অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हर्साय

व्हर्साय

फ्रान्सच्या उत्तरमध्य भागातील ईव्हलीन विभागाचे प्रमुख केंद्र, पॅरिसचे निवासी उपनगर व इतिहासप्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या ८८,४७६ (१९९९). पॅरिसच्या नैर्ऋत्येस १८ किमी. वर एका पठारी भागात हे शहर वसले आहे. भव्य व्हर्साय राजवाडा व त्याभोवतीचे सुंदर उद्यान प्रसिद्ध आहे. या राजप्रासादाभोवतीची सुनियोजित शहररचना हे व्हर्सायचे वैशिष्ट्य आहे.

शिकाऱ्यांची मूळ वस्ती असलेल्या व्हर्सायची पहिली रचना १६२४ मध्ये तेराव्या लूईने केली. चौदाव्या लूईने येथील राजवाड्याचा प्रकल्प सुरू केला. फ्रेंच वास्तुविशारद ल्वी ल व्हो याने राजप्रासादाचा वास्तुकल्प तयार केला. बांधकाम पूर्ण होण्यास १६६१ पासून सु. चाळीस वर्षे लागली. राजवाड्याभोवतीच्या शंभर हे. क्षेत्रातील बाग व विहारोद्यानाचा आराखडा आंद्रे लनोत्र याने केला होता. बागेमधील कारंजे आणि तळ्याभोवतीची रंगीबेरंगी झाडे यांची भूमितीय पद्धतीने रचना केलेली आहे. विहारोद्यानातील ग्रँड ट्रायनॉन राजवाडा चौदाव्या लूईने, तर पेटिट ट्रायनॉन राजवाडा पंधराव्या लूईने बांधला. पेटिट ट्रायनॉन राजवाडा सोळाव्या लूईची पत्नी मारी आंत्वानेत हिच्या खास आवडीचा होता.

शहराच्या पश्चिम भागात लांबच-लांब पसरलेल्या व्हर्साय राजप्रासादाचे बांधकाम फिकट पिवळ्या व गुलाबी रंगाच्या दगडांत केलेले आहे. राजवाड्याची लांबी जवळजवळ अर्धा किमी. असून त्यात सु. १,३०० खोल्या आहेत. यातील चित्रशिल्पादी कलाकाम प्रसिद्ध युरोपीय कलाकारांनी केलेले आहे. रंगकाम चालर्स ले ब्रून याने केले. राजवाड्यातील शाही शयनगृहे, आरसे महाल व सलॉन द हर्क्यूल (रूम ऑफ हर्क्यूलस) ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. लाकडावर सोनेरी मुलामा चढवून, तसेच प्राचीन दुर्मीळ कलावस्तू व इतर कलाकुसर यांनी शयनगृहे सुशोभित केलेली आहेत. आरसे महाल म्हणजे एक लांबच लांब सज्जा (गॅलरी) आहे. त्यातील प्रत्येक खिडकीच्या समोर मोठमोठे आरसे लावलेले आहेत. सलॉन द हर्क्यूल याचे छत बरेच उंच असून त्याचे क्षेत्र ३१८ चौ. मी. आहे. हर्क्यूलसशी निगडित ग्रीक पुराणकथांच्या चित्राकृतींनी ते छत सजविलेले आहे.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (१७८९-९९) प्रक्षुब्ध जमावाने राजवाड्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. तेव्हापासून शहराच्या अधोगतीस सुरुवात झाली. लोकसंख्याही एकदम निम्म्याने कमी झाली. राजाचे निवासस्थानही तेथून हलविण्यात आले. इ. स. १८१५ मध्ये ब्ल्यूखर याच्या नेतृत्वाखाली प्रशियनांनी हे शहर लुटले. लूई फिलिप याने १८३७ मध्ये राजवाड्याच्या काही भागांचे संग्रहालयात रूपांतर केले. एकोणिसाव्या शतकात हळूहळू राजवाड्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. राजवाड्यातील हजारो रंगीत चित्रे, पुतळे, लाकडी शिल्पे, नक्षीदार पडदे व इतर कलाकाम यांमुळे हा राजवाडा म्हणजे जगातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक संग्रहालय बनले आहे.

युरोपातील अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना व्हर्सायशी निगडित आहेत. ब्रिटन व संयुक्त संस्थाने यादरम्यानचा अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध सामाप्तीबाबतचा करार व्हर्साय येथे २० जानेवारी १७८३ रोजी झाला. फ्रँको-प्रशियन युद्धकाळात (१८७०-७१) व्हर्साय हे जर्मन सैन्याचे मुख्य ठाणे होते. तसेच १८७१ मध्ये जर्मन सम्राटाचा येथे राज्याभिषेक करण्यात आला. जर्मनीबरोबरचा आठ वर्षांचा काळ शांततेत गेल्यानंतर फ्रेंच संसद या राजवाड्यात आणण्यात आली. १८७५ मध्ये फ्रान्सच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाचे संविधान येथेच स्वीकारण्यात आले. तिसऱ्या व चौथ्या प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची निवडही येथेच करण्यात आली. पहिल्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांच्या युद्धमंडळाचे व्हर्साय हे मुख्य केंद्र होते. दोस्त राष्ट्रे व जर्मनी यांच्या दरम्यान २८ जून १९१९ रोजी झालेल्या प्रसिद्ध व्हार्सायच्या तहावर या राजवाड्यातील आरसे महालात सह्या झाल्या. दुसऱ्या महायुद्धकाळात सप्टेंबर १९४४ ते मे १९४५ यांदरम्यान दोस्त फौजांचे येथे प्रमुख ठाणे होते. सध्या या राजवाड्याचा उपयोग महत्त्वाचे अतिथी व अधिकाऱ्यांसाठी स्वागतकक्ष व निवासस्थान म्हणून केला जातो. येथे राष्ट्रीय संग्रहालय आहे.

सध्या व्हर्साय हे पॅरिसचे निवासी उपनगर तसेच महत्त्वाचे प्रशासकीय व लष्करी केंद्र आहे. शहरातील निवासी क्षेत्र पश्चिम भागात आहे. शहराच्या सतोरी या सर्वांत जुन्या भागात सेंट लूईस कॅथीड्रल (१७४३-५४), तर उत्तरेकडील ली चेस्ने भागात नोत्रदाम चर्च आहे. शहरात सैनिकी रुग्णालय-सैनिकी अभियांत्रिकी व तोफखाना विद्यालय आणि राष्ट्रीय कृषिसंशोधन केंद्र आहे. येथील उद्यान विज्ञान विद्यालय (स्था. १८७४)  प्रसिद्ध आहे. व्यापारी व शैक्षणिक दृष्ट्याही शहराला महत्त्व आहे. धातुकाम, दारू गाळणे, चर्मकाम व बागायती हे प्रमुख उद्योग येथे चालतात. युरोपातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांपैकी व्हर्साय हे एक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येत असतात.

 

लेखक : वसंत चौधरी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate