অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्री–रॅफेएलाइट्‌स

प्री–रॅफेएलाइट्‌स

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीत उदयास आलेली इंग्रज कलावंतांची एक संघटना. डँटी गेब्रिएल रोसेटी (१८२८-८२), विल्यम होलमन हंट (१८२७-१९१०) व जॉन एव्हरेट मिले (१८२९-९६) या तिघा चित्रकारांनी एकत्र येऊन १८४८ मध्ये ‘प्री-रॅफेएलाइट ब्रदरहुड’ या संघटनेची स्थापना केली. त्यांच्या खेरीज संघटनेचे अन्य सदस्य पुढीलप्रमाणे होत : जेम्झ कॉलिन्सन (सु. १८२५ - ८१) हा चित्रकार; टॉमस वुल्नर (१८२५-९२) हा शिल्पकार आणि डब्ल्यू. एम्. रोसेटी व एफ्. जी. स्टीव्हेन्झ हे समीक्षक. फोर्ड मॅडोक्स ब्राउन हा या संघटनेचा सदस्य नसला, तरी निकटवर्तीय होता. रॅफेएलच्या प्रबोधनकालीन अभिजात कलापरंपरेतून निर्माण झालेल्या ब्रिटिश अकादेमिक चित्रकलेतील निर्जीवपणा व सांकेतिकता यांविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून ही संघटना उभारण्यात आली. रॅफेएलच्या कारकीर्दीपासूनच चालत आलेल्या प्रबोधनकलेला व तीमधील अभिजात प्रवृत्तींना त्यांनी नाकारले आणि रॅफेएलपूर्व (प्री-रॅफेएलाइट) म्हणजे चौदाव्या-पंधराव्या शतकांतील आद्य इटालियन कलेपासून प्रेरणा घेतली. अशाच प्रकारे रॅफेएलपूर्व कलेचा मागोवा घेणारी आद्य-कलावंत संघटना म्हणजे ‘नॅझरीन्झ’ ही जर्मन स्वच्छंदतावादी प्रणाली (१८०९-१० च्या सुमारास स्थापना) होय. ओव्हरबेक, प्फोर व व्हिंटरगर्स्ट हे त्यातील प्रमुख चित्रकार होत. कलेची निर्मिती हा धार्मिक उपासनेचाच एक प्रकार त्यांनी मानला. या संप्रदायाचा प्रभाव प्री-रॅफेएलाइट्सवर दिसून येतो. प्री-रॅफेएलाइट्स पंथाला साहित्यिक अधिष्ठानही होते. कीट्‌स, टेनिसन प्रभृती कवींच्या काव्यातील भावगेयतेचा प्रभाव त्यांच्यावर होता. या संप्रदायातले बरेचसे सदस्य हे स्वतः कवी व चित्रकार होते. ब्रिटिश कलेत रॅफेएलपूर्व कलेची विशुद्धता आणण्याची त्यांची आकांक्षा होती. निसर्गाचे प्रामाणिक व तंतोतंत अनुकरण, तपशिलांच्या चित्रणावर विशेष भर व अभिव्यक्तीतील सरळ साधेपणा हे त्यांचे विशेष होत. या संप्रदायाच्या चित्रनिर्मितीत धार्मिक व नैतिक विषयांना प्राधान्य दिल्याचे आढळून येते. रोसेटीचे गर्लहुड ऑफ मेरी व्हर्जिन हे एक प्रख्यात चित्र होय.

नैतिकतेचे तत्त्व प्रकट करणारी काही प्रायिक चित्रेही आढळतात. उदा., हंटचे द अवेकन्ड कॉन्शन्स. मिलेच्या ऑफिलियासारख्या चित्रांतून साहित्यिक विषयांवरील भाष्य आढळते. त्याच्याच लोरेंत्सो अँड इझाबेला या चित्रातील मानवप्रतिमा प्रत्यक्ष व्यक्ती पुढे बसवून रंगविलेल्या आहेत. या व्यक्ती म्हणजे संघटनेचे सभासद व निकटवर्तीय होत. या संघटनेच्या सदस्यांनी काही काळ ‘पी.आर्.बी.’ या आद्याक्षरांनी आपली चित्रे एकत्रितपणे प्रदर्शित केली. रॅफेएलने घालून दिलेल्या कलासौंदर्याच्या तत्त्वांचा अधिक्षेप केला म्हणून; तसेच धार्मिक विषयांची हाताळणी वास्तववादी पद्धतीने केली म्हणून या संघटनेवर त्या काळात प्रखर टीका झाली. तथापि जॉन रस्किनसारख्या प्रख्यात समीक्षकाने संघटनेच्या तत्त्वांचे जोरदार समर्थनही केले. १८५४ च्या सुमारास ही संघटना विस्कळीत होऊन नामशेष झाली. तथापि तिचा प्रभाव मात्र पुढील काळातही टिकून राहिला. बर्न-जोन्झ हा या संप्रदायाचा सच्चा अनुयायी. विल्यम मॉरिसच्या अलंकरणात व पुढील नव्यकलेतही हा प्रभाव दिसून येतो.

लेखक : श्री. दे. इनामदार

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate