অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता (भाग २)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता (भाग २)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून. जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. असे जरी असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे होते. धर्मशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक द्रष्टे विचारवंत विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी केलेली पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल अशीच आहे.

डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि सद्यस्थिती

बाबासाहेब हे सव्यसाची पत्रकार होते. सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक न्याय ह्या तत्वांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आग्रह धरलेला होता. त्यांची सर्व पत्रे याच ध्येयवादाने भारलेली होती. नैतिकता हा तर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीचा कणाच मानला होता. वृत्तपत्र हे जर जनकल्याणाचे साधन असेल तर मग पीत पत्रकारिता ही निषेधार्हच मानली पाहिजे.

महाराष्ट्रात एक ध्येयशील पत्रकारितेची परंपरा आहे आणि म्हणून व्यथित अंत:करणाने पण परखडपणे आपल्या ध्येयापासून वंचित होणाऱ्या पत्रांना त्यांनी आपल्या मूळ बैठकांची जाणीव दिली. वृत्तपत्रांनी आचारसंहिता पाळली नाही आणि तंत्र स्वैर असले तर अज्ञजन रानभेरी होतील, असे त्यांना वाटत होते. भडक, विकृत आणि भावनांना आवाहन करणारे लेख लोकमानस घडवू शकणार नाहीत. लोकजीवनाला नवे परिणाम देऊ शकणार नाही अशी त्यांची खात्री होती. वृत्तपत्राचा खप वाढणे म्हणजे लोकमनाला संस्कारित करणारी विधायकता नव्हे. नि:पक्षपातीपणाचा अभाव आणि न्यायोचित लोककल्याणाच्या विचारांशी फारकत, लोकमनाची व लोकमताची अविकृत जडणघडण करु शकत नाही असा त्यांचा ठाम विचार होता. वृत्तपत्र हे शोषणाचे माध्यम बनविणाऱ्या प्रवृत्तींना त्यांनी धारेवर धरले.

त्यांच्या मते व्यक्तिपूजा ही भारतातील अनेक पत्रांना लागलेली कीड आहे. व्यक्तिपूजा आंधळी असते. त्यामुळे नीतीमत्ता ढळते म्हणून वृत्तपत्रांनी नीतीमत्तेला बाधा येणार नाही आणि सत्यापलाचा सूर बदलणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. वृत्तपत्र प्रपंच म्हणजे नीतीमत्तेचा प्रपंच अशी त्यांची धारणा होती.जाहिराती शिवाय वृत्तपत्रे जगू शकत नाही हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातीच्या आहारी जावे का? आणि कितपत जावे! आर्थिक सवलतीसाठी जाहिराती आवश्यक असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासंबंधीची संहिता पाहायला हवी, असे ते म्हणत. जाहिरातीची उद्दिष्टे आणि जाहिरात करण्याची पद्धती यात विरोध निर्माण झाला की, जाहिराती करण्यामागील तत्व भ्रष्ट होते असा त्यांचा दावा असे.

जाहिरात आणि नीतीमत्ता यांचा अन्योन्य संबंध बाबासाहेबांना अपरिहार्य वाटे. समाज उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्राकडे पाहिले. लौकिक ऋण फेडण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा प्रभावीपणे वापर केला.

बाबासाहेबांची पत्रकारिता या विषयावर डॉ. गंगाधर पानतावणे व विजया इंगोले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आलेली आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांचे संशोधन ग्रंथरुपाने प्रकाशित झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेले विचार, भूमिका आजही तंतोतंत लागू पडते, यावरुनच त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची खोली दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट


  1. 1891 एप्रिल 14, जन्म : महू, मध्यप्रदेश
  2. 1900 नोव्हेंबर – सातारा येथील शासकीय विद्यालयात प्रवेश
  3. 1908 जानेवारी – मुंबई विद्यापीठाची मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण
  4. 1913 जानेवारी – पर्शियन आणि इंग्रजी घेऊन बी.ए. उत्तीर्ण
  5. 1913 जुलै – अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात (न्युयार्क) सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन अभ्यासक्रमासाठी दाखल.
  6. 1915 – अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन एम.ए. उत्तीर्ण
  7. 1916 मे- ''दि कास्ट इन इंडिया'' या निबंधाचे वाचन. हा त्यांचा पहिला प्रकाशित निबंध
  8. 1916 जून – स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स, लंडन येथे दाखल
  9. 1917 – कोलंबिया विद्यापीठात पीएचडीचे संशोधन पूर्ण
  10. 1917- स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज प्रकाशित
  11. 1918 नोव्हेंबर – मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक
  12. 1920 जानेवारी- ''मूकनायक'' सुरु केले
  13. 1921 जून – लंडन विद्यापीठाची एमएसस्सी ही अर्थशास्त्रातील पदवी मिळवली.
  14. 1923 मार्च – ''दि प्रॉब्लेम ऑफ रुपी'' या प्रबंधाला अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी
  15. 1926 – मुंबई शासनात एम.एल.सी म्हणून नियुक्ती
  16. 1926 मार्च – चवदार तळ्याचा महाड येथील सत्याग्रह
  17. 1927 एप्रिल – बहिकृष्त भारत सुरु केले
  18. 1928 जून – सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक
  19. 1930 – जनता पत्र सुरु केले.
  20. 1930 ते 35 – काळाराम मंदिर सत्याग्रह
  21. 1930-32 – गोलमेज परिषद अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी
  22. 1932 सप्टेंबर – पुणे करार
  23. 1935 जून – मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य
  24. 1935 ऑक्टोबर – हिंदु धर्मत्यागाची येवला येथे घोषणा
  25. 1936 ऑगस्ट – स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
  26. 1945 जुलै – पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
  27. 1946 ऑक्टोबर – ''हू वेअर शुद्राज'' प्रकाशित
  28. 1947 ऑगस्ट – घटना समितीचे अध्यक्ष
  29. 1947 ऑगस्ट – स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री
  30. 1949 नोव्हेंबर – भारतीय संविधान सादर
  31. 1950 जून – औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना
  32. 1952 मार्च – कोलंबिया विद्यापीठाने एलएलडी पदवी दिली
  33. 1955 मे – भारतीय बौद्ध महासभेची स्थापना
  34. 1955 – प्रबुद्ध भारत सुरु
  35. 1956 ऑक्टोबर 14 –नागपूर येथे बौद्धधर्माचा स्वीकार
  36. 1956 नोव्हेंबर – जागतिक बौद्ध परिषदेला काठमांडू येथे प्रतिनिधी म्हणून हजर
  37. 1956 डिसेंबर 6 – दिल्ली येथे महापरिनिर्वाण
  38. 1957 – ''बुद्ध अँड हिज धम्म'' ग्रंथाचे प्रकाशन

संदर्भसूची
1. रणपिसे अप्पा, दलितांचे वृत्तपत्रे, प. 1-2
2. पानतावणे गंगाधन, पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे, 1996, पृ. 6,239,240,
241,247,248
3. कानडे रा. गो., मराठी नियतकालिकांचा इतिहास, कर्नाटक – मुंबई, 1934, पृ. 3
4. हिवराळे सुखराम, लोकपत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, 1990, पृ.9
5. आढावे, प्रशांत, माध्यम संशोधन पत्रिका
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विलायतेहून आलेली पत्रे रमेश रघुवंशी पृ. 1 -2
7. निबंधकार डॉ. आंबेडकर, डॉ. यशवंत मनोहर, प. 18,19,20,21,22,23, 103,104
8. डॉ. आंबेडकर विचारमंथन, डॉ. वा. ना. कुबेर, पृ. 17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28

लेखक  देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती) (वृत्त)

स्रोत - महान्यूज

अंतिम सुधारित : 5/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate