অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जोसेफ, दुसरा

जोसेफ, दुसरा

जोसेफ, दुसरा

(१३ मार्च १७४१–२० फेब्रुवारी १७९०). पवित्र रोमन साम्राज्याचा १७६५–९० दरम्यानचा सम्राट आणि ऑस्ट्रियाचा राजा. ऑस्ट्रियन सम्राज्ञी माराया टेरिसाचा मुलगा. व्हिएन्ना येथे जन्म. प्रथम १७६५ ते १७८० ह्या काळात त्याने आपल्या आईबरोबर राज्य केले. त्याचा या काळात काहीच प्रभाव पडला नाही. माराया टेरीसाच्या मृत्यूनंतर १७८० मध्ये स्वतंत्रपणे राज्य करू लागला. तत्पूर्वी १७६० मध्ये त्याने इझाबेला या बूर्बां पार्मा घराण्यातील मुलीशी लग्न केले. तिच्यापासून त्याला एक मुलगी झाली, पण इझाबेला १७६२ मध्ये मृत्यू पावली. तेव्हा त्याने बव्हेरियाच्या जोसेफाबरोबर दुसरा विवाह केला. त्याच्या राज्यकारभाराच्या धोरणावरून त्यास प्रबुद्ध सम्राट म्हटले जाते. अठराव्या शतकातील परस्परविरोधी विचारप्रणालीचा जोसेफ हा उत्तम प्रतिनिधी होता. मानवतावाद, मानवी हक्कांची जाणीव, हुकूमशाही आणि अनेक वेळा आपल्या सिद्धांतांच्या परिपूर्तीमध्ये असमंजसपणा हे गुणावगुण त्याच्या ठायी एकत्रित झालेले आढळतात. धर्मोपदेशक आणि उमराव ह्यांविषयी त्याच्या मनात विलक्षण राग होता. ह्या वर्गाची सत्ता नेस्तनाबूत करून त्या जागी एक प्रबळ केंद्रशासित राज्य निर्माण करणे, हे त्याचे ध्येय होते. १७८१ च्या ऑक्टोबरमध्ये त्याने सहिष्णुतेचा फतवा काढला. पुढील आठ वर्षांच्या काळात सु. ७०० मठ बंद करण्यात आले व जवळजवळ ३७,००० संन्यस्त धर्मोपदेशकांना मोकळे करण्यात आले, तरीही १,३२४ मठ शिल्लक राहिलेच; परंतु धर्मसंस्थेचे शिक्षणावरील प्रभुत्व कमी झाले. पोप पायस (सहावा) याने १७८२ मध्ये व्हिएन्नाला भेट देऊन मध्यस्थी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

जोसेफने मध्ययुगीन जाचक कायदे नष्ट करून विवेकपूर्ण कायदा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांवरील मध्ययुगीन बंधने दूर केली. त्यांनी द्यावयाचा खंड निश्चित ठरवून दिला. भूदासपद्धती बंद केली. ह्यामुळे त्यास साम्राज्यात विरोधक निर्माण झाले.

७८१ मध्ये डचांशी त्याचा संघर्ष झाला. १७८५ मध्ये जोसेफने बव्हेरिया घेऊन त्याच्या बदल्यात बेल्जियम बव्हेरियाच्या राजास देऊ केले. परंतु ह्या व्यवहारास इतर जर्मन राजांनी विरोध करून फ्रीड्रिख द ग्रेटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रियाविरोधी संघ निर्माण केला. हंगेरी व ऑस्ट्रिया यांच्या एकाच राजाने दोन वेगळे अभिषेक करणे व दोन वेगळी सरकारे स्थापणे, या गोष्टी त्याने नष्ट केल्या व एक मध्यवर्ती राज्ययंत्रणा निर्माण केली; पण तिला सर्व बाजूंनी विरोध झाला.

जोसेफच्या जवळजवळ सर्वच सुधारणा त्याच्याबरोबरच नाहीशा झाल्या; याचे कारण तो काळाच्या बराच पुढे गेला होता. त्यामुळे त्याच्या सुधारणा कालबाह्य ठरल्या. धर्मोपदेशकांविरुद्ध त्याने केलेल्या कारवायांमुळे सामान्य जनता दुखावली. तरीही जोसेफमुळे ऑस्ट्रियन राज्यात व राजघराण्यात एक चैतन्य निर्माण झाले हे निःसंशय. जोसेफच्या अनेक योजना जरी अयशस्वी झाल्या, तरी एक सुस्कृंत हुकूमशाह म्हणून यूरोपच्या इतिहासात त्यास स्थान आहे.

 

संदर्भ :  Bernard, P.P y3wuoeph II, 1968.

देशपांडे, अरविंद

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate