्याचे तत्कालीन वस्तूंवरून दिसून येते. विशेषतः त्यांनी केलेले शिरस्त्राण, ढाली, तलवारीच्या मुठी, चिलखते, भांडी इ. अत्यंत कलापूर्ण असून त्यांत मानवी आकृत्या प्रामुख्याने आढळतात. मीनाकारी, जडावकाम व मुलामाकाम यांतील कौशल्य तत्कालीन दागिने, भांडी व अन्य शोभादायक वस्तूंवरून दिसून येते. ओतकामासाठी प्राचीन काळापासून (ख्रि. पू. सु. १०००) ब्राँझचा उपयोग होत असे. इ. स. पू. १५०० ते ५०० या काळात इराणमध्ये झालेल्या ब्राँझ शिल्पकामात शाही रथ, घोड्यांवरील खोगीर व इतर सरंजाम, शस्त्रे, दागदागिने व नित्योपयोगी वस्तू यांवरील कलाकाम दर्जेदार होते [ब्राँझशिल्प]. इ. स. पू. ३३० ते इ. स. ३०५ या काळात बांधलेल्या ईजिप्तमधील मंदिरांत ब्राँझच्या नवसमूर्ती ठेवलेल्या आढळतात. मृतांबरोबर पुरलेल्या अभिमंत्रित कास्यमूर्तीवरील कपडे व दागिने अलंकृत केलेले असत. त्यांपैकी काहींवर मुलामा, सोन्याच्या तारेचे जडावकाम किंवा  कोफ्तगारी केलेली दिसून येते. ब्रिटनमधील राजवाड्यात सापडलेली तलवार इ. स. पू. २००० ते १६०० या कालातील असून तिची मूठ सुवर्णविलेपित आहे. ग्रीक लोक ईजिप्शियनांपासून धातुकलाकाम शिकले व त्यानी घडाई, ओतकाम, उठावकाम, उत्कीर्णन, तक्षण, डाखकाम यांत चांगली प्रगती केली. ग्रीक नाण्यांवरील शिक्के उत्कृष्ट प्रतीचे व कलापूर्ण होते. ब्राँझचे पोकळ ओतकाम इ. स. पू. ६०० नंतर होऊ लागले. तसेच स्मारकशिल्पे आणि भव्य मूर्ती त्यापुढील काळात निर्माण होऊ लागल्या. इ. स. पू. पाचव्या शतकात प्राचीन इट्रुरियामध्ये ब्राँझची शिल्पकला व धातुकलाकाम प्रगत झाले होते. त्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे बकऱ्याचे शरीर, सिंहाचे डोके व सापाचे शेपूट असलेल्या काल्पनिक पशूची मूर्ती हे होय. तेथून ब्राँझच्या मूर्ती, भांडी, शिरस्त्राणे, शस्त्रे, आरसे व रथसुद्धा निर्यात होत. त्यांवर सोन्याचांदीचे जडावकाम केलेले असे.

सोन्याचांदीवरील कलाकाम

सोन्याचांदीवरील कलाकाम किंवा या दोन्ही धातूंच्या मिश्रणापासून बनलेल्या पांढऱ्या सोन्यावरील कलाकाम प्राचीन ग्रीस आणि इटलीमध्ये होत असे. दागिने, भांडी, बाण, शस्त्रे व नाणी वगैरे वस्तू या धातूपासून बनवीत. इतिहासपूर्वकालीन (इ. स. पू. सु. २०००) ट्राय शहराच्या उत्खननात या प्रकारच्या धातुकलाकामाचे नमुने सापडले आहेत. धातूच्या पत्र्याच्या ठोकून घडविलेल्या या साध्या वस्तू असून त्यावर कलाकुसर व नक्षीकाम नाही. प्राचीन ग्रीस व क्रीटमधील उत्खननांतून सोन्याचांदीचे दागिने व मुद्रा विपुल प्रमाणात सापडल्या. त्यांचा काल इ. स. पू. सु. १५०० हा आहे. अंत्यविधीतील मूर्तींचे मुखवटे व शवपेटिकेची सजावट सोन्याची असे. कबरींमधून सोन्याचे जडावकाम केलेली शस्त्रे असत. पेला, खुजा वा सुरई यांवरील उठावाचे नक्षीकाम कलापूर्ण असून त्याचे विषय पौराणिक व ऐतिहासिक घटनाचित्रे किंवा प्राणी, पक्षी, पाने व फुले यांनी युक्त अशा सौंदर्याकृतींचे असत.

लोखंडावरील कलाकाम

लोखंडावरील कलाकाम आशिया मायनरमध्ये इ. स. पू.२००० वर्षांपासून केले जात होते. लोखंडाचा पत्रा ठोकून त्याला अपेक्षित आकार देण्यात येई व नंतर त्यावर उठावकाम करून वस्तू तयार करीत. या वस्तूंत मुखवटे व ढाली होत्या. पुढे लोखंडाचे ओतकाम सुरू झाले व ही कारागिरी अनेक प्रदेशांत अधिक प्रमाणात रूढ झाली. लोखंडापासून पोलाद तयार करण्याचे तंत्रही प्राचीन काळी अवगत होते. पोलाद हा लोखंडापेक्षा कडक व लवकर बोथट न होणारा असल्याने त्यापासून उपकरणे, हत्यारे, चिलखते, शिरस्त्राणे, बाण वगैरे वस्तू बनवीत.

धातूकला

मध्ययुगातील यूरोपमध्ये तयार झालेल्या तांब्याच्या वस्तू म्हणजे गोंडे, झुंबरे, पेले इ. सोन्याचांदीच्या वस्तूंइतक्याच मूल्यवान मानीत. कारण त्यांवरील उत्कीर्णन व जडावकाम कलापूर्ण व दर्जेदार असे. बाराव्या शतकातील मुस्लिम धातूकला विकसित झालेली दिसते. तांब्याच्या तबकावर पक्षी, प्राणी, ताडवृक्ष इत्यादींच्या आकृतींनी युक्त असे नक्षीकाम केलेले असे. तेराव्या शतकातील मेसोपोटेमियात प्राणी व मनुष्याकृतींनी युक्त असे नक्षीकाम व जडावकाम विशेष प्रगत होते. या कलाकृर्तींवर कलावंतांची स्वाक्षरी असे. सोळाव्या शतकात चांदीचे धातूकलाकाम यूरोपमध्ये अधिक होऊ लागले. इटलीमध्ये तांब्याचे धातुकलाकाम होई; पण इतर यूरोपीय देशांत ओतकामासाठी ब्राँझचा वापर होत गेला. पश्चिमी प्रबोधनकाळात धातूच्या इतर वस्तूंबरोबर ब्राँझच्या पुतळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्याबरोबरच ओतकामाच्या तंत्रातही प्रगती होत गेली. दोनातेलो याचा डेव्हिडचा पुतळा (१४३०) आणि सेलिनीये पुतळे (१५००—७१) हे विशेष उल्लेखनीय आहेत. सतराव्या शतकात पेले, शोभापात्रे इत्यादींवर कोरीवकाम, उठावकाम, मीनाकारी, मुलामाकाम आणि जडावकाम अधिक सुबक व सफाईदारपणे होऊ लागले. काही वस्तूंवर मूल्यवान खडेही जडवीत, तसेच मनुष्याकृतियुक्त देखाव्यांचे चित्रणही त्यांवर होऊ लागले. अठराव्या शतकात चांदीची धातुकला मागे पडली व सामान्य मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने आवश्यक अशी नित्योपयोगी भांडी, पेले, थाळ्या, मद्यपात्रे, स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे इ. तांब्याचीच तयार होत गेली. त्यांतील काहींवर नक्षीकामही असे. अठराव्या शतकात चांदीचा मुलामा दिलेली भांडी मध्यमवर्गात लोकप्रिय होती; कारण त्यांच्या किंमती चांदीच्या भांड्यांच्या किंमतीपेक्षा पुष्कळच कमी असत. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत अशा कामाकरिता तांब्याचा वापर कमी होऊ लागला; परंतु अनेक मिश्रधातू धातुकलाकामाकरिता उपलव्ध होत गेले. त्यामुळे अल्युमिनियम व त्याचे मिश्रधातू, जर्मनसिल्व्हर, पितळ, कासे, पोलाद, स्टेनलेसस्टील इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात धातुकलाकामाकडे होऊ लागला.

भारतात फार प्राचीन काळापासून धातुकलाकाम अस्तित्वात आहे. याचे पुरावे मोहें-जो-दडो येथील उत्खननांतून मिळालेले आहेत. त्यांतील लहान नर्तिकेची मूर्ती, दागिने, हत्यारे, भांडी इ. वस्तूंवरून त्या काळी धातुकलाकाम व ओतकाम प्रगत असल्याचे दिसून येते. नर्तिकेची तांब्याची ओतीव मूर्ती कलात्मकता व कारागिरी या द्दष्टीने उल्लेखनीय आहे. सोन्याचे दागिने [सोनारकाम], ताम्रपात्रे व हत्यारे हे तत्कालीन कारागिरीचे उत्कृष्ट नमुने आहेत. ओतकाम हे सिंधू संस्कृतीपूर्वीच्या लोकांनाही अवगत असावे, असे दिसते. प्राचीन भारत आणि चीन हे देश धातुकलाकामात विशेष प्रगत होते. सोन्याचांदीचे कलाकामही भारतात प्राचीन काळापासून केले जाई. देवादिकांच्या मूर्ती, सिंहासन, वेदपात्रे, रथ इत्यादींच्या रूपसौंदर्याची वर्णने प्राचीन भारतीय साहित्यात विखुरलेली आहेत. बुद्धकाळापासून गुप्तकाळाच्या सुरुवातीपर्यंत मिळालेल्या वस्तूंत पत्र्यावर उठावकाम केलेला स्त्रीप्रतिमेचा टाक, सोने, चांदी व तांब्याची नाणी इ. वस्तू उल्लेखनीय आहेत. नाण्यांवरील नक्षीकामात मनुष्याकृती, पशुप्रतिमा व संकेतचिन्हे इत्यादींचा कल्पकतापूर्ण रीतीने उपयोग केलेला आहे. ही नाणी छापटंक पद्धतीने बनविलेली आहेत. काही नाण्यांवर ब्राह्मी व देवनागरी लिपींतील अक्षरे उठविलेली आहेत. त्यांचे आकार त्रिकोणी, चौकोनी व वर्तुळाकार असेही आहेत. इ. स. पहिल्या शतकात (कनिष्ककाळात) बनविलेला सोन्याचा करंडक ओतकामाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्यावर बैठी बुद्धप्रतिमा असून त्याच्या बाजूला दोन शिष्य उभे आहेत. करंडकाच्या वर्तुळाकृती बाजूवर उडणाऱ्या हंसाची रांग व त्याखाली बुद्ध आणि त्याचे शिष्य यांची शिल्पे आहेत. या सर्व कलाकुसरीवर ग्रीक शैलीची छाप दिसून येते.

गुप्तकाळ (इ. स. चौथे ते सहावे शतक) हा सर्व दृष्टींनी सुवर्णकाळ समजला जातो. सम्राट समुद्रगुप्ताच्या वेळी सोन्याचांदीचे ओतकाम केलेल्या मूर्तींवर रत्ने जडविली जात. त्या काळी तांब्याचा उपयोग अधिक प्रमाणात केला जाई. तत्कालीन धातूच्या नाण्यांचा कलात्मक दर्जा उच्च प्रकारचा होता. दिल्लीजवळ असलेला लोहस्तंभ इ. स. ४०० च्या सुमाराचा आहे. तो १,५०० वर्षानंतर आजही गंजलेला नाही व त्यावर खोदलेला लेख स्पष्टपणे दिसून येतो. तत्कालीन मुलामाकामातही प्रगती झाल्याचे दिसून येते. याचे उदाहरण म्हणजे पू. बंगालमध्ये तयार केलेला अत्यंत नक्षीपूर्ण ब्राँझचा मुलामा दिलेला लोखंडी ओळंब होय (इ. स. सहावे शतक). इ. स. दहाव्या ते तेराव्या शतकांत तांबे, कासे इ. धातूंमध्ये बौद्ध, हिंदू व जैन देवतांच्या अनंत मूर्ती ओतकाम पद्धतीने घडविल्या गेल्या. काही मूर्तींवर सोन्याचा मुलामाही देत असत. याच काळात दक्षिण भारतातही उत्कृष्ठ प्रतीचे ओतकाम होत असे. याचे उदाहरण म्हणजे चोलकाळातील घडविलेल्या नटराज, शिवपार्वती, विष्णू व इतर मूर्ती हे होय. कलात्मक रीत्या या मूर्तींचा दर्जा उच्च होता. मूर्तीकलेबरोबर अन्य प्रकारचे धातुकलाकामही प्रगत झालेले होते. त्यावेळी घडविलेली कर्णकुंडले, कंकणे, कंठमाला इ. दागिने आणि पात्रे या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. घरगुती वापराच्या वस्तू घडविण्यास तांब्याचा जास्त वापर होत असे. नंतर पितळेचाही वापर होऊ लागला. तांबे शुद्ध धातू असल्यामुळे त्याचे धार्मिक माहात्म्य कायम राहिले. यज्ञ, देवपूजा व अन्य धार्मिक विधीची उपकरणे शुद्ध तांब्याचीच असत [तांबटकाम].

मीनाकारीचे तंत्र

मीनाकारीचे तंत्र भारतात मोंगलांच्या—विशेषतः अकबराच्या—वेळेपासून जास्त प्रगत झाले. सोळाव्या शतकापासून जयपूर मीनाकारीकरिता प्रसिद्ध आहे. या पद्धतीने केलेले सोन्याचांदीचे दागिने, हुक्का, तबक इ. अत्यंत आकर्षक दिसतात.

तारकाम

ओरिसा आणि बंगाल अठराव्या शतकापासून  तारकामासाठी विशेष प्रसिद्धीस आले. या पद्धतीने सोन्याचे, विशेषतः चांदीचे, अनेक प्रकारचे दागिने अत्यंत नाजुक रीतीने तयार केलेले आढळतात. त्रिचनापल्ली आणि करीमनगर येथील तारकाम अधिक सुबक आहे. बीदरीकाम [बीदरचे कलाकाम] हे निजामच्या कारकीर्दीत प्रसिद्धीस आले. या पद्धतीने अनेक उपयुक्त अशी पात्रे ( उदा., हुक्का, सुरई वगैरे वस्तू) बनविली जातात. यासाठी बीदर, औरंगाबाद इ. शहरे प्रसिद्ध आहेत.

भारतातील धातुकलाकामाचे वैशिष्ट्य

भारतातील धातुकलाकामाचे वैशिष्ट्य हे केवळ तांत्रिक सफाईपुरतेच मर्यादित नाही, तर ते नित्योपयोगी वस्तूंच्या कलात्मक आकारअलंकरणातही आढळते. भारतीय कलाकारांनी धातूच्या गुणधर्मांचा कलाद्दष्टीने उपयोग करून घेतला. दिव्यांचे [दिवे] विविध आकार-प्रकार, लामणदिवा इ. तसेच विविध प्रकारचे  अडकित्ते, भांडी, सुरया, लोटे वगैर वस्तू याची साक्ष देतात.

भूतपूर्व राजेमहाराजे यांच्या संग्रहांत सोन्याचे, जडजवाहिरांचे दागिनेच नव्हे, तर सोन्याचादींची मद्यपात्रे, वाडगे, पेट्या व हत्ती-घोड्यांचेही अलंकार आहेत. त्यांवरील उठावकाम व जडावकाम दर्जेदार स्वरूपाचे आहे. आधुनिक अभिरुचीचा कल साधेपणाकडे असल्यामुळे सोन्याचादींच्या वस्तूही साध्या, सपाट पृष्ठभागाच्या किंवा सहज स्वच्छ करता येईल अशा प्रकारात नक्षीकाम असलेल्याच बनविल्या जातात. अशा वस्तू भारतात सर्वत्र तयार होतात, परंतु त्यांत प्रादेशिक वैशिष्ट्य आढळते. तंजावर येथील सोन्याचांदीच्या वस्तूंवरील उठावकाम व जडावकाम प्रसिद्ध आहे, तर पुण्यास चांदीवर ठळक व खोल उठावकाम चांगल्या प्रतीचे होते. कच्छमधील उठावकाम उथळ, पण आकर्षक असते. काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू या प्रदेशांतील धातुकलाकामात प्रादेशिक वैशिष्ट्ये आढळतात [अलंकार].

लेखक : १) गो. चिं. कानडे

२) ना. भी. साबण्णावर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate