অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शोभित हस्तलिखिते

शोभित हस्तलिखिते

(इल्युमिनेटेड मॅन्युस्किप्ट्स). नानाविध प्रकारचे आलंकारिक आकृतिबंध, रंगीत चित्रे, सुलेखन व सुनिदर्शने यांचा वापर करून सजविलेले हस्तलिखित गंथ व पोथ्या. कित्येकदा या सजावटीत सोनेरी वा चंदेरी वर्ख वापरून चमकही आणली जाते. मूळ लॅटिन ‘ इल्युमिनेर ’(उजाळा देणे) या शब्दावरून ‘ इल्युमिनेटेड ’हा इंगजी शब्द आला व हस्तलिखिताच्या संदर्भात ‘ रंग व धातू यांनी उजाळा दिलेले ’असा अर्थ त्याला प्राप्त झाला. गंथांची शोभा वाढवून ते आकर्षक करणे, चित्रे व रेखाटने यांव्दारे मजकूर अधिक स्पष्ट करणे, असे अनेक अर्थ या प्रकाराला पुढे प्राप्त झाले. गंथशोभन (इल्युमिनेशन) व ⇨सुनिदर्शन (इलस्ट्रेशन) या संज्ञांमध्ये खूपच साधर्म्य असले, तरी सुनिदर्शन हे गंथातील मजकुराच्या स्पष्टीकरणार्थ, विशदीकरणार्थ, मुख्यतः एक प्रकारची गरज म्हणून योजिले जाते; तर शोभन हे चमकदार रंगसंगतीचा व अन्य अलंकरण-घटकांचा वापर करून मुख्यतः गंथाचे दृश्यसौंदर्य वाढविण्यावर भर देते. ‘ मिनिएचर ’हा शब्द लॅटिन ‘ मिनिअम ’(‘ रेड लीड ’- रोमनांनी आद्याक्षरे या अर्थी वापरलेला शब्द) वरून आला असून, तो शोभित हस्तलिखितातील सुट्या, एकेका चित्रासाठी सामान्यतः योजिला जातो.

हस्तलिखितांच्या सुशोभनाची कला मध्ययुगातच उदयास येऊन कळसास पोहोचली. मात्र तिची पूर्वपरंपरा थेट प्राचीन ईजिप्शियन पपायरसांवरील सुशोभित हस्तलिखितांपर्यंत नेऊन भिडविता येते. ईजिप्शियन थडग्यांतील बुक ऑफ द डेड ही आद्य शोभित हस्तलिखिते म्हणता येतील. ग्रीक-रोमन काळातही हस्तलिखित गंथांची सजावट होत होती. त्यांच्या अलंकरणात अभिजात वास्तूच्या वा निसर्गदृश्याच्या पार्श्वभूमीवर आदर्श मानवी आकृत्यांचे चित्रण केलेले आढळते.

प्राचीन व मध्ययुगीन काळात मुख्यत्वे धार्मिक पोथ्या व हस्तलिखिते यांची सजावट केली जात असे. चर्च तसेच अन्य धर्मसंस्थांशी ती प्राय: संबंधित असत. इ. स. १००० पूर्वीच्या काळात ‘ गॉस्पेल ’(शुभवर्तमान पोथ्या) सजावटीची प्रथा विशेष प्रचलित होती. अकरावे ते तेरावे या तीन शतकांत त्यांची जागा ‘ सॉल्टर ’(बायबल च्या ‘जुन्या करारा ’तील स्तोत्रांचा संगह) गंथांच्या सजावटीने घेतली. चौदाव्या-पंधराव्या शतकांत ‘बुक ऑफ अवर्स’च्या (प्रार्थनापुस्तिका) सुशोभनाला जास्त प्राधान्य मिळाले. शिवाय काही हस्तलिखितांच्या सजावटीही परंपरेने दीर्घकाळचालू राहिल्या. उदा., गूढाविर्भाव साहित्य (अपॉकॅलिप्स), बोधपर प्राणिकथा (बेस्टिअरी) इत्यादी.

हस्तलिखितांचे सुशोभन विविध प्रकारे केले जाई. कित्येकदा संपूर्ण पृष्ठभर चित्रण केले जाई, तर कधी गंथाच्या आरंभीची वा आद्याक्षरांची सजावट केली जाई. काही वेळा हस्तलिखितांचे समास वा कडा यांचे सुशोभन केले जाई. हे सुशोभन लघुचित्रे, दृश्यचित्रे-विशेषतः आख्यायिकांची व ऐतिहासिक घटनांची चित्रे, आलंकारिक मूलबंध, सुलेखन अशा अनेकविध प्रकारांनी केले जाई. मजकुराभोवतीची संपूर्ण रिकामी जागा, समास अथवा त्याचा अंशभाग यांवरही सुशोभन केले जाई. प्राचीन व मध्ययुगीन काळात हस्तलिखिते ही पपायरस, कातडे, पातळ चर्मपत्रे (व्हेलम), भूर्जपत्रे, ताडपत्रे इत्यादींवर लिहिली जात. साधारणपणे चौदाव्या शतकापासून लेखन व सजावटीसाठी काही प्रमाणात कागदाचा वापर होऊ लागला.

बायझंटिन सुशोभन : पाचव्या व सहाव्या शतकांतील द व्हिएन्ना जेनिसि, द रोझ्झानो गॉस्पेल्स व सिनोप गॉस्पेल्स ही महत्त्वाची शोभित हस्तलिखिते होत. नवव्या शतकाच्या उत्तरार्धापासून बायझंटिन गंथसजावटीचे नमुने उपलब्ध आहेत. उदा., ग्रेगरी ऑफ नाझिआनस (८८०-८६) हेपहिल्याबॅझिलसाठीतयारकेलेलेसुशोभितहस्तलिखित. बायझंटिनगंथशोभनाचीप्रमुखकेंद्रेम्हणजेशाहीगंथलेखनशाला, तसेच कॉन्स्टँटिनोपल येथील वेगवेगळे मठ ही होत. बायबल, सॉल्टर, गॉस्पेल बुक यांच्या संहिता या काळात प्रामुख्याने लिहिल्या व सजविल्या जात. यांतील थिओडोर सॉल्टर हे शोभित हस्तलिखित विशेष उल्लेखनीय होय. गॉस्पेल गंथसजावटीत चार शुभवर्तमान-लेखकांच्या (इव्हँजलिस्ट) पूर्णपृष्ठाकार व्यक्तिप्रतिमा, क्रिस्ताची सिंहासनाधिष्ठित प्रतिमा, गंथाच्या आरंभीचे व शिरोभागाचे अलंकरण (सामान्यतः भौमितिक वा वेलबुटीच्या नक्षीने सजविलेले आयताकार) यांचा समावेश असे. अक्षरवटिकांना आलंकारिक रूपे देऊन व त्यांत अधूनमधून बायबल मधील प्रसंगचित्रे रंगवून हस्तलिखिते सजविली जात.दहाव्या शतकात नवनव्या गंथशोभन शैली उदयास आल्या. त्यांत मानवाकृतीचे शैलीकरण हे ठळक वैशिष्ट्य होते. रंगांचा भपकेबाजपणाही वाढला. उदा., 'होमिलीज ऑफ द मंक जेम्स’व 'मेनॉलॉजी ऑफ बॅझिल द सेकंड व्हॅटिकन ’(९७६१०२५). ‘ होमिलीज ’या प्रकारात प्रवचने असत, तर मेनॉलॉजीमध्ये संतचरित्रे व दिनदर्शिका असत. दुसऱ्या बॅझिलसाठी तयार केलेल्या मेनॉलॉजीमध्ये निरनिराळ्या आठ चित्रकारांची ४३० लघुचित्रे होती.

हिबेर्नो-सॅक्सन सुशोभन : हिबेर्नो-सॅक्सन किंवा अँग्लो केल्टिक गंथशोभन शैली ही सातव्या-आठव्या शतकांत आयर्लंड व उत्तर ब्रिटन-मधील केल्टिक धर्ममठांतून विकसित झाली. केल्टिक शिल्पकला व धातुकाम यांच्या प्रभावातून ह्या शोभन शैलीचा उदय झाला. गंथाच्या संहितेतील ऐतिहासिक तपशिलांकडे व सुनिदर्शनाकडे दुर्लक्ष करून केवळ शुद्घ, रेषात्मक अलंकरणावर भर देणारी ही शैली होती. सूक्ष्म व नाजुक रेषांचे जाळीकाम हे या शैलीचे ठळक वैशिष्ट्य. वलयाकार, आंतरगुंफित रेषांची जाळी, नागमोडी, सर्पिल वकाकार नक्षी तसेच चौकडे, पट्ट्या, किल्ल्या इत्यादींचे आकृतिबंध तीत दिसतात. पशूंची व मानवाची चित्रे लांबलचक, अनैसर्गिक, विकट बृहदाकारांत असून ती अलंकरणात समाविष्ट असत. या शैलीत शैलीकरणाचे प्राचुर्य आढळते. हिबेर्नो-सॅक्सन सजावट मुख्यत्वे गॉस्पेल बुकांच्या हस्तलिखितांत आढळते. आयर्लंडमधील बुक ऑफ केल्स (आठवे शतक) या हस्तलिखितात लाल केसांच्या व निळ्या डोळ्यांच्या मानवाकृती दिसतात, तर लिंडिस्‌फार्न गॉस्पेल (सातवे शतक) मध्ये शुद्घ आलंकारिक स्वरूपाचे चित्रण आढळते. रेखाटनात रेषेचा उपयोग बहुधा रंगविलेल्या भागाची कडा दाखविण्यासाठी केला जाई. बुक ऑफ ड्यूरो (सातवे शतक) हेही या शैलीतील एक उल्लेखनीय हस्तलिखित होय.

कॅरोलिंजिअन सुशोभन : शार्लमेन राजाच्या कारकीर्दीत (७६८-८१४) फ्रान्समध्ये इतर कलांप्रमाणेच गंथशोभन कलेचाही उत्कर्ष झाला. आठव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते दहाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ही परंपरा आढळते. पुरातन, बायझंटिन, इंग्लिश अशा सर्व शैलींची वैशिष्ट्ये आत्मसात करून ही शोभनशैली सर्वसंग्राहक बनली. या शैलीत अभिजात धाटणीतील कथनपर चित्रण आढळते. जांभळ्या रंगाच्या पातळ चर्मपत्रावर सोनेरी अक्षरांनी हस्तलिखिते लिहिली जात व वेलबुट्ट्या, पर्ण-फुलादी अलंकरणाने ती भरगच्च सजविली जात. उदा., अदा गॉस्पेल्स. आखेन येथील शाही गंथलेखनशालेतील शोभित हस्तलिखितांत अभिजात अलंकरणशैलीची समृद्घ परंपरा दिसून येते. उदा., शार्लमेन गॉस्पेल बुक, तसेच सुवर्णाक्षरांनी सजविलेले एबन गॉस्पेल्स, उत्रेक्त सॉल्टर ही या काळातील अन्य उल्लेखनीय शोभित हस्तलिखिते होत.

ऑटोनियन सुशोभन : जर्मनीतील ऑटो सम्राटांच्या आधिपत्याखाली जर्मनीत अनेक ठिकाणी धार्मिक मठांची स्थापना झाली, त्यांतून ऑटोनियन अलंकरणशैली विकसित झाली. जर्मन शहरांतील कॅरोलिंजिअन गंथलेखनशाला ऑटोनियन अलंकरणाची केंद्रे बनल्या. पुनरूज्जीवित कॅरोलिंजिअन परंपरेत बायझंटिन प्रभाव येऊन मिसळला. धार्मिक हस्तलिखितांच्या सजावटीत क्रिस्तजीवनावरील चित्रमालिका रंगविल्या जात. गंथारंभी सोनेरी वर्खाचा वापर चमक आणण्यासाठी केला जाई. ऑटोनियन गंथशोभनाची तीन प्रमुख केंद्रे होती : (१) रिचेन्यू येथील गंथांच्या (दहावे-अकरावे शतक) सजावटीत भव्य भावदर्शी व्यक्तिप्रतिमा साकारल्या जात. उदा., एग्बर्ट गॉस्पेल्स व ऑटो दी थर्ड गॉस्पेल्स. (२) रेगेन्झबर्ग गंथसजावटीत कॅरोलिंजिअन व बायझंटिन प्रभावांचे मिश्रण आढळते. उदा., गॉस्पेल बुक ऑफ हेन्री द सेकंड. (३) सॉल्झबर्ग येथील गंथसजावटीत एकरंगी बाह्यरेषा-चित्रणावर विशेष भर होता. उदा., पेरीकोप बुक ऑफ सेंट एऱ्हेनट्रूड (बारावे शतक).

विंचेस्टर संप्रदाय : राजा ॲल्फेडनेनवव्याशतकातविद्येचेजेपुनरूज्जीवनघडवूनआणले, त्यातून इंग्लिश गंथशोभनाचा विंचेस्टर संप्रदाय उदयास आला (दहावे-अकरावे शतक). या शैलीत फडफडणाऱ्या वस्त्रप्रावरणांमध्ये झाकलेल्या व्यक्तिप्रतिमा केवळ बाह्यरेषा व रंगछटांनी दाखवीत. समासांतील पर्णाकृतींची नक्षी व सोनेरी रंगांचा वापर ही तिची वैशिष्ट्ये होत. बेनेडिक्शनल ऑफ सेंट एथेलवोव्ह हे या शैलीतील सर्वोत्कृष्ट हस्तलिखित होय. केवळ मोजक्या रूपरेषात्मक लघुचित्रांनी तसेच तुरळक प्रमाणात साध्या शाईतील रेखाटनांनी सजविलेली हस्तलिखितेही या काळात निर्माण झाली. उदा., केडेमॉन मॅन्युस्क्रिप्ट (अकरावे शतक).

रोमनेस्क सुशोभन : (दहावे ते बारावे शतक). या काळात नवनव्या धर्मसंस्था व पंथ यांचा उदय झाला व त्यायोगे हस्तलिखिते, गंथ व गंथालये यांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली. त्यांतून सुशोभनाच्या अनेक प्रणाली व शैली विकसित झाल्या. मोठमोठया आकारांच्या बायबल च्या प्रतींचे लेखन व सुशोभन केले जाई. बाराव्या शतकाच्या मध्यकाळातील बायबल च्या प्रतींमध्ये दुहेरी रेघांनी साधलेले चुणीदार वस्त्रचित्रण (डॅम्पफोल्ड स्टाइल) आढळते. या शैलीत, परिधान केलेल्या वस्त्रप्रावरणांना दुहेरी रेषेच्या चुण्या पडल्याचे दाखविले आहे. रोमनेस्क शोभनशैलीचे हे ठळक वैशिष्ट्य होय. तसेच गडद व झगझगीत रंगछटांचा वापर प्राय: करण्यात येई. चर्च-मठादींच्या आर्थिक संपन्नतेबरोबर गंथसजावटीतील भपकेबाजपणाही वाढत गेला. उदा., ‘ विंचेस्टर’ बायबल च्या सजावटीत रंगांच्या गडद छटांची व झगमगीतपणाची परिसीमा गाठलेली आहे.

गॉथिक सुशोभन : (तेरावे-चौदावे शतक). फ्रेंच व इंग्लिश हस्तलिखितांत या शैलीचे विशुद्ध व परिणत रूप आढळते. पंधराव्या शतकात ‘ लो कंट्रीज ’(नेदर्लंड्स, बेल्जियम, लक्सेंबर्ग) मधील हस्तलिखितांतून ही शैली बहरलेली दिसते. बाराव्या शतकाच्या अखेरीपासून हस्तलिखिते मठांच्या गंथलेखनशालांतून हौशी चित्रकारांकडे सुशोभनासाठी सोपविली जात. विदयापीठांच्या व सर्वसामान्य वाचकांच्या उद्यानंतर हस्तलिखितांचे आकार लहान व हाताळणीस सुलभ असे होत गेले. गॉथिककालीन फेंच हस्तलिखितांच्या सजावटीत नेत्रदीपक रंगझळाळी आढळते. त्यात सोनेरी रंगाच्या पार्श्वभूमीवर उठावदार तांबड्या व निळ्या रंगांचा वापर केला जाई. झां प्यूसेल (सु. १३००-५५) याचित्रकाराच्यागंथसजावटीतमजकुराभोवतीपाने, फुले, पक्षी, कीटक यांची नक्षीदार झगझगीत रंगीत चौकट असे. त्याच काळात समासांत मानव व पशू यांच्या चित्रविचित्र वा विनोदी आकृत्या रंगविण्याची पद्घत (ड्रॉलरी) रूढ झाली. फ्रान्स, इंग्लंड, लो कंट्रीज येथील हस्तलिखितांतील काही समासचित्रणांचा शेजारच्या मजकुराशी दूरान्वयानेही संबंध नसे. क्वीन मेरीज सॉल्टर (चौदावे शतक), रोमान्स ऑफ अलेक्झांडर (१३४४) यांतील अद्‌भुतरम्य चित्रणे विशेष प्रसिद्घ आहेत. तेराव्या शतकाच्या अखेरीस सांकेतिक पर्णचित्रांची जागा नैसर्गिक पानाफुलांच्या चित्रणाने घेतली. उदा., अल्फान्सो सॉल्टर (सु.१२८४), इंग्लंडमधील ईस्ट अँग्लिकन हस्तलिखिते (चौदावे शतक).

पंधराव्या शतकातील हस्तलिखितांच्या सजावटीत तत्कालीन नामवंत चित्रकारांचा वाटा मोठा आहे. पॉल, हेर्मान व यान या लिम्बर्ख बंधूंनी बेरीच्या ड्यूककरिता रंगविलेले, ‘ बेरीच्या ड्यूकचा वैभवसंपन्न काळ ’(सु. १४१३-१६) हेसर्वोत्कृष्टहस्तलिखितगॉथिकशैलीतीलसुंदर सुनिदर्शनांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात दरबारी जीवनातील दृश्ये व निसर्गचित्रेही आहेत. त्यातील दिनदर्शिकेत प्रत्येक महिन्यातील मानवी दिनकम व निसर्गदृश्ये यांचे वास्तववादी चित्रण झगमगत्या रंगसंगतीत केले आहे. पंधराव्या शतकाच्या अखेरच्या पंचवीस वर्षांतील फ्लेमिश हस्तलिखितांचे सुशोभन हा या कलेच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. मास्टर ऑफ मेरी ऑफ बर्गंडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या फ्लेमिश गंथशोभनकाराने हस्तलिखितांच्या समासांत नैसर्गिक शैलीतील लघुचित्रे रंगवून या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रयोग केले. उदा., प्रेयरबुक ऑफ एंगेलबर्ट ऑफ नॅसॉ (सु. १४८५-९०). पंधराव्याशतकातीलफ्रान्समधीलझांफूकेयागंथशोभनकारानेबुकऑफअवर्सची (१४५०-६०) सजावटकेली, तीत अभिनव रीत्या अवकाश-निदर्शन केले आहे.

इस्लामी सुशोभन : इस्लाम धर्मीयांत कुराणा चे लेखन पवित्र मानले जात असल्याने सुलेखनाचे नानाविध प्रकार व शैली उदयास आल्या. इस्लामी कलावंतांनी मजकुराभोवती नानाविध वेलबुट्ट्या, भौमितिक आकृत्या व अन्य अलंकरण-प्रकार योजून कुराणा ची सजावट केली. ‘ कुफिक ’व ‘ नक्शी ’या सुलेखनाच्या दोन शैली मुख्यत्वे कुराणा च्या लेखन-सजावटीसाठी वापरल्या जात. इस्लामी लघुचित्रांचा उदयही गंथसजावटीतून झाला. अनेक काव्यगंथांचेही सुनिदर्शन तत्कालीन शोभनकारांनी केले. उदा., फिर्दौसीचे शाहनामा हे महाकाव्य, तसेच गद्यगंथांचीही वैविध्यपूर्ण व विपुल सजावट केल्याचे आढळते. उदा., बोस्तान व गुलिस्ताँ कलिला वा दिम्ना (पंचतंत्रा चे अरबी रूपांतर) इत्यादी. वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान, वैदयक इ. विषयांवरील अनुवादित गंथांत सजावटीसाठी लघुचित्रांचा वापर मुख्यत्वे करण्यात आला. बिहजाद ह्या इराणी चित्रकाराने लघुचित्रणाव्दारे हस्तलिखितांची सजावट केली. सादीच्या बोस्तान साठी पाच लघुचित्रे व निजामीच्या खमसा काव्याच्या दोन हस्तलिखितांतील अठरा लघुचित्रे बिहजादने रंगविली.

भारतीय हस्तलिखित शोभन : भारतीय चित्रकलेची विविधता हस्त-लिखितांच्या सजावटीतूनही प्रकट झाली आहे. हस्तलिखित गंथांच्या सजावटीतून लघुचित्रशैलीचा उदय झाला. पाल-सेन काळातील (दहावे- -अकरावे शतक) नालंदाच्या बौद्ध विदयापीठात ताडपत्रावरील लिपिरेखनात चित्रे समाविष्ट केलेली दिसतात. (उदा., प्रज्ञापारमिता हस्तलिखित). सुमारे दोन इंच रूंदीच्या व सु. दीड फूट लांबीच्या ताडाच्या पानांवर ही हस्तलिखिते आहेत. लिपिरेखन काळ्या शाईत व चित्रण अनेक रंगांत केले जाई. अजिंठा भित्तिचित्रशैलीचा प्रभाव चित्रणावर दिसतो. अकराव्या ते तेराव्या शतकांतील भूर्जपत्रांवरील वा ताडपत्रांवरील जैन पोथ्यांतील चित्रे उल्लेखनीय आहेत. तसेच सोळाव्या शतकापर्यंत निर्माण झालेली जैन सचित्र हस्तलिखिते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. साधारण बाराव्या शतकात कागदाचा उपयोग सुरू झाला व जैन शोभनशैलीने वैशिष्ट्यपूर्ण वळण घेतले. त्यात सुलेखनातील चित्राचा प्रभाव वाढला. विशेषतः पंधराव्या शतकातील कल्पसूत्र हे जैन हस्तलिखित कलात्मक सजावटीसाठी प्रसिद्घ आहे. महावीराच्या जीवनातील विविध प्रसंगचित्रे, तसेच ऋषभनाथ व अन्य तीर्थंकरांच्या चरित्रांतील अनेक घटना-प्रसंगांची चित्रे ह्या हस्तलिखितात आहेत. कालकाचार्य कथा, सुबाहू कथा, ज्ञातसूत्र, नागरसर्वस्व (पद्मश्रीकृत कामशास्त्रा वरील रचना) अशा अनेक गंथांची चित्रमय हस्तलिखिते उल्लेखनीय आहेत. गुजरात, राजस्थान भागांत तयार झालेली सचित्र जैन हस्तलिखिते (अकरावे ते पंधरावे शतक) हे भारतीय कलेचे वैभव आहे. मुसलमानी अंमलात पर्शियन हस्तलिखितांचा प्रभाव पडला व त्यानंतर भारतीय हस्तलिखितांतही प्रगल्भता व विविधता वाढतच गेली. विशेषतः श्रीमद्‌भागवत व रामायण ही दाक्षिणात्य धाटणीत सजविलेली हस्तलिखिते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अशा प्रकारच्या चित्रमय हस्तलिखितांचा प्रभाव महाराष्ट्रातही पडला. सतराव्या-अठराव्या शतकांत मराठा अंमलात, विशेषतः पेशवाई काळात, काही चांगल्या चित्रमय पोथ्या महाराष्ट्रात निर्माण झाल्या. धुळे, नगर, पुणे व नागपूर येथील वस्तुसंग्रहालयांत उत्तम सचित्र पोथ्या पहावयास मिळतात. नागपूर वस्तुसंग्रहालयातील रघुजी भोसले यांच्या मूळ मालकीची श्रीमद्‌भागवत ही पोथी सर्वोत्कृष्ट आहे.

साधारणपणे मुद्रणकलेच्या शोधानंतर हस्तलिखित गंथशोभनाची कला हळूहळू लोप पावत गेली; तथापि सोळाव्या शतकाच्या प्रारंभी यूरोपात काही उत्तमोत्तम शोभित हस्तलिखिते निर्माण झाल्याचे दिसते. उदा., ग्रिमानी ब्रेव्हिअरी, अवर्स ऑफ ॲनऑफब्रिटनीइत्यादी. पंधराव्या-सोळाव्याशतकांतकाहीछापीलपुस्तकांतहीसुशोभनेकेलेलीआढळतात. इटलीमध्ये अशा छापील गंथशोभनाची निर्मिती झाल्याचे दिसून येते.

संदर्भ :1. Backhouse, Janet, Illuminated Manuscript, 1990

2. Ghosh, A. Ed., Jain Art and Architecture, New Delhi, 1975.

3. Ranade, Usha R. Manuscript Illustrations of the Medieval Deccan, 1983.

लेखक : श्री. दे.इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate