অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लक्रॉस

इतिहास

एक मैदानी खेळ. या खेळाशी साम्य असलेला ‘बॅगॅटवे’ नामक एक खेळ अमेरिकेतील रेड इंडियन लोक खेळत असत. त्या काळी बहुतेक क्रीडा व रंजकप्रकार हे धार्मिक स्वरूपाचे असून, ते निरनिराळ्या देवदेवतांच्या जत्रेच्या, उरुसाच्या निमित्ताने अनेक गावातील लोक एकत्र येऊन खेळत. त्यामुळे खेळापूर्वी धार्मिक प्रार्थना, उपवास, नाच, गाणी, वाद्यवादन असे कार्यक्रम नित्य चालत. तत्कालीन लक्रॉस या खेळात दोन संघ भाग घेत. त्यात गोलांतील अंतर वगैरेबाबत काहीच नियमबद्धता नव्हती. खेळाडू काठीच्या टोकाला लावलेल्या जाळीत चेंडू पकडून गोलकडे नेत. चेंडू लाकडी किंवा हरिणाच्या कातडीचा असे. खेळ चालू असता पायांत काठ्या अडकवून खेळाडूंनी परस्परांना पाडणे, उचलून फेकणे इ. गैरप्रकारांमुळे खेळाला लढाईचे स्वरूप येई. जेझुईट मिशनऱ्यांनी हा खेळ १६३६ मध्ये प्रथम पाहिल्यावर या खेळातील वाकड्या काठ्या आणि बिशपचा धर्मदंड (क्रोझर) यांतील साधर्म्यावरून त्याला ‘लक्रॉस’ हे फ्रेंच नाव दिले. या खेळातील ‘क्रॉसी’ वा बॅट म्हणजे एका टोकाला जाळी लावलेली काठी होय. ओटावाच्या टोळीचा म्होरक्या-पॉन्टॅक याने १७६३ मध्ये लक्रॉस खेळाचे निमित्त करून ब्रिटिशांच्या ताब्यातील किल्ल्यात घुसून, कत्तल करून किल्ला ताब्यात घेतला, असाही ऐतिहासिक संदर्भ मिळतो. १८४० पासून गोरे लोक हा खेळ खेळू लागले. पुढे १८६७ मध्ये कॅनडामध्ये ‘नॅशनल लक्रॉस असोसिएशन’ ही पहिली अधिकृत संघटना स्थापन झाली. कॅनडामध्ये बंदिस्त जागेतही हा खेळ खेळतात. त्याला ‘बॉक्स-लक्रॉस’ वा ‘बॉक्सला’ म्हणतात. तो १९३० पासून कॅनडात खेळला जाऊ लागला. हा कॅनडाचा राष्ट्रीय खेळ आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इ. देशांतही हा खेळ लोकप्रिय ठरला. १९०० च्या सुमारास स्त्रियांचा लक्रॉस खेळ इंग्लंडमध्ये खेळला जाऊ लागला. लक्रॉसचे आंतरराष्ट्रीय सामनेही १८६८ पासून खेळले जातात. हाताच्या पंज्यासारख्या जाळीच्या बॅटने चेंडू मारून तो प्रतिस्पर्ध्याच्या गोलात ढकलणे, हे या खेळाचे उद्दिष्ट होय. ठराविक वेळात ज्या संघाचे अधिक गोल होतील, तो संघ जिंकतो. खेळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ गोल-परिसराच्या मागेही चालू शकतो. प्रत्येकी १० खेळाडू असलेल्या दोन संघांत सामना होतो. एक गोलरक्षक, तीन खेळाडू संरक्षक फळीमध्ये, तीन मध्यम संरक्षक फळीत आणि तीन पुढील आक्रमक फळीमध्ये अशी रचना असते. स्त्रियांच्या स्पर्धांमध्ये एका संघात १२ खेळाडू असतात. खेळामध्ये प्रत्येक क्षणाला आपले चार तरी खेळाडू आपल्या संघाच्या मैदानकक्षेत (झोन) असलेच पाहिजेत आणि तीन खेळाडू समोरच्या प्रतिपक्षाच्या मैदानकक्षेत असले पाहिजेत, असा नियम आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात नऊ राखीव खेळाडू ठेवता येतात. दोन पंच, दोन वेळाधिकारी, एक गुणलेखक आणि तीन दोषदर्शक असा अधिकारी वर्ग खेळावर नियंत्रण ठेवतो. प्रत्येकी १५ मिनिटांचे ४ डाव मिळून एकूण साठ मिनिटांचा सामना होतो. पहिल्या दोन डावांनंतर १० मिनिटे विश्रांती असते, तसेच पहिल्या व तिसऱ्या डावांनंतर दोन मिनिटांची विश्रांती असते. स्त्रियांचा सामना प्रत्येकी २५ मिनिटांच्या दोन डावांचा असतो. खेळ संपतेवेळी जर दोन्ही संघांची बरोबरी झाली, तर प्रत्येकी चार-चार मिनिटांचे दोन वा तीन अधिक डाव, एक संघाचा किमान एक गोल अधिक होईपर्यंत खेळले जातात. गोल रेषेवरून गोलाच्या जाळीत चेंडू गेला, की गोल होतो. ज्याचे गोल अधिक होतील, तो संघ विजयी ठरतो. फक्त बॅटने मारलेल्या चेंडूनेच गोल होतो.

बॅट

बॅट हे या खेळाचे खास वैशिष्ट्य होय. बॅटची लांबी १.८३ मी. (६ फुट) असून तिच्या काठीच्या एकाटोकाला हाताच्या पंज्यासारख्या आकाराची २५ सेंमी. (१० इंच) रुंदीची जाळी असते. या बॅटच्या जाळीमध्ये चेंडू अडकू नये, म्हणून ती सपाट ठेवलेली असते. बाजूची चौकट बांबूसारख्या लाकडी पट्टीची असते. लक्रॉसचा चेंडू भरीव स्पंज-रबराचा, टेनिसचेंडूच्या आकाराचा असतो. त्याचा परिघ १९.७ ते २०.३ सेंमी, (७३४ ते ८ इंच) व त्याचे वजन १४२ ते १४९ ग्रॅ. (५ ते ५.२५ औस) असते. खेळाचे क्रीडांगण १०० मी. लांब (११० यार्ड) व ५५ मी. (६० यार्ड) रुंद असते. गोल १.८ मी. (६ फूट) रुंद व १.८ मी. (६ फूट) उंच असून, मैदानाच्या मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी ३६.५७ मी. (४० यार्ड) अंतरावर व अंतिमरेषेपासून (एंडलाइन) प्रत्येकी १३.७ मी. (१५ यार्ड) अंतरावर दोन गोल असतात. गोलाच्या मागेही खेळ चालू शकतो.

ऑफसाइड

हॉकी, फुटबॉल या खेळांप्रमाणेच ‘ऑफसाइड’ (एकाच संघाचे जास्त खेळाडू नियमबाह्य, निषिद्ध मैदानक्षेत्रात जमल्यास हा प्रमाद होतो), गोलक्षेत्र प्रवेश, व्यक्तिगत प्रमाद (पर्सनल फाऊल), नियमभंग-दंडगुण (पेनल्टीज) इ. नियमभंगांसाठी विरुद्ध संघाला फायदा देणारे उपनियम या खेळातही असतात. खेळाच्या आडदांड व आक्रमक स्वरूपामुळे खेळाडूंना संरक्षक साधने वापरावी लागतात. खेळ वेगवान, दमदार असल्याने खेळाडूंची क्षमता कसाला लागते व प्रेक्षकांनाही तो आकर्षित करतो.

लेखक: श्री. पु. गोखले ; प. म. आलेगावकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate