অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पहिला नेपोलियन

नेपोलियन बोनापार्टनेपोलियन बोनापार्ट

पहिला नेपोलियन : (१५ ऑगस्ट १७६९–५ मे १८२१). फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट, एक असामान्य सेनानी व कार्यक्षम प्रशासक. त्याच्या घराण्याचे नाव बोनापार्ट. हे घराणे मुळचे इटलीतील तस्कनीचे; पण सोळाव्या शतकात कॉर्सिकात येऊन आयात्‌चो येथे ते स्थायिक झाले.

पूर्वापार चालत आलेली सरदारकी या घराण्यात होती; पण नेपोलियनचे वडील कार्लो यांनी घराण्याची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे वकिलीचा पेशा पतकरला. त्यांच्या पत्नीचे नाव मारीआ लेतीत्स्या रामोलीनो. त्यांना एकूण १३ अपत्ये. त्यांपैकी पाच अल्पायुषी ठरली. उरलेल्यांत जोझेफ हा सर्वांत मोठा होता.

त्यानंतरचा नेपोलियन. ल्यूस्यॅं, ल्वी व झेरोम हे तीन त्याचे धाकटे भाऊ आणि एलीझा, कारॉलीन व पॉलॅन या तीन धाकट्या बहिणी. नेपोलियनच्या जन्माच्या वेळी जेनोआ संस्थानाने कॉर्सिका हे बेट फ्रान्सला विकले. त्यामुळे बोनापार्ट कुटुंब फ्रेंच नागरिक झाले. पुढे कॉर्सिकाने पाओलीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढा सुरू केला.

कार्लो हा प्रथम या लढ्यात सहभागी झाला; पण परिस्थितीने त्याला गांजले व पुढे पाओलीचा पक्ष सोडून तो फ्रान्सच्या सेवेत शिरला.

बालपण व शिक्षण

नेपोलियनचे प्राथमिक शिक्षण आयात्‌चो येथे झाले.पुढे वडिलांनी फ्रेंचांची नोकरी धरली, तेव्हा तो पुढील शिक्षणासाठी फ्रान्समध्ये गेला. ब्रीएनच्या लष्करी विद्यालयात पाच वर्षांसाठी तो दाखल झाला. ब्रीएन येथील लष्करी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पॅरिसच्या इकॉल मिलितेअर अकादमीत तोफखान्याचे शिक्षण घेण्यासाठी त्याने नाव घातले. १७८५ मध्ये तो पहिली परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच वर्षी त्याचे वडील कर्करोगाने मरण पावले व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. पुढील वर्षी दुसरी परीक्षा बेचाळिसाव्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला. शालेय जीवनात त्याला कधीच वरचा क्रमांक मिळाला नाही आणि हुशार विद्यार्थ्यांतही त्याची कधीच गणना झाली नाही.

फ्रान्समध्ये तो एक परकीय म्हणूनच राहिला. त्याला मित्रही फारसे नव्हते. त्याला फ्रेंच भाषा चांगली येत नव्हती व त्याचे अक्षरही चांगले नव्हते; तथापि विविध विषयांवरील ग्रंथ वाचण्याची व त्यांचे मनन करण्याची त्याला प्रथमपासून सवय होती. एकांतात तो नेहमी विचारमग्न अस विविध लष्करी पदांवरील कामगिरी : सुरुवातीस ला फेरे या प्रशालेत सेकंड लेफ्टनंट म्हणून त्याची नियुक्ती झाली. लेफ्टनंट म्हणून त्याची प्रथम नेमणूक व्हालांस गावी झाली. या वेळी लीआँ येथील काही लोकांनी बंड केले. ते मोडण्याची कामगिरी त्याने यशस्वीपणे पार पाडली. तेथील मुक्कामात त्याने ग्रंथालयात जाऊन रूसो, रेनल, गीबेअर, प्लूटार्क वगैरेंचे ग्रंथ वाचून टिपणवह्या केल्या. राज्यक्रांती, राजेशाहीचा अस्त आणि प्रजासत्ताकाचा उदय या तीन घटनांमुळे त्याच्या विचारांना एकदम कलाटणी मिळाली. त्याने Lettres Sur la Corseहे पुस्तक लिहिले. त्यात कॉर्सिकासंबंधीच्या त्याच्या भावना व्यक्त झाल्या आहेत.

तो पुन्हा कॉर्सिकात गेला, त्यामुळे त्याची नोकरी गेली. कॉर्सिकाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्याचे व पाओलीचे मतभेद आले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत त्याचा कल जॅकोबिन पक्षाकडे होता. त्या पक्षाचा तो अध्यक्ष झाला. त्याची लेफ्टनंट कर्नल या पदावर नेमणूक झाली. (१७९१). या काळात त्याच्यावर काही आरोप लादण्यात आले; पण फ्रान्सने ऑस्ट्रियाबरोबर युद्ध पुकारताच त्यास माफी मिळाली (१७९२).

दरम्यान कॉर्सिकात जाऊन तो तेथील जॅकोबिन्सना मिळाला. कॉर्सिका फ्रान्सपासून अलग करण्याचे पाओलीचे प्रयत्‍न चालू होते. नेपोलियनने त्याच्या हुकूमशाही नेतृत्वास विरोध केला (१७९३). तेव्हा पाओलीने त्याची फ्रेंच नागरिक आणि राष्ट्रद्रोही बापाचा मुलगा म्हणून कॉर्सिकातून हकालपट्टी केली. त्यामुळे बोनापार्ट कुटुंबास फ्रान्समध्ये विपन्नावस्थेत आश्रय घ्यावा लागला. नेपोलियनने काही लोकांच्या साहाय्याने कॅप्टनची जागा मिळविली आणि नीस येथे लष्कराच्या कामगिरीवर जून १७९३ मध्ये तो रुजू झाला. या वेळी त्याने Souper de Beaucaireहे पुस्तक लिहिले.

१७९३ च्या अखेरीस नॅशनल कन्व्हेशनच्या फौजांनी मार्से घेतले व तूलाँ येथे फौजा दाखल झाल्या. तूलाँ बंदरात त्याने आपल्या तोफखान्याच्या साहाय्याने ब्रिटिशांना हकलण्यात यश मिळविले. हा त्याच्या आयुष्यातील पहिला विजय होता आणि त्यामुळे फ्रेंच सैन्यात त्याचे नाव सर्वतोमुखी झाले.

मॉनितोर या राजपत्रातही त्याचे नाव झळकले आणि विशेष म्हणजे सॅलिसेती, धाकटा रोब्झपीअर, जनरल तेल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची मर्दुमकी पाहिली. त्यांच्या शिफारशींमुळे त्याला मेजर व नंतर ब्रिगेडीयर जनरल या पदांवर बढती मिळाली. नंतर नेपोलियनची इटलीतील नीस येथील तोफखान्यावर फ्रेंच पायदळात नेमणूक झाली (१७९४).

या वेळी रोब्झपीअरला सत्तेवरून काढण्यात आले (२० जुलै १७९४). ही बातमी नीसमध्ये पोहोचली. त्या वेळी रोब्झपीअरचा पक्षपाती म्हणून त्याला अटक करण्यात आली.

पुढे त्याच्यावरील आरोप दूर होऊन पुन्हा त्यास रुजू करून घेण्यात आले आणि व्हांदे येथे त्याची नेमणूक झाली. त्यात त्याच्या भवितव्याच्यादृष्टीने काही विशेष नसल्यामुळे त्याने ती नाकारली व तो पॅरिसला आला. यानंतर अडीच वर्षांनी नेपोलियनच्या युद्धकौशल्याचा खरा कस लागला, तो खुद्द पॅरिस या राजधानीत.

५ ऑक्टोबर १७९५ रोजी तीस हजार सशस्त्र रॉयलिस्ट बंडवाले तूलरीझ राजवाड्यावर चालून आले. बंडखोरांचा निःपात करून प्रजासत्ताकाचे रक्षण करण्याची जबाबदारी बारास या नव्या संचालकाने नेपोलियनवर टाकली व त्याने ती यशस्वी रीत्या पार पाडली. यामुळे त्याची पॅरिसचा लष्करी प्रशासक व फ्रान्सच्या अंतर्गत सैन्याचा कमांडर म्हणून नेमणूक झाली. थोड्याच दिवसांनी त्याच्याकडे इटलीच्या मोहिमेचे नेतृत्व सोपविण्यात आले.

इटलीच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी काही दिवस आधी तो एका प्रेम प्रकरणात गुंतलेला होता. या वेळी त्याला अर्धा पगार मिळत असे. मार्से येथील एका श्रीमंत धनिकाची मुलगी डेझीरी क्लेरी हिच्याबरोबर विवाह करावा, असे त्यास वाटे. ती नेपोलियनच्या थोरल्या भावाची मेहुणी होती; पण तिच्या बापाने सरळ विरोध केला, तेव्हा निराश होऊन तो पॅरिसला परतला. पॅरिस येथील बंडाचा बीमोड केल्यानंतर नेपोलियनला अनेक मानमरातब मिळाले.

इटलीतील मोहिमेची सरदारकी बारासने त्यास देऊ केली. बारासच्या सांगण्यावरून नेपोलियनने जोझेफीनशी ९ मार्च १७९६ रोजी विवाह केला. ती नेपोलियनपेक्षा सात वर्षांनी मोठी होती. जोझेफीनचे पूर्वाश्रमीचे नाव जोझेफीन रोझ ताशेअर द ला पाझरी. तिचे पहिले लग्न जनरल अलेक्झांडर द बोआर्ने या सरदाराबरोबर झाले होते व त्यांना दोन मुले होती; पण दोघांचे बिनसले आणि त्यांनी घटस्फोट मागितला.

पुढे अलेक्झांडरला रॉयलिस्ट म्हणून फाशी देण्यात आले. नेपोलियनच्या मनात जोझेफीनविषयी निष्ठा होती; वारसाच्या कारणास्तव त्याने पुढे मारी ल्वीझबरोबर विवाह केला व जोझेफीनला घटस्फोट दिला, तरी तिची व्यवस्था त्याने योग्यप्रकारे ठेवली होती आणि तिची विचारपूस व भेट तो वारंवार घेत असे.

लग्नानंतर दोनच दिवसांनी म्हणजे ११ मार्च १७९६ रोजी नेपोलियन इटलीच्या मोहिमेवर नीसला गेला. तूलाँ जिंकून आणि नवोदित फ्रेंच प्रजासत्ताकाविरुद्ध उठलेले बंड शमवून तलवार गाजवायला त्याला सुवर्णसंधी प्राप्त झाली होती. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही फ्रेंच राज्यक्रांतीत उदयाला आलेली उदात्त तत्त्वे नुकतीच कुठे रुजत होती. त्या तत्त्वांनी भारावलेले फ्रेंच सैनिक नव्या साहसी नेतृत्वाची वाट पहात होते; पण त्यांना धड कपडे नव्हते की पुरेसे अन्न उपलब्ध नव्हते.

युद्धसामग्री मर्यादित व खराब झालेली होती; पण नेपोलियनने त्यांच्या अस्मितेला आवाहान करून ‘हा विजय तुम्ही मिळविलात, तर संपन्न शहरे तुमच्या ताब्यात येतील आणि वैभव–सुखाची साधने सहज तुमच्या स्वाधीन होतील. तेव्हा धीर धरा आणि उद्योगात कमी पडू नका’ असे आवाहन केले.

या वेळी फ्रान्सभोवती इंग्‍लंड, ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया असे साम्राज्यवादी देश व त्यांच्या कच्छपी असणारे छोटेमोठे सरंजामदार व रोमचे पोप कोलाहल माजवीत होते.

प्रत्यक्ष सैन्य फक्त ३०,००० होते. त्याने १२ एप्रिल १७९६ रोजी ऑस्ट्रिया व सार्डिनिया यांच्या फौजांचा पराभव केला आणि तूरिनकडे कूच केली. मिलान जिंकून त्याने मँट्‌युआकडे वेढा दिला. दरम्यान त्याने पार्मा, मोदीना यांचे ड्यूक व सहावा पोप पायस यांच्याबरोबर युद्धविरामाचे तह केले. त्या वेळी त्याने इटलीची पुनर्संघटना केली. त्याने लाँबर्डीमध्ये प्रजासत्ताक स्थापन केले.

ऑस्ट्रियन सैन्याने चार वेळा मॅंट्‌युआचे रक्षण करण्याचा प्रयत्‍न केला; पण अखेर ऑस्ट्रियाचा रीव्हॉली येथे १७९७ मध्ये नेपोलियनने पराभव केला व पुढे तो व्हिएन्नाकडे वळला. ऑस्ट्रियाने १७ ऑक्टोबर १७९७ रोजी काम्पॉफार्मिदॉ येथे अखेर शस्त्रसंधी तह केला. हा तह नेपोलियनच्या लष्करी व राजकीय डावपेचांचा द्योतक आहे.

या तहाने ऑस्ट्रियाने फ्रान्सची ऱ्हाईन नदीची सरहद्द मान्य केली. या विजयामुळे नेपोलियनची प्रतिष्ठा अधिकच वाढली. संचालकांनी त्याच्याकडे इंग्‍लंडला नमविण्याचे काम सोपविले. पण त्याने ‘फ्रान्सचे नौदल सुसज्ज झाल्याशिवाय इंग्‍लंडवरील आक्रमणास काहीच अर्थ नाही’ असे सांगितले व त्याऐवजी ईजिप्तवरील स्वारीचा बेत सुचविला.

संचालकांनी या योजनेस पाठिंबा दिला; कारण त्यांना नेपोलियनसारखा महत्त्वाकांक्षी व कर्तृत्ववान सेनानी फ्रान्सपासून दूर ठेवणे अधिक श्रेयस्कर वाटले. इटलीचे युद्धपर्व संपल्यानंतर पाच–सहा महिन्यांतच नेपोलियन ईजिप्तच्या सागरी स्वारीसाठी तयार झाला (१९ मे १७९८). नौदलाची आगेकूच अत्यंत त्वरेने व गुप्तपणे झाली.

सुरुवातीस त्याला एकामागून एक विजय मिळाले. त्याने माल्टा, ॲलेक्झांड्रिया आणि नाईलचा त्रिभुज प्रदेश पादाक्रांत केला. ईजिप्तमध्ये त्याने काही प्रशासकीय बदल घडवून आणले आणि तो सिरियाकडे वळला (१७९९). एकर येथे त्याच्या सैन्यास माघार घ्यावी लागली. फ्रान्सच्या विरूद्ध ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रिया, रशिया व तुर्कस्तान यांनी संयुक्त आघाडी उघडली. यामुळे इटलीत फ्रेंच सैन्याचा पराभव झाला. खुद्द फ्रान्समध्ये छोटीसी क्रांती होऊन (१८ जून १७९९) उदारमतवादी लोकांना संचालक मंडळामधून हाकलून देण्यात आले व जॅकोबिन्स लोक सत्तेवर आले; तथापि एकूण परिस्थिती गोंधळाची होती. संचालक मंडळामधील इमॅन्युएल स्येयअसच्या मते, फक्त लष्करी हुकूमशाहीच या परिस्थितीत देशाला तारू शकेल व राजेशाहीस पुन्हा डोके वर काढता येणार नाही.

अर्थात नेपोलियनला ही सर्व परिस्थिती आपल्या जासूदांकरवी कळत होती. म्हणून निवडक सैन्य घेऊन म्यूरोन नौकेतून इंग्रजांची टेहाळणी असतानाही शत्रूच्या नौसैन्यास चुकवीत ९ ऑक्टोबर १७९९ रोजी तो फ्रान्सच्या फ्रेझ्यूस बंदरावर उतरला. तेथे त्याची मावशी-जोझेफशी भेट झाली. त्याने देशातील सर्व परिस्थिती त्यास स्पष्ट केली. पाच जणांचे संचालक मंडळ जनमानसातून पार उतरले होते. नव्या राज्यघटनेचा वारंवार भंग होत होता.

त्रस्त झालेली जनता या तडफदार तरुण सेनाधिकाऱ्याकडे मोठ्या आशेने पहात होती. फ्रान्समध्ये नेपोलियनचे उत्स्फूर्त स्वागत झाले. यावेळी बारास, गॉये आणि मॉल्यॅन हे संचालक भ्रष्टाचारी म्हणून कुप्रसिद्ध झाले होते; तर रॉजर द्यूको हा संचालक अभनुवी, प्रामाणिक व भित्रा होता; मात्र पाचवा संचालक आबे स्येयेअस महत्त्वाकांक्षी, बुद्धिमान व हिकमती होता. त्याने नेपोलियनच्या साहाय्याने एक व्यूह रचला आणि फ्रान्समध्ये अंतर्गत क्रांती घडवून आणली.

जॅकोबिन उठावाची खोटी हूल उठवून ती चिरडण्याकरिता ज्येष्ठ मंडळ व पाचशेचे मंडळ या दोहोंच्या बैठकी स्वतंत्ररीत्या सेंट क्लाऊद या स्थळी १० नाव्हेंबर १७९९ रोजी घेण्यात आल्या. नेपोलियन, स्येयेअस व द्यूको या तिघांचे प्रशासक मंडळ अस्तित्वात आले. या मंडळास कौन्सिल ऑफ एन्शंट्स (अपर चेंबर) व कौन्सिल ऑफ फाइव्ह हंड्रेड (लोअर चेंबर) यांच्या बैठकांत शिक्कामोर्तब झाले. लोअर चेंबरमध्ये प्रथम नेपोलियनची फजिती उडाली; पण ल्यूस्यॅं या त्याच्या धाकट्या भावाने समयसूचकतेने वेळ निभावून नेली.

नवीन संविधानाप्रमाणे नपोलियन हा पहिला कॉन्सल बनला. याव्यतिरिक्त कौन्सिल ऑफ स्टेट, ट्रिब्यूनेट, लेजिस्लेटिव्ह वॉर्ड व सिनेट अशी चार स्वतंत्र मंडळे नव्याने स्थापन झाली; परंतु कोणताही प्रस्ताव नेपोलियनच्या संमतीशिवाय सादर केला जाऊ नये वा मतासाठी घेऊ नये असे एकूण धोरण ठरले. एवढेच नव्हे, तर मंडळांनी मान्य केलेला प्रस्ताव त्याच्या संमतीशिवाय अंमलात येऊ शकत नसे.

या सुमारास वस्तुतः फ्रान्समधील कर्तुमकर्ता शक्ती नेपोलियनच होता. मुख्य कॉन्सलची मुदत सुरुवातीस दहा वर्षांची होती. १८०० ते १८०५ या पाच वर्षांच्या काळात वाढत्या विरोधाला तोंड देत देत नेपोलियन फ्रान्सचा सर्वसत्ताधारी झाला. या बिकट काळात उत्तर इटलीत त्याने मॅरेंगोची लढाई जिंकली. ऑस्ट्रेलियाला पुरते नमवून त्याने ल्यूनेव्हीलचा तह आपल्या मनाप्रमाणे करवून घेतला. त्याचे वाढते बळ पाहून इंग्लंडने आम्येंचा तह केला (१८०२). असंतुष्टांनी परक्यांच्या मदतीने त्याचा खून करण्याचे प्रयत्न केले व कट रचले. त्याची वाढती लोकप्रियता व कर्तृत्व लक्षात घेऊन सिनेटने त्याची पहिल्या कॉन्सलपदी कायम स्वरूपाची म्हणजे आजीव नेमणूक केली (१८०२); पण कटवाले आणि विरोधक जेव्हा प्रत्यक्ष त्याच्या प्राणावरच उठले; तेव्हा वंशपरंपरागत सम्राटपदाची कल्पना पुढे आली.

सिनेटने ठराव करून आणि सार्वमत घेऊन नपोलियनला सम्राटपद देऊ केले. २ डिसेंबर १८०४ रोजी पॅरिसमधील नॉत्रदाम या प्राचीन प्रसिद्ध चर्चमध्ये नेपोलियनचा मोठ्या थाटामाटात राज्यभिषेक झाला. या राज्याभिषेकाला रोमहून खुद्द पोप पायस आपली नेहमीची परंपरा मोडून नाखुशीनेच पॅरिसला आला.

राज्यभिषेकसमयी वादाचा मुद्दा उपस्थित होऊ नये, म्हणून नेपोलियनने स्वतःच राजमुकुट धारण केला आणि त्यानंतर दुसरा जोझेफीनच्या मस्तकावर ठेवला व जोझेफीन महाराणी झाली. राजमस्तकी मुकुट ठेवण्याची पोपची उज्वल परंपरा नेपोलियनने मोडली होती, याबद्दल पोपने विनंती करून त्याची नोंद राजपत्रात (मॉनितोर) होणार नाही, याची खात्री करून घेतली.

एक कॉर्सिकन शिपाईगडी फ्रान्सचा सम्राट झाला, घटननेने यूरोपची सर्व राजघराणी हादरून गेली. त्यांच्या धुरिणांनी नेपोलियनविरुद्ध युती करून अखंड युद्धाची तुतारी फुंकली. कॉन्सल झाल्यानंतर त्याने फ्रान्सच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वगैरे सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आणि विविध कायदे करून फ्रान्सला जागतिक राजकारणात मानाचे स्थान मिळवून दिले. या काळात नेपोलियनला इंग्लंड, ऑस्ट्रिया व रशिया यांच्या आघाडीस तोंड द्यावे लागले. त्याने मुत्सद्देगिरीने रशियास फळीमधून फोडले व ऑस्ट्रियावर मॅरेंगो व होअनलिंडन येथे विजय मिळवला. यावेळी आल्प्स पर्वत प्रचंड सेनेसह व तोफांसह ओलांडण्याचे कमालीचे साहस त्याने दाखवले. ऑस्ट्रियाने ल्यूनेव्हील येथे तह केल्यामुळे (९ फेब्रुवारी १८०१) ऱ्हाईनच्या पश्चिमेकडील बराच मुलुख फ्रान्सला मिळाला होता. फ्रान्स आणि इंग्लंड दोघांनाही शांततेची निकड असल्यामुळे आम्यें येथे त्यांनी तह केला (मार्च १८०२).

परंतु नेपोलियनच्या संरक्षक जकातीच्या धोरणामुळे इंग्लंड असंतुष्ट होते. ल्यूनेव्हीलच्या तहामुळे यूरोपातील फ्रान्सचे पारडे फार जड झाले होते. परिणामतः माल्टाच्या प्रश्नावरून दोहोंमध्ये पुन्हा युद्ध भडकले. इंग्लंडने ऑस्ट्रिया, रशिया व स्वीडन यांसह फ्रान्सविरुद्ध तिसऱ्यांदा फळी उभारली. नेपोलियनने विद्युत्‌वेगाने धडक मारून ऑस्ट्रियाचा उल्म व ऑस्ट्रिया-रशियाचा ऑस्टरलिट्‌झ येथे पराभव केला. ऑस्ट्रियाने प्रेसबुर्क (ब्रात्यिस्लाव्हा) तह केला (१८०५).

या तहामुळे ऑस्ट्रियास जर्मन राज्यसमूहात व इटलीमध्ये काही स्थान उरले नाही. पुढे १८०६ च्या तहाने नेपोलियनने ऱ्हाईनचे संघराज्य स्थापले. प्रशियाशीही फ्रान्सचे युद्ध जुंपून नेपोलियनने येना व आउअरश्टेट येथे प्रशियाचा पराभव केला व रशियाचा फ्रीटलांट (प्राव्हडीन्‌स्क) येथे पराभव केला. प्रशियाचा अधिकाअधिक मुलूख नेपोलियनने ताब्यात घेऊन त्याचे वेस्टफेलियाचे राज्य बनविले व प्रशियाच्या ताब्यातील पोलंडच्या प्रदेशाचे वॉर्साचे संस्थान बनविले.

परत एकवार ऑस्ट्रियाचा पराभव करून त्याने इलिरियाचे प्रांत मिळविले. त्यावेळी नेपोलियनची सत्ता पराकोटीस पोहोचली होती. त्याने स्वतःसाठी ‘इटलीचा राजा’ हा किताब घेतला. विजयामागून विजय संपादन करीत गेल्याने १८१० साली त्याचा पराक्रम आणि वैभव कळसाला पोहोचले होते.

ऑस्टरलिट्‌झ व येना येथील विजयानंतर त्याच्या शत्रूंनी जे गौरवोद्‌गार काढले, ते उल्लेखनीय आहेत. ऑस्टरलिट्‌झच्या युद्धात ऑस्ट्रिया, रशिया यांच्या संयुक्त सैन्याचा, त्यांच्या सम्राटांदेखत नेपोलियनने धुव्वा उडविला, तेव्हा इंग्लंडचा पंतप्रधान विल्यम पिट म्हणाला, ‘यूरोपचा नकाशा गुंडाळून ठेवा, आणखी दहा वर्षे त्याची गरज नाही.’ नेपोलियनने आपल्या नातेवाईकास निरनिराळ्या देशांची राजपदे तसेच सरदारक्या दिल्या. मारी ल्वीझपासून त्याला एक मुलगा झाला, त्याला तो रोमचा राजा म्हणे.

इंग्लंडच्या नाविक शक्तीशी सामना करण्याचा नेपोलियनने प्रयत्न केला; परंतु ट्रफॅल्गर युद्धात नेल्सनच्या व्यूहरचनेमुळे तो हारला. म्हणून इंग्लंड आणि इंग्लंडच्या साम्राज्याचा यूरोपीय देशांशी होणारा व्यापार बंद करण्याचा चंग त्याने बांधला. ही बंदी यशस्वी करण्यासाठी त्याने पोर्तुगाल ताब्यात घेऊन स्पेनवर आक्रमण केले; परंतु स्पेनमध्ये स्वातंत्र्यवादी गनिमांनी सुधारण्यांच्या प्रलोभनांस बळी न पडता कडवा विरोध केला; जेथे बारा हजार शिपायांवर काम भागेल अशी नेपोलियनची कल्पना होती, तेथे पाच लाख सैनिक गुंतून पडले व अनेक कामास आले. स्पेनची मोहीम नेपोलियनच्या अनिर्बंध सत्तेला कर्करोगाप्रमाणे जीवघेणी ठरली.

काँटिनेंटल सिस्टिमच्या अंमलबजावणीवरून नेपोलियनचे रशियाशी बिनसले, सहा लाख सैन्यानिशी तो मॉस्कोपर्यंत चालून गेला; पण रशियाच्या दग्धभूमी व शिस्तबद्ध माघार या धोरणांमुळे अखेर तो जेरीस आला. झार अनेक पराभव होऊनही शरण येईना. तेव्हा नाइलाजाने नेपोलियनच्या महान सेनेला माघार घ्यावी लागली.

रोगराई, थंडीचा कडाका, अन्नधान्याचा तुटवडा व गनिमांच्या हल्ल्यामुळे कसेबसे तीस हजार सैनिक मायदेशी परत आले. यानंतर रशिया, प्रशिया व ऑस्ट्रिया यांच्या संयुक्त फौजांनी लाइपसिक येथे नेपोलियनचा संपूर्ण पराभव केला (१६–१८ ऑक्टोबर १८१३). त्यामुळे नेपोलियनने उभारलेली जर्मन प्रदेशातील सारी फ्रेंच सत्ता लयास गेली.

दोन महिने फ्रान्सच्या प्रदेशांत युद्ध होऊन शेवटी पॅरिस पडले. नेपोलियनने राजत्याग केला. फ्रान्सच्या राष्ट्रीय निशाणाचे चुंबन घेतले व हुंदके देणाऱ्या सैनिकांची अखेरची सलामी व निरोप घेऊन फाँतेन्‌ब्लो राजवाड्यातून तो बाहेर पडला. दोस्तांनी ठरविल्याप्रमाणे त्यास एल्बा बेटावर पाठविण्यात आले. सु. दहा महिने एल्बा बेटाचा अधिपती म्हणून त्याने तेथे वास्तव्य केले. जमतील त्या सुधारणा केल्या; पण व्हिएन्ना काँगेस यूरोपची पुनर्घटना करण्यात गुंतलेली होती. त्या काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचे समजताच त्याची महत्त्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली.

ब्रिटिशांची नजर चुकवून त्याने धाडसाने एल्बा सोडले आणि तो फ्रान्समध्ये दाखल झाला. धीरोदात्त वर्तनाने व वाणीने त्याने फ्रेंच सैन्याची सहानुभुती मिळविली आणि सर्व सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली; पण अखेर दोस्तांच्या सैन्याशी त्याची वॉटर्लू येथे गाठ पडून तो पूर्णपणे पराभूत झाला (१८१५). त्यास इंग्रजांनी सेंट हेलीना बेटावर कारावासात ठेवले. कर्करोगाने वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी तो मरण पावला.

सुधारणा

नेपोलियन हा श्रेष्ठ सेनानी तसाच मुत्सद्दी व राजकारणपटू म्हणून प्रसिद्ध आहे. पहिला कॉन्सल झाल्यानंतर त्याला १८००–०५ च्या दरम्यान बरीच शांतता लाभली. या काळात त्याला फ्रान्सच्या अंतर्गत स्थितीचे चांगले अवलोकन करण्यास अवधी मिळाला व त्याला अनुसरून त्याने अनेक सुधारणा केल्या.

या सुधारणा सर्वस्वी नवीन होत्या, असे नव्हे, त्यांतील काहींची सुरूवात नेपोलियनपूर्व क्रांतिकालात झाली होती, तर काहींची बूँर्बाँ राजांच्या कारकीर्दीत झाली होती; परंतु नेपोलियनने दुर्दम्य उत्साहाने व कमालीच्या चिकाटीने त्यांना पूर्ण स्वरूप देऊन त्या सुधारणा कार्यवाहीत आणल्या.

एवढेच नव्हे, तर कसूर करणाऱ्यांविरूद्ध त्याने कडक उपाययोजना करून त्यांना शासनही केले. या पाच वर्षांत फ्रान्सच्या तत्कालिक गरजा भागवून देशात त्याने भक्कम व स्थिर राजसत्ता स्थापण्यात यश मिळविले. धडाडी, योजकता, संघटनाकौशल्य व विशेष म्हणजे सर्व विषयांत रस घेण्याच्या वृत्तीमुळे लोकमतावर त्याची तत्काळ छाप पडली. प्रथम त्याने देशांतील विविध पक्ष व असंतुष्ट गट यांना राजी राखून जुन्यानव्याची सांगड घातली.

आपल्या शासनयंत्रणेत त्याने तज्ञांना गोवले. संविधानाच्या रेंगाळत्या कार्याला चालना दिली. लोकशाहीचे विडंबन होऊ नये म्हणून व केंद्रसत्ता बळकट व्हावी म्हणून मताधिकारांना मर्यादा घातली. त्याने तयार केलेली विधिसंहिताही त्याची सर्वश्रेष्ठ सुधारणा समजली जाते. “माझी खरी कामगिरी मी जिंकलेल्या लढायांत नसून कायद्याची संहिता तयार करण्यात आहे; ही संहिता महत्त्वाची असून शाश्वत टिकणारी आहे,” असे तो म्हणे.

फ्रान्समध्ये त्यावेळी निरनिराळ्या विभागांत निरनिराळ्या तत्त्वांवर आधारलेले वेगवेगळे कायदे व न्यायपद्धती अस्तित्वात होत्या. त्यामुळे न्याय आणि त्याची अंमलबजावणी यांत सर्वत्र एकवाक्यता नव्हती. दक्षिणेमध्ये रोमन कायदे आधारभूत होते, तर उत्तरेमध्ये फ्रॅंक लोकांचे. क्रांतीकालात झालेल्या कायद्यांनी या गोंधळात भर टाकली होती. अशा परिस्थितीत कायद्यांची एक संहिता तयार करणे अत्यावश्यक होते.

कन्व्हेशनने सुरू केलेले हे संहितीकरणाचे व आधुनिकीकरणाचे काम नेपोलियनने पुढे चालू केले. संहिता तयार करणाऱ्या पंडितांच्या समितीच्या बैठकींस तो हजर राही. सभासदांची चर्चा लक्षपूर्वक ऐकून वेळोवेळी त्यांना सूचना करी. हा नवा कायदा प्रत्यक्ष अस्तित्वात आला, तेव्हा लोक त्याला खुशीने ‘कोड नेपोलियन’ म्हणू लागले. त्याच्या या संहितेचे कित्येक देशांनी नंतर अनुकरण केले.

विधिसंहितेचे दिवाणी व फौजदारी प्रक्रिया, नागरी संहिता, दंडसंहिता आणि वाणिज्य संहिता असे एकूण पाच भाग आहेत; पण नेपोलियनला स्वातंत्र्याची विशेष कदर नव्हती आणि समतेपेक्षा शिस्त, सुव्यवस्था आणि कार्यक्षमता या गोष्टी त्याला जास्त महत्त्वाच्या वाटत; म्हणून त्याने स्त्रियांना कमी प्रतीचा दर्जा, अपराध्यांना क्रूर शिक्षा व खटल्याची गुप्त प्राथमिक चौकशी यांसारख्या गोष्टींचाही अंतर्भाव संहितेत केला; परंतु क्रांतीच्या तत्त्वांचा मूळ गाभा या विधिसंहितेत सुरक्षित ठेवला असून नागरिकांतील श्रेष्ठ–कनिष्ठ हा भेद नष्ट करण्यात आला. सुसंस्कृत समाजाचे शासन कशाप्रकारे चालवावे, याची शिकवण नेपोलियनच्या या विधिसंहितेने यूरोपला दिली.

कायद्याखालोखाल इतर क्षेत्रांतही त्याने आमुलाग्र सुधारणा केल्या.

शिक्षणाच्या क्षेत्रात शिस्त व केंद्रीकरण साधण्याचा नेपोलियनने प्रयत्न केला. त्याने शाळांचे चार विभाग पाडले. प्राथमिक, माध्यमिक, लायसियम व तांत्रिक. शिक्षण आणि शासन यांवर धर्ममार्तंडांचा पगडा होता. नेपोलियनने तो बेडरवृत्तीने दूर केला. त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साम्राज्याचे एक विद्यापीठ असावे व त्याच्या शाखा सर्व प्रांतामध्ये असाव्यात, अशी त्याची योजना होती; पण लढाया व इतर उद्योग यांमुळे ती फलद्रुप झाली नाही.

उच्च शिक्षणाच्या १७६५ मध्ये स्थापन झालेल्या ‘इन्स्टि‌ट्यूट द फ्रान्स’ ह्या संस्थेस या दृष्टीने त्याने पाठिंबा दिला; पण तेथे नीतिशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या अभ्यासास मनाई केली; कारण त्यामुळे आपल्या कारभारावर टीका करणारे विद्वान तिथे निर्माण होतील, अशी त्यास भीती वाटे.

सैनिकांच्या शौर्याचे चीज करण्याच्या हेतूने त्याने किताब देण्याची प्रथा सुरू केली. ही पुढे मुलकी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनांही लागू केली; पण पुढे या गोष्टींचा अतिरेक होऊन बूर्बाँ राजांच्या वेळेसारखा दरबारातल्या मानकऱ्यांचा एक वर्ग निर्माण झाला. आर्थिक समृद्धी व्हावी, यासाठी त्याने रस्ताबांधणीचे आणि कालवे खोदण्याचे मोठे कार्यक्रम हाती घेतले. देशातील उद्योगधंद्यांस उत्तेजन देण्यासाठी व राजकीय हेतूंच्या पूर्तीसाठी त्याने आयात-निर्यातीवर कर बसवले; करपद्धतीत सुधारणा केली. बॅंक ऑफ फ्रान्सची स्थापना केली.

पॅरिसच्या सौंदर्यात त्याने अनेक नव्या वास्तू बांधून, रस्ते सुधारून खूप भर घातली. तसेच लूव्ह्‌रच्या संग्रहालयात लढाईवरून परत येताना असंख्य मौल्यवान वस्तू आणून भर घातली व ते एक उत्तम संग्रहालय केले. तसेच त्याने सक्तीची करवसुली बंद केली. धर्ममंदिरे खुली केली.

हिंसाचारामुळे हद्दपार झालेल्यांना परत येण्याची मुभा दिली. स्थानिक स्वराज्याला भरपूर उत्तेजन दिले; पण जबाबदार अधिकारी नेमण्याचा वा बडतर्फ करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला. देशातील रस्ते, कालवे, उद्याने, स्मारके इ. सार्वजनिक गोष्टींकडे त्याने रसिकतेने व उपयुक्ततेच्या दृष्टीकोनातून लक्ष पुरविले. त्याने सैन्याची स्थिती सुधारून अधिकारी व सैनिक यांच्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीत अनेक खास सवलती दिल्या.

रणनीती

जगाच्या इतिहासात एक असामान्य लष्करी सेनापती म्हणून नेपोलियनचे नाव प्रसिद्ध आहे. त्याच्या लष्करी जीवनाला १७९३ साली सुरुवात झाली आणि वॉटर्लू ही नपोलियनच्या बाबीस वर्षांच्या लष्करी जीवनातील अखेरची लढाई ठरली.

या काळात त्याने सु. साठ लढायांत फ्रेंच सेनेचे नेतृत्व केले व वॉटर्लूखेरीज (१८१५) अन्य बहुतेक लढायांत तो विजयी झाला. त्याचा देह हा मुळात लष्करी बाण्याचा होता आणि ब्रीएन येथे लष्करी शिक्षण घेतल्यावर कोणत्याही जागी, कोणत्याही वेळी व कसल्याही हवामानात युद्ध करण्याची त्याच्या मनाची तयारी होती आणि वरिष्ठांचे अधिकार तो शिरसावद्य मानी. या दृष्टीने त्याने सैनिक तयार केले.

शालेय जीवनात त्याने प्राचीन ग्रीस, रोम, मध्ययुगीन युरोप, आधुनिक युरोप यांसंबंधी पूर्ण माहिती मिळविली होती. त्याने पुनःपुन्हा अलेक्झांडर, सीझर, हॅनिबाल, गस्टाव्हस, आडॉल्फस, फ्रीड्रिख द ग्रेट यांच्या स्वाऱ्यांचा व लढायांचा अभ्यास केला. आपल्या आईपासून नेपोलियनने शिस्त व नेतृत्व यांचे धडे घेतले. त्याच्यात कोणतेही धाडसी कृत्य करण्याची धडाडी होती आणि अशी जबाबदारी तो मुद्दाम स्वीकारी. त्याच्या रणनीतीचे मर्म सैनिकांची मने आणि अंतःकरणे जिंकण्यात होते. प्रत्येक सैनिकाची आणि अधिकाऱ्याची त्याला पूर्ण माहिती असे.

युद्धभूमीवर सर्वजण सारखे असतात, या तत्त्वाने तो वागे आणि त्यांच्यात तो मिसळत असे. अनेक वेळा त्यांना गत लढायांच्या विजयी कहाण्या सांगे, त्यांच्या कुटुंबांची आस्थेने चौकशी करी आणि त्यांच्या तक्रारी सहानुभूतीने ऐकून घेई. युद्धात कामी आलेल्या सेनपतींच्या कुटुंबीयांची तो व्यवस्था करी.

ऑस्टरलिट्‌झच्या लढाईच्या वेळी कामी आलेल्या सर्व सैनिकांच्या मुलांचा सांभाळ करण्याची तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याने स्विकारली. नेपोलियनची केवळ उपस्थिती ही त्याच्या सैन्याची स्फूर्ती होती. म्हणून वेलिंग्टनने म्हटले आहे की, ‘नेपोलियनचे रणांगणावरील अस्तित्व म्हणजे ४०,००० सैनिक होते’.

विविध लढायांत पराक्रम दाखविलेल्या शूर सेनापतींना त्याने मार्शल ऑफ फ्रान्स व मार्शल या पदव्या दिल्या. त्यांच्यात ने, लान, दाव्हू, बेस्येअर, म्यूरा, ओझरो, केलेरमान, बेरनादॉत, सेसरीर वगैरे मातब्बर सरदार व शूर सेनापतींचा अंतर्भाव होतो.

त्याच्या रणनीतीचे दुसरे महत्त्वाचे गमक म्हणजे त्याचे युद्धाकाळातील जाहीरनामे, आपल्या सैनिकांना स्फूर्ती मिळेल आणि त्यांचे नीतिर्धर्य वाढेल, असे जाहीरनामे तो काढी. प्रसंगी शत्रूच्या सैन्याला अत्यंत कमी लेखून आपल्या सैनिकांची तोंड भरून स्तुती करी. अनेक वेळा तो युद्धाचा सर्व आराखडा आपल्या सैनिकांसमोर ठेवी. त्याच्या दृष्टीकोनातून जो जलद जातो, जो चिकाटीने व सातत्याने आणि शिस्तीने लढतो, तो श्रेष्ठ लढवय्या होय. त्याने सैनिकांना अनेक गुन्हे माफ केले असले, तरी प्रत्यक्ष लढाईच्या वेळी त्याची शिस्त फार कडक असे.

नेपोलियनचे कोणत्याही स्वारीचे आराखडे गणिती पद्धतीने तयार केलेले असत. तो प्रथम नकाशावर सर्व डावपेच आखून कोणत्या स्थळी शत्रूला गाठावयाचे, कसे गाठावयाचे वगैरेंचा खर्डा तयार करी. त्याच्या गणितात अन्नपुरवठ्याला किंमत होती; पण महत्त्व नव्हते. उलट चपळ हालचालींना अधिक महत्त्व होते. वेळेचे मोल तर त्याच्याइतके कोणीच ओळखले नाही. जयापजयाचे पारडे मिनिटामिनिटाला फिरते ही त्याच्या अनुभवातली गोष्ट होती.

सर्व बाजूंचा, सर्व दृष्टींनी नीट विचार करून शांतचित्ताने तो प्रत्येक लढाईचा बेत करीत असे व मग त्यात ऐनवेळी तात्पुरता व आवश्यक तो फेरफार करी. सैन्याला हुकूम स्पष्ट व बारीकसारीक बाबींतसुद्धा संगतवार देई. तो सैन्याचे चार किंवा पाच, प्रसंगी त्याहून अधिक भाग करी. एक तुकडी राखीव म्हणून ठेवत असे. प्रत्येक तुकडीवरील अधिकाऱ्यास निःसंदिग्ध शब्दांत मोहिमेचे स्वरूप सांगून त्यांच्या दिनचर्येच्या हकीकती व दररोजची स्थिती यांचे अहवाल मागवीत असे. हे सर्व अहवाल रात्री निजण्यापूर्वी त्याच्याकडे पोहोचले पाहिजेत, अशी त्याची सक्त ताकीद असे.

लढाईच्या वेळी शत्रूच्या गोटात व छावणीत आपले गुप्तहेर पसरून टाकी. त्यांच्याकडून येणाऱ्या बातम्यानुसार तो हालचालींचे हुकूम सोडी आणि हुकूमी अंमलबजावणी योग्य रित्या होते की नाही, यावर त्याची करडी नजर असे. अपयशाची त्याला कधीही शंका वाटत नसे आणि त्याचा आत्मविश्वासही मोठा विलक्षण होता.

तरीपण लढाईत अपयश येऊन पराभव झाला व सैन्य मागे हटले, तर पुढे कशी तजवीज करावी, याचा स्थूल आलेखही तो लढाईपूर्वीच नीट आखून ठेवी आणि त्याप्रमाणे आपल्या अधिकाऱ्यांना व सेनपतींना आगाऊ सूचना देई. शत्रूला कसे फसवावे आणि फसल्यानंतर शत्रू काय करील व जाळ्यात कसा गुंतेल वगैरेंचे आडाखे त्याने बांधलेले असत. त्यामुळे पाहणाऱ्यास त्याने संपादिलेले विजय केवळ दैवी चमत्कारच वाटत.

बादशाही वस्त्रे उतरून नेपोलियनने रणवेश धारण केला, की त्याच्या अंगची युद्धकला नवतेजाने उफाळून येई. वेगवान हालचाली, गुप्तता, चकवाचकवी, स्फूर्तिशाली जाहीरनामे, अनुकूल युद्धक्षेत्राची निवड, सैन्यदलाची इष्टस्थळी मिळवणी, शत्रूच्या मर्मस्थानाचा अचूक वेध असे अनेक तंत्रमंत्र या युद्धवीराच्या गणिती डोक्यात सज्ज असत.

या सर्व व्यवस्थेत फक्त एकच दोष होता आणि तो म्हणजे सर्व बाबी तो स्वतः ठरवी व सर्व खाती तो स्वतःच सांभाळी, त्यामुळे सेनापती व इतर मुत्सद्दी केवळ हुकूमबंद यंत्रे बनली. स्वतंत्रपणे जबाबदारी पेलण्याची ताकद त्यांच्यात कधीच निर्माण झाली नाही.

योग्यता

नेपोलियनचे चरित्र आणि चारित्र्य रोमांचकारी घटनांनी भरलेले आहे. नेपोलियन हे फ्रेंच राज्यक्रांतीचे अपत्य, असे म्हटले जाते. १७८९ मध्ये राज्यक्रांती झाली. त्यांतून पक्षोपक्षांचा तीव्र झगडा माजला आणि क्रांतीने रक्तरंजीत, भयाण स्वरूप धारण केले. त्यातच शत्रूंनी फ्रान्सला चोहोबाजूंनी वेढले.

अशावेळी नेपोलियनने फ्रान्समध्ये एक स्थिर राजसत्ता प्रस्थापित केली आणि आपल्या रणनैपुण्याच्या जोरावर यूरोपमधील राजसत्तांशी अखंडपणे झुंज दिली. या झुंजीत त्याचे अनेक गुणावगुण दिसून आले आणि सुरुवातीस त्याने विजयामागून विजय संपादित १८१० साली पराक्रम आणि वैभव यांचे उच्च शिखर गाठले. त्याच्या अंगी सेनापतीस योग्य असे धैर्य व धाडस होते आणि त्याची बुद्धीमत्ता व स्मरणशक्ती विलक्षण होती. नेपोलियनची आकृती सेनापतीला न शोभेल अशी ठेंगू; पण ऐटदार व आकर्षक होती.

तो दुसऱ्यावर तत्काळ छाप पाडी. कार्दीनाल काप्रारा जेव्हा नेपोलियनला भेटायला आला, तेव्हा त्याने गडद हिरवा गॉगल घातला होता, एवढी त्याच्या नजरेची त्यास भीती वाटे, तर जनरल व्हानदाम म्हणतो, ‘त्याचे मोहिनी घालणारे डोळे पाहून मी थरथर कापू लागतो.

आतापर्यंत मी देवाला किंवा भुतालाही भ्यालो नाही’; तथापि नेपोलियनचा पिंड भावनाप्रधान, वृत्ती रसिक, भोगप्रवण; स्वभाव आक्रमक, बुद्धी शोधक व सर्वस्पर्शी होती. त्याचा पोषाख साधा असे आणि तपकीर व कॉफी तसेच गरम पाण्याचे स्वच्छंद स्नान व उपवास यांचा त्याला शौक होता. नट, गायक, चित्रकार, कवी, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ वगैरे बुद्धिवंतांची संगत त्याला फार प्रिय असे. त्याच्या वाङ्‌मयभिरुचीमुळे गटे प्रभावीत झाला होता, तर इतिहासकार म्यूलर ‘त्याच्या बहुश्रुततेमुळे आणि सूक्ष्म निरीक्षणामुळे’ थक्क झाला.

नेपोलियनच्या वीरगाथेत प्रणयगाथेची एक चमकती वीज आहे. तो रणवीर होता, तसाच प्रेमवीर होता. त्याची पहिली पत्नी जोझेफीन व दुसरी पत्नी मारी ल्वीझ यांना लिहिलेली त्याची प्रेमपत्रे उपलब्ध आहेत. राजवाड्याबाहेर त्याच्या अनेक नाटकशाळा होत्या. ज्या बाहेरच्या अनेक स्त्रियांशी त्याचा स्नेहसंबंध लावला जातो किंवा आला, त्यात डेझीरी ही त्याची पहिली प्रिया; नंतर मादाम डॅन्यूली व मादाम व्हालेफ्‌स्का या

दोन सुंदरींना विशेष प्राधान्य देण्यात येते. या दोघींनाही नेपोलियनपासून एक एक अपत्य झाले आणि त्या दोघींचे नेपोलियनवर एवढे प्रेम होते, की त्याच्या आपत्तीच्या काळातही त्या त्याच्याजवळ राहण्यास तयार होत्या. जोझेफीनला घटस्फोट दिल्यानंतरही त्याने तिच्याशी अखेरपर्यंत संबंध ठेवले होते. काही लेखक बहिणीशी अथवा सावत्र मुलीशी असणाऱ्या त्याच्या संबंधाबद्दल शंका घेतात. किमान त्यावेळी अशी कुजबुज होती, असे नमूद करतात; तथापि आपल्या आयुष्यात शृंगाराला त्याने कधीही कर्तुत्वाच्या आड येऊ दिले नाही.

सत्ता, संपत्ती व स्त्रिया यांचा मनःपूर्वक उपभोग घेऊनही त्याची वीरवृत्ती उफाळून येत असे. सत्ताधीश किंवा युद्धनेता हा सतत कर्तव्यदक्ष असला पाहिजे, या उक्तीपासून तो कधीही ढळला नाही. त्याने आपले सेनापती अक्षरशः शून्यातून निर्माण केले आणि पडत्या काळातही अनेक अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या मर्दुमकीने साथ दिली. म्हणून एमर्सनने म्हटले आहे, ‘त्याने आपली युद्धे बुद्धीने जिंकली.’

नेपोलियनचा उदय जितक्या शीघ्रगतीने झाला, तितकाच त्याचा अस्त झपाट्याने झाला. वेग, गतिमानता, नाट्य त्याच्या वादळी जीवनात ओसंडून वहात होते. त्याची महत्त्वाकांक्षा दुर्दम्य होती; पण त्याला कधीच इंग्लंडशी तुल्यबळ असे आरमार निर्माण करता आले नाही. ते जमले नाही तरीसुद्धा त्याला साऱ्या यूरोपात एक विशाल राज्य निर्माण करावयाचे होते. त्याचा हा ध्यास होता. त्याकरिता त्याने असंख्य लढाया केल्या. काहींच्या म्हणण्यानुसार या लढाया स्वसंरक्षणार्थ होत्या; तथापि या लढायांत फ्रान्सची अपरिमित मानवहानी झाली.

अखेरीस जवळजवळ तरुण पिढी नष्ट झाली. त्यामुळे त्याला सैन्याची जमवाजमव करणे कठीण झाले. त्यातच क्रांतीची समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व ही उदात्त तत्त्वे मागे पडून एका व्यक्तीची हुकूमशाही झाली. यामुळे फ्रान्सला, विचारवंतांना आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांना आणि मुख्यतः रॉयलिस्टधार्जिण्या लोकांना नेपोलियन नकोसा वाटू लागला. यांतूनच त्याच्या विश्वासांतील प्रमुख अधिकारी, सेनापती शत्रूला जाऊन मिळाले. नेपोलियनच्या नियतीत, पराक्रमात आणि राजकीय उत्कर्षापकर्षात ज्यांची नियती आणि हात गुंतले होते, असे अनेक आप्तजन सगेसोयरे होते.

त्यांपैकी आपल्या भावांना नेपोलियनने छोट्या छोट्या राज्यांवर राजे नेमले होते व इतरांना सरदार केले होते. यांपैकी एकही हुशार वा कार्यक्षम प्रशासक नव्हता; या कृत्यात त्याने यूरोपातील अनेक राजघराणी दुखविली. त्याच्या भावांनी नेपोलियनचा पराभव झाला, हे पाहिल्यावर स्वार्थासाठी शत्रूची कास धरली. वारसाचा हक्क प्रस्थापित करण्याचा त्याने जो प्रयत्न केला आणि पोपला दुखविले; या अनेक कारणांमुळे आणि सत्तेचा हव्यास यांमुळे अखेर त्यास पराधीन जीवन कंठावे लागले.

नेपोलियनने आपल्या आठवणी अखेरीस तुरुंगात असताना लिहिल्या. त्या विलक्षण उद्‌बोधक असून त्याच्या मनोवृत्तीचे तसेच यशापयशाचे स्वयंमूल्यमापन त्यातून प्रभावीपणे प्रकट झाले आहे. त्याची असंख्य पत्रे आतापर्यंत उपलब्ध झाली असून त्यांपैकी सु. ४१,००० पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. नेपोलियनचे चरित्र व लढाया यांवर गेल्या दीडशे वर्षांत जवळजवळ दोन लाखांहून अधिक ग्रंथ लिहिले गेले. अद्यापि त्याच्या युद्धनीतीचा अभ्यास अनेक पाश्चात्य विद्यापीठांत चालू आहेत.

 

संदर्भ : 1. Bertaut, Jules, Napoleon in His Own Words, Chicago,1916.

2. Bourguignon, Jean, Napoleon Bonaparte, 2, Vols., Paris, 1936.

3. Cronin, Vincent, Napolean Bonaparte; An Intimate Biography, New York, 1972.

4. Durant, Will & Ariel, The Age of Napoleon, New York, 1975.

5. Esposito, V. J.; Elting, J. R. A Military History and Atlas of the Napoleonic Wars, London, 1964.

6. Ludwig, Emil, Napoleon, New York,1958.

७. दीक्षीत, म. श्री. नेपोलियन, पुणे, १९७१.

८. भावे, वि. ल. चक्रवर्ति नेपोलियनचे चरित्र, ठाणे १९१७.

लेखक - चं. रा. पोतनीस / सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate