অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यझदानी, गुलाम

यझदानी, गुलाम

यझदानी, गुलाम : (२२ मार्च १८८५–१३ नोव्हेंबर १९६२). भारतातील एक श्रेष्ठ संशोधक, पुरातत्त्वज्ञ व कलासमीक्षक. त्यांचा जन्म सनातनी मुस्लिम कुटुंबात दिल्ली येथे झाला. वडील मुन्शी गुलाम जीलानी व आई मखोली बेगम. जीलानी भारतात येणाऱ्या मुलकी शासकीय ब्रिटिश अधिकाऱ्यांना उर्दू व फार्सी या भाषा शिकवीत. पुढे ते दुजान (पंजाब) संस्थानात दिवाण होते. यझदानींनी पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त दिल्लीत शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतले. सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून त्यांनी उर्दू–फार्सी–इंग्रजी भाषांत पहिल्या वर्गात बी.ए. पदवी घेऊन (१९०५) अनेक पारितोषिके मिळविली.

कलकत्ता विद्यापीठातून ते एम्‌.ए. झाले व इतिहास संशोधनाच्या ग्रिफिथ पारितोषिकाचे मानकरी ठरले (१९१३). विद्यार्थिदशेतच त्यांचा बद्र जहाँ बेगम यांच्याशी विवाह झाला (१९०९). त्यांना तीन मुली व दोन मुलगे होते. यझदानींनी अधिव्याख्याता म्हणून राजशाही, लाहोर इ. ठिकाणी १९०७ ते १९१३ यांदरम्यान काम केले. ब्रिटिश सरकारने त्यांना हैदराबाद संस्थानात स्थापन झालेल्या पुरातत्त्वखात्याचे अधीक्षक नेमले(१९१४). पुढे ते या खात्याचे पहिले संचालक झाले. १९४३ साली निवृत्त होईपर्यंत ते या पदावर होते. उर्वरित जीवन त्यांनी हैदराबाद येथेच संशोधन–वाचन–लेखन यांत व्यतीत केले.

संचालक असताना त्यांनी प्रा. सेक्कोनी व कौंट ओर्सिनी या इटालियन तज्ञांच्या मदतीने अजिंठ्याची चित्रे स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले. अजिंठा भित्तीचित्रांची सफाई, आरेखन व संरक्षण यांविषयी त्यांनी लिहिलेला अजंठा फ्रेस्कोज (४ खंड १९३०, १९३३,१९४६) हा सचित्र ग्रंथ याची साक्ष देतो. यामुळे ते विद्वत्‌वर्तुळात ख्यातनाम झाले. याशिवाय मांडू द सिटी ऑफ जॉय (१९२९) आणि बीदर : इट्स हिस्टरी अँड मॉन्युमेंट्स (१९४७) या दोन ग्रंथांद्वारे त्यांनी मध्ययुगात प्रसिद्ध असलेल्या मांडू व बीदर या नगरांचा सचित्र कलेतिहास प्रसिद्ध केला. अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन (२ भाग-१९६०) या ग्रंथाचे संपादन करून त्यांनी दक्षिण हिंदुस्थानातील प्राचीन वंशांसंबंधीचे अद्ययावत संशोधन प्रकाशात आणले. या ग्रंथातील कलाविषयक भागाचे त्यांनी लेखन केले. ते मूलगामी स्वरूपाचे आहे. ब्रिटिश सरकारने डॉ. हॉरोविट्स यांच्यानंतर पुराभिलेखज्ञ म्हणून त्यांचीच नियुक्ती केली. यझदानींनी एप्रिग्राफिया इंडोमॉस्लेमिका याचे चौदा खंड संपादित केले (१९४०).

यझदानींनी हैदराबाद संस्थानातील वेरूळ, रामप्पा, हनमकोंडा, औंध, अन्वा, हट्टगी इ. स्थळी असलेल्या प्राचीन मंदिरां चे तसेच बहमनीकालीन मकबऱ्यांचे शास्त्रशुद्ध रीतीने जतन करण्याचे प्रयत्न केले. कोंडापूर येथील उत्खननात त्याचा सहभाग होता आणि रायपूर जिल्ह्यातील अशोकाचे शिलालेखही त्यांनी उजेडात आणले. कामानिमित्त त्यांनी अनेक पाश्चात्त्य व पश्चिम आशियातील देशांना भेटी देण्याची संधी लाभली. तेथील वस्तुसंग्रहालयांचे कामकाज त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. इराण, इराक, मेसोपोटेमिया, ईजिप्त इ. प्रदेशांतील प्राचीन स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. हैदराबाद येथे त्यांनी वस्तुसंग्रहालय (सध्याचे सालारजंग संग्रहालय) स्थापन केले(१९३०).

त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. उर्दू मजलिस, मौलाना आझाद संस्था इ. संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले (१९४१). रॉयल एशियाटिक सोसायटी (बंगाल) या संस्थेचे अधिछात्र होण्याचाही मान त्यांना मिळाला. ब्रिटिश सरकारने ओ. बी. ई. (१९३६) आणि भारत सरकारने पद्मभूषण (१९५९) देऊन त्यांनासन्मानित केले. उस्मानिया, अलीगढ इ. विद्यापीठांनी डी.लिट्. ही सन्मान्य पदवी त्यांना दिली. त्यांचे शोधनिबंध, लेख आणिसंपादित पुरातत्त्वीय वृत्तांत यांची संख्या खूप मोठी आहे. हैदराबाद येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

 

संदर्भ : Sen S. P. Ed. Historians and Historiography in Modern India, Calcutta, 1973.

देव, शां. भा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate