অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामुराई

सामुराई

सामुराई

मध्ययुगीन सरंजामशाही जपानमधील एक योद्घयंचा क्षत्रियवर्ग. सामाराऊ (सेवा करणे) या जपानी शब्दापासून सामुराई ही संज्ञा रुढ झाली असून सुरुवातीस सम्राटाच्या संरक्षक दलाच्या संदर्भात ती प्रचारात होती. स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण शस्त्रबळाने करावे, या संकल्पनेतून स्वसंरक्षणासाठी शस्त्रसज्ज झालेल्या या क्षात्रवृत्ती असलेल्या लोकांचे हळूहळू योद्घयंच्या वर्गात (सामुराई) रुपांतर झाले. पुढे सामुराई ही संज्ञा पूर्ण लष्करी वर्गासाठी रुढ झाली. सामुराई या योद्घयंच्या वर्गात लढवय्ये –सैनिक –शिपाई, दाइम्यो (जहागीरदार-सरंजामदार) आणि सेनापती-सरसेनापती यांचा अंतर्भाव होता. साधारणतः सहा ते दहा टक्के तत्कालीन जनता या वर्गात कार्यरत होती.

‘बूशी’(लष्करी लोक) या नावाने हे योद्घे समाजात परिचित असत. सामुराईंसाठी बूशिदोनामक एक आचारसंहिता होती. तीत निष्ठा व निर्विवाद आज्ञापालन यांना विशेष महत्त्व होते. सामुराई संपत्ती किंवा प्राण (जीव) यांपेक्षा मानसन्मानाला-प्रतिष्ठेला सर्वाधिक महत्त्व देई आणि अपमानित झाला असता ⇨हाराकिरीचे (जपानी उच्च्वर्गीय व्यक्ती पोट फाडून घेऊन आत्महत्या करत असे) प्रायश्चित्त घेत असे. प्रत्येक सामुराई योद्घा दोन तलवारी व एक विशिष्ट प्रकारचे शिरस्त्राण वापरत असे. लष्करी हुद्यांनुसार त्यांची मानचिन्हे व अनुक्र म ठरलेला असे. त्यानुसार त्यांना मानधन वा जमिनी दिल्या जात असत.

मध्यपूर्व जपानमधील होन्शू विभागातील कांटो हे त्यांचे मूलस्थान असून हेआन राजवटीत (७९४–११९१) क्योटोमधील केंद्रीय सत्तेची दुर्बलता हे सामुराईंच्या उगमाचे प्रमुख कारण होय. प्रारंभी सामुराईंत ताइरा व मिनामोटो असे दोन गट होते; आणि त्यांत सतत संघर्ष होत असे. बाराव्या शतकाच्या अखेरीस मिनामोटो गटाने ताइरा गटाला नेस्तनाबूत केले (११८५); आणि होन्शू विभागातील कामाकुरा येथे सामुराईंच्या क्षात्रशक्ती व युद्घकौशल्याचा पुरेपूर उपयोग करून सु. सातशे वर्षे जपानवर अधिसत्ता गाजविली.

औद्योगिक क्रांतीनंतर जपानमध्ये अस्थैर्य माजून दाइम्यो व शोगुन यांत संघर्ष उद्‌भवला आणि क्रांती झाली (१८६८).त्यानंतर सामुराई सरंजामशाही राजवट संपुष्टात येऊन मेजी ही सांवैधानिक राजेशाही अस्तित्वात आली (१८७१).

सामुराईंच्या काळामध्ये परकीय आक्र मणे परतविली गेली. जपानच्या एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. झेन बौद्घ पंथाचा प्रसार व प्रचार झाला.बंदुकीची दारु आणि तोफखाना यांच्या शोधांमुळे युद्घतंत्रात बदल घडले. देशांतर्गत अनेक सुधारणा होऊन सांस्कृतिक क्षेत्रात, विशेषतः साहित्यकलांना उत्तेजन मिळाले. झेन बौद्घ पंथाच्या प्रभावाखाली चौदाव्या शतकात चहासमारंभ व पुष्परचना या कलाप्रकारांची अभिवृद्घी झाली. तसेच शाईने केलेले एकवर्णी रंगांकन विकसित झाले.

भरदार प्रभावी रेखांकन व आलंकारिक चित्रे ही त्यांची प्रमुख अभिव्यक्ती होय. ती मुख्यत्वे वास्तूंच्या सुशोभनासाठी वापरात होती. दाइम्योंच्या आश्रयाने ‘देन्‌गाकु-नो-नो’ व ‘सारुगाकु-नो-नो’ यांसारखी लोकनाट्ये; कान्आमी व ⇨मोतोकिओ झेआमी (सेआमी) यांसारखे प्रसिद्घ नट व त्यांनी रुपांतरित केलेले ⇨नो नाट्य व नो–क्योगेन हे प्रसिद्घ नाट्यप्रकार यांनी रंगभूमी संपन्न झाली. यातूनच पुढे ⇨काबुकी हा प्रसिद्घ नाट्यप्रकार प्रसृत झाला.


पहा : जपान; शोगुन; हाराकिरी.

संदर्भ : 1. Hall, J. W.Government and Local Power in Japan, Princeton ( N. J.), 1966.

2. Morris, Ivan, The Nobility of Failure, London, 1975. 3. Varley, H. P. The Samurai, Oxford, 1970.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate