অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोनार कलाकाम भाग २

सोनार कलाकाम भाग २

रोमन : इ. स. पू. चौथ्या शतकात चांदीच्या भांड्यांवर उठावदार सजावट करण्याची शैली सुरू झाली. या प्रकारच्या कामाचा विस्तार ग्रीकांश काळात आणि मुख्यतः अँटिऑक आणि ॲलेक्झांड्रिया येथे झाला. रोमन साम्राज्याच्या अस्तापर्यंत हीच शैली चांदीच्या वस्तूंची सजावट करण्याकरिता वापरात राहिली.

रोमन काळात चांदीच्या थाळ्या असणे सौंदर्यासक्तीची व अभिमानाची बाब होती. उठावरेखनाला सामान्यपणे तांत्रिक नावे (उदा., एंब्लेमॅटा, सिगिल्ला, क्रस्टी) वापरात होती. तत्कालीन मालक थाळ्यांचे वजन विक्रमी रीत्या वाढवीत, त्याबाबत तुलना करीत व वजने डामडौलात वाढवून सांगत असत. इ. स. पू. दुसऱ्या शतकात रोमनांनी ग्रीस व आशियातून मोठ्या प्रमाणावर सोने व चांदी लुटून आणली. दुसरा प्लिनी याच्या सांगण्यानुसार प्रजासत्ताक काळातही रोम शहरात प्रत्येकी १०० किग्रॅ.च्या १५० पेक्षा जास्त चांदीच्या थाळ्या होत्या.

रेन येथे सापडलेल्या (बिब्लिओथेक नॅशनलमध्ये ठेवलेल्या) अत्यंत दुर्मिळ अशा वाचलेल्या सोन्याच्या बाऊलच्या (वाडगा) तुकड्यावर सविस्तरपणे सजावट केलेली आहे. त्याची लांबी २५ सेंमी. असून वजन १ किग्रॅ. ३०४ ग्रॅ. इतके आहे. केंद्रभागातील पदकावर बाक्खूस आणि हरक्यूलिझ यांच्यातील मद्य पिण्याची स्पर्धा चित्रित केलेली आहे. कोरीव चित्रात आणि कड्यापर्यंत नाजूक पुष्पगुच्छांच्या चौकटीत १६ सोन्याची नाणी आहेत. ही नाणी हेड्रीयन ते कारासेल्ला प्रकारची आहेत. याच संग्रहात खूप मोठ्या थाळ्या देखील आहेत, त्यांच्या संपूर्ण पृष्ठभागावर पौराणिक किंवा ऐतिहासिक विषयांचे उठावरेखन केलेले आहे. यांतील सर्वांत मोठी सापिओची ढाल ७० सेंमी. व्यासाची असून तिचे वजन १० किग्रॅ. २९१ ग्रॅ. एवढे आहे.

सुरुवातीचा ख्रिस्ती आणि बायझंटिन काळ : सुरुवातीच्या ख्रिस्ती सोनारकामावर पेगन कामाची त्यातील नैसर्गिक सहजता, सुशोभिकरण आणि उठावरेखन व चेसिंग या पारंपरिक तंत्राची दाट छाया होती. कधी कधी त्यातील विषय देखील अभिजात होते. रोम येथे सापडलेल्या एस्क्विलीन खजिन्यातील चौथ्या शतकातील प्रोजेक्टा आणि सेकंद्स यांच्या लग्नाचा संदूक पेगन दृश्यांनी सजविलेला आहे. तो आता ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात ठेवलेला आहे.

या काळाच्या उत्तरार्धातील बहुतांशी सोनारकाम पूर्व-ख्रिस्ती भागात आढळते. सिरिया, ईजिप्त, सायप्रस, आशिया मायनर आणि रशिया या देशांत बहुतकरून चर्चच्या वस्तूंच्या स्वरूपात आढळते. उदा., चषक, धूपपात्रे, मेणबत्ती मांडण्या (स्टँड), वाडगे, थाळ्या इत्यादी. या काळातही चेस करणे व उठावरेखन प्रामुख्याने केले जात होते, मात्र अमूर्त आकार व ख्रिस्ती चिन्हे यांच्या निएल्लोमधील जडावकाम वाढताना आढळून येते. या पदार्थांवर सहाव्या व सातव्या शतकांत राजचिन्हांच्या नियंत्रणमुद्रा प्रकट होऊ लागलेल्या दिसतात. कोणते शहर सोनारकामासाठी मध्यवर्ती होते हे ज्ञात नाही. मात्र पूर्वेची राजधानी कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) हे महत्त्वाचे शहर होते.

सुरुवातीच्या ख्रिस्ती काळातील फक्त खाजगी दागिने शाबूत राहिले आहेत; मात्र सहाव्या व सातव्या शतकानंतर इतर वस्तू देखील सापडतात. नंतरच्या काळात सर्वांत महत्त्वाचे स्पेन आणि इटलीच्या राजघराण्यांतील सरदारांनी चर्चना दिलेले संकल्प मुकुट आणि क्रॉस होते. यांपैकी सर्वोत्तम टोलिडो प्रांतातील ग्वाराझार येथे सापडले आहेत. ते दागिने रत्नांनी जडविले आहेत. ते आता नॅशनल आर्किऑलॉजिकल म्यूझियम (माद्रिद) आणि म्यूसे द क्लूनी (पॅरिस) येथे पहावयास मिळतात. मोन्झा चर्च (इटली) येथील ॲजिलुल्फ राजाचा क्रॉस आणि थेओडोलिंडा राणीने बनवून घेतलेली सोन्यात कोरलेली पुस्तकांच्या आवरणाची जोडी इत्यादी. या आवरणांवर मोती, रत्ने आणि कॅमिओ (उठावाच्या नक्षीला एक रंग आणि पाठीमागे दुसरा रंग असलेला दागिना) मढविले असून सोन्याचे क्लाँसोने काम खड्यांनी जडविलेले आहे. ब्रिटनमधील जडावकामाचे क्लाँसोने दागिन्यांचे सोनारकाम अतिउच्च प्रतीला पोहोचले होते. पिशव्यांची आवरणे, तलवारी आणि सेनोटॅफ (ज्यांचा मृतदेह इतरत्र कुठे दफन असेल, अशा व्यक्तीच्या सन्मानार्थ बनविलेले स्मारक) यांमधील दागिन्यांत ते दिसून येते, तसेच सोनारकामाचे अवशेष सातव्या शतकातील पूर्वअँग्लियन राजाचे स्मारक सुटॉन हू (सुफ्फॉल्क) येथे देखील आढळतात. आता ते ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात संग्रहित आहे.\

मध्ययुग : मध्ययुगातील मौल्यवान धातूंचे शाबूत राहिलेले बहुतेक काम चर्चशी निगडित आहे : जसे (१) सोन्याची वेदी; उदा., मिलान येथील सेंट ॲम्ब्रॉजिओ (सन ८५०) वेदीवर येशू ख्रिस्त आणि सेंट ॲम्ब्रॉस यांच्या आयुष्यावरील प्रसंग कोरलेले आहेत. ते क्लॉईसोने एनॅमलच्या चौकटीत बंदिस्त आणि खुले काम केलेले आहेत; (२) अवशेषमंजूषा आणि पुस्तक रत्नांनी जडविलेली, दृश्य आणि आकृत्यांचे उठावरेखन असलेली आवरणे; उदा., सेंट एम्मेराचे कोडेक्स ऑरियसचे (सन ८७०, बायरिश स्टॅॲट्सबिब्लिओथेक, म्यूनिक) आवरण. या अवशेषांवरून कॅरोलिन्जियन कामाची अपूर्वता दिसून येते. अकराव्या शतकापर्यंत सोनारकामाच्या या शैलीचे प्रभुत्व होते.

रोमनेस्क : बाराव्या शतकात चर्चने धर्मनिरपेक्ष राज्यकर्त्यांना प्रमुख कलाश्रयदाता बनविले आणि मोठमोठ्या मठांमध्ये कलाकाम करण्यात आले. या काळातील सोनारकाम करणारे कारागीर अज्ञात राहिले नाहीत. हेल्मार्हौझनचा रॉजर, यूवीचा राइनर व गॉडफ्रा दी क्लेर, व्हर्दनचा निकोलास आणि इतरांची कामे ओळखता येतात. ऱ्हाईन आणि म्यूझ या सोनारकाम केंद्रांवर त्यांनी नेतृत्व केलेली कामे ओळखता येतात. यांची सर्वोत्कृष्ट उपलब्धी म्हणजे शाल्व्हे मीनाकारीचा विकास या पद्धतीने आधीच्या क्लाँसोने तंत्राला बदलले. सोने आणि चांदी यांचा मीनाकारीत तसेच वेदींसाठीच्या चौकटींसाठी किंवा लहान धार्मिक द्विपुटचित्रे वा त्रिपुटचित्रांसाठी, चर्चच्या गाभाऱ्यातील उठावरेखन केलेल्या आकृती आणि ताम्रपटांसाठी मौल्यवान धातूंचा वापर होत होता.

गॉथिक कला : सतत वाढत्या संपत्तीमुळे राजघराणे, सरदार व श्रीमंत व्यापारी यांनी पॅरिसमध्ये व मोठ्या शहरांत १२०२ मध्ये धर्माशी निगडित नसलेले सोनारकामाचे कारखाने तसेच सोनारकाम करणाऱ्यांचे संघ स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

रोमनोत्तर काळात सोनारकाम, वास्तुकला, स्मारक शिल्पे आणि हस्तिदंत कला यांमध्ये जर्मनी आणि इतर लहान देशांचा पुढाकार होता. तो पुढे फ्रान्सकडे आला. वास्तुशिल्पाचे आकार नेहमीप्रमाणेच मौल्यवान धातूत तयार केले जात. उदा., एव्हर येथील सेंट तुरिन यांची चांदीची समाधी हे गॉथिक चर्च होय.

उत्तर गॉथिक काळात पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘गोल्डनेस रॉसेल’ (१४०३, स्टिफ्टस्कर्श, ॲल्टॉटिंग, पश्चिम जर्मनी) आणि थॉर्न अवशेषमंजूषा (ब्रिटिश वस्तुसंग्रहालय) यांसारखे प्रादेशिक खजिने निर्माण झाले. मध्यम वर्गाच्या उदयामुळे ख्रिस्ती धार्मिक विषयांव्यतिरिक्त काम असलेले सोनारकाम निर्माण होऊ लागले. इंग्लिश मेझर (चांदीचे आवरण असलेला पिण्याचा चषक) आणि मोठ्या प्रमाणात विविधता असलेल्या स्तूपिका असणारे चांदीचे चमचे ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या अवेशषमंजूषा आणि वेदी अजूनही निर्माण होत होत्या. मध्ययुगाच्या शेवटी वास्तुकलेतील शैलीचा दाट प्रभाव पडून सोनारकामात विकास होऊन विविध राष्ट्रीय प्रतीके व प्रतिमा असलेल्या वस्तू निर्माण होत होत्या. उदा., इंग्लंडमधील भौमितिक लंब प्रकार आणि फ्रान्समधील नाजूक गुलमोहरासारखे नक्षीकाम.[ गॉथिक कला].

सोने व चांदीची शुद्धता कठोरपणे नियंत्रित केली जात असे व त्यावर शिक्का (हॉलमार्क) छापलेला असे. इंग्लंडमध्ये अशा ओळखखुणा अत्यंत काळजीपूर्वक तपासल्या जात.

इस्लाम : कुराणात सोने व चांदी या धातूंना निषिद्ध मानण्यात आल्याने त्यांचा इस्लामी देशांत वापर मर्यादित प्रमाणात झाला आहे, मात्र यामुळे सोनारकामाच्या अमूल्य कारागिरीची मोडतोड करून ते धातू वितळविले जात असत. सुरुवातीच्या काळातील इस्लामी सोनारकाम वा दागिने अत्यंत दुर्मिळ आहेत. फातिमीद आणि मोगल काळातील काही बकले व हातकंगण पहावयास मिळतात. तसेच स्पेनमधील हेरोना येथील चांदीची आभूषणे (हस्तिदंतावरील नक्षीसारखी) आणि बर्लिन येथील तेराव्या शतकातील चांदीचा सॅसॅनियन प्राण्यांचे उठावमुद्रण असलेला तुकडा आदी उदाहरणे होत.

प्रबोधन ते आधुनिक काळ : चौदा ते सोळावे शतक : रोमन पुरातनशैलीचे पुनरुज्जीवन करून पुढे नेण्यात इटलीचे सोनारकाम करणारे कारागीर यूरोपात आघाडीवर होते. मात्र सोनारकामाचे पुरावशेष उपलब्ध नसल्याने त्यांना ब्राँझ आणि संगमरवरमधील फुलदाण्या (पात्रे) यांच्या प्रतिकृतींवरून काम करावे लागले. वेगळ्या माध्यमात कलाकारांनी बनविलेल्या जुन्या अवशेषांवरून सोनारकाम करणाऱ्या कारागिरांनी मुक्तपणे आपल्या परिप्रेक्ष्यातून काम केले. आज या कामांपैकी फारच थोड्या सोनारकामाच्या वस्तू शिल्लक आहेत. त्यांतील सर्वांत प्रसिद्ध पहिल्या फ्रान्सिससाठी फ्लॉरन्टाईन बेनव्हेनुनो चेलिनी याने एनॅमलमध्ये बनविलेली सोन्याची मीठदाणी होय (कुन्स्थिस्टोरीशेस वस्तुसंग्रहालय, व्हिएन्ना). सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन आणि स्थलांतरित झालेले सोनारकाम कारागीर कॉसिमो (पहिला) व ग्रॅन्ड ड्यूक ऑफ तस्कनी यांच्याकडे काम करीत होते. त्यात विशेषतः एनॅमल व कठीण दगडांपासून बनविलेले आणि सोन्याने मढविलेली पात्रे आहेत. फ्लॉरेन्स येथील पिट्टी पॅलेसमधील म्यूसियो देग्ली अर्जेन्टी येथे आणि कुन्स्थिस्टोरीशेस वस्तुसंग्रहालयात ती उत्तम स्थितीत पहावयास मिळतात. याच प्रकारची कामे मिलानमधील साराशी कुटुंबाने केलेली आहेत.

फ्रान्समधील सोनारकाम कमी प्रमाणावर शाबूत राहिले आहे. शिल्लक राहिलेले बरेच काम लूव्ह्र् वस्तुसंग्रहालयातील ॲपोलो गॅलरीत ठेवलेले आहे. यूरोपातील इतर देशांतील सोनारकाम करणारे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात गॉथिक शैलीतच काम करीत होते. स्पेनमधील कारागिरांनी आपल्या भरपूर नक्षीकामाने नटलेल्या शैलीला आपल्या ‘प्लॅटेरिया’ नावावरून त्या काळाला प्लॅटेरेस्क्यू असे नाव दिले होते. नवीन जगातून प्राप्त झालेल्या मौल्यवान धातूंचा वापर करून एनरिके आणि युआन डी आरफे या सोनारकाम करणाऱ्या कस्टोडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यजमानासाठी मोठ्या आकाराचे कवच बनविले होते. पोर्तुगालमधील सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे गिल व्हिसेंट याने (१५०६) बनविलेले बेलेम मठाचे प्रवेशद्वार. हे गॉथिक शैलीत बनविलेले आहे. नंतर पोर्तुगीज सोनारांनी स्पेनसारखी स्वतंत्र शैली विकसित केली. मात्र ती स्पॅनिश शैलीची नक्कल नव्हती. सोळाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट सोनारकाम फ्लॉरेन्सच्या (इटली) सोनारांकडून झालेले आढळते. या कारागिरांना मॅनेरीस्ट शैलीविषयी विशेष आस्था होती, जी इटलीत निर्माण झाली होती. परंतु स्थानिक कोरीव काम करणाऱ्यांनी तिला परावर्तित केले होते. १५८० च्या सुमारास डच सोनारांनी फ्लॉरेन्सच्या सोनारांशी स्पर्धा सुरू केली.

सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रभाव नसलेले बरेच काम होते. पुनर्निर्माणाच्या संघर्षात चर्चसाठी बनविलेले बरेचसे काम नष्ट करण्यात आले. प्रबोधन शैलीची सुरुवात हान्स हेल्बेइन (लहान) याने राजासाठी फुलदाणी पात्रांची निर्मिती केली तेव्हा झाली. तिचा प्रसार नंतर निम्नस्तरीय देशांत व जर्मनीत झाला.

सतरावे शतक : या शतकाच्या पूर्वार्धात व्हान व्हायानेन्स आणि योहान्स लुत्मा या डच सोनार कारागिरांनी अलिंद (ऑरिक्युलर) या भरदार सजावटीच्या स्वरूपाचा विकास केला. ती उत्तर यूरोपात (इंग्लंडसह) सामान्य होती. ख्रिस्तीयन व्हान व्हायनेन हा चार्लस् पहिला याच्यासाठी राजसोनार म्हणून काम करीत असे. जर्मनीमध्ये सलग ३० वर्षे (१६१८-४८) युद्ध चालल्यामुळे तेथील सोनारकाम निर्मितीतील प्रमाण व दर्जा दोन्ही खालावले होते. शतकाच्या उत्तरार्धात डच सोनारकामात पातळ पत्र्यांवरील उठावरेखन केलेले काम आढळते. ते वापरापेक्षा प्रदर्शनाकरिताच वापरले जात असे. फ्रान्स निर्विवादपणे आधुनिक शैलीतील काम करण्यात आघाडीवर होता. चौदावा लूई याने सैन्याला वेतन देण्यासाठी सोन्याच्या शाही थाळीला वितळविले, तेव्हापासून या काळातले कोणतेही सोनारकाम शिल्लक नाही. १६८५ मध्ये फ्रान्स सोडलेल्या ह्यूगनॉट सोनारांच्या कामांमध्ये तत्कालीन कामाचा दर्जा दिसून येतो. फ्रान्सच्या प्रांतीय सोनारांनी इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर निवडीची व आवडीची कारागिरीची नवीन परिमाणे निर्माण केली.

व्हर्साय येथील राजे व उमरावांमध्ये चांदीचे फर्निचर वापरण्याची चाल (फॅशन) प्रसिद्ध होती. लाकडी चौकटीत चांदीचे पत्रे तयार करून ठोकत असत. प्रत्येक दिवाणखान्यात शृंगार मेज, आरसा व मेणबत्ती स्टॅन्डची जोडी असे. फ्रान्समध्ये राज्यक्रांतीनंतर असे फर्निचर शिल्लक राहिले नाही; मात्र इंग्लंड, डेन्मार्क, जर्मनी आणि रशिया येथे बऱ्याच प्रमाणात वाचले. सलग ३० वर्ष युद्धकाळामुळे जर्मनीला आपली पत परत मिळविता आली नाही. तरीही प्राग व म्यूनिक येथील राजघराण्यांतील एनॅमलमध्ये केलेले सोन्याचे नक्षीकाम व अंत्यरूपण कला अद्वितीय आहे.[ बरोक कला]

अठरावे शतक : या काळात इंग्लंडमधील सोनारकामात साधेपणासह प्रारूपात लालित्य आढळून येते. तर डच आणि जर्मन सोनार याच तऱ्हेचे मात्र कमी आल्हाददायक काम करीत. या काळातील सर्व फ्रेंच सोनारकाम नष्ट झाल्यामुळे इंग्लंडच्या कामाला पूर्वप्रसिद्धी प्राप्त होऊ शकली; जे काम बचावले ते नक्षीच्या अस्सलपणात आणि उत्कृष्ट अंत्यरूपण कलेत अद्वितीय आहे. फ्रेंच सोनारकामाला नक्षींची उत्कृष्टता आणि ओतकाम व चेसिंग कामातील उच्च गुणवत्तेमुळे वरिष्ठता प्राप्त झाली आहे. इतर सोनार धातू उठावरेखनात काम करीत, तर फ्रेंच कारागीर प्रतिरूप (मॉडेल) बनवून ओतकाम करून दागिने व आभूषणे बनवीत. या कामात जादा मौल्यवान धातूंची गरज भासत असे. फ्रान्समधील छोट्या गावातील सोनार मोठ्या शहरातील कारागिरांशी यशस्वी रीत्या स्पर्धा करीत, तर इंग्लंडमधील सर्व उत्तम सोनार लंडनमध्ये एकवटले होते. फ्रेंच रोकोको शैली १७३० च्या सुमारास इंग्लंडमधील ह्यूगनॉट व पारंपरिक सोनारांनी स्वीकृत केली.

वसाहती अमेरिका : नवीन जगातील वसाहती काळात जे सोनारकाम होते, ते यूरोप व इंग्लंड यांपासून तयार झालेले होते. इंग्रज कारागिरांनी सोनारकाम सतराव्या शतकात उत्तर अमेरिकेतील न्यू इंग्लंड येथे प्रथमतः आणले. बोस्टन, न्यूपोर्ट, न्यूयॉर्क शहर, फिलाडेल्फिया, बाल्टिमोर आणि ॲनापलीस ही सोनारकामाची महत्त्वाची केंद्रे होती. माबेल ब्रॅडी गार्व्हान संग्रह (येल विद्यापीठ), बोस्टन म्यूझीयम ऑफ फाईन आर्टस्, अमेरिकन विंग ऑफ द मेट्रपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट आणि फिलाडेल्फिया म्यूझीयम ऑफ आर्ट या ठिकाणी सर्वोत्कृष्ट सोनारकामांचा संग्रह आहे. त्या काळाचे उत्तर अमेरिकेतील काम साधेपणा आणि डौलदार ब्रिटिश रूपामुळे ओळखता येते. तर मेक्सिको, ब्राझील, कोलंबिया, पेरू, चिली आणि बोलिव्हिया येथील काम यूरोपीय कल्पनेसारखे आहेत. त्यात आयबेरीयन नक्षी आणि रूप यांचे संमिश्रण दिसते, त्याच्यावर पूर्व-हिसपॅनिक काळाचा प्रभाव आढळतो. यातील बहुतेक अवशेष चर्चमध्ये दैवी (पवित्र) पात्रे म्हणून टिकले आहेत. मात्र काही खाजगी संग्रह देखील आहेत.

एकोणिसावे शतक : नेपोलियनच्या साहसामुळे फ्रान्समधील सोनारकामातील फॅशन प्रमुख व्हायला सुरुवात झाली आणि तेथील शैली संपूर्ण यूरोप खंडात पसरली. इंग्लंडमधील राजसोनार कारागिरांनी (मुख्यतः पॉल स्टॉर्‌र) फ्रान्सच्या शैलीत बदल करून स्वतःची ठळक अशी शैली निर्माण केली. या काळातील (१८१३-१६) सर्वोत्कृष्ट स्मारक ‘घरकामवाली’ लिस्बनमध्ये बनविले गेले व पोर्तुगाल स्वतंत्र झाल्यामुळे ड्यूक ऑफ वेलिंग्टनला ते भेट दिले. ते स्मारक आता ॲप्सले हाऊस, लंडन येथे ठेवलेले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर सुरुवातीच्या शैली पुनरुज्जीवित करून त्यात व्हिक्टोरियन शैलींचे संमिश्रण करण्यात आले. त्यासाठी आवश्यक ती सविस्तर माहिती विविध स्रोतांवरून रेखाटण्यात आली. सोनारकामातील कलाकुसरीतील कौशल्य उच्च स्तरावर होते, मात्र खेड्यातील काम अनुसाधित केलेले व निवडलेले होते. कारागीर त्यांवरील नैसर्गिक परिणाम दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असत. या शतकाच्या उत्तरार्धात सोनारकाम कारखान्यांत आणि सोनारकाम करणारे लोककामगारांत परिवर्तित झाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सोनारकामातील मानके बदलली आणि दुसरी महत्त्वपूर्ण चळवळ विल्यम मॉरीस आणि आर्ट नोव्हू (आधुनिक कला) शैलीमुळे सुरू झाली. इंग्लंडमध्ये आल्फ्रेड गिल्बर्ट या शिल्पकाराने महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी शृंगारिक (रोमान्टिक) विषयांत हस्तिदंत व मौल्यवान खडे वापरून आभूषणे तयार केली.

आधुनिक काळ : सन १९१४ नंतर यांत्रिकीकरण झालेल्या जवळपास सर्व देशांत व्यापाराचे स्वरूप सामाजिक बदलांमुळे पूर्णपणे बदलले. सोनारकाम करणाऱ्या काही कलावंत कारागिरांनी स्वतंत्र कामाचे स्टुडिओ उभारून, व्यापारीदृष्ट्या कमी नफ्याचे मात्र कलात्मकदृष्ट्या लक्षणीय काम केले. त्यातील अनेक कलावंतांनी कला विद्या-लयात शिक्षक व कारखान्यात आकृतिबंध सल्लागार म्हणून काम केले. कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक कामामुळे (उदा., मुद्रा उत्कीर्णन, दाबकाम, कातकाम, ओतकाम आणि चकाकी आणणे वगैरे) आर्थिक दृष्ट्या फायदा झाला, तरी कलात्मक काम अभावानेच होऊ लागले. सोन्याचे दागिने, आभूषणे, वस्तू आदींचा किरकोळ व्यापार करणारे व्यापारी कारखाने व घाऊक विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर घेऊन तो माल निनावी विकत. त्यामुळे शैलीमधील उत्क्रांती होण्यास नवीन यंत्रांची किंमत, घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांची सावधगिरी, लोकांची खरेदी आणि सोन्याच्या उत्पादांची सौंदर्यमूल्यापेक्षा गुंतवणूक म्हणून पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोण या बाबींचा अडथळा होत होता. याच्या परिणामस्वरूप वेशभूषेसाठी केलेली आभूषणे सजीव वाटतात. सर्वोत्कृष्ट आधुनिक कलात्मक काम सामान्यतः कमी प्रमाणात झाले. त्याचा व्यापारावर खूपच कमी प्रभाव पडला.

पॅरिसमधील रेनो लेलिक याच्या कामामुळे आर्ट नोव्हू चळवळीला प्रेरणा मिळाली. ती चळवळ आधी बेल्जियममध्ये व नंतर संपूर्ण यूरोप व अमेरिकेत पसरली. पीटर कार्ल फॅबर्गी याने लहान आभूषणांसाठी कलाकुसरीचे सरस मानके निर्माण केली. डेन्मार्कमधील सुप्रसिद्ध सोनार कारागिरांनी डॅनिश शैली निर्माण करून कारखाने स्थापन केले व विक्रीसाठी जगभर दुकाने उभारली. ज्यायोगे कलावंतांनी निर्मिलेली कलाभूषणे त्यांच्या स्टुडिओपुरती मर्यादित न राहता सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. जॉर्ज जेन्सन, योहान र्‍होड यांसारख्या सोनार कलावंतांचा प्रभाव स्कँडिनेव्हियन देशात पसरला. १९६० पर्यंत फक्त जर्मनी कामाचा दर्जा व कलावंत कारागिरांची संख्या यांबाबतीत स्कँडिनेव्हियन देशांशी बरोबरी करू शकला. गिसलिंगेन येथील डब्ल्यूएम्एफ् (वुर्टेम्बर्गश मेटलवॉरेन फॅब्रिक) कारखाना हा चांदीच्या वस्तू तयार करणारा बहुधा यूरोपातील सर्वांत मोठा असावा. इंग्लंडमध्ये सर्वांत जास्त वैशिष्ट्यपूर्ण कामे झाली आहेत. सोनारकाम कारागिरांच्या कंपनीने १९४५ पासून उदयोन्मुख कलावंताना पुढे येण्यासाठी मदत केली आहे.

भारतातील सोनारकाम : भारतात सोने ही धातू अत्यंत प्राचीन काळापासून ज्ञात असून वापरात आहे. तिला सुवर्ण वा हिरण्य असा शब्द योजलेला आढळतो. ऋग्वेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत आदी ग्रंथांत सोन्याचे व सोनारकामाच्या कौशल्याबाबत वारंवार उल्लेख आलेले आढळतात. त्यांतील सुवर्णालंकार किंवा वास्तुशिल्पात सोन्याचा झालेला वापर यांतील वर्णनांवरून तत्कालीन सोनारकाम कारागिरांचे कौशल्य व निपुणता लक्षात येते.

कौटिल्याच्या मते सोनारकामाचे क्षेपण, गुण व क्षुद्रक हे तीन प्रकार आहेत. हिरे-माणकांच्या जडावाच्या कामाला ‘क्षेपण’, सोन्याची तार ओढून केलेल्या कामाला ‘गुण’, तर भरीव किंवा पोकळ दागिने तयार करण्याला ‘क्षुद्रक’ असे म्हणतात. मढविणे व मुलामा देणे हे देखील सोनारकामाचे प्रकार होत. सोनारकाम करणाऱ्यांचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद इ. ठिकाणी आहे. नंतरच्या काळात सुवर्णकार व सुवर्णकर्तार असा देखील उल्लेख आढळतो. सोन्याच्या परीक्षेत हे लोक अत्यंत निपुण व तरबेज असल्याने पाणिनीने त्यांना आकर्षिक हे विशेषण लावलेले आहे. रामायणात उल्लेखिलेले पुष्पक विमान हे सोनारकाम कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे.

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अशी समजूत प्रचलित आहे की, विशिष्ट प्रक्रियेद्वारे सामान्य धातूंपासून (विशेषतः तांबे) सोने तयार करता येते. रसशास्त्रात वर्णन केलेली हेमवती ही सोने बनविण्याची विद्या आढळते. रसरत्नाकर या ग्रंथात प्रसिद्ध रसशास्त्रज्ञ नागार्जुन याने तांबे व चांदी या धातूंपासून सोने बनविण्याचे प्रयोग दिलेले आढळतात. अलंकार व आभूषणांसाठी सोन्याचा वापर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे अलंकार लहान मुले, स्त्री-पुरुष तसेच पशूंसाठीही बनविले जात. बाहुभूषणे, उरोभूषणे, कुंडले, रत्नमाला, वळी, अंगठी, कंठा आदी प्रकारचे दागिने बनविण्यात तत्कालीन सोनारकाम कारागीर निष्णात होते. पाणिनीच्या अष्टाध्यायीत कर्णिका, ललातिका, अंगुलिका आदी अलंकारांचे उल्लेख आहेत. भारतातील सांची, मथुरा, भारहूत, अमरावती आदी स्तूपांतील मूर्तिशिल्पांतून आणि अजिंठा, भाजे आदी लेण्यांतील भित्तिचित्रे यांतून विविध अलंकाराचे नमुने आढळतात.

वेदकालीन सोनार स्त्रियांसाठी कुरीरम्, ओपश (केसांत माळली जाणारी आभूषणे) ; निष्कंठ्य, निष्कग्रीव (गळ्यात घातले जाणारे) तसेच हिरण्यकंठी, सुवर्णशतकंठी यांसारखे दागिने घडवीत असत. घोड्यांना सालंकृत भेट देण्याची पद्धती प्राचीन काळी होती. हत्तीच्या सुळ्यांना सोन्याने सजविले जात असे. विविध विधींसाठी सोन्याचे जानवे, गाय, पाळणा, निरांजन इ. वस्तू घडविल्या जात. स्फ्य, कुर्च इ. यज्ञात लागणारी भांडी, भोजपात्रे, विविध भांडी इ. अनेक वस्तू मुबलक प्रमाणात सोन्याच्या बनविलेल्या असत. सोनारकाम करणाऱ्यांना मूर्तिकलाही ज्ञात असे. रामायणात सुवर्णमूर्त्यांचा वारंवार उल्लेख आढळतो. विनिमयाचे साधन म्हणून सोन्याची नाणी पाडली जात. ऋग्वेदात मना, निष्क इ. नाण्यांचा उल्लेख आढळतो, तसेच ‘शतमान’ नावाचेही नाणे होते.

भारतात धातूंचे हस्तकलाकाम हा फार प्राचीन व्यवसाय असल्यामुळे त्याची प्रचिती सिंधू संस्कृतीतील (इ. स. पू. २७५०-१७५०) मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले चांदीचे फुलपात्र आणि चकचकीत सुवर्ण रत्ने यांतून येते. प्राचीन काळी सोन्याच्या मुबलकतेमुळे निरनिराळ्या वस्तू सोन्यापासून बनविल्या जात, तसेच वास्तुनिर्मितीतही सोन्याचा मुक्तपणे वापर केला जात असे. अथर्ववेदात सोन्याच्या नौकेचा व वल्ह्यांचा उल्लेख आहे. सैन्यासाठी लागणारे रथ, वाद्ये, चिलखते, शिरस्त्राणे सोन्याची बनविलेली असत. इ. स. पू. पहिल्या शतकातील सुत्तुकेनी येथील थडग्यात सुवर्ण कमळे-कलिका आणि वर्तुळाकार जाडजूड कर्णभूषणे मिळाली; तर बिमरान (अफगाणिस्तान) येथील अवशेषांत सोन्याच्या मण्यांनी-माणकांनी सुशोभित केलेली मंजूषा आढळली. गंधार (अफगाणिस्तान) कलेतील दागिन्यांवर ग्रीकांश संस्कृतीचा प्रभाव आढळतो. मध्ययुगातील मंदिर शिल्पांतून विशेषतः खजुराहो, कोणार्क, हळेबीड, सोमनाथ येथील मंदिरांतून विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल आढळते. कर्नाटकातील मंदिर शिल्पांतून दागिन्यांची विशेष रेलचेल असून कारागिरीमधील कौशल्य आढळते. मुसलमानांच्या भारतातील आगमनानंतर पुनरुत्थान प्रक्रियेला सुरुवात होऊन कोफ्तगारी कलेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ती इराण-काबूलमधून (अफगाणिस्तानातून) भारतात प्रविष्ट झाली. सोन्याच्या पत्र्यांचा पृष्ठभाग खोदून जडावाचे काम तलवारींच्या मुठी, ढाली, बिचव्याची मूठ यांच्या अलंकरणासाठी करण्यात येऊ लागले. मोगल काळात (१५२६-१७०७) चिलखतींच्या अलंकरणात सोन्याचा सर्रास उपयोग उच्चभ्रूत प्रचलित झाला. मुस्लिम कारागिरांनी कुराणातील वचने, काव्यपंक्ती किंवा शुभेच्छा दर्शक वाक्ये उठविण्यात आपले कौशल्य प्रकट केले (भारत इतिहास संशोधक मंडळातील कुराणाची प्रत). मोगलांनी भारतभर जवाहिरांना व सुवर्णकारांना आश्रय देऊन उत्तेजन दिले; पण त्यांतील सर्वोत्तम कारागीर आग्रा आणि दिल्ली येथे होते. कोहिनूर हिरा बसविलेले रत्नजडित सोन्याचे मयूर सिंहासन हे भारताच्या वैभवाचे द्योतक होते. उत्तर भारतात मीनाकारी कला अधिक लोकप्रिय होती. प्रदेशपरत्वे स्थानिक केंद्रातून पर्यायी भिन्न तंत्रे विकसित झाली. काश्मीरमध्ये ‘सुराही’ नामक सोन्यावर प्रक्रिया करण्याची एक विशिष्ट पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत फुलांसारखा रचनाबंध सोन्याच्या ठिपक्यांच्या चांदीच्या (ठोकलेल्या) पत्र्यांवर रेखाटण्यात येई. गुजरात, सियालकोट, जयपूर, अलवार व सिरोही या ठिकाणी कोफ्तगारी कला अद्यापि प्रसिद्ध आहे. येथील कारागीर लोखंड व पोलाद या मूळ धातूंवर सोन्याच्या तारांनी अत्यंत कुशलतेने विविध आकृतिबंध उठवून वस्तू अलंकृत करतात. अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये सुरई, मंजूषा, तबके, थाळ्या, चाकू, अडकित्त्ये, कातऱ्यां, फुलदाण्या, हुक्क्याच्या बैठकी आणि तत्सम शोभादायक वस्तूंचे अलंकरण करण्यासाठी कोफ्तगारीचा कलात्मक उपयोग या ठिकाणी केला जातो. त्रावणकोरमध्ये केस बांधावयाच्या सुवर्ण पिनांत फुलांच्या आकृतिबंधांचा उपयोग केलेला आढळतो. तसेच अन्य नीतिवचने आणि सांस्कृतिक चिन्हे उठविण्याचे कसब कलाकारांनी दाखविले आहे. लखनौ, जयपूर, त्रिचनापल्ली, तिरुपती आणि बंगलोर या शहरांतून आजही सुवर्ण कलाकाम मोठ्या प्रमाणावर होते.

मराठा अंमलात सोन्याचे सिंहासन बनविण्याची परंपरा शिवकाळापर्यंत अस्तित्वात असलेली आढळते. छ. शिवाजी महाराजांचे सुवर्णांकित सिंहासन रामजी प्रभू चित्रे यांनी बनविले होते आणि त्यावरील कलाकुसरयुक्त सुवर्णांकित छत्र या कलेची साक्ष देते; मात्र शिवकाळात अलंकार वा दागिने फार मर्यादित होते; परंतु पेशवेकाळात (१७२०-१८१८) कर्नाटक, गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली, आग्रा, बंगाल आदी प्रदेशांतील मराठ्यांच्या संचारात तेथील अलंकारांची ओळख झाली. कलगी तुरा, शिरपेच ही शिरोभूषणे, भिकबाळी, चौकडा, कर्णफुले, नथ आणि कंठी, गोफ, रत्नहार, चंद्रहार, मोहनमाळ, तन्मणी, चपलहार ही कंठभूषणे व अन्य दागिने आणि देवदेवतांच्या मूर्ती सोन्याचांदीच्या, हिऱ्यामाणकांच्या बनविण्यात येऊ लागल्या. कर्नाटकातील श्रीरंगपट्टणमच्या टिपू सुलतानाचे सिंहासनही सोन्याचे असून त्याच्याकडील फर्निचरवर सुवर्णांकित कलाकुसर आढळते.

विविध गोष्टींना मुलामा देण्याच्या कामासाठीही सोन्याचा वापर प्राचीन काळी होत असे. सोनारकामाचा विणकामाशीही संबंध आहे. अनेक भरजरी वस्त्रे सोन्याचा उपयोग करून विणलेली असत.

सोन्याचा अपहार करणे ही सोनारकाम करणाऱ्यांची एक प्राचीन काळापासून चालत आलेली मनोवृत्ती आहे. खोटे वजन देणे, दागिन्यातील सोने काढून त्यात हीन धातू मिसळणे, जुने दागिने वितळविताना त्यांतील सोने काढणे, सोन्याच्या पत्र्यांच्या आत शिशाचा वा तांब्याचा पत्रा घालणे इ. प्रकार कौटिल्याने सांगितले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्याने दंडही सांगितला आहे, तसेच सोनारांना कोणत्या जागी बसवावे याचेही नियम त्याने ठरवून दिले आहेत.

संदर्भ : 1. Came, Richard, Silver, London, 1961.

2. Huges, Graham, Modern Jewelry, London, 1963.

3. Jackson, Charles J. English Goldsmiths and their marks, Dover, 1986.

4. Larkman, Brian Metalwork Designs of Today, London, 1969.

5. Reid, F. H. and Goldie, W. Gold Plating Technology, 1980.

लेखक : सु. र. देशपांडे, नितिन भरत वाघ

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate