অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

छत्रसाल बुंदेले

छत्रसाल बुंदेले ( ४ मे १६४६ ? – ४ डिसेंबर १७३१)

औरंगजेब बादशाहाच्या कारकीर्दीत माळव्यात व मध्य भारतात हिंदूंची सत्ता स्थापन करणारा वीर पुरुष. हा चंपतराय बुंदेल्याचा चौथा मुलगा. वडिलांच्या मृत्यूनंतर मिर्झा राजा जयसिंगाच्या शिफारसीने त्याने काही काळ मोगल सैन्यात चाकरी केली आणि पुरंदर व देवगड (१६६७) च्या मोहिमांत चांगला पराक्रम केला. पुरंदर वेढ्याचे वेळी त्याची व शिवाजी महाराजांची भेट होऊन तिचा त्याच्यावर खूपच प्रभाव पडला. त्याने औरंगजेबाची चाकरी सोडून माळव्यास प्रयाण केले. औरंगजेबाने हिंदूंची देवळे पाडण्याचा १६६९ मध्ये उपक्रम चालू केल्यामुळे छत्रसालाने स्वजनांना एकत्र करून त्यास कसून विरोध केला. तेथील जनतेने त्यास आपला पुढारी आणि राजा म्हणून मान्य केले व त्याच्या शौर्याची व गुणांची वाहवा केली.

सुरुवातीस त्याच्याजवळ अत्यंत थोडे सैन्य होते. प्रथम त्याने धामोणीवर हल्ले केले, तेव्हा तेथील छोटेमोठे सरदार आपल्या लोकांसह त्यास येऊन मिळाले. अशा तऱ्हेने त्याने त्या प्रांतात आपला अंमल बसवून, तेथे चौथाई वसूल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने माळवा आणि कालिंजर हेही जिंकून आपल्या ताब्यात घेतले. मोगल सैन्याने त्यास विरोध केला. औरंगजेबाने तहव्वुर खान यांस त्याच्यावर पाठविले. परंतु त्याने त्यांचा व १६९९ मध्ये शेख अन्वरखानाचाही पराभव केला. शेवटी १७०५ मध्ये फिरूशजंगाच्या मध्यस्थीने औरंगजेबाने त्यास मोगल मनसबदार करून घेतले. औरंगजेबानंतर बहादुरशाहने त्याचे स्वातंत्र्य मान्य केले.

उत्तरेत त्याने मराठ्यांना साहाय्य केले, हे बादशाहास आवडले नाही; तेव्हा १७२८ मध्ये मुहम्मदखान बंगश या अलाहाबादच्या सुभेदारास त्याजवर पाठविले. त्याने जैतपूर येथे छत्रसालाचा पराभव केला. छत्रसालाने मराठ्यांचे साहाय्य मागितले. या वेळी चिमाजीअप्पा व बाजीराव पेशवे माळव्यात होते. माळव्यात बाजीरावाने वेढा घालून त्यास शरण आणले व छत्रसालाची सोडवणूक केली. याच्या मोबदल्यात छत्रसालने आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बाजीरावास देण्याचे मान्य केले होते. तथापि याबाबत तो व त्याचे मुलगे यांनी टाळाटाळ चालविली होती; पण त्यांना शेवटी बाजीरावाचे समाधान करावे लागले. नंतर थोड्याच दिवसांत तो मरण पावला.


संदर्भ : गुप्त, भगवानदास, महाराजा छत्रसाल बुंदेला, आग्रा, १९५८.

कुलकर्णी, गो. त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate