অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुहंमद पैगंबर

मुहंमद पैगंबर

मुहंमद पैगंबर

(? ५७१ ?–८ जून ६३२). इस्लामचे संस्थापक मुहंमद यांचा जन्म मक्का येथील कुरैश ह्या अरब टोळीतील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. (२० एप्रिल ५७१ व ११ नोव्हेंबर ५६९ असे असे दोन पक्ष त्याच्या जन्मतारखेबाबत आहेत). त्याकाळी मक्का हे व्यापाराचे केंद्र म्हणून भरभराटीला आले होते. बायझंटीन साम्राज्य तसेच ससानिद (इराणी) साम्राज्य ह्यांच्याशी चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार मक्केद्वारा चालत असे. अनेक देशातून माल मक्केत येत असे आणि तेथून ह्या साम्राज्यातील प्रदेशांकडे रवाना होत असे. हा व्यापार इतका वाढला होता, की मक्केतील स्त्रियाही त्याच्यात सहभागी होत असत. जो व्यापार करीत नाही तो कंगाल राहतो अशी मक्केत म्हण पडली होती. ह्या व्यापाराची मक्तेदारी कुरैश टोळीकडे होती.

इतर अरब टोळ्यांना खूष राखण्यासाठी व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी कुरैश टोळीने मक्केतील ⇨ काबा या उपासनामंदिराला सर्व अरबांचे धार्मिक केंद्र हे स्वरूप दिले होते. भिन्न अरब टोळ्या ज्या ज्या देवतांची उपासना करीत त्या सर्वांना काबामध्ये स्थान देण्यात आले होते. ह्या मंदिरात देवदेवतांच्या तीनशेहून अधिक मूर्ती तसेच अनेक चित्रविचित्र आकारांच्या शिला ठेवलेल्या होत्या. काबा येथे दरवर्षी  भरणाऱ्या यात्रेमुळे ते सबंध अरबस्तानचे एक सांस्कृतिक केंद्रही बनले होते. कुरैश टोळीतील सहा प्रमुख कुटुंबांचे काबावर नियंत्रण होते आणि ही सुद्धा उत्पन्नाची एक मोठी बाब होती. व्यापारी आणि धार्मिक केंद्र म्हणून मक्केमध्ये संपन्नता नांदत होती आणि संपत्तीबरोबरच येणारे सामाजिक दुराचरण आणि अनैतिकता ह्यांचीही तेथे कमतरता नव्हती.

अशा धनसंपन्न, शिरजोर पण ह्याबरोबरच अनेक टोळ्या आणि धर्मपंथ ह्यांच्या सांस्कृतिक प्रभावाचे मिश्रण जेथे झाले होते, अशा शहरात इस्लामच्या प्रेषितांचा जन्म झाला. त्यांचे वडील अब्दुल्लाह ह्यांचे मुहंमदाच्या जन्माआधीच निधन झाले होते आणि मुहंमद सहा वर्षांचे असतांना त्यांची आईही त्यांना सोडून गेली. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब हे त्यांचे पालक झाले. पण तेही दोन वर्षांनी मृत्यु पावले आणि अबू तालिब ह्या त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या पालनपोषणासाठी त्यांना जवळ केले. अबू तालीब हे व्यापारी होते. मुहंमद त्यांच्या अपत्यांबरोबर वाढले. पण जरा मोठे झाल्यावर अबू तालीब ह्यांच्याबरोबर व्यापाराच्या निमित्ताने ते अनेकदा सिरिया येथे गेले. पौगंड वयातही त्यांची ऋजुता, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणा ह्यासाठी ते प्रसिद्ध झाले. मक्केमध्ये ‘अमीन’-म्हणजे इमानी-ही पदवी त्यांनी प्राप्त करून घेतली होती. जेव्हा अबू तालिब ह्यांच्या व्यापाराला उतरती कळा लागली तेव्हा मक्केमधील खदीजा ह्या एका श्रीमंत विधवेने त्यांना आपले मुनीम ही जागा देऊ केली. ती त्यांनी स्वीकारली. त्यांची सचोटी, एकनिष्ठपणा आणि नेकी ह्यांची खदीजावर अतिशय छाप पडली. मुहंमदांनी आपल्या दक्ष आणि कुशल व्यवहाराने खदीजाला खूप फायदाही मिळवून दिला. आपण विवाह करावा अशी खदीजाने मुहंमदांना सूचना केली आणि ती त्यांनी मान्य केली. ह्यावेळी मुहंमदाचे वय पंचवीस होते, तर खदीजा चाळिशीच्या जवळ आली होती. ह्या लग्नामुळे मक्केच्या वरिष्ठ वर्गात मुहंमदांना प्रतिष्ठित स्थान प्राप्त झाले.

ह्या सुमाराला मुहंमदांची एकांतवासाविषयीची आवड वाढत चालली होती. ते अधिकाधिक अंतर्मुख बनून स्वतःच्या विचारात मग्न राहत. त्यांची धर्मपरायणता प्रसिद्ध होती. त्यांच्या सत्चशील मनोवृत्तीमुळे मक्केमध्ये प्रचलित असलेल्या सामाजिक दुराचरणाने ते अत्यंत व्यथित असत. संपत्तीच्या पाठोपाठ एका क्रूर प्रकारच्या गुलामगिरीच्या चालीने मक्केत प्रवेश केला. ख्यालीखुशाली फोफावली होती आणि नीतिमत्ता खालावली होती. प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण घेतला, की मद्यपान, जुगार आणि स्त्रैणपणा हे दुर्गुण त्याच्या ठिकाणी असणारच असा समज पसरला होता. ह्या वातावरणाचा उबग येऊन मुहंमद सांसारिक व्यवहारापासून अधिकाधिक निवृत्त होऊ लागले. आपला बराच काळ मक्केपासून तीन मैल दूर असलेल्या हिरा डोंगरावरील गुहेत एकांतवासात ते घालवू लागले. ह्या काळात सामाजिक संपर्क शक्य तितका टाळून ते उपवास आणि रात्रंदिवस ईश्वराची प्रार्थना करीत कालक्रमणा करीत. अशी एखाद्या यतीसारखी प्रखर साधना करीत त्यांनी बरीच वर्षे घालविल्यानंतर वयाचे चाळिसावे वर्षे गाठीत असताना रमजान महिन्यातील एका दिवशी हिराच्या गुहेत त्यांना उच्च आणि खणखणीत ध्वनी ऐकू आला. ‘‘विश्वाचा निर्माता असलेल्या ईश्वराच्या नावाचे पठण कर’’ अशी आज्ञा ह्या ध्वनीने त्यांना केली. त्यांना लाभलेला हा पहिला ईश्वरी संदेश, पहिली ‘श्रुती’ अथवा पहिले प्रकटीकरण (रेव्हेलेशन) होते. हा पवित्र कुराणाचा प्रारंभ होय. ह्या अनुभवाने मुहंमद भयचकित तर झालेच; पण शिवाय अतीव आदरयुक्त भीतीने ते हादरल्यासारखे झाले. त्यांनी हा असाधारण स्वरूपाचा अनुभव आपली पत्नी खदीजा हिला कथन केला. ह्यानंतर लवकरच त्यांना आकाशात एक आकृती दिसली. ‘हे मुहंमद तू ईश्वराचा प्रेषित आहेस आणि मी गाब्रिएल आहे’ असे ती घोषित करीत होती. हे समजल्यावर खदीजाने आपले चुलते वरख बिन नव्‌फल ह्यांचा सल्ला घेतला. सेमिटिक धर्मपंथांविषयीच्या सखोल व्यासंगाबद्दल वरख हे प्रसिद्ध होते. मुहंमदांना येणारे अनुभव सत्य आहेत आणि ⇨ मोझेसप्रमाणे मुहंमदही आपल्या जमातीचे प्रेषित म्हणून ओळखले जातील असे त्यांनी खदीजाला आश्वासन दिले. ह्यामुळे मुहंमद आणि खदीजा ह्यांना धीर आला. मुहंमदांना लाभणारे प्रकटीकरण चालू राहिले; पण पुढील काही वर्षे आपल्याला मिळालेला संदेश थोडे जवळचे नातेवाईक आणि मित्र ह्यांच्यापुरताच त्यांनी मर्यादित ठेवला. पण त्यानंतर हा संदेश त्यांनी सर्व लोकांत पसरवावा, असा त्यांना आदेश झाला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate