অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रझिया सुलतान

रझिया सुलतान

रझिया सुलतान

( ?–१३ नोव्हेंबर १२४०). दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणारी तार्तर (इल्बारी) घराण्यातील पहिली राणी. तिचे चारित्र्य, चरित्र आणि कर्तृत्व यांविषयी इतिहासात अनेक कथा-दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. रझियाविषयीची माहिती मुख्यत्वे फिरिश्ता - खुसरौ वगैरे तत्कालीन लेखकांच्या ग्रंथांतून मिळते. रझिया ही ⇨ अल्तमश (कार. १२११–३६) याची एक हुशार मुलगी. तिला त्याने लहानपणी धार्मिक व लष्करी शिक्षण दिले. राज्यकारभारातही तो अनेक वेळा तिला सहभागी करून घेत असे. ज्येष्ठ राजपुत्र नासिरुद्दीन मुहम्मद याच्या आकस्मिक मृत्यूनंतर (१२२९) अल्तमशने इतर सर्व राजपुत्रांना डावलून भावी वारस म्हणून रझियाचीच निवड केली होती. ग्वाल्हेर मोहिमेच्या वेळी (१२३१–३२) त्याने शासनाची सर्व जबाबदारी रझियावर टाकली;तथापि तुर्की सरदारांना राजपुत्र हयात असताना एका स्त्रीचे वर्चस्व अपमानास्पद वाटू लागले. तेव्हा अल्तमशच्या मृत्यूनंतर रुक्नुद्दीन फीरुझशाह याला सरदारांनी गादीवर बसविले (मे १२३६).

तो दुर्व्यसनी व चैनी होता आणि प्रत्यक्षात सर्व सत्ता त्याची आई शाह तुर्कान बेगम हिच्याकडे होती. तिने रझियासह सावत्र मुलांना नष्ट करण्याचे कटकारस्थान रचले. कट उघडकीस येताच चाळीसगुणी शम्सी सरदारांत असंतोष माजला आणि त्यांनी रझियाच्या मदतीने रुक्नुद्दीन विरुद्ध बंड करून रझियाला सुलतान रझियतुघीन या नावाने दिल्लीच्या तख्तावर बसविले (७ नोव्हेंबर १२३६). बुरखा टाकून ती दरबारात बसू लागली. पुरुषी वेश धारण करून हत्तीवर बसून ती प्रजेस दर्शन देत असे. रणांगणातील नेतृत्व ती स्वतः करी. प्रत्येक काम ती स्वतः पाहून निकालात काढीत असे.

तिने दरबारातील प्रमुख सरदारांना विश्वासात घेतले आणि हिंदूंवरील जझिया कर रद्द केला. रस्त्यांची व्यवस्था, इमारतींची डागडुजी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इ. तिच्या महत्त्वाच्या सुधारणा होत. तिने प्रशासनात शिस्त आणली. आपल्या नावाने नाणी पाडली. नाण्यांवर उम्दत-उल्‌-निस्वा अशी मुद्रा असे.

राज्यावर येताच वजीर निजामुल्भुल्क मुहम्मद जुनैदी व बदाऊन, मुलतान, हांसी, लाहोर इ. ठिकाणच्या राज्यपालांनी तिच्याविरुद्ध बंड पुकारले. परंतु नुस्रतद्दीन तायसी, इज्जुद्दीन मुहम्मद सालारी, कबीरखान आयार इत्यादींच्या मदतीने तिने भेदनीतीचा उपयोग करून विरोधकांचा निःपात केला आणि राज्यात शांतता प्रस्थापिली. ग्वाल्हेरचा किल्ला सर केला आणि रणथंभोरमधील मुस्लिम सैनिकांना मुक्त्त केले. तुर्की सरदारांचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने जमालुद्दीन याकूत नावाच्या ॲबिसिनियन गुलामाला शाही तबेल्याचे अमीर उल्‌ उम्र (प्रमुख) नेमले व त्यास अनेक अधिकार दिले. याशिवाय विश्वासातीलसेवकांना उच्चपदे दिली. परिणामतः शम्सी सरदारांना एका स्त्रीचे वर्चस्व अपमानास्पद वाटू लागले.

काही विश्वासू अमीरही तिच्याविरोधात गेले. लाहोरच्या कबीरखान आयार याने बंडाचे निशाण उभारले. भतिंडाच्या मलिक आल्तुनियाने तिच्या सम्राज्ञीपदालाचआव्हान दिले. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी तिने पराक्रमाची शर्थ केली. परंतु तंबूतच तुर्की सरदारांनी जमालुद्दीन याकूतला ठारकेले. त्याच्या मृत्यूने ती खचली. तिचा पराभव होऊन तिला तुरुंगात टाकण्यात आले. दरम्यान तिचा सावत्र भाऊ बेहरमशाह यासदिल्लीचे सुलतानपद देण्यात आले. तेव्हा तिने आल्तुनियाशी संगनमत करून त्याच्याशी लग्न केले आणि उभयतांनी गख्खर, जाट वभाडोत्री सैन्य घेऊन दिल्लीकडे आगेकूच केली. जलालुद्दीन बल्बन याने दिल्ली –कटेहर मार्गावरील कैथलच्या युद्धात त्यांचा पराभवकेला (२४ ऑक्टोबर १२४०). आल्तुनिया व ती पळून जात असता अज्ञात इसमांनी उभयतांचा वध केला. तिने चोख कारभार केला.खुसरौच्या मते तिच्या हातून क्षुल्लकशीही चूक घडली नाही. तिचे थडगे जुन्या दिल्लीमध्ये बुलबुलीखाना नावाने प्रसिद्ध आहे. याकूत–रझिया व रझिया – आल्तुनिया यांतील जवळिकीमुळे नंतरच्या काळात काही रोमांचकारी वदंता प्रसृत झाल्या आहेत.

 

संदर्भ : 1. Majumdar, R.C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1970.

2. Zakaria, Rafiq. Razia : Queen of India, Bombay, 1966.

गोखले, कमल

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate