অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तालेरां–पेरीगॉर, शार्ल मॉरीस द

तालेरां–पेरीगॉर, शार्ल मॉरीस द

तालेरां–पेरीगॉर, शार्ल मॉरीस द

(१३ फेब्रु. १७५४–१७ मे १८३८). फ्रेंच राज्यक्रांतीच्या व क्रांत्युत्तर काळातील एक श्रेष्ठ मुत्सद्दी. पॅरिस येथे सधन घराण्यात जन्म. लहानपणी पायास दुखापत झाल्यामुळे त्यास लष्करी शिक्षण घेता आले नाही. म्हणून त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. ते घेत असताना व्हॉल्तेअरप्रभृतींच्या क्रांतिकारक लेखनाचा त्याच्यावर प्रभाव पडला. १७७५ मध्ये तो पाद्री झाला आणि १७८९ मध्ये त्याची ओत्यूँचा बिशप म्हणून नियुक्ती झाली.

१७८९ मधील स्टेट्स जनरलच्या इतिहासप्रसिद्ध बैठकीस तो उपस्थित राहिला व नंतर क्रांतिकारकांत सामील झाला. पुढे तो नॅशनल असेंब्लीत निवडून आला. तिथे त्याने चर्चची संपत्ती राज्यसंस्थेने ताब्यात घ्यावी व पुरोहितांस सरकारनेच वेतन द्यावे, हा महत्त्वाचा ठराव मांडला. त्याबद्दल पोपने त्याला चर्चच्या एकूण बाबींतून बाहेर काढले. तो संविधानात्मक राजेशाहीचा पुरस्कर्ता होता. त्याने मूलभूत हक्कांच्या मसुद्यांवर सही केली होती.

१७९० मध्ये नॅशनल असेंब्लीचा तो अध्यक्ष झाला. त्याने फ्रान्स व इंग्लंड यांचे संबंध सलोख्याचे रहावेत, म्हणून प्रयत्न केले; तथापि लुईच्या वधामुळे (१७९३) ते तडीस जाऊ शकले नाही. तो १७९२ मध्ये इंग्लंडला गेला. तिथे रॉयलिस्ट म्हणून त्यावर आरोप केल्यामुळे तो अमेरिकेत आश्रयास गेला. १७९६ मध्ये तो काही मित्रांच्या सल्ल्यानुसार फ्रान्समध्ये परत आला. त्याला पुन्हा परराष्ट्रमंत्री करण्यात आले. नेपोलियनच्या सत्ताग्रहणाच्या खटपटीत त्याने त्यास महत्त्वाची मदत केली. बारासला संचालकपदाचा राजीनामा देऊन पॅरिस सोडण्यास त्याने भाग पाडले.

नेपोलियनाचा एक प्रमुख सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री या नात्याने त्याने १८०७ मध्ये रशियाबरोबर शांतता तह घडवून आणला. नेपोलियनने शांततेचे धोरण स्वीकारावे म्हणून त्याने प्रयत्न केले. नेपोलियनच्या स्पेन व रशियावरील मोहिमांविरुद्ध तो होता. त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला, पण त्याच्यावर अनेक आरोप लादण्यात आले. नेपोलियनविरुद्ध तो चिकाटीने उभा राहिला. पुन्हा राजेशाही आणण्याकरिता त्याने प्रयत्न सुरू केला.

नेपोलियनच्या पराभवानंतर १८१५ च्या व्हिएन्ना काँग्रेसमध्ये त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली व बूर्‌बाँ घराण्यातील अठराव्या लुईची फ्रान्सच्या गादीवर प्रतिष्ठापना केली; परंतु बूर्‌बाँ राजाने तालेरांस सार्वजनिक जीवनातून अर्धचंद्र दिला. १८३० मध्ये ज्या वेळी बूर्‌बाँ घराण्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उडाला, तेव्हा तालेरांने संविधानात्मक राजेशाही स्थापन व्हावी म्हणून लुई फिलीप याला पाठिंबा दिला व तो राजा झाल्यावर तालेरां राजदूत म्हणून इंग्लंडला गेला. तेथे त्याने बेल्जियम स्वतंत्र व्हावे म्हणून वाटाघाटी केल्या आणि फ्रान्स व इंग्लंड यांमध्ये मैत्रीचा तह घडवून आणला. मुत्सद्देगिरीतील याचे हे शेवटचे महत्त्वाचे कार्य होय.


संदर्भ : Cooper, Duff, Talleyrand, London, 1964.

पोतनीस, चं. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate