অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गंग घराणे

भक्तिलीन स्त्रीमूर्ती, श्रवणबेळगोळ

गंग घराणे

भारतातील कर्नाटक व ओरिसा राज्यांत चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकांपर्यंत गंग घराण्याचे प्राबल्य होते, तथापि आठव्या शतकापासून पुढे ओरिसामध्ये त्याचा जोर अधिक वाढला आणि गंग घराणे प्रबल झाले.

त्याच्या पूर्व व पश्चिम शाखांमध्ये काही नाते होते किंवा पूर्वीची शाखा ही पश्चिमेच्या शाखेतूनच उद्‌भवली, ह्याविषयी फारसी विश्वसनीय माहिती ज्ञात नाही, परंतु गंग घराण्याच्या दोन शाखा होत्या.

 

पश्चिम शाखा पूर्वीच्या दक्षिण म्हैसूर प्रदेशावर राज्य करीत होत्या. तिच्या अंमलाखालील प्रदेशाला गंगवाडी म्हणत.

तिची राजधानी प्रथम कोलार आणि नंतर तैलकाड ही होती.

पूर्वशाखां च्या नंतरच्या लेखात म्हटले आहे, की कोलाहल नामक राजाने गंगवाडी प्रदेशात कोलाहलपुर स्थापून तेथे आपली राजधानी केली. नंतर काही काळाने कामार्णवाने आपल्या चुलत्याला गादी देऊन आपल्याभावांसह देश जिंकण्याकरिता प्रयाण केले आणि कलिंग दे शात महें द्र पर्वताजवळ येऊन तेथील राजाला पदच्युत करून तो आपल्या चार भावांसह राज्य करू लागला. नंतरच्या या आख्यायिकेतच कि ती तथ्य आहे, हे सांगता येत नाही. तथापि आरंभी पांच गंग राज्ये असून नंतर त्यांचे एकीकरण झाले, असे काही कोरीव लेखांत म्हटले आहे. पूर्व शाखेची राजधानी कलिंगनगर (सध्याचे मुखलिंगम्) येथे होती.

पश्चिम शाखा

या शाखेचा मूळपुरूष कोंगुणिवर्मा हा चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. याची राजधानी कोलार येथे होती. पुढे त्याचा वंशज आय्यवर्मा (सु. ४५o–६o) याने ती तैलकाड येथे नेली. यालाच नंतरच्या लेखांत हरिवर्मा म्हटले आहे.

गंगराजे हे आरंभी पल्लवांचे मांडलिक होते, पण पुढे दुर्विनीत (सु. ५४0–६00) याने पुन्नाड (दक्षिण कर्नाटक) आणि कोंगुदेश जिंकून त्यांचे जूं झुगारून दिले. त्यानंतरचा राजा श्रीपुरूष याने पांड्यांशी सख्य करून पल्लवांशी युद्ध केले. त्याचे राज्य राष्ट्रकूट, पल्लव आणि पांड्य यांच्या राज्यांमध्ये असल्याने त्याला मोठ्या सावधगिरीने वागावे लागे. त्याने कोंगुणिराजाधिराज परमेश्वर अशी पदवी धारण करून बंगलोरजवळ मान्यपूर (मण्णे) येथे आपली राजधानी नेली.

त्याचा पुत्र श्रीपुरूष (७२५–८0) याला राष्ट्रकूटांशी झगडावे लागले. राष्ट्रकूट नृपती ध्रुव आणि तिसरा गोविंद यांनी त्याला दोनदा बंदीत टाकून आपल्या राजकुमारांना राज्यशासक नेमले होते. पण गोविंदाचा पुत्र पहिला अमोघवर्ष याच्या कारकीर्दीत पुन्हा गंगानी आपले वर्चस्व स्थापले. तिसऱ्या कृष्णाने आपला मेहुणा बूतुग याला गंगवाडीचा अधिपती केले. त्याचे वंशज पुढे काही पिढ्या तैलकाड येथे राज्य करीत होते. त्यांपैकी राजमल्लाचा प्रधान चामुंडराय याने ९८३ मध्ये श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराचा मव्य पुतळा उभारला.

गंगांची पांड्यांच्या बाजूने पल्लवांशी आणि राष्ट्रकूटांचे साहाव्यक म्हणून चोलांशी वरचेवर युद्ध होत. शेवटी १००४ मध्ये चोलांनी तैलकाड काबीज करून गंगांना आपले स्वामित्व कबूल करावयास लावले, नंतर लवकरच गंग नामशेष झाले.

पूर्व शाखा

पाचव्या शतकाच्या अखेरीस वाकाटक नृपती हरिषेण याच्या स्वाऱ्यांमुळे कलिंग प्रदेशात जी अस्थिर परिस्थिती उत्पन्न झाली, तीत पूर्व शाखेच्या गंगांचा उदय झाला. त्यांनी आपल्या राज्य-स्थापनेचा द्योतक असा गांगेय (किंवा गंग) संवत् चैत्र शुल्क प्रतिपदा शक संवत् ४२o (१४ मार्च ४९८) या दिवशी स्थापला. हा गंग संवत् कलिंग देशात निदान ५२६ वर्षे प्रचलित होता. पुढे त्याची जागा शक संवताने घेतली.

या वंशाचा पहिला ज्ञात राजा पहिला इंद्रवर्मा. याचा गंग संवत् ३९ चा लेख सापडला आहे. तोच कदाचित या घराण्याचा मूळ पुरूष असावा. यानंतरच्या अनेक राजांचे अकराव्या शतकाच्या आरंभापर्यंतचे ताम्रपत्र सापडले आहेत. हे राजे महेंद्र पर्वतावरील गोकर्णेश्वराचे उपासक होते. त्यांची राजधानी कलिंगनगर (मुखलिंगम्) येथे होती. ते त्रिकलिंगाधिपती अशी पदवी धारण करीत; पण तिचा नक्की अर्थ विवादास्पद आहे. यांचे राज्य सामान्यत: गंजाम आणि विशाखापटनम् जिल्ह्यांना व्यापून असे. आरंभीच्या काही लेखांत हे आपणास तुंबुरू गंधर्वाचे वंशज म्हणवीत; पण पुढे त्यांनी आपला वंश ययातीचा पुत्र तुर्वसु याच्यापासून उत्पन्न झाला, अर्थात आपण सोमवंशी आहो, असे मानण्यास सुरूवात केली.

गंगांचा मधला काही इतिहास संशयित आहे. शक संवत् ९६o (१0३८) मध्ये अभिषिक्त झालेल्या पाचव्या वज्रहस्ताच्या वंशजांस उत्तरकालीन गंग म्हणतात. त्यामध्ये अनंतवर्मा-चोडगंग हा महाप्रतापी राजा होऊन गेला. हा १o७८ मध्ये गादीवर आला. याने कुलोत्तुंग चोल, दक्षिण कोसलचे कलचुरी, ओरिसाचे सोमवंशी आणि बंगालचे पाल यांच्याशी युद्धे करून त्यांपैकी बहुतेकांवर विजय मिळविले आणि आपले राज्य गंगेपासून गोदावरीपर्यंत विस्तृत केले. त्याने पुरी येथे जगन्नाथाचे सुप्रसिद्ध देवालय बांधले.

याच्या वंशजांकडून लवकरच सेन राजांनी नैर्ऋत्येचा बंगालचा भाग जिंकून घेऊन तेथे आपले राज्य स्थापले; पण लक्ष्मणसेनाच्या काळी मुहम्मद बखत्यारने स्वारी करून बंगाल जिंकला व तो १२००च्या सुमारास ओरिसाच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला. तिसरा राजराज आणि तिसरा अनंगभीम (१२१६–३५) यांनीही मुसलमानांचा पराभव करून आपले स्वातंत्र्य टिकविले. यानंतरही पहिला नरसिंह व दुसरा नरसिंह यांनीही मुसलमानी आक्रमणाला पायबंद घातला. पहिल्या नरसिंहाने (१२३८–६४) समुद्रकाठी⇨कोनारक येथे भव्य सूर्यमंदिर बांधले. भारतातील अत्यंत आश्चर्यजनक अशा प्राचीन स्थापत्यकृतींत त्याची गणना होते.

चौदाव्या शतकात गंगांच्या राज्यावर मुसलमानांच्या वरचेवर खाऱ्या होत होत्या; पण त्यांना यशस्वी रीतीने तोंड देऊन हे गंग राजे त्या परतवीत. त्यांना विजयानगरच्या हल्ल्यांनाही प्रतिकार करावा लागे. चौथ्या नरसिंहाच्या (१३७८–१४१४) कारकीर्दीत तर दक्षिणभारत आणि माळवा येथील मुसलमान अधिपतीं नी त्याच्यावर स्वारी केली; पण तीही त्याने परतविली. त्याच्या निधनानंतर त्याचा प्रधान कपिलेंद्र याने १४३४ मध्ये गादी बळकावली आणि अशा रीतीने जवळजवळ हजार वर्षे राज्य करणाऱ्या गंग घराण्याचा अस्त झाला.

इतर प्रदेशात मुसलमानांच्या आक्रमणामुळे हिंदू राज्ये कोलमडून पडली; पण गंग राजांनी दोन शतकांहून अधिक काळ त्यांचा यशस्वी प्रतिकार केला, हे त्यांस नि:संशय भूषणावह आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate