অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मीनाकारी

मीनाकारी

मीनाकारी : (एनॅमलिंग). सोने, चांदी, तांबे यांसारख्या धातु-वस्तूंच्या पृष्ठभागावर रंग चढवून त्याची खुलावट वाढविण्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक तंत्र.‘मीना’ हा शब्द फार्सी असून त्याचा एक अर्थ काचेच्या मुलाम्याचे वा जडावाचे काम असा होतो. विविध रंगांचा वापर करून एखाद्या वस्तूला अलंकृत करणे व तिचे सौंदर्य वाढविणे तसेच त्यात हिरे-माणके वापरल्याचा आभास निर्माण करणे हा मीनाकारीचा मुख्य उद्देश आहे.

. स. पू. २,५०० च्या सुमारास काचेसंबंधीचे ज्ञान लोकांना होते, असे दिसते. ईजिप्तमधील सुमेरियन साम्राज्यात काचेवर रंगीत खडे बसविण्यात येत असल्याचे उल्लेख आढळतात. सायप्रसमधील उत्खननात सापडलेल्या मीनाकामयुक्त वस्तूंवरून इ. स. पू. १३०० च्या काळात लोकांना मीनाकारीचे तंत्र ज्ञात होते, असे आढळून आले आहे. भारतीय मीनाकारीचे काही प्राचीन नमुने तक्षशिला येथे सापडले आहेत; त्यांवरून मीनाकारीची कला भारतात फार पूर्वीपासून प्रचलित होती असे म्हणता येते.मीना हा मुळातच एक कलात्मक काच-प्रकार आहे. एखाद्या धातूवर काचेचा लेप दिला की त्याला मीना म्हणण्याची प्रथा आहे. गारगोटी किंवा वाळू, सेंदूर व क्षार एकत्र करून वितळविले तर पारदर्शक काच तयार होते. रंगीत मिन्यासाठी काचेच्या वितळलेल्या स्थितीतच त्यात शेकडा दोन किंवा तीन या प्रमाणात काही धातूंचे ऑक्साईड मिसळवून ते ढवळतात; त्यामुळे पाहिजे त्या रंगाची काच मिळू शकते. ही काच थंड झाल्यावर तिला ठेचून तिचे चूर्ण करतात आणि मग हे चूर्ण धातूवर पसरवून पुन्हा भट्टीत तापवितात. काच वितळल्यामुळे ती धातूला घट्ट पकडून ठेवते.

धातूवर रंग चढविण्याच्या स्थूलमानाने दोन पद्धती आहेत. एक निएल्लो व दुसरी शालव्हे. पैकी निएल्लो पद्धतीत धातूवर नक्षी कोरून त्यात मीना किंवा धातुमिश्रण ओततात; तर शालव्हे पद्धतीत नक्षी खोदून वा ती वर उचलून तिच्या खोलगट भागात मीनाचूर्ण भरण्यात येते किंवा मिन्याचे बारीक तुकडे खोवण्यात येतात.पाश्चिमात्य देशात प्रायः मीनाकारी ही निएल्लो पद्धतीची आढळते, तर भारतात मुख्यत्वे शालव्हे पद्धतीचाच अवलंब करण्यात येतो; तथापि भारताच्या काही प्रदेशात मात्र निएल्लो पद्धती वापरण्याची रूढी आहे.भारतामध्ये प्राचीन काळी कारागीर कुंडले, कंकणे वा कंठहार यांसारख्या दागिन्यांवर नैसर्गिक रंगांशी मेळ साधणारे रंग वापरून पक्षी, वृक्ष किंवा फुले इत्यादींची चित्रे उठवीत; तर कधी कधी ते दागिन्यांच्या दर्शनी भागावर सोन्याच्या कोंदणात खडे बसवित व त्यांच्या पार्श्वभागी मीनाकारी करीत. ही मीनाकारी अनेक वर्षे सुरक्षित व सतेज राही. कारण एकतर त्यांचे रंग नैसर्गिक व पक्के असत व दुसरे म्हणजे तो दागिना मखमलीच्या पट्टीवर बसविण्यात येत असल्यामुळे त्याचे त्वचेशी घर्षण होत नसे. त्याकाळी मीनाकारी खऱ्या सोन्यावरच केली जाई.

मीनाकारीची ही पद्धत भारतात चौदाव्या शतकापर्यंत दिसून येत असली, तरी भडक रंगाचा व विपूल खड्यांचा वापर करण्यात येणारा मीना इकडे इराणकडून आला असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. त्यांच्या मते इराणमधून प्रथम खडे आले व त्यापाठोपाठ हे खड्यांच्या मीनाकारीचे तंत्रही आले. मोगल काळात मीनाकारीचा हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होता. पुढे मात्र खड्यांऐवजी रत्नांचा वापर सुरू झाला. मोगल काळातील राजांच्या प्रोत्साहनामुळे सोनार व मीनाकार हे दोघेही नवनवीन आकृतिबंध आणि शैली निर्माण करण्याची पराकाष्ठा करू लागले. निसर्गापासून प्रेरणा घेऊन पाने, फुले, वेलबुटी, डहाळ्या व पक्षी यांच्या प्रतिकृती उठवू लागले; त्यामुळे त्यात सतेजपणा व विविधता आली. विविध रंगी मीना वापरण्याचे तंत्र प्रगत झाले. परिणामतः त्या काळात भारतामध्ये मीनाकारीच्या अनेक शैली निर्माण झाल्या आणि तिचे क्षेत्रही विस्तारले गेले. त्यावेळी जयपूर हे एक प्रसिद्ध केंद्र होते. मीनाकारीची निर्मिती उत्तम व्हावी म्हणून जयपूरचे कारागीर शुद्ध सोन्याचा वापर करीत. तेजदार सोन्याला अतिशय बारीक उत्कीर्णन करण्यात येई. त्यावरील कारागिरीही इतकी अप्रतिम असे की एखादी लहान वस्तूही मोठ्या आकाराची भासावी. त्याकरिता ते मोगली लघुचित्रांचे अनुकरण करीत. प्रायः हातात फूल धरलेल्या वा मनगटावर पक्षी बसलेल्या राजाराणीचे किंवा देवदेवतांचे युग्म चितारीत असत. त्या काळातीलच दुसरे महत्त्वाचे केंद्र वाराणसी हे होते. तेथील मीनाकारीत कटाक्षाने गुलाबी छटा आणण्यात येई. ती गुलाबपुष्पाप्रमाणे भासावी असा प्रयत्न कारागीर करीत.

जही जयपूर, काश्मीर, दिल्ली, लखनौ, वाराणसी, मुरादाबाद, कच्छ व हैदराबाद ही मीनाकारीची प्रमुख केंद्रे मानली जातात. येथील मीनाकारीचे काम विविध प्रकारे चालते.मीनाकारीच्या नक्षीकामाचेही विविध प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात पृष्ठभागाच्या दर्शनी भागावर नक्षीकामाच्या रेषा वा पाने, फुले यांचे आकृतिबंध कोरून काढतात, तर दुसऱ्या प्रकारात नक्षीचा आकृतिबंध वगळून उर्वरित भाग ठोकून खोलगट करतात; त्यामुळे नक्षी उठून दिसते. यात नक्षीचा पृष्ठभाग सपाट असतो. तिसऱ्या प्रकारात धातूच्या पत्र्याला मागील बाजूस ठोकून नक्षीला पार्श्वोत्थित शिल्पासारखे वर उठवितात; त्यामुळे पानाफुलांना हवा तेवढा उठाव देणे शक्य होते व नक्षीकाम सुबक दिसते. चौथ्या प्रकारात वस्तूच्या पृष्ठभागावर सोने वा चांदी यांची बारीक तार बसवून नक्षी काढण्यात येते. या पद्धतीला तारकशी म्हणतात.यांपैकी कोणतीही नक्षी धातुपृष्ठावर काढली तरी त्या नक्षीच्या खोलगट भागात रंगीत मीनाचूर्ण भरून त्या वस्तूला भट्टीत घालून खालून उष्णता देतात. त्या उष्णतेमुळे मीना वितळतो व तो धातुपृष्ठाला धरून घट्ट बसतो. तसेच तारेने वेढलेल्या जागेत विविध रंगी मीना वापरल्याने त्या धातुपृष्ठावर रंगकाम केल्याची आभासनिर्मिती होते.मीनाकारांचे काम निरनिराळ्या कारागिरांमध्ये विभागलेले असते सर्वप्रथम ‘चितेरा’ एखादा वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार करतो; तर सुवर्णकार त्यानुरूप वस्तू वा अलंकार घडवितो. नंतर ‘घडाई’ त्यावर आकृतिबंधानुरूप खोदकाम करतो व शेवटी ‘मीनाकार’ त्यात रंग भरून मीनाकाम पूर्ण करतो.

हे रंग एका विशिष्ट क्रमानेच भरावे लागतात. उदा., सर्वप्रथम पांढरा, नंतर निळा, हिरवा, काळा व लाल. रंगांचा हा क्रम त्या त्या रंगाच्या करडेपणावर अवलंबून असतो. वरील सर्व रंग सोन्यावरच चढविण्यात येतात; तर चांदीवर प्रथम काळा व नंतर हिरवा, निळा, पिवळा, नारिंगी, गुलाबी व सालमन (त्याच नावाच्या माशापासून तयार केलेला रंग) या क्रमाने भरण्यात येतात. तांब्यावरील रंगाचा क्रम वेगळाच असून पांढरा, काळा गुलाबी असा तो असतो. लाल अर्थात माणिकसदृश रंग चढविणे मात्र कौशल्याचे काम असते. केवळ अनुभवी व कसबी कारागीरच ते काम करू शकतात.भारतात सर्वोत्कृष्ट मीनाकारीसाठी जयपूरची विशेष ख्याती आहे. येथे हे काम दोन प्रकारांनी चालते. पहिल्या प्रकारात प्रथमतः धातूला कोरून खोलगट करतात व मग त्या खोबणीत रंग भरून उष्णतेच्या साहाय्याने ते धातुपृष्ठाशी एकजीव करण्यात येतात; तर दुसऱ्या प्रकारात प्रथम धातूच्या पृष्ठभागाला उष्णता देतात व नंतर पूर्वीच तयार करून ठेवलेल्या कोंदणात रंगीत चकाकणारे तुकडे भरण्यात येतात. या तंत्रामुळे रंग दीर्घकाळ टिकून राहतात. हे या तंत्राचे खास वैशिष्ट्य आहे.

यपूर मीनाकारीमध्ये आकृतीचे चिकन, मारोरी व बीदरी हे प्रकार रूढ असून त्या प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. चिकन पद्धतीत धातूच्या पृष्ठभागावर ठळक अशा पानाफुलांचे उत्थित शिल्प उठविण्यात येऊन खोलगट भाग मीनाकामाने वा लाखेने मढवितात; तर मारोरी प्रकारात बारीक व नाजूक वर्तुळाकृती आकृतिबंध कोरून आणि त्यांना विरोधात्मक अशा काळ्या वा अन्य गडद रंगाची जोड देऊन त्यात नाजूकपणा आणण्यात येतो. बीदरी शैली पानाफुलांचा अति सूक्ष्म असा आकृतिबंध वस्तूच्या संपूर्ण पृष्ठभाग व्यापून टाकतो. त्यातील एकसंघपणामुळे तो अतिशय डोळ्यात भरतो.
भारतातील प्रत्येक ठिकाणच्या मीनाकारीचे एक खास तंत्र असल्यामुळे ती सहजपणे ओळखता येते. त्यापैकी जयपूरची ख्याती अतिउन्नत व परंपरागत मीनाकारीसाठी आहे. ही शुद्ध सोन्यावर करण्यात येत असून त्यावरील नक्षीकाम इतके सफाईदार असते की नक्षीची सीमारेषा दिसून येत नाही. संपूर्ण आकृतिबंध हा रंगीत पार्श्वभूमीवरील चमकदार खड्यांचा पारदर्शक मुलामाच वाटतो; अशा मीनाकारीचे दागिने हे जयपूरचे खास वैशिष्ट्य असते. याशिवाय तेथे तावदाने, फुलदाण्या, अत्तरदाण्या, मद्याच्या सुरया, तलवारीच्या मुठी व तत्सम वस्तूही मीनाकामाने अलंकृत करण्यात येतात.

वाराणसी हे भारतातील असेच दुसरे व महत्त्वाचे मीनाकारीचे केंद्र आहे. येथील मीनाकारीत उज्ज्वल गुलाबी रंगाची छटा प्रभावी असून ती गुलाबपुष्पाप्रमाणे भासते. संपूर्ण वस्तूवर मीना करून त्यात खडे वापरतात. येथील मीनाकारीच्या दागिन्यांपैकी ‘हसली’ ही खड्याने मढविलेली व अखंड वर्तुळाकार असून हा येथील खास दागिना मानण्यात येतो. इतर दागिन्यांत पुष्पाकृती लोलक वा झुबका बसविलेला असतो. क्वचित मत्स्य, हिरा, तारा यांचे झुबकेसदृश लोलकही बसविण्यात येतात. कंकणाला मात्र ज्या रंगाची पार्श्वभूमी असेल, त्या रंगाच्या विरुद्ध रंगाची कंकणाकृती उत्कीर्णित टोके असतात. त्यामुळे कंकणाचा रंग एक तर त्याच्या टोकांना दुसराच रंग असतो; कधी कधी तर त्यात दोन भिन्न रंगाचे संमिश्रणही केलेले असते. याशिवाय येथील मीनाकामयुक्त आसने व देव्हारेही प्रसिद्ध आहेत.खनौची मीनाकारी प्रामुख्याने चांदीवर उत्कीर्णन करून करण्यात येते. त्यामध्ये मुख्यतः हिरवा, निळा, तपकिरी व पिवळा हे रंग असतात. लखनौच्या मीनाकारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या आकृतिबंधात असलेला ठळकपणा, तर दुसरे म्हणजे आकृतिबंधात होणारे मत्स्यसदृश लहान लहान आकारांचे हमखास उपयोग. याचा वापर करून येथे सुरई, हुक्कापात्रे, मद्यपात्रे यांसारख्या वस्तू तयार करण्यात येतात.

मुरादाबादची प्रसिद्धी तेथील मीनाकामयुक्त पितळी भांड्यासाठीच आहे. पितळी वस्तूवर निएल्लो व शालव्हे या दोन्ही मीनापद्धतींचा वापर येथे होतो. तसेच ‘सादा कलम’ व‘ सिया कलम’ या दोन प्रकारांचा उपयोग करून येथील मीनाकाम करण्यात येते. सादा कलम प्रकारात कलई केलेल्या पितळी वस्तूंवर आकृतिबंध कोरतात; त्यामुळे पांढऱ्या चकाकणाऱ्या वस्तूवर सोनेरी रंगाचा आकृतिबंध दिसू लागतो; तर सिया कलम प्रकारात वस्तूवर ठसे वापरून किंवा ठोके मारून उत्कीर्णन करण्यात येते. काही वेळा मात्र आकृतिबंधातील मोकळा भाग काढून खोलगट भागात काळी लाख भरतात. याप्रकारे येथे रक्षापात्रे, पुष्पपात्रे, दीपपात्रे व बोळकेसदृश शोभेच्या अनेक वस्तू तयार करण्यात येतात.काश्मीरमधील मीनाकारी निएल्लो पद्धतीची असून मुख्यतः चांदी व क्वचित तांबे-पितळ या धातूंवरही ती करण्यात येते. येथील कलाकुसर अतिशय सूक्ष्म व नाजूक असते. चांदीच्या वस्तूंवर नक्षीकाम केल्यावर वस्तूला उष्णता देतात व कोरलेल्या जागी एकप्रकारचे कृष्णवर्णी द्रव्य गरम करून ओततात. नंतर पृष्ठभाग घासून काढतात; त्यामुळे जास्तीचे द्रव्य निघून जाते. नंतर पुन्हा ती वस्तू भाजतात, त्यामुळे कोरलेल्या जागी द्रव्य घट्ट बसते. शेवटी घासूनपुसून ती वस्तू चकचकीत करतात. तांबे-पितळी वस्तूंवर मात्र कमी उष्णतामान वितळणारे मिन्याचे रंगलेपन करण्यात येते. या पद्धतीने सुरया, हुक्कापात्रे, चाकू, सुऱ्या व कट्यारीच्या मुठी इ. वस्तू तयार करण्यात येतात.

हैदराबादलाही मीनाकारी होत असून त्याची गणना बीदरीकामातच होते. काळ्या पार्श्वभूमीवरील पांढऱ्या पातळ रेषांच्या कलाकुसरीमुळे हे बीदरीकाम लक्षात येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे एका धातूत दुसरा धातू बसवून ते करण्यात येते. प्रथम मोरचूद, सोरा, मीठ यांचे एक विशिष्ट मिश्रण वस्तूच्या पृष्ठभागावर लावतात, त्यामुळे पृष्ठभाग काळा पडतो. त्यानंतर छिन्नी-हातोडीच्या साह्याने त्यावर खोलगट रेषा खोदतात आणि त्या खोदणीत चांदी वा सोन्याची पातळ पट्टी किंवा तार बसवितात. शेवटी वस्तू घासूनपुसून झाली की ती तार चकाकू लागते. विशेषतः परंपरागत वस्तू, लाकडी सामान, शोभेच्या घरगुती वस्तू या प्रकाराने तयार करण्यात येतात. [बीदरचे कलाकाम].यपूर, लखनौ, पूर्णिया, मुर्शिदाबाद व कच्छ येथील बरीचशी मीनाकारी बीदरीकामाप्रमाणेच वाटते; परंतु त्यावर तार-पट्टी वरून न बसविता पृष्ठभागावरच नक्षी काढण्यात येते.भारतीय मीनाकारीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कोंदण होय. कोंदण व मीनाकारीच्या या एकत्रितपणामुळे एखाद्या अलंकाराला दोन सुंदर पृष्ठभाग असल्याची आभासनिर्मिती होते व ह्या वस्तू पहाणाराला गोंधळात टाकतात. वस्तूच्या पार्श्वभागी मीनाकारी व दर्शनी भागांवर कोंदणात खडे, हिरे, माणके बसविण्याच्या या पद्धतीमागे प्राचीन भारतीय परंपरा आहे.

याच पद्धतीचा वापर करून राजस्थानातील प्रतापगड गावी विशिष्ट प्रकारच्या मीनाकारीसदृश कामात हिरव्या पार्श्वभूमीवर सुवर्ण वस्तू चोखंदळपणे जडविण्यात येतात. लघुमंजुषा, तबक, डब्या किंवा तत्सम लहान वस्तू याच प्रकारांनी तेथे तयार करण्याची पद्धत आहे. राजस्थानातीलच नाथद्वारा या गावी मीनाकारीचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. ते प्रायः रूपे, काच किंवा अन्य धातूंवर करण्यात येते व त्यावर चकाकणारे मणी जडविण्यात येतात. मोठ्या आकाराच्या गळसऱ्या करण्याची येथे पद्धत आहे.निएल्लोकाम हा मीनाकारीचाच एक उपप्रकार आहे. विदेशात त्याचा वापर सर्वत्र करण्यात येतो. या पद्धतीने सोन्याचांदीच्या थाळ्यासदृश भांड्यांना अलंकृत करण्याची प्रथा आहे. प्रथमतः भांड्यावर ती नक्षी कोरून घेऊन नंतर त्यावर रूपे, शिसे, तांबे हे धातूमिश्रण ओतून व त्यावर सल्फ्युरीक ॲसिड (गंधकाम्ल) सोडून ते भांडे विस्तवावर तापविण्यात येते; त्यामुळे ते धातुमिश्रण वितळून वस्तूच्या पृष्ठभागाशी एकजीव होते. तेजाबाने (गंधकाम्ल) त्याला एकप्रकारे गुळगुळीतपणा व चकाकी येते आणि भांड्यावरील नक्षीचा भाग कृष्णवर्णी बनतो.

प्राचीन काळी ग्रीक, रोमन व ईजिप्शियन लोकांत नेएल्लोकामाचा बराच प्रसार होता; परंतु बायझंटिन साम्राज्यात (सहावे ते अकरावे शतक) हे काम विशेष लोकप्रिय झाले होते. ॲग्लोसॅक्शन अलंकारप्रायः याच प्रकाराने सुशोभित करण्यात येत. रोमनेस्क काळातील ख्रिस्ती धर्मीयांची उपकरणे निएल्लोकामयुक्त असत. भारत व रशियामध्येही सांप्रत हा प्रकार प्रचलित असल्याचे दिसते. मध्ययुगीन काळात मुलामा पद्धतीने भांडी अलंकृत करण्याचे फ्रान्समधील लिमोझ हे गाव एक प्रसिद्ध केंद्र होते. रोमन कॅथलिक चर्चसाठी येथील कारागीर उत्कृष्ट प्रतीची मुलामायुक्त भांडी तयार करीत असत.

 

 

 

 

 

 

लेखक : चंद्रहास जोशी, शं. ह मुळीक

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate