অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाकडी कलाकाम

प्रस्तावना

उपयुक्त आणि सुभोशित वस्तू तयार करण्याच्या उद्देशाने लाकडास देण्यात येणारे रूप व आकार. नित्योपयोगी कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करण्यासाठी आणि घराच्या बांधकामासाठी प्राचीन काळापासून लाकडाचा उपयोग करण्यात आलेला आहे. कापून, कोरून, तासून, जोडून लाकडाचा विविध प्रकारांनी उपयोग करता येतो. इमारतकामाला (खांब, तुळ्या इ. साठी) लांब, बळकट व एकसंध लाकडाचा वापर करण्यात येतो. कोरीवकामाला एकसंध परंतु मऊ लाकडे लागतात. लाकडे निसर्गतःच ठिसूळ असल्याने त्यांच्या रक्षणासाठी रोगणे अथवा लेप यांचा वापर करावा लागतो. रंगसंगती साधण्यासाठी नैसर्गिक रंग असलेली–काळा, तांबडा, पांढरा इ. रंगांची–लाकडे वापरतात. सुगंधी वस्तूंसाठी चंदनाच्या लाकडाचा वापर होतो.

प्रकार

लाकडी कलाकामाचे दोन वर्ग करतात : जोडणीचा आणि दुसरा घडणीचा. जोडणीत नक्षीकाम, जाळी अथवा मूर्ती पट्टया, लाकडी सांधे अथवा खिळे यांच्या साहाय्याने एकत्र आणण्यात येतात. विशेषत: भूमितिजन्य जाळ्या वा छतासारख्या ठिकाणाची नक्षीकामे आधीच आकार दिलेल्या पट्ट्या वा गोल दांडकी एकत्र जोडून तयार केलेली असतात. लाकडाच्या अंगावर इतर रंगांच्या लाकडांच्या, हस्तिदंताच्या वा शिंपल्यांसारख्या पदार्थांच्या आकृत्या बसविण्यात येतात. घडणीच्या वस्तूंत पूर्णाकृती, अर्धउठावाच्या आणि चित्रसदृश असे भाग पाडता येतात. एखादी मूर्ती चारी बाजूंनी प्रत्यक्षात असते, त्याप्रमाणे घडविली असल्यास ती पूर्णाकृती म्हणता येईल. याउलट चित्रसदृश आकृतीत नक्षीला थोडासा उठाव आणलेला असला, तरी सर्व घनमाने दाखविण्याचा हेतू नसतो. आकृती द्विमिती म्हणजे चित्रासारखीच असते. सर्व वेलबुट्या आणि भूमितिजन्य आकृत्या याच पद्धतीने करण्यात येतात. सामान्यपणे हस्तिदंताचे जडावकाम अशा चित्रसदृश आकृतीतच सापडते. पूर्णाकृती व चित्रसदृश या दोहोंमध्ये ‘अर्थउठाव’ येईल. येथे त्रिमिती चित्रणाचा भास तरी उत्पन्न करण्याइतपत खोल कोरीवकाम असते.

लाकूडकामाला वापरण्यात येणारी हत्यारे म्हणजे लाकडाची लांबी कमी करून तुकडे पाडण्यासाठी करवत, लाकूड उभे चिरावयाचे असल्यास दोन माणसांनी चालवावयाची वा यांत्रिक करवत, तर लाकडावरील खडबडीत भाग काढून सपाट पृष्ठभाग तयार करण्यासाठी ‘रंधा’ वापरतात. लाकडाच्या गाभ्यात घुसून हवे ते भाग काढून टाकण्यासाठी  ‘पटाशी’, तर भोके पाडण्यासाठी ‘गिरमिट’ वापरतात. लाकूडकामासाठी–विशेषत: आसने, मंचक तयार करण्याच्या काही पद्धतींत–लेथचा वापर करतात. साधारणपणे पारंपरिक कारागिरांकडे हाताने चालवावयाचे –हाताने वादी वा दोरी मागेपुढे खेचण्याचे–लेथ असतात. अलीकडे विजेवर चालणारे लेथही वापरतात.

संरक्षण

लाकडाच्या वस्तू तयार केल्यावर त्यांवर काही संरक्षक द्रव्ये लावणे जरूरीचे असते. मूर्ती वा खेळणी खऱ्यासारखी आणि आकर्षक दिसण्याकरिता रंगकामाचा उपयोग होतो. तैलरंग अथवा लाखरंग अशा दोन प्रकारे रंग वापरतात. अथवा एकच साधा तेलकट रंग नसेल, तर त्यावर रोगण (व्हर्निश) लावण्यात येते. रंगाखेरीज सौंदर्यवर्धनाची दुसरी पद्धत म्हणजे वर उल्लेखिलेली जडावाची. हवी तेवढी आकृती खोदून तीत निराळा रंग, लाकूड, हस्तिदंत किंवा शिंपले यांसारखे पदार्थ भरावयाचे, रंग वा लाख याऐवजी सोन्यारूप्यांच्या पत्र्यांनी मढविलेल्या लाकडी वस्तूही, विशेषतः छोट्या पेट्या, आसने वा मुखवटे (तूतांखामेनचे थडगे, ईजिप्त) पहावयास सापडता. यांवरील उठावात कोरीवकाम असते; पण ते पत्र्यावर केलेले असते; लाकडाचा केवळ आधार म्हणून उपयोग होतो.

वास्तुकला व काष्ठाशिल्प

लाकडाचा वास्तुरचनेतील उपयोग जवळजवळ तिच्याइतकाच जुना आहे. खांब आणि तुळ्या या कामासाठी लाकडाचा मुख्यत्वे वापर होतो. प्राचीन काळी आवश्यक त्या लांबीचे सलग, एकसंध लाकूड उपलब्ध असणे, हा वास्तुरचनेचा फार मोठा फायदा होता. दगड वा विटा एकत्र जुळवून कमानी उभारण्याचे तंत्र हस्तगत होईपर्यंत आच्छादन घालण्यास–दोन बिंदूंना समपातळीवर जोडण्यास–लाकडाशिवाय अन्य मार्ग नव्हता. पुढे दगडी, लोखंडी वा क्राँक्रीटच्याही तुळ्या अस्तित्वात आल्या, तरी बांधकामपद्धती लाकडी खांब–तुळ्यांसारखीच राहिली. दारे व खिडक्यांच्या चौकटी तसेच सज्‍जासारखे काहीसे अदांतरी राहणारे भाग लाकडीच असत व आजही आढळतात. बांबू, लव्हाळे, मोठी लाकडे या सर्वांचा उपयोग करून बांधलेल्या घरांचे वा राजप्रासादांचे देखावे प्राचीन शिल्पपट्ट्यांत सापडतात. सोळाव्या–सतराव्या शतकांत घरांचे दर्शनी भागही सबंध लाकडीच करण्याची पद्धत लोकप्रिय झाली. दर्शनी भागावर कोरीव नक्षीकाम करण्याची पध्दत अवलंबिण्यासाठीच ही प्रथा अस्तित्वात आली असावी. जपानसारख्या देशात अवलंबिण्यासाठीच ही प्रथा अस्तित्वात आली असावी. जपानसारख्या देशात भूकंप, ज्वालामुखी इ. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी बांबूची अथवा हलक्या लाकडांची घरे व मंदिरे बांधलेली दिसतात.

अलंकृत लाकडी तीरशिल्प, कच्छ (गुजरात). अलंकृत लाकडी तीरशिल्प, कच्छ (गुजरात). सुभोशित स्तंभ अनेक प्रकारचे असू शकतात. गोल, चौकोनी, षट्‌कोनी, अष्टकोनी अथवा वर निमुळते होत जाणारे. अशा स्तंभांचा सामान्य आकार न बदलता त्यांवर चित्रसदृश भूमितिजन्य अथवा वनस्पतिजन्य आकृत्या कोरतात. खांबांचा आकार साधारण तोच ठेवून मध्ये नारळाच्या झावळ्या, पूर्ण कलश अथवा मानवी प्राण्यांच्या आकृत्या बसविण्यात येतात. हे खांब अर्धउठावात कोरतात. तुळ्यांवरील कोरीवकाम चित्रसदृश कोरण्यात येते. जेथे तुळ्या टेकवावयाच्या, तो स्तंभाचा माथा, त्याचे क्षेत्रफळ वाढविण्यासाठी स्तंभशीर्ष आणि हस्त यांचा वापर करतात. स्तंभशीर्षाचा आकार कमळासारख्या फुलांवर आधारलेला असतो, तर हस्तांवर मानवी आकृत्या, पशुपक्षी व वेल-पाने यांनी वेढलेली मकरादी प्रतीके कोरण्यात येतात. दारेखिडक्या यांच्या चौकटी, सज्‍जांचे कठडे तसेच प्रत्यक्ष दारांच्या पृष्ठभागावर वेलबुट्टी आणि द्वारपालादी मानवी आकृत्यांचे कोरीव काम आढळते. भिंती किंवा छते यांसारख्या विस्तृत सपाट भागावर शोभन करावयाचे असेल, तेथे भूमितिजन्य अथवा वेलबुट्टीची रूपके कोरतात किंवा बसवितात. ही रूपके पुनरावृत असतात. पाणपट्ट्यांवरही अशीच सजावट दिसते. वाड्याच्या आतील चौकात वा सज्‍जाच्या कोपऱ्यांवर जेथे पाणपट्ट्या काटकोन करतात, तेथे मोठे लाकडी लोलक लावतात. यांचा साधारण आकार उलट्या टांगलेल्या कळीसारखा वा केळफुलासारखा असतो. यावर वेलबुट्ट्या, मोर किंवा पोपट अशी प्रतीके जडावाने बसविण्यात येतात. भारतात काश्मीर तसेच नैऋत्य राजस्थान, केरळ आणि गुजरात इ. राज्यांत सुप्रसिद्ध लाकडी वास्तू आढळतात.

आशियाच्या पूर्व व आग्‍नेय भागांत एकावर एक पण निमुळती होत गेलेली छपरे असणाऱ्या मंदिरांच्या वा प्रासादांच्या लाकडी वास्तू उल्लेखनीय आहेत. समोर उभारण्यात येणाऱ्या वीथिका व मंडप यांमुळे या वास्तूंना एक प्रकारचा नाजुकपणा प्राप्त होतो; त्या हलक्या, तरंगत्या वाटू लागतात. सिमेंट क्राँक्रीटच्या उपाययोजनेमुळे लाकडाला आज वास्तुरचनेत अत्यंत गौण स्थान प्राप्त झालेले आढळते.

आसन–मंचक

खुर्च्यांसारखी आसने, पलंग वा मंचक, उशा, लहान–मोठे चौरंग अशा अनेक नित्योपयोगी वस्तू प्राचीन काळापासून बनविण्यात येतात. बांबूच्या पट्ट्या व वेत यांचाही या कामी उपयोग करतात. प्राचीन काळी आसने व मंचक फारसे नसावेत, असे शिल्पपट्टातील वा चित्रकामातील प्रतिकृतींवरून दिसून येते. काही ठिकाणी, विशेषत: ईजिप्तच्या थडग्यांत, सापडलेल्या प्रत्यक्ष नमुन्यांत, या आसनावर सोनेरी पत्र्याची नक्षी आहे. बाकी रचना सर्वसाधारण आहे. भारतात व पौर्वात्य देशांत सर्वसाधारणपणे जमिनीवरच बसण्याची पद्धत असल्याने आसने–मंचक यांचे नमुने आढळत नाहीत. पाश्चात्त्य देशांत टिकून असणारे कलाकुसरीचे नमुने सोळाव्या सतराव्या शतकांतीलच आहेत. क्वचित सोनेरी मुलाम्याचे मंचकही आढळतात. प्राचीन काळी शिसवीसारख्या किंवा काळ्या रंगाच्या लाकडी आसनांवर व मंचकांवर, वेलबुट्टीच्या नक्षीने सर्व भाग भरून काढण्यात येई. चर्च आणि मशिदींमधील बाके आणि व्यासपीठे यांवरही लाकडी कोरीवकाम आढळते. चर्चमधील काम मंचकांच्याच शैलीचे असून मशिदींतील व्यासपीठांवर भूमितिजन्य चित्रसदृश आकृत्या कोरलेल्या आहेत.

कैरावान आणि बेशेहिर येथील जामा मशिदींतील व्यासपीठे इस्लामी कलेचे उत्तम नमुने होत. विशेषत:, सिरियात उत्कृष्ट प्रतीचे लाकूडकाम, तसेच जाड बुडाच्या व वर अर्धचंद्राकृती अशा लाकडी उशा आफ्रिका व आग्‍नेय आशियातील बेटे येथे आजही प्रचलित आहेत. यांवर चित्रजवनिका अथवा जाळीकाम असे. काही ठिकाणी मानवी वा पशुपक्ष्यांच्या मूर्ती त्यांवर पूर्णाकृतींत कोरलेल्या आहेत. तबके, छोट्या पेट्या ह्या आज ठिकठिकाणी तयार होतात. यांत चिनी बनावटीच्या वस्तू त्यांवरील उत्कृष्ट कलाकामासाठी प्रसिद्ध आहेत. २० ते २५ सेंमी. व्यासाच्या गोलात बसविलेल्या अष्टकोनी, षट्‍कोनी पेट्या व तबके यांवर लाखेचे रंगकाम व शिंपल्याचे जडावकाम आढळते. अलंकार अथवा प्रसाधने ठेवण्यासाठीच या सुबक पेट्यांचा व तबकांचा वापर होत असावा. काश्मीर व म्हैसूर येथे अशा तऱ्हेच्या छोट्या  वस्तू आज मोठ्या प्रमाणावर तयार होतात. शिसवी, अक्रोड किंवा चंदन यांच्या लाकडाच्या पेट्या, तबके, डब्या, लेखनतबके, दिवे, पुस्तकांच्या अडण्या अशा विविध वस्तूंचा यात समावेश होतो. नक्षीकाम चित्रसदृश असून मध्ययुगीन पाश्चात्त्य शैलीचा या कामावर बराच प्रभाव पडला असल्याचे आढळते.म्हैसुरी कलाकामात चंदन व हस्तिदंत यांचा वापर जास्त असतो. या उपयुक्त वस्तूंसोबतच हत्तींची डौलदार मालिका किंवा मंदिरांच्या प्रतिकृती अशा केवळ सजावटीच्या वस्तू पूर्णाकृतीने तयार करण्यात येतात.

सुबक चंदनी पेटी, कर्नाटक. सुबक चंदनी पेटी, कर्नाटक. आसनादिकांत विशेष प्रसिद्धीस आलेल्या गुजरात–काठेवाड येथील लाकडी कलाकामात आसने, मंचक, पाळणे इ. प्रकार आढळतात. प्रत्येक भाग लेथच्या साहाय्याने गोलाकार करतात. त्याची अंगभूत सजावट म्हणजे टोकांना येणारे गोळे किंवा कळ्यांच्या आकारांची टोके, खुर्च्या व मंचक यांच्या आडव्या दांड्यांवर कळ्यांच्या आकारांचे अनेक लोलकही लावतात. लेथवर असतानाच प्रत्येक भागावर लाखेचा रंग देतात. मात्र इतर नक्षीकाम स्वतंत्रपणे करण्यात येते. सामान्यत: भडक पिवळ्या आणि लाल रंगांबरोबरच भडक हिरव्या रंगाचाही उपयोग करतात. एके काळी अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या कामाला ‘ संखेडा फर्निचर ’ असे संबोधतात. घराण्याचा अलंकार या दृष्टीनेच आज त्याचा क्वचित वापर होत असला, तरी काठेवाडात तो अधिक प्रमाणात आढळतो.

प्राचीन काळी लाकडी भांडी व पात्रे सर्वत्र वापरात होती. वैदिक यज्ञकर्मात लागणारी सर्व भांडीकुंडी लाकडाचीच असत. मातीच्या (खापरी) आणि नंतर धातूंच्या भांड्यांचा प्रसार झाल्यावर लाकडी भांड्यांचा वापर बंद झाला. ती नाशवंत असल्याने त्यांचे जुने नमुनेही आज उपलब्ध नाहीत. आजही काही प्रसंगी लाकडी भांडी–विशेषतः धर्मकांडांत–वापरण्यात येतात. आग्‍नेय आशियातील मॅनस व टॅमी बेटांवर दोन अत्यंत सुबक कटोरे असून त्यांपैकी एक उडणाऱ्या पक्ष्याच्या आकाराचा आहे. समोरच्या बाजूला डौलदार मान, दोहोबाजूंस पसरलेले पंख आणि पाठीमागे मोठा पिसारा, असे त्याचे चित्तवेधक दृश्य आहे. यावरील कोरीवकाम काहीसे सूक्ष्म पण सुसंबद्ध आहे. ही पात्रे मृतांच्या पूजाअर्चेतून वापरीत.

लाकडी घसरगाड्या नवाश्मयुगापासून वापरात होत्या. पुढे त्यांचे चाकांच्या वाहनांत रूपांतर झाले. ही लाकडी वाहने वजनाने हलकी पण बळकट होती. माणसांनीच उचलून खांद्यांवरून न्यावयाच्या पालख्या व मेणेही पुढे अस्तित्वात आले. देवालयांतील पालख्यांवर लाखेचा रंग वा सोन्याचांदीचे मढविलेले पत्रे असून त्या वार्षिक उत्सवांसाठीच वापरीत. याच कामासाठी दक्षिण भारतात रथ वापरतात. चार चाकांच्या मोठ्या चौथऱ्यावर चार ते सात मजलेक्रमाने लहान होत जाणारे व सर्वांत वर शिखर– अशी रथाची रचना असते. मजल्यांभोवती अर्धउठावातील वा पूर्णाकृती मूर्ती असून त्या दरवर्षी रंगविण्यात येत.

मूर्ती व मुखवटे

अत्यंत प्राथमिक तांत्रिक कौशल्य दाखविणाऱ्या बीर कौर या भारतातील मूर्तीपासून तो सयाम–कंबोडियातील सौंदर्यपूर्ण बुद्धमूर्तीपर्यंत सर्वांचा यात समावेश होतो. बीर कौर यात धड व डोके यांमधील फरक एका खाचेने, तर उर्वरित सर्व गोल ओंडक्याने दाखवितात. आफ्रिका आणि पॅसिफिकमधील बेटे येथील प्रचलित देवता व पूर्वजमूर्ती याच तांत्रिक बंधनाच्या आढळतात. सरळ, गोल ओंडक्याच्या मूर्ती करतात. त्या उभ्या आणि शरीरास अवयव चिकटलेल्या दिसतात. मान, डोळे इ. भाग केवळ त्रिकोणी खाचांनी दाखवितात. मूर्ती बसलेली असेल, तर गुडघ्यांत वाकून अधांतरी बसलेली, पण गुडघे ओंडक्याच्या कक्षेबाहेर गेलेली नसणारी दाखवितात. ईजिप्तमधील समाध्यांतून अनेक लाकडी मूर्ती सापडलेल्या आहेत.तंत्र व कला या बाबतींत ह्या मूर्ती अग्रेसर, मर्यादाबद्ध पण सौंदर्यपूर्ण आहेत. अनुबिस ही श्‍वानमुखी देवता, युद्धावर जाणाऱ्या सैनिकांच्या बाहुल्या ह्या सर्व एकाच परंपरेतील आढळतात. मूर्ती पूर्णाकृती असून नाकडोळे, वस्त्रे यांची कलाकुसर आढळते. उभे राहण्याचा मूर्तीचा ताठरपणा बोलका आहे; एक पाय थोडासा पुढे आणि एक हात काटकोनात कोपऱ्यात वाकविलेला, असे त्या मूर्तीचे स्वरूप आहे. एकाच ठोकळ्यातून मूर्ती निघावी असा यत्‍न असला, तरी जोडणीच्या कामाचा मुक्त वापर आहे. जडावाच्या आणि रंगांच्या सजावटीने मूर्ती आकर्षक दिसतात. भारतात. वर उल्लेखिलेल्या मूर्ती दगडी व धातूच्या असून लाकडी मूर्ती नष्ट झाल्या आहेत; फक्त पौर्वात्य कलेला भारतातून स्फूर्ती मिलाली. तिबेट, थायलंड तसेच ख्मेर प्रजासत्ताकमध्ये (कांपुचिया) याचे काही उत्कृष्ट नमुने आजही आढळतात. नेपाळमधील काठमांडू शहरातील अवलोकितेश्वराची २·१ मी. उंचीची बैठी मूर्ती ही माध्यामाच्या दृष्टीने पूर्णत्वे मुक्त आहे. या पूर्णाकृती मूर्तीत वस्त्रांच्या घड्या व चुण्या, अवयवांची गोलाई. चेहऱ्यावरील शांत भाव ही वैशिष्ट्ये काष्ठशिल्पांत क्वचितच आढळतात. पंधराव्या शतकात कांपुचियात कोरण्यात आलेली बुध्दाची रंगीत मूर्ती आकाराने फारशी लहान नसली, तरी तांत्रिक कौशल्याच्या दृष्टीने अवलोकितेश्वराच्या मूर्तीसारखी नाही. तिबेटी कलाकारांनी सोळाव्या शतकात विशेष प्रावीण्य मिळवून मूर्तीची घनता आणि तिची बाह्य रेखा यांचा उत्कृष्ट संगम साधण्यात यश संपादन केले. हाताशी येईल त्या लाकडी तुकड्यावर एकदोन खाचा पाडून मानवी आकृती सूचित करण्याच्या प्राथमिक अवस्थेपासून, तिचा भावाभिव्यक्तीसाठी उपयोग करण्याचे कौशल्य ही लाकडी मूर्तिकलेची दोन टोके आढळतात.

मूर्तिकलेचे छोटे अंग म्हणजे मुखवटे. प्राथमिक समाजातील परंपराबद्ध लोक व आजही काही भागांतील आदिवासी नृत्यांत मानवाचे, पक्ष्यांचे, पशूंचे वा यक्ष–व्याल इ. प्राण्यांचे मुखवटे घालतात. कटोऱ्याच्या आकाराचा एक लाकडी तुकडा घासून, छिनून, त्यावर नाकडोळे व ओठ कोरतात. डोळ्यांसाठी पांढरा रंग वा शिंपले, केसांसाठी गवत, लोकर व काथ्या वापरण्यात येतात. अर्थात हे सर्व मुखवटे रंगविलेलेच असतात. जेते हे मुखवटे शवपेटिकेवर किंवा मृताच्या मंदिरात ठेवतात, त्यावेळी त्यांवर भूमितिजन्य अथवा वेलबुट्टीची प्रतीकात्मक आकृती कोरलेली दिसते [मुखवटे].

खेळणी

आधुनिक काळातील लाकडाचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे खेळणी तयार करणे. प्राचीन काळापासून यासाठी लाकडाचा वापर होत असे. राजे, राण्या, सैनिक, पशु-पक्षी इ. प्रतिकृती तसेच केवळ हातानेच गती देता येणारी खेळणीही तयार करण्यात येत. यांत वजनांच्या साहाय्याने गोलगोल फिरणारे वा कोलांट्या उड्या घेणारे विदूषक, दोरी खेचून गती मिळणारे पंखे, दाणे टिपणाऱ्या  चिमण्या यांचा समावेश होतो. यांतील बहुतेक खेळणी सांप्रत लेथवर तयार करण्यात येतात. ती तैलरंगाने रंगविलेली असतात. हात, पाय तसेच क्वचित शीरही खिळ्यांनी जोडलेले असते. काही खेळणी मऊ लाकडांपासून बनवितात; यासाठी लेथऐवजी धारदार छन्नी किंवा पटाशी हेच मुख्य हत्यार असते. अशा सर्व खेळण्यांत व्यवसाय मिळवून देणाऱ्या बाहुल्या महत्त्वाच्या ठरतात. वस्तुतः खेळणी सुशोभन म्हणून तयार होत नसून त्या त्या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणूनच त्यांचा खप होत असतो. यांत वाद्यवादकांचा ताफा, अंबारीवाले, हत्ती व शिपाई इ. तयार होतात. यांवर चकचकीत तैलरंग आणि रोगण यांचा उपयोग करतात. बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सोंगट्या (प्यादी, घोडे इ.) उत्तम लाकडाच्या, लेथवर फिरविलेल्या अशा मिळतात. आज सामान्यत: सगळीकडे वापरली जाणारी व मोठ्या प्रमाणावर विकली जाणारी लाकडी खेळणी यांत्रिक करवतीने पातळ लाकूड कापून तयार केलेली असतात. ह्यांत कुत्री, मांजरी, मोटारी, टांगे इ. विविध प्रकार असतात. हे तंत्र वापरावयाचे कौशल्य काही खेळण्यांत दिसत असले, तरी कला या दृष्टीने ती निकृष्ट प्रकारचीच मानतात [खेळणी ].

वाद्ये

वाद्ये तयार करण्यासाठी लाकडाचा विविध प्रकारे उपयोग करण्यात येतो. तंतुवाद्यांना लागणाऱ्या भोपळ्यांपासून लाकडी नळकांड्यांच्याच बनविलेल्या आघात–वाद्यांपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत. लाकडाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे नाद परावर्तित किंवा उत्पन्न करण्यास त्याचा मोठा उपयोग होतो. लाकडातून उत्पन्न होणारा नाद मृदू व मधुर असतो. कोरीवकाम या दृष्टीनेच सतारींना देण्यात आलेला मोराच्या डोळ्यांचा व मानेचा आकार आणि मकरमुखाचा लाकडी तबला ही वाद्ये महत्त्वपूर्ण ठरतात.

हत्यारे

विविध लाकडी हत्यारांत रंगीबेरंगी व नक्षीदार ढाली यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. आजही कित्येक रानटी जमाती ही आयुधे तयार करतात. प्रत्यक्ष युद्धावर ती वापरली जात नसून राज्यारोहण, धार्मिक विधी अथवा उत्सव अशाच वेळी वापरण्यात येत असल्याने त्यांवर अधिक कलाकुसर व रंगकाम आढळते.

पुरातन काळापासून फर्निचर वापरात आहे. त्याच्या विविध शैली व कलाकुसर तत्कालीन संस्कृती व त्यांचा विकास यांची साक्ष देतात. भारतात विविध प्रकारच्या पोतांचे मऊ व कठीण लाकडाचे फर्निचर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. हे फर्निचर कालौघात नष्ट झाले असले, तरी शिल्पचित्रादी कलानिर्मितिविषयक ग्रंथांतून वा पुरावशेषांवरून प्राचीन लाकडी फर्निचरचे नमुने लक्षात येतात [फर्निचर].

सांप्रत लाकडाला पर्यायी असे अनेक पदार्थ निर्माण झालेले असल्याने व्यावहारिक उपयोग आणि कलाकसुरीचे माध्यम या दोन्हीही दृष्टींनी लाकडाचा उपयोग व महत्त्व थोड्या प्रमाणात कमी होत असल्याचे आढळते.

लेखक : म.श्री. माटे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate