অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजपूत चित्रकला

राजपूत चित्रशैलीला महत्त्व

भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रात राजपूत चित्रशैलीला महत्त्वाचे स्थान आहे. उच्चभ्रू धनिक मंडळी, सामंतवर्ग आणि सर्वसामान्य समाज या सर्वांचाच राजपूत चित्रकलेच्या उत्कर्षाला हातभार लागलेला आहे. आज उपलब्ध असलेले राजपूत चित्रकलेचे (विशेषतः लघुचित्रांचे व भित्तिचित्रांचे) नमुने पंधराव्यासोळाव्या शतकांतील आहेत; मात्र ते एका दीर्घ परंपरेच्या वारशातून आले होते, हे सहज जाणवते. सतरावे-अठरावे शतक हा या चित्रकलेचा ऐन बहराचा काळ होय. एकोणिसाव्या शतकात ही परंपरा टिकून राहिली; तरी तिचा पूर्वीचा उच्च दर्जा टिकून राहिला नाही. राजपूत चित्रशैलीचा काळ व तिच्या उच्च दर्जाचे श्रेय, यांसंबंधी अभ्यासकांत मतैक्य नाही. ही शैली म्हणजे प्राचीन पश्चिम भारतीय कलेची प्रगत अवस्था मानणारा एक पंथ आहे, तर ह्या कलेच्या निर्मितीचे श्रेय मोगल कलेला देणारा दुसरा पंथ आहे. मात्र आज उपलब्ध असलेल्या साधनांवरून कोणतेही एक मत पूर्णपणे ग्राह्य मानता येत नाही.

भारतात प्राचीन काळापासून राहते वाडे, देवालये इ. इमारती चित्रकामाने सुशोभित करण्याची प्रथा होती. राजपूत अंमलाखाली असलेल्या प्रदेशातही असे चित्रकाम होत असे. प्रत्यक्ष नमुने उपलब्ध नसले, तरी जुन्या स्थानिक वाङ्मयातून चित्रकामाचे अनेक उल्लेख व वर्णने आढळतात. पश्चिम भारताच्या सर्वच भागांत सचित्र, सुशोभित हस्तलिखिते तयार होत होती. त्यांत सर्वाधिक प्रमाण जैन ग्रंथाचे होते; त्यामुळे या विशिष्ट संप्रदायाला जैन चित्रकला असेही नाव काही अभ्यासक देतात, पंरतु इतर धर्मपंथाच्या ग्रंथातील चित्रे याच शैलीत आहेत, म्हणून पश्चिम भारतीय हे भौगोलिक नाव जास्त युक्त वाटते. पुढे ज्यावेळी राजपूत दरबार आणि मोगल दरबार यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले, तेव्हा मोगल चित्रकलेचा प्रभाव मर्यादित स्वरूपात राजस्थानी चित्रकलेवर पडल्याचे दिसून येते. पंरतु थोडयाच अवधीत मोगल चित्रशैलीच्या सानिध्यामुळे व संपर्कामुळे राजस्थानी चित्रशैलीला काहीसे वेगळे रंगरूप प्राप्त झाले. तरीही राजपूत शैली ही स्वंतत्र परंपरा राहिली व तिची वैशिष्ट्यपूर्ण अंगे कायम राहिली.

राजपूत आणि पहाडी चित्रकला

जपूत आणि पहाडी चित्रकला या दोन्ही राजपूत राजाश्रयाने बहरल्या; पण राजस्थानातील राजपूत कलेवर दरबारी प्रभाव जाणवतो, तर पहाडी चित्रकला ही मुख्यतः निसर्गाच्या कुशीत उमललेली सहज स्वाभाविक आणि मुक्त कला वाटते. पहाडी चित्रकलेतील शृंगार हा आल्हादकारी निसर्गाच्या संगतीने बहरतो; तर राजपूत कलेत निसर्गाचे आलंकारिक रूप नजरेत भरते. राजपूत चित्रकलेतील उष्ण रंगसंगतीच्या विरोधी अशी सौम्य रंगच्छटाची रम्य उधळण पहाडी चित्रकलेत पाहावयास मिळते. पहाडी व राजपूत शैलीतील आकृतिचित्रणातील फरकही स्पष्ट आहे. राजपूत शैलीतील आकृती या सुंदर,तेजस्वी आणि आवेशयुक्त वाटतात; तर पहाडी शैलीतील आकृती या माधुर्यपूर्ण आणि निरागस आहेत. कमनीय बांध्याच्या, नाजुक नाक-डोळ्यांच्या, चेहऱ्यावर सुहास्य असलेल्या स्त्रीप्रतिमांच्या लयबद्ध हालचालीतून, पहाडी चित्रांतील काव्य अतिशय बोलके झालेले आहे. राजपूत  आणि पहाडी या दोन्ही शैली आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण रेखांकनासाठी प्रसिद्ध आहेत. राजपूत शैलीच्या चित्रातील रेखा ही प्रवाहपूर्ण आणि जोरकस आहे; तर पहाडी शैलीची रेखा ही मृदू, तरल आणि लयपूर्ण आहे. भावभावनांची उत्कटता अतिशय कोमलतेने तीमधून व्यक्त होते, पहाडी शैलीत ग्रामीण जीवनांची चित्रे, रोजच्या जीवनातील घटना यांचेही विशेष चित्रण आहे. पहाडी चित्रकलेतील स्त्री-पुरुषांची वेशभूषा ही मुख्यत्वे मोगल पद्धतीची आहे.

पहाडी प्रदेशात अनेक ठिकाणी लहानमोठ्या राजपूत घराण्यांचा अंमल होता. या राजपूत घराण्यांच्या आश्रयाने पहाडी प्रदेशात चित्रकलेचा विकास घडून आला. बसोली,गुलेर, कांग्रा, नुरपूर,पूंछ, जम्मू,चंबा इ. या चित्रकलेची प्रमुख केंद्रे होत. पहाडी प्रदेशातील चित्रकलेचे आश्रयदाते हे राजपूत असून वैष्णवपंथी होते, साहजिकच राजस्थानातील राजपूत चित्रकला आणि पहाडी प्रदेशातील चित्रकला यांचे आशय आणि विषय एकच आहेत. दोन्ही ठिकाणच्या विषयवस्तूंत पौराणिक कथानके, कृष्णलीला,रागमाला चित्रे, बारामास, नायक-नायिका भेद, तसेच बोलीभाषेतील कविप्रिया,रसिकप्रिया इ. काव्यग्रंथांचा समावेश आहे. राजस्थानातील आणि पहाडी प्रदेशातील चित्रकला यांची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी समान आहे. त्यामुळे पहाडी चित्रकला ही राजपूत चित्रकलेची एक शाखा आहे, असे सुरुवातीच्या काही संशोधकाचे मत बनले. पण या कालखंडात देशात ज्या ज्या ठिकाणी मुख्यत्वे हिंदू आश्रयाने चित्रनिर्मिती झाली, तेथे सर्वत्र थोड्याबहुत फरकाने सांस्कृतिक पार्श्‍वभूमी ही समानच होती. शैली आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांच्या आधारावर त्यांतील पृथगात्मता स्पष्ट होते. तसेच बाहेरील कलाप्रवाहांनी पहाडी चित्रशैलीला समृद्ध केलेले आहे, हे मान्य करूनही पहाडी चित्रकला ही एक स्वंतत्र निर्मिती व स्वंतत्र शैली आहे. तिला राजपूत अथवा अन्य कोणत्याही शैलीची शाखा मानता येणार नाही. [ कांग्रा चित्रशैली; पहाडी चित्रशैली ; बसोली चित्रशैली].

राजपूत चित्रकलेचे वैशिष्ट्य

राजपूत चित्रकलेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, तिच्यात मध्ययुगीन धर्म, संस्कृती, वाङ्मय, नृत्य, संगीत या सगळ्यांचा सुंदर समन्वय साधला आहे. किंबहुना राजपूत चित्रशैली ही तत्कालीन वाङ्मयाची छायाच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सोळाव्या शतकाच्या सुमारास राजस्थान व नजीकचा पहाडी प्रदेश हा संपूर्णपणे भक्तिमार्गांच्या लाटेखाली होता. वैष्णव संप्रदायाने आपल्या भक्तिमार्गाचा प्रसार करण्यासाठी येथेही बोलीभाषेचा स्वीकार केला आणि त्यामुळे ब्रज भाषेत व अवधी भाषेत भक्तिरसाचा अविष्कार करणाऱ्या उत्कृष्ट काव्यरचना झाल्या. यातही वल्लभाचार्यप्रणीत कृष्णभक्तीचा प्रसार अधिक झाला. नवविधा भक्तीच्या मार्गामुळे सर्वच कलांना धर्माचे अधिष्ठान प्राप्त झाले.सर्वच कलांचे रसात्मक आविष्कार हे ईश्‍वरसेवेकरिता आहेत, किंबहुना हे आविष्कार म्हणजेच भक्ती असा समज रूढ झाला. मधुरा भक्तीला प्राधान्य मिळाले. बालकृष्ण आणि गोकुळच्या गोपी यांचा परस्पर स्नेह, कृष्ण व राधा यांची प्रीती हेच वाङ्मयाचे आणि म्हणूनच चित्रकलेचे प्रमुख विषय झाले. भागवतपुराण व जयदेवाचे गीतगोविंद या दोन संस्कृत ग्रंथांनी मधुरा भक्तीचे विविध आविष्कार घडविले. हे ग्रंथ बोलीभाषेतील साहित्याचे प्रेरणास्त्रोत ठरले. सूरदास, मीराबाई आदींनी कृष्णभक्तीची  सुरस काव्ये गाइली. राजपूत राजदरबारातील कवींनी भक्तिमार्गी काव्याच्या धर्तीवरच; पण आपल्या आश्रयदात्यांना रुचतील अशी काव्ये, विशेषतः राधाकृष्णाच्या शृंगारपर काव्ये निर्माण केली. केशवदास, बिहारी, देव, पदमाकर, मतिराम इ. कवींनी नितांतसुंदर रचना केल्या ओर्च्छा दरबाराचा कवी केशवदास यांच्या रसिकप्रिया व कविप्रिया या काव्यरचना लोकप्रिय झाल्या आणि ती राजपूत चित्रकांराची मुख्य स्फूर्तिस्थाने ठरली. संगीतातील रागरागिण्या, बारामास, नायक-नायिका भेद या विषयांनाही चित्ररूप मिळाले. यांबरोबरच नित्याच्या दैनंदिन जीवनातील प्रसंग, शिकारीची दृश्ये, व्यक्तिचित्रणे यांनाही स्थान मिळाले.

राजपूत चित्रकलेचे तीन प्रमुख प्रकार दिसतात

(१) भित्तिचित्रे

(२) सुशोभित हस्तलिखितांतीलचित्रे

(३) लघुचित्रे (ही प्रायः चित्रसंग्रहांत असत).

भित्तिचित्रांचे वर्णन

भित्तिचित्रांचे विषय सामान्यपणे रामायण, महाभारत यांतील प्रसंग, तसेच नृत्य-गायन, शिकारी असे रोजच्या जीवनातले प्रसंग असत. या चित्रासाठी भित्तिलेपतंत्र व खनिज रंग वापरीत. हे चित्रकाम म्हणजे चित्रकाराच्या अभिव्यक्तीचे साधन न राहता वास्तुशोभनाचे अंग बनले होते. रामायण, महाभारत, गीता, भागवतपुराण, दुर्गासप्तशती, गीतगोविंद, रसमंजरी यांसारख्या ग्रंथांत अप्रतिम चित्रे काढलेली दिसतात. असे सचित्र ग्रंथ आज जगभर ठिकठिकाणच्या संग्रहालयांत दिसतात. ही चित्रे प्रसंगचित्रे किंवा कथनचित्रे म्हणता येतील अशी होती. याउलट चित्रसंग्रहासाठी तयार केलेल्या चित्रांना विषयांची मोकळीक होती. त्यांत रागरागिणी, बारामास आणि व्यक्तिचित्रणे ही मुख्य होत. राजपूत चित्रकांरानी भावदर्शन हे आपले मुख्य ध्येय मानले. ही चित्रे प्रायः वाङ्मयावर आधारित असल्याने साहजिकच वाङ्मयीन कल्पना, उपमा, प्रतीके यांचा मुक्तपणे वापर झाला आहे. त्यामुळे ही कला आलंकारिक बनली. राजपूत शैलीतील रंगयोजना रसानुकूल आहे. रंग सपाट भरलेले असून त्यांत लाल व पिवळा यांना प्राधान्य आहे. वृक्षराजीचा हिरवा आणि आकाशाचा निळा यांना फारसा उठाव नाही. सोनेरी रंग मोठ्या प्रमाणात वापरलेला असल्याने चित्रे चमकदार दिसतात. आकृतींच्या संयोजनात वैविध्य आहे. व्यक्तिचित्रणात एखादी आकृती जशी दिसते, तसेच प्रसंगचित्रणात शंभरापर्यतं विपुल आकृत्या योजल्याचेही दिसून येते. बाह्याकृती बारीक, गतिमान व प्रवाही आहेत. पृष्ठभांगीसाठी निसर्गाचा तसेच वास्तूंचा उपयोग केलेला आहे.

मेवाड, उदयपूर, नाथद्वार,अलवर, बिकानेर, कोटा, बुंदी, किशनगढ. जोधपूर अशा ठिकाणी स्थानिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा विविध चित्रशैली निर्माण झाल्या.

लेखिका :कमल चव्हाण

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate