অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बांधणी

बांधणी

बांधणी : एक परंपरागत भारतीय वस्त्रप्रकार. बांधणीत वस्त्राला गाठी मारून रंगविण्याची क्रिया असल्याने त्यास ‘बांधणी’ हे नाव पडले.पाटोळा व बांधणी हे भारतीय परंपरागत रंगारी कामातील वैशिष्ट्यूपर्ण प्रकार मानले जातात. गुजरात-राजस्थानची ती बांधणी, मध्य प्रदेशाची चुनरी, सौराष्ट्राचा घरचोला, पूर्वीच्या ग्वाल्हेर संस्थानातील हल्लीच्या मध्य प्रदेशातील जावदची पिलिया आणि मदुराईची सुंगडी व बिहारची सुंगडी साडी हे सर्व प्रकार मुख्यत्वे बांधणीचेच असून प्रदेशपरत्वे त्यांत थोडाफार फरक आढळतो.

बांधणीची कला फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. मध्य आशियात आढळलेल्या पुराव्यावरून बांधणीच्या निर्मितीतंत्राच्या प्राचीनतेची कल्पना येऊ शकते. सुमारे सहाव्या शतकातील काही कापडतुकड्यांवरून तत्कालीन कापड छपाईचे तंत्र किती विकसित झाले होते, हे दिसते. त्या छपाईतंत्राची बांधणी निर्मितीतंत्राचे साम्य असल्याचे दिसून येते.

परंपरागत पद्धतीने गाठी मारणे व रंगविणे या दोन प्रमुख क्रिया असलेले बांधणीचे तंत्र म्हणजे रोध-छपाईचा एक प्रकार होय. कापडाला गाठी मारणाराला ‘बंधारा’ व रंगविणाराला ‘रंगरेज’ अशी नावे गुजरातमध्ये आहेत. कापडाला गाठी मारण्याचे काम अंगठा, तर्जनी व मध्यमा या बोटांच्या नखाग्रांनी करण्यात येते. प्रारंभी कापडाला निळीमध्ये डूब देण्यात येते व नंतर त्याच्या उभ्या-आडव्या घड्या घालण्यात येतात. काठ व पदर यांना पोताच्या रंगापासून वेगळे ठेवण्यासाठी गेरूच्या पाण्यात बुडविलेल्या धाग्याने त्यावर रेषा उठविण्यात येतात. नक्षी बारीक किंवा मोठी ज्या प्रकारची असेल, त्यानुरूप जाड वा बारीक सुताचा वापर करण्यात येतो. कापडावर ज्या ठिकाणी रंगाचा ठिपका काढावयाचा असतो, तो भाग नखाग्राने उचलून त्यावर मेणयुक्त धाग्याच्या गुंडाळ्या मारण्यात येतात. हे कापड प्रथम पांढरे वा रंगीत असते. नंतर ते रंगरेजकडे हव्या त्या रंगछटेत रंगविण्यास देण्यात येते. बांधणीसाठी रेशमी, सॅटिन, मलमल, साधे सुती कापड वा जाडीभरडी खादी यांपैकी कोणत्याही प्रकारचे कापड वापरता येते.

गुजराती बांधणीचे परंपरागत रंग म्हणजे गडद लाल, हिरवा, पिवळा, निळा व काळा हे होत. कधी कधी रंगांची सरमिसळही करण्यात येते, तर कधी आकर्षक रंगसंगती साधली जाते. गुलाबी व करडा, जांभळा व गुलाबी आणि मोरपंखी व काळा अशी विसंगत रंगांची मिळणी हे बांधणीच्या रंगाईचे आणखी एक वैशिष्ट्य होय. एकापेक्षा अधिक रंग पोतामध्ये वापरले असतील, तर त्याला ‘फुलवाडी’’ म्हणतात आणि पोतावर प्राण्यांचे आकृतिबंध असतील, तर त्याला ‘शिकारी’ म्हणतात. यांशिवाय काही अन्य प्रकारांत पर्णाकृती या हिरव्या रंगाच्या असून संपूर्ण पोतावर ठिपक्यांची चतुष्कोणी आकृती व वर्तुळे उठविलेली असतात; त्यांतही ‘अंबादाल’, ‘कोडीदाणा’,‘कांडभात’ व ‘चोकीदाल’ हे साधे चौकोन असतात; तर ‘मोरझाड’ हे मयुराकृतियुक्त आणि ‘वसंतबहार’ हे पुष्पसंभारयुक्त असतात; तथापि ‘बारा बाग’ व ‘बावन बाग’ हे बांधणीप्रकार महत्त्वाचे मानले जातात. बांधणीचे पोत प्राय: तांबड्या रंगाचे असले, तरी तिचे काठ-पदर मात्र ‘वीरभात’या परंपरागत शैलीनेच सुशोभित केलेले असतात. वीरभात याचा अर्थ भावाने (वीर) बहिणीला दिलेली देणगी (भात) असा आहे. म्हणून या शैलीला परंपरागत मूल्य लाभले आहे. घरचोला व चुनरी यांच्या तुलनेने बांधणी ही अधिक नक्षीदार असून तिच्यात मोठे आकृतिबंध असतात. गुजराती बांधणीनिर्मितीची प्रमुख केंद्रे म्हणून जामनगर, अंजार व भूज ही गावे प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी भूज व जामनगर येथील बांधणीत वीण व आलंकारिकता इत्यादींमध्ये फरक असतो. जामनगरला तुकतुकीत कापडावरही बांधणीसदृश आकृती निर्माण करण्यात येते. त्याचा उपयोग पोलकी, जाकीट वा दीपाच्छादन यांसाठी करण्यात येतो. राजस्थानात चावडा पुरुष आकृतिरेखाटन करतात व स्त्रिया गाठी मारतात. गाठी मारून झाल्यावर पोताला गडद रंगात रंगवितात व नंतर गाठी मारलेल्या भागाला फिकट रंग देण्यात येतो. त्यानंतर संपूर्ण बांधणीवस्त्र धुण्यात येते. गडद रंगातील बांधणी फक्त विवाहित स्त्रीने वापरावी असा संकेत आहे. राजस्थानी बांधणीत विपुल वैचित्र्य आढळते. फुले, पाने, गुंडाळ्या, विविध प्राणी, नानातऱ्हेचे पक्षी, नृत्यांगना, वैविध्यपूर्ण भौमितिक आकृतिबंध इत्यादींची येथील बांधणीवर रेलचेल असते व त्या त्या शैलीला अनुरूप अशी नावेही दिलेली असतात. उदा., पर्वत शैली, पतंग शैली, पुतळी शैली इत्यादी. विविध ऋतू व सणसभारंभ यांना अनुसरून बांधणीनिर्मिती करताना त्यात रंगवैचित्र्य व नक्षीचे वैविध्य राखले जाते. रेषायुक्त बांधणीचा वापर फेटा, साडी वा ओढणी म्हणून करण्याची प्रथा आहे. अशा बांधणीवरील ठिपके वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि त्याभोवतीची वर्तुळे एक प्रकारची विस्तारित नक्षीच तयार करतात. तेथील रंगारी ‘दो-रूखा’ पद्धतीनेही बांधणीची रंगाई करतात. या पद्धतीत परस्परविरुद्ध बाजूंना दोन वेगवेगळे रंग दिलेले असून त्यांवरील आकृत्याही भिन्नच असतात. लहरिया शैलीतील बांधणीला तिच्या रंगानुसार नावे दिली जातात. उदा., पंचरंगी, सप्तरंगी इत्यादी.

सौराष्ट्रातील बांधणीला ‘घरचोला’ म्हणतात. त्याचा अर्थ ‘घरातील मौलिक वस्त्र’ असा आहे. नववधूला हे वस्त्र विवाहप्रसंगी दहेज म्हणून देण्यात येते. त्यात सूती साडीवर जरतारी चौकोन काढलेले असतात व त्या चौकोनांत वेधक आकृतिबंध उठविण्यात येतात. प्रत्येक चौकोनात ठिपके चितारल्यामुळे संपूर्ण पोतावर रुंद फुलांचे सुंदरसे ताटवेच फुलल्याचा भास निर्माण होतो. कधी कधी फुलांऐवजी हत्ती वा पुतळ्या यांचेही आकृतिबध उठविण्यात येतात. घरचोलाचे पोत प्राय: तांबड्या रंगाचेच असते, मात्र काठ-पदर परंपरागत ‘वीरभात’ शैलीत केलेले असतात.

मध्य प्रदेशातील बांधणी प्राय: ‘चुनरी’ या नावाने ओळखली जाते. ती अतिशय नाजुक व मुलायम असते. तिचा रंग बहुधा फिकट गुलाबी असतो आणि वापर नववधूसाठीच करण्यात येतो. सलग अशा ठिपक्यांची शृंखला हा तिच्या पोतावरचा प्रमुख आकृतिबंध असतो. तिला‘दाणा’ शैली म्हणतात. कधी कधी एककेंद्री अशी दोन वर्तुळे एकांत एक काढून त्यांत यवांच्या परस्पर छेदक आकृत्या काढण्यात येतात. काठपदरांवर मात्र वेगळे नक्षीकाम केलेले असते. चुनरीच्या एका पदराला ‘उतार पल्लो’ व दुसऱ्या पदराला ‘चढन पल्लो’म्हणतात. दोहोंवरील नक्षीकामात भिन्नता असते. चुनरीचे पोत प्राय: गुलाबी आणि काठ निळ्या रंगाचे व केवळ नागमोडी वळणाचे असतात; तर कधी नेमके याउलटही असते. अशा पोतावर दोन दोन पट्ट्यांमध्ये एकापाठोपाठ एक अशी गुंडाळ्यांची वा त्रिदलांची नक्षी उठविलेली असते. शेवटच्या पट्ट्यात फक्त फुले वा पक्षी चितारण्यात येतात. दुतर्फा काठांच्या चुनरीवर नागमोडी रेषा व त्यांवर कलती वर्तुळे काढलेली असून तिच्या पोतावर चौकानाकृती आकृतिबंधात फळाफुलांचे घोस व झुबके उठविलेले असतात. तारापूर, उमेदपूरा व भैरवगड ही येथील प्रमुख निर्मितीकेंद्रे आहेत.

जावद या गावी तयार होणाऱ्या बांधणीला ‘पिलिया’म्हणतात. ती लांबरुंद अशी एक प्रकारची ओढणीच असते. पिलियाचे पोत प्राय: तांबडे असून त्यावर पाने, फुले, पुतळ्या, हत्ती इत्यादींचे आकृतिबंध वर्तुळांत उठविलेले असतात. होळीप्रसंगी ती शुभप्रद मानली जाते. आपल्या पुत्रवती कन्येला पित्याकडून पिलियांची भेट वसंतऋतूत देण्याची येथे पूर्वापार प्रथा आहे.

क्षिण भारतातील मदुराई येथे फार वर्षांपूर्वी सौराष्ट्रातील बांधणी तयार करणाऱ्या काही जमाती आल्या व स्थायिक झाल्या, त्यामुळे त्या येथेही बांधणीनिर्मिती करू लागल्या. दाक्षिणात्य पद्धतीचा लालभडक, गडद काळा, निळा वा जांभळा रंग ते बांधणीसाठी वापरतात. नक्षी मात्र केवळ रांगोळी (कोलम) सदृश थेंबाथेंबाची असते.

उत्तर बिहारमध्येही बांधणीचा वापर व निर्मिती होते. येथील बांधणीला सुंगडी साडी म्हणतात. सुंगडीचे निर्मितीतंत्र मदुराईच्या निर्मितितंत्राशी साम्य राखते. लग्नप्रसंगी या बांधणीचा वापर करण्यात येतो .

संदर्भ : 1. Chattopadhyaya, Kamaladevi, Handicrafts of India, New Delhi, 1975.

2. Wheeler, Monroe, Ed., Textiles and Ornamnets of India, New York, 1956.

लेखक : चंद्रहास जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate