অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेखन

रेखन

(ड्रॅाइंग). दृश्य जगातील वस्तूंचा बाह्य आकार चित्रफलकावर भिंतीवर किंवा अन्य कोणत्याही पृष्ठावर रेखाटणे म्हणजे रेखन. वस्तूचा आकार काढण्यासाठी कोणत्याही पृष्ठावर त्या मूळ पृष्ठाहून वेगळी दिसेल अशी रेषा वापरावी लागते. या रेषेला वेगळा रंग, निदान वेगळा उठाव (टोन) असावा लागतो. आकार स्पष्ट व्हावयाचा तर ही रेषा स्पष्ट करावी लागते. कारण आकार हा मूलतः रेषेने वेढलेला असतो. ज्या वस्तूचे रेखन करावयाचे तिची बाह्यकृती स्पष्ट दिसणे ही पहिली गरज. या वस्तूच्या अंतर्गत असलेल्या अवयवीभूत आकारांचे तपशील भरण्यासाठीसुध्दा कमीअधिक सामर्थ्यशील रेषेचाच उपयोग केला जातो.

वस्तूंच्या त्रिपरिमाणात्मक आकारांचे रेखन द्विरपरिमाणात्मक पृष्ठावर करताना मूळ वस्तूचे अनेक सलग-विलग व वळणदार पृष्ठघटक स्पष्ट पणे मांडण्यासाठी रेषेचा वापर विविध प्रकारे करावा लागतो. या त्रिपरिमाणात्मक वस्तूवर प्रकाश पडल्याशिवाय ती दृष्टीला दिसत नाही. वस्तुवर पडणारा प्रकाश तिच्या काही पृष्ठघटकांपर्यंत पोहोचतो आणि तेथेच अडतो. जेथे प्रकाश पोहोचत नाही, तेथे छाया राहते. वस्तु जात विश्वातील असंख्य वस्तूंच्या पृष्ठांवरून प्रकाश परावर्तित होतो व विखुरतो. हा विखुरलेला सौम्य प्रकाश वस्तूंच्या प्रकाशरहित पृष्ठघटकावर कमीअधिक प्रमाणात पोहोचतो. जेथे तो मुळीच पोहोचत नाही , तेथे पूर्ण काळी छाया दिसते. पृष्ठघटकांवर पडणार प्रत्यक्ष सूर्यप्रकाशही सर्वत्र सारखा नसतो. काही ठिकाणी तो अत्यंत मंद, तर काही ठिकाणी स्वच्छ पांढरा व प्रखर असतो. अशा रीतीने वस्तूवरील प्रकाशाच्या प्रभावामुळे आणि अभावामुळे पांढरेपणापासून गडद काळ्या छायेपर्यंत अनेक छटा व छायांची स्थित्यंतरे निर्माण होतात. त्यांना उठाव (टोन) अशी संज्ञा आहे.

रेखनामध्ये वस्तूचे त्रिमितिस्वरूप दाखवावयाचे, तर या अनंत छाया-छटांची सूक्ष्म स्थित्यंतरे स्पष्ट व्हावी लागतात. रंग न वापरता फक्त रेखनातून ही स्थित्यंतरे दाखवावयाची, तर त्यासाठी रेषेचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करावा लागतो. वस्तूचा बाह्याकार व अंतर्भूत आकार काही प्रभावी रेषांनी स्पष्ट केल्यानंतर वस्तूची जाडी आणि भोवतालच्या अवकाशाची खोली छायाछटांच्या योगे दाखविली जाते. यासाठी जे पृष्ठ किंवा जो भाग गडद करावयाचा त्या भागात रेषेचे कमीअधिक गडद, कमीअधिक जाडीचे फटकारे (किंवा बिंदूसुध्दा) कमीअधिक अंतर राखून मांडले जातात. यामुळे या रेखाशलाकांमधील चित्रफलकाचा मोकळा पांढरा अवकाश गडद उठावामुळे प्रभावित होतो आणि परिणामी त्या त्या भागातील सर्व उठाव गडद भासतो. फटकारे ज्या साधनांनी मारावयाचे ती पेन्सिल, कोळशाची कांडी यांसारखी साधने ठिसूळ असली, की या फटकाऱ्यांवरून अलगद बोट किंवा कापडासारखी मऊ वस्तू फिरवून उठाव अधिक सलग व एकजीव करता येतो. पांढरेपणापासून काळेपर्यंत असे अनेक उठाव मूळच्या पांढऱ्या चित्रफलकावर निर्माण करून वस्तूच्या त्रिपरिणामाची जाणीव देता येते. निव्वळ रेषेने रेखन करण्याऐवजी अनेकदा जलरंगाच्या एकरंगी पातळ थरांचा वापर उठाव-निर्मितीसाठी केला जातो. कोळशाच्या भुकटीचा उपयोग कुशलतेने केल्यास असेच सूक्ष्म उठाव मांडता येतात. एकूण रेखनात रेषा व उठाव (मग तो कोणत्याही माध्यम-साधनांतून निर्माण केलेला असो) यांच्या संमिश्र प्रभावाने अपेक्षित परिणाम साधावयाचा असतो. यासाठी पेन्सिल, कोळशाची कांडी, कुंचला, जलरंग, तैलरंग, रंगीत खडू (क्रेऑन), शाईचे विविध प्रकार व तत्सम इतर साधने वापरली जातात. एखाद्या सपाट पृष्ठावर टोकदार हत्याराने ओरखडले किंवा खोदले असता खोदीव, खोलगट रेषातयार होते. तसेच मूळ पृष्ठातून वर उचलल्या गेलेल्या कंगोरेदार भागाचीही रेषा होते. भिंतीसारख्या पृष्ठावर माती लिंपून अशीच कमीअधिक जाडीची कंगोरेदार रेषा तयार करता येते. तद्वतच धातूमध्ये किंवा तत्सम वस्तूमध्ये छिन्नीने ठोकून खोलगट किंवा उठावदार रेषा मिळविता येते . अशा अनेकविध रेषांचा उपयोग चित्रकलेत आणि शिल्पकलेत केला जातो.

वस्तुजात विश्वातील आकार रेखित करण्याचे प्रयत्न अगदी मानवी इतिहासात प्राचीन, आदिम काळापासून (इ.स.पू.सु. २५,००० ते १०,०००) केले गेले आहेत. अल्तामिरा येथील आदिमानवांच्या भित्तीचित्रांत जिवंत व संवेदनक्षम रेषा अप्रतिम कुशलतेने वापरलेली दिसते. काही भित्तीरेखनांत बोटांनी किंवा अन्य हत्याराने ओरखडे काढून किंवा मूळ ओल्या भिंतीवर बोटांनी चिखलाचा लेप काढून रेषा तयार केली आहे. ओल्या पृष्ठामध्ये पडलेला खड्डा किंवा ओरखडा, यातून या मानवाला आकार घडविण्याची कल्पना सुचली असावी, असे म्हणता येते . चिखलात रूतलेल्या पावलांवरून (स्वतःच्या वा जंगली श्वापदांच्या वा सापांच्या) आदिमानवाला आकार निषिद्ध करण्याची कल्पना सुचली,असे मानण्यास भरपूर वाव आहे. आदिमानवाचे रेखन प्राथमिक अवस्थेतील व काहीसे बालकाच्या चित्रातील आकारांसारखे अकृत्रिम होते. रेषेत नाजूक तरलतेऐवजी ठाशीवपणाआणि निरतिशय सहजता होती. स्वरसंरक्षण आणि वंशवर्धन या जीवशास्त्रीय गरजा भागविण्यासाठी त्याला जिवावर उदार होऊन बाह्य परिस्थितीशी सातत्याने झगडा करावा लागला, त्याचे प्रतिबिंब त्याच्या रेषेतून दिसते. सुसंस्कृत मानवाच्या रेखनात वस्तूच्या बाह्य स्वरूपाची हुबेहुब अनुकृती किंवा नोंद बहुधा दिसेल. आदिमानवाच्या रेषेतील चैतन्य, झोक, पल्ला व लय सुसंस्कृत कलावंताला (काही आधुनिक कलावंतांचे अपवाद वगळता) क्वचित गवसली. अल्तामिरामधील रेखने किंवा दक्षिण आफ्रिकेतील बुशमन या आदिवासी जमातीची रेखने याची साक्ष देतात. [ आदिम कला; प्रागैतिहासिक कला] .

प्रागैतिहासिक संस्कृतीमधील ईजिप्शियन, मेक्सिकन, मोंहे-जो-दडो, हडप्पा व सुमेरियन उत्थित शिल्पांतील आकार व रेषा अशाच प्रभावी आहेत. आदिमानवाची प्राथमिक रेषा ओजस्वी पण काहीशी बोजड; तर या प्रागैतिहासिक कलावंताची रेषा ओजस्वी सफाईदार व लयबद्ध आहे. वस्तूवरील छायाप्रकाशाकडे त्याचे लक्ष जसजसे वेधले गेले, तसतसे वस्तूच्या त्रिपरिमाणात्मक स्वरूपाचे चित्रण करण्याकडे कल वाढत गेला. या प्रयत्नात रेषेच्या स्वभावगुणाचे व रेषात्म लयीचे भान त्या मानाने कमी होत गेले. ख्रिस्तकाळानंतरच्या बायझंटिन (इ.स.सु. ३३०–१४५३) व मध्य पूर्वेतील इतर चित्र-शिल्पांमध्ये छायाप्रकाशाच्या जाणिवेबरोबरच आकारांची रेषात्म लय काही प्रमाणात जतन करण्याचा प्रयत्न दिसतो. पाश्चात्त्य चित्रकारांमध्ये जॉत्तोच्या काळापर्यंत (१२६७–१३३८) रेषात्म लयीवर लक्ष केंद्रीत केलेले दिसते. प्रबोधनकाळानंतर वस्तूच्या रेखनात सरसहा छायाप्रकाशालाच महत्व येत गेले. यामुळे रेखनाचे अनेक प्रकार उदय पावले. निव्वळ रेखनासाठी केलेले रेखन (डॅाइंग) आणि रंगचित्राची पूर्वतयारी म्हणून केलेले कच्चे आरेखन (स्केच) असे रेखनाचे मुख्यतः दोन प्रकार मानता येतात. स्वयंपूर्ण रेखनात वस्तूच्या जडणघडणीचे भान राखून रेषेचे सौंदर्यही काही प्रमाणात जतन करण्यावर कटाक्ष असतो. रंगचित्राची पूर्वतयारी म्हणून करावयाच्या आरेखनाच्या दोन अवस्था असतात. वस्तूचा नुसता अभ्यास करण्यासाठी केलेले प्राथमिक आरेखन. यात वस्तूच्या सर्व बारकाव्यांचा अभ्यास केला जातो. या सामग्रीतून पुढे चित्र उभारावयाचे असल्याने, त्यातील काही तपशील गाळून, काहींवर भर देऊन, काहींना प्राधान्य तर काहींना गौणत्व देऊन, छायाप्रकाशांच्या उठावांसह जणू चित्रच, पण एकरंगी केल्यासारखे आरेखन केले जाते. लिओनार्दो दा व्हींची, मायकेल अँजेलो, रूबेन्स, व्हेलात्थकेथ, रेम्ब्रँट हे प्रबोधन व बरोक काळातील कलावंत आणि माने, मॉने,ऑगस्टस जॉन, पिकासो हे आधुनिक काळातील कलावंत अशा प्रकारच्या आरेखनांसाठी प्रसिद्ध आहेत. यातही रेम्ब्रँटची आरेखने रंगचित्रांच्या पूर्वतयारीची आरेखन म्हणून विशेष लक्षणीय आहेत. शिल्पासाठीही त्यांची गरज असते. शिल्पाकृतीची रेषात्म लय साधण्यासाठी शिल्पकाराला अशी कित्येक आरेखने करावी लागतात. आधुनिक शिल्पकार रॉदँ आणि हेन्री मुर यांची या प्रकारची आरेखने प्रसिद्ध आहेत.

प्रबोधनकाळाच्या प्रारंभापासून म्हणजे चौदाव्या शतकापासून चित्र, शिल्प व वस्तु या कलांची समृध्दी अनेक अंगांनी होऊ लागली. इतर शास्त्रांच्या शाखा, विशेषतः विज्ञानशाखा, वाढीस लागल्या. लिओनार्दो दा व्हींचीसारखे काही कलावंत हे शास्त्रज्ञ आणि विद्वानही होते. या विशेष ज्ञानशाखांमधील कल्पनांच्या विशदीकरणासाठी रेखनाच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या; तद्वतच लेखणी, कुंचला या रेखन साहित्याच्या जोडीला इतर साधनेही आली आणि त्यामध्ये परिपूर्णता येऊ लागली. लाकूड ,धातू यांवर ओरखडे काढून, खोदून, त्यांच्या उठावदार भागावर छपाईचे रंग वगैरे लावून त्यांच्या आधारे मुद्रित रेखने (ग्राफिक प्रिंट्स) केली जाऊ लागली. धातूवरील अम्लरेखने (एचिंग्ज) आणि शिलारेखने (लिथोग्राफ्स) यांची तंत्रे परिपूर्ण झाली. अशी रीतीने एकाच रेखनाची अनेक मुद्रिते (प्रिंट्स) उपलब्ध होऊ लागली. निव्वळ आलंकारिक आकार व इतर अलंकरणे यांसाठीसुद्धा रेखन केले गेले. अशा रेखनाची कारागिरीसाठी नितांत आवश्यकता असल्यामुळे कलावंताखेरीज इतर क्षेत्रातील कारागीरही आलंकारिक रेखनाचा अवलंब करतात.

निखळ भावनाभिव्यक्तीसाठी म्हणजेच कलाभिव्यक्तीसाठी करावयाच्या रेखनाहून वेगळे विशदीकरणात्मक (इलेस्ट्रेटिव्ह) रेखनप्रकारही व्यवहारात आवश्यक असतात. त्यातील कलाभिव्यक्तीच्या किंचित जवळ असलेल्या प्रकार म्हणजे वास्तुकलेतील रेखन. वास्तुकलावंताने आपल्या प्रतिभेतून पाहिलेली वास्तुकृती प्रत्यक्षात बांधण्यापूर्वी ती प्रत्यक्षात बांधून पूर्ण झाल्यानंतर कशी दिसावयाची आहे याची कल्पना येण्यासाठी वास्तुकलावंताला तिचे यथादर्शनीय रेखन आधीच आणि अगदी काटेकोर अचूकपणाने करावे लागते. बांधकाम करणाऱ्या अभियंत्यांनाही त्याचा अतिशय उपयोग होतो. याशिवाय शैक्षणिक आणि एकूण ज्ञानक्षेत्रात विज्ञान, भूगोल, इतिहास, यांसारख्या विषयांच्या दृश्यरूप स्पष्टीकरणासाठीही विशदीकरणात्मक रेखने करावी लागतात. त्यांत कलाभिव्यक्तीपेक्षाही वस्तुनिष्ठ दर्शन हे महत्वाचे ठरते.

भारतीय आणि इतर पौर्वात्य चित्रपद्धतींमध्ये छायाप्रकाशाला महत्त्व दिले गेले नाही. त्यामुळे रेखनाभिमुख रेषात्म चित्रण हे सर्व पौर्वात्य चित्रकलेचे वैशिष्ट्य ठरले. वस्तूंचे चित्रण करताना त्यांची वास्तवामध्ये दिसते. तशी अचुक अनुकृती करण्याऐवजी, त्यांतील सौंदर्य नेमके वेचण्याची व ते भावनिर्भर आकारांतून अभिव्यक्त करण्याची निकड पौर्वात्य कलावंतांना विशेषत्वाने भासली. त्यामुळे पौर्वात्य रेखन पाश्चात्य रेखानाहून पूर्णतः वेगळ्या प्रकृतीचे राहिले. अजिंठा, बाघ, कोचीन येथील भित्तिचित्रे आणि राजपूत, जैन, मोगल या भारतीय लघुचित्रशैली यांमधील रेषेची लयबद्धता तरलता आणि ओजस्विता अजोड आहे. भारतीय विष्णुधर्मोत्तर पुराणातील ‘चित्रसूत्र’ अध्यायात चांगल्या चित्रांची लक्षणे सांगितली आहेत; त्यांतील पहिले लक्षण ‘रेषां प्रशंसन्ति आचार्याः’ असे आहे. कोचीन भित्तिचित्रांत तर जोरकस रेषा, आकार आणि नाजूक अलंकरण यांचा दुर्मिळ मिलाफ आहे. भारतीय शिल्पांच्या आकारघडणीतही रेषात्म लय नखशिखान्त भरलेली आहे. खजुराहो, हळेबीड, बेलूर, महाबलीपुर, विजयानगर येथील शिल्पे ही याची उदाहरणे आहेत. महाबलीपुर आणि विजयानगर येथील शिल्पांच्या धनाकारांची ओजस्विता मूलतः त्यामधील रेषात्म वळणामुळेच प्रत्ययकारी होते.

रेषात्म लयीच्या दृष्टीने चिनी, जपानी, ईजिप्शियन आणि इराणी कलाप्रकार भारताला जवळचे आहेत. ईजिप्शियन आकारांची ओजस्वी, डौलदार वळणे व प्रतीकात्मकता, तसेच चिनी व जपानी चित्रांमधील नाजूक, तरल व प्रसंगी उग्र होणारी रेषा आणि परिणामी आकार ही पौर्वात्य वृत्तींची निदर्शक म्हणता येतील.

रेखनाची अनेक तंत्रे विविध उपयोगांसाठी वापरावी लागतात. रेखांकित आकार एकदा पूर्ण झाल्यावर ते जसेच्या तसे दुसऱ्यापृष्ठावर उतरविण्यासाठी ते प्रथम पारदर्शक कागदावर गिरवून घेऊन नंतर दुसऱ्या पृष्ठावर उमटवावे लागतात. रेखांकित पारदर्शक कागदाच्या किंवा कापडाच्या मागील बाजूस चिकटणारी पूड किंवा अन्य रंगीत द्रव लावून ते रेखन इच्छित नव्या चित्रफलकावर ठेवायचे व वरून गिरवावयाचे. असे केल्याने त्या रेखनाची अचूक प्रतिकृती खालील पृष्ठावर मिळते. राजपूत, मोगल, जैन वगैरे चित्रशैलींत असे गिरविण्याचे कार्य महत्वाचे असे, कारण मूळ रेखांकन करणारे प्रतिकृतिकारआणि अंतिम सफाईदार रेखन करणारे कलावंत वेगवेगळे होते. त्यांची कार्ये व गुणवत्ताही वेगवेगळी होती.

चिनी व जपानी रेखनांत भारतीय बनावटीची शाई हे मुख्य साधन असते. प्रथम लेखणीने ढोबळ आरेखन करून त्याचे पक्के रेखन नंतर करावयाचे, अशी पद्धत चीन व जपानमध्ये नाही. तेथील कलावंत कुंचल्याने सरळ रेखन करीत जातो आणि तेच अंतिम रेखन असते. समाधानकारक झाले नाही, तर ते रेखन तात्काळ त्याज्य ठरवून इच्छित भाव मिळेपर्यंत अविश्रांतपणे पुनःपुन्हा रेखन करीत राहणे ही या कलावंताची प्रवृत्ती. चिनी व जपानी रेखन पद्धती समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांच्या भाषेतील लेखन अक्षरलिपीने होत नाही; चित्रलिपीनेच होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला चित्रलिपी लिहिण्याचे बाळकडू प्राथमिक शिक्षणापासूनच मिळते. अगदी तरल नाजुक रेषा, तसेच जाड. ठाशीव रेषा व आकार घडविण्याच्या अनेक तंत्रांमध्ये चिनी व जापनी कलावंत पारंगत असतो. त्यांच्या शैलीत रेखन आणि रंगविलेपन कधी कधी तर पूर्णतः एकजीव होऊन येते. [चिनी व जपानी रेखनतंत्र] .

आधुनिक कलाप्रकारांमधील घनवादी चित्रांत वस्तुघनतेला महत्त्व असल्यामुळे वस्तूची जडणघडण करणाऱ्या रेषेला अनन्यसाधारण महत्व आले. पुढे उदय पावलेल्या अप्रतिरूप चित्रांमध्ये मात्र कधी रेषात्म आकारांना महत्व; तर कधी नुसत्या रंगसौंदर्यांला महत्व असे होत गेले.तरीही एकूण चित्रनिर्मिती -प्रक्रियेमधील रेखनाचे महत्व अबाधिक राहते. कारण चित्र, मग ते रेखनप्रधान असो, किंवा रंगप्रधान असो, रंगाकित आकार त्यात ज्या रीतीने एकत्र जडविले जातात, ती जडविण्याची प्रक्रिया ही मूलतः रेखनाचीच असते आणि चित्राला सौंदर्य देणारी लय ही रेषात्म लय असते. आधुनिक कलावंतापैकी ब्राक, पिकासो, व्हान गॉख, गोगँ  यांची चित्रे रेखनप्रधान ठरतील. पिकासोच्या रेखनातील भेदक आक्रमक रेषा आणि व्हान गॉखच्या चित्रांतील ज्वालांची आठवण करून देणारे व गरगर फिरल्यासारखे भासणारे विश्व निर्माण करणारी रेषात्म लय ही मूलतः रेखनप्रवृत्तीनुसार उपजतात. पॉल क्लेच्या काव्यमय अप्रतिरूप चित्रणातील नाजुक, हळुवार व भाववाही रेषा रंगाशी एकजीव होते. जॅक्सन पॉलक सारखे क्रियाप्रभावी चित्रकार आणि तांत्रिक, धातुरसायन किमयेतील (ॲल्केमी) किंवा ताओ पंथातील चित्रकार यांनी रंगविलेली चित्रे प्रायः रेखनप्रधानच असतात.

 

संदर्भ : 1. Ernst, James A. Drawing the Line, New York, 1962.

2. Fawcett, Robert, On the Art of Drawing, London, 1958.

3. Loomis, Andrew, Creative Illustration, New York, 1963.

लेखक : संभाजी कदम

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate