অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्क्वॉश

स्क्वॉश

रॅकेट व चेंडू यांच्या साहाय्याने खेळावयाचा एक खेळ. या खेळात वापरल्या जाणार्‍या रॅकेटवरून यास‘स्क्वॉश रॅकेट’ असेही म्हणतात. १८३० मध्ये लंडन येथील हॅरो स्कूलमध्ये या खेळाचा उगम झाला. स्क्वॉश हा त्याच्या वेगासाठी विशेष प्रसिद्ध आहे. याच्या खेळासाठी लागणारे क्रीडाक्षेत्र चहुबाजूंनी बंदिस्त असते. स्क्वॉशचा चेंडू हा रबराचा, आतून पोकळ आणि काळ्या रंगाचा असतो. त्याचा व्यास ४ सेंमी. असतो आणि तो २३—२८ ग्रॅम एवढ्या वजनाचा असतो. चेंडूवर जे रंगीत ठिपके असतात, ते त्या चेंडूच्या चलनशीलतेची पातळी किंवा उसळी घेण्याची क्षमता दर्शवितात. उदा., दोन पिवळे ठिपके असणारा चेंडू हा अतिशय कमी उसळी घेणारा असतो, तर एकच निळ्या रंगाचा ठिपका असणारा चेंडू सर्वांत जास्त उसळी घेणारा असतो. तो विशिष्ट प्रकारे बनविलेला असून, तो सहजपणे दाबला जाऊ शकतो. भिंतीवर आदळल्यानंतर या चेंडूचा एक  विशिष्ट प्रकारचा— स्क्वाशी— आवाज होतो. स्क्वॉशच्या रॅकेटची लांबी सर्वसाधारणपणे ६८ सेंमी. इतकी असून तिचे वजन २८० ग्रॅम इतके  असते. स्क्वॉशचे क्रीडांगण ९.६० मी. लांब व ५.५५ मी. रुंद असते. भिंतीची उंची ४.८० मी. इतकी असते. पुढील भिंतीच्या तळाशी ३.५० सेंमी. इतक्या जाडीचे टेलटेट असते. ते जमिनीपासून ४३ सेंमी. इतके उंच असते. समोरील भिंतीवर जमिनीपासून १.९५ मी. इतक्या उंचीवर आरंभखेळी रेषा (सर्व्हिस लाइन) आखलेली असते. मागच्या भिंतीपासून ३ मी.अंतरावर तळ रेषा (फ्लोअर लाइन) आखलेली असते. या तळ रेषेच्या  मध्यापासून सरळ मागच्या भिंतीपर्यंत एक मध्य रेषा आखलेली असते.त्या मध्य रेषेच्या योगाने मागच्या भिंतीच्या पुढील भागाचे दोन चौकोनाकृती भाग तयार होतात. या चौकोनाच्या भिंतीलगतच्या पुढील कोपर्‍यांत वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आखलेला असतो. त्यास आरंभखेळी चौकट (सर्व्हिस बॉक्स) असे म्हणतात. त्याची त्रिज्या १.३५ मी. इतकी असते.

स्क्वॉश हा खेळ सुरू करण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अडीच मिनिटे ‘वॉर्मअप’ (शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी लागणारा व्यायाम) दिला जातो. या खेळात सर्वप्रथम कोणत्या खेळाडूने आरंभखेळी (सर्व्हिस) करावयाची ते रॅकेटच्या साहाय्याने ओली-सुकी करून होते. रॅकेटला जमिनीवर ठेवून तिला गती दिली जाते आणि ज्या दिशेने रॅकेटच्या दांड्याचे टोक असेल, त्या खेळाडूला सर्वप्रथम संधी देण्यात येते. आरंभखेळी करणारा खेळाडू त्याच्या इच्छेप्रमाणे डाव्या किंवा उजव्या खेळीच्या चौकटीतून खेळास सुरुवात करतो. आरंभखेळी करताना खेळाडूला त्याचा एकतरी पाय चौकटीत ठेवणे आवश्यक असते. त्याने तो चेंडू समोरच्या भिंतीवर मारावयाचा असतो. तो आरंभरेषेच्या वर लागावा लागतो आणि तेथून उसळी घेऊन आलेला तो चेंडू प्रतिस्पर्ध्याने टोलवायचा असतो. त्याच्याकडून तो टोलवला गेल्यावर मूळ खेळाडूलातो परत टोलवावा लागतो. चेंडू परतविण्यात खेळाडूंना अपयश येईपर्यंत ही खेळी चालते. प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडू टोलवण्यात अयशस्वी झाल्यास त्याच्यावर पहिल्याचा एक गुण (पॉइंट) लागू झाला असे मानले जाते.

हा खेळ केवळ ताकदीचाच नव्हे, तर तो युक्तीचाही आहे. बॅडमिंटन, टेनिस या खेळांप्रमाणेच हा खेळ एकेरी वा दुहेरी स्वरूपाचा असतो. या खेळामध्ये जेव्हा दोनच प्रतिस्पर्धी भाग घेतात, तेव्हा त्यास ‘ एकेरी ’ (सिंगल्स्) स्पर्धा असे म्हणतात. एकेरी स्पर्धेमध्ये दोन्हीही खेळाडू ९ गुणांचा एक डाव (गेम), असे तीन किंवा पाच डाव खेळतात. त्यांत सर्वाधिक डाव जिंकणारा विजयी म्हणून घोषित होतो. साधारणतः दोन खेळाडूंमध्येच हा खेळ जास्त खेळला जातो. चार खेळाडूंसाठी लागणार्‍या क्रीडांगणाचा आकार मोठा असतो.

हा खेळ विद्युत् प्रकाशात खेळला जातो आणि त्यासाठी वापरावयाचे दिवे किमान ३०० लक्स आणि कमाल ५०० लक्सचे असावे लागतात (ढगाळ हवामान नसताना कोणत्याही दिवशी सूर्योदयाच्या वेळी असलेले प्रकाशमान हे ४०० लक्सचे असते). दिवे हे सावलीला प्रतिबंध करणारे असावेत, ही त्यासाठीची प्राथमिक अट आहे. डोळ्यांच्या संरक्षणासाठी खेळाडूने पॉलिकार्बोनेट भिंगांचे गॉगल्स घालून खेळणे अपेक्षित आहे.

न्यू हँपशरमधील सेंट पॉल्स स्कूलमध्ये स्क्वॉश या खेळाचे पहिले क्रीडांगण १८६४ मध्ये तयार झाले. न्यूयॉर्क येथे युनायटेड स्टेट्स स्क्वॉश  रॅकेट्स असोसिएशन (यू. एस्. एस्. आर्. ए.) ही संस्था स्थापन झाली (१९०४). सध्या ती ‘यू. एस्. स्क्वॉश’ या नावाने प्रचलित आहे. द इंटरनॅशनल स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन (आय. एस्. आर्. एफ्.) ही या खेळाचे जागतिक नियंत्रण करणारी संस्था १९६७ मध्ये इंग्लंड येथे स्थापन झाली. २००९ पासून ही ‘वर्ल्ड स्क्वॉश फेडरेशन’ (डब्ल्यू. एस्. एफ्.) या नावाने कार्यरत आहे. सांप्रत (२०१४) तिचे अध्यक्षपद भारताकडे असून त्याचे अध्यक्ष एन्. रामचंद्रन् आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ईजिप्त, मलेशिया, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, भारत इ. सुमारे १८८ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. स्त्रियांसाठी स्क्वॉश स्पर्धा १९२१ मध्ये इंग्लंडमध्ये सुरू झाली. पुरुषांसाठी प्रतिष्ठित अशा ‘ब्रिटिश ओपन’ स्पर्धेची डिसेंबर १९३० मध्ये सुरुवात झाली.

जानशेर खान या पाकिस्तानी खेळाडूने ‘ब्रिटिश ओपन स्पर्धा’ सहा वेळा व ‘जागतिक खुली स्पर्धा’ आठ वेळा जिंकून विक्रम प्रस्थापित केला  (१९९०). डेव्हिड पाल्मर (ऑस्ट्रेलिया; २००२, २००६), देअरी लिंकू (फ्रान्स; २००४), आम्र शबाना (ईजिप्त; २००३, २००५, २००७, २००९), निक मॅथ्यू (इंग्लंड; २०१०-११) इ. खेळाडू स्क्वॉशमध्ये विशेष नावाजलेले आहेत. रवी दीक्षित, रमीत टंडन, ऋत्विक भट्टाचार्य, सौरव घोषाल या भारतीय खेळाडूंची स्क्वॉशमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. दोहा (कतार) येथील कनिष्ठ जागतिक चॅम्पियन स्पर्धेत (जुलै, २०१२) भारताने ब्राँझपदक मिळविले. येथील स्पर्धेत कुश कुमार, महेश माणगांवकर, वृषभ  कोटियन व अभिलाषा प्रधान यांनी भाग घेतला होता. मुलांप्रमाणेच स्क्वॉश खेळात भारतातील जोत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लिकल या युवतींनी २०१२ च्या मे मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक मिळविले. याशिवाय भुवनेश्वरी कुमारीने यापूर्वी दहा राष्ट्रीय स्पर्धांत विजेतेपद मिळविले आहे.

लेखक: अरविंद व्यं. गोखले

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate