অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कनिष्क

कनिष्क

कनिष्क

(सु. पहिले शतक). कुशाण वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. हा विम कडफिससनंतर गादीवर आला, पण त्याचा त्या कुशाण राजाशी असलेला संबंध निश्चितपणे माहीत नाही. त्याच्या कारकीर्दीचे आरंभीचे लेख उत्तर प्रदेशात सारनाथ येथे सापडले आहेत. त्यांवरून तो पूर्वी प्रांताधिपती असून विम कडफिससच्या निधनानंतर झालेल्या सत्तासंघर्षात त्याने गादी बळकाविली असावी. त्याच्या काळाविषयी विद्वानांत मतभेद आहेत. फ्लीटच्या मते तो विक्रम संवताचा संस्थापक असावा. इतर काही विद्वान तो ख्रिस्तोत्तर १४४ च्या किंवा २४८ च्या सुमारास गादीवर आला असावा, असे मानतात. पण बहुसंख्य विद्वानांच्या मते तो ख्रिस्तोत्तर ७८ या वर्षी राज्य करू लागला. अर्थात तो शक संवताचा संस्थापक होता.

कनिष्काचे साम्राज्य फार विस्तृत प्रदेशावर पसरले होते. उत्तरेस मध्य आशियातील खोतानपासून महाराष्ट्र-विदर्भापर्यंत वपश्चिमेस खोरासानपासून पूर्वेस बिहार-ओरिसा पर्यंतचा विशाल प्रदेश त्याच्या साम्राज्यात अंतर्भूत होता. यांवर त्याने आपले क्षत्रप किंवा प्रांताधिपती नेमले होते. भारताच्या वायव्य प्रांतावरील लल, वेश्पशि, लिअक यांसारखे तसेच उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागावरील खरपल्लान आणि वनस्फर या त्याच्या क्षत्रपांची व सेनापतींची नावे कोरीव लेखांत आली आहेत. या लेखांचे ऐतिहासिक महत्त्व म्हणूनच मोठे आहे.

कनिष्काची नाणी काबूल, कंदाहार, बंगाल, बिहार, ओरिसा, छत्तीसगढ इ. अत्यंत विस्तृत प्रदेशांत सापडली आहेत. त्याच्या साम्राज्यात विविध धर्मांचे अनुयायी रहात असल्यामुळे त्या नाण्यांवर भारतीय शिव आणि शाक्यमुनी बुद्ध,पारशी वात, अग्‍नी आणि मिहिर (सूर्य), सुमेरियन नना, ग्रीक हेलिओस इ. अनेक देवातांच्या आकृती आढळतात.

कनिष्काची राजधानी पुरुषपुर (पेशावर) येथे होती. तेथे त्याने एक उत्तुंग स्तूप बांधला होता; त्याचा निर्देश चिनी यात्रेकरू फाहियान व ह्युएनत्संग यांनी केला आहे. त्याने पाटलिपुत्राहून (किंवा साकेतहून) सुप्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ अश्वघोष याला आणवून गांधार देशात (काहींच्या मते काश्मीरात) मोठी बौद्ध परिषद भरविली होती. तिचा अध्यक्ष वसुमित्र आणि उपाध्यक्ष अश्वघोष होता. या परिषदेत बौद्ध धर्मग्रंथ जमवून त्यांवर टीका लिहिण्यात आल्या. कनिष्काच्या काळी बौद्ध महायान पंथाचा उदय झाला.

कनिष्काचा अनेक विद्वानांना उदार आश्रय होता. पार्श्व, वसुमित्र, अश्वघोष, नागार्जुन, संघरक्ष इ. बौद्ध तत्त्वज्ञांप्रमाणे आयुर्वेद ग्रंथकार चरक हाही त्याच्या आश्रयास होता, असे म्हणतात.

कनिष्काची कारकीर्द शोकपर्यवसायी झाली. ख्रिस्तोत्तर ७३ ते ९४ या काळात चिनी सेनापती पांचाव याने मध्य आशियात आक्रमण करून खोतान, काशगर इ. पश्चिमेचे प्रदेश जिंकून चिनी सत्ता कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरविली. आपण चिनी सम्राटाच्या बरोबरीचे आहो, हे दाखविण्याकरिता कनिष्काने चिनी राजकन्येला मागणी घातली. हा आपल्या स्वामीचा अपमान आहे, असेपांचावला वाटून त्याने कनिष्काला युद्धाचे आव्हान दिले. कनिष्काने त्यावर ७०,००० घोडेस्वारांचे सैन्य पामीर पठारावर पाठविले, पणते पर्वतातील दुर्गम प्रदेशांतून जाताना बरेचसे नष्ट झाले. स्वतः कनिष्कही या युद्धात मारला गेला.

विशाल साम्राज्याचा अधिपती, शक संवताचा संस्थापक, बौद्धधर्माचा आश्रयदाता आणि विद्वानांचा पोशिंदा म्हणून कनिष्काचेनाव भारताच्या प्राचीन इतिहासात चिरस्मरणीय राहील.

 

पहा : कुशाण वंश.

संदर्भ : 1. Majumdar, R. C., Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.

2. Nilakanth-Sastri, K. A. Comprehensive History of India, Bombay, 1956.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate