অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोमवंश

सोमवंश

सोमवंश

इक्ष्वाकु जसा सूर्यवंशाचा तसा पुरूरवा हा सोमवंशाचा मूळ पुरुष होय. तो सोम किंवा बुध याला इला या स्त्रीपासून झाला होता; म्हणून त्याला ऐल असेही नाव पडले होते.

पुरूरवा याची राजधानी प्रयागजवळ प्रतिष्ठान येथे होती. उर्वशीनामक अप्सरेशी झालेली त्याची प्रणयकथा ऋग्वेद, शतपथ ब्राह्मण, विष्णू व भागवत पुराणे इत्यादिकांत थोड्याफार फरकाने आली आहे. कालिदासाने तिच्यावर आपले विक्रमोर्वशीय नाटक रचले आहे. पुरूरव्याने शंभर अश्वमेध केल्याची कथा आहे. तो ऐश्वर्याने मत्त होऊन यज्ञयाग करणाऱ्या ऋषींना त्रास देऊ लागला, तेव्हा ऋषींनी त्याला ठार मारून त्याचा पुत्र आयू याला गादीवर बसवले. आयूने प्रतिष्ठान हीच राजधानी चालू ठेवली; पण आपला भाऊ अमावसू याला कान्यकुब्ज येथे स्वतंत्र राज्य स्थापून दिले.

आयूनंतर नहुष व विरजा यांचा द्वितीय पुत्र ययाती याने राज्य केले. ययातीने आपल्या राज्याचा सर्व दिशांत विस्तार करून सम्राट ही पदवी धारण केली. त्याला यदू, तुर्वसू, द्रुह्यू, अनु व पूरू असे पाच पुत्र झाले. त्यांपैकी पूरूला प्रतिष्ठानची गादी, तर ज्येष्ठ पुत्र यदू याला चर्मण्वतीची (चंबळा) गादी दिली. यदूला कोष्ट आणि सहस्त्रजित असे दोन पुत्र होते. त्याच्या वंशांना अनुक्रमे यादव आणि हैहय अशी नावे पडली. हेच दोन वंश पुढे प्रबळ झाले. ययातीच्या इतर तीन पुत्रांची राज्ये कालांतराने अयोध्येच्या मांधात्याने काबीज केली. हैहयांनी माळव्यात आपली सत्ता स्थापिली. त्यांच्या वंशातील माहिष्मत याने वसविलेली माहिष्मती त्याची राजधानी झाली.

ययाती पुत्र अनूच्या वंशजांनी पंजाबात आक्रमण केले. त्यांतील शिबी राजाने मुलतान येथे राजधानी स्थापिली. त्याच्या चार भावांनी पंजाबच्या इतर भागात आपला अंमल बसविला. त्यांपैकी नृग याच्यापासून ऐतिहासिक कालात विख्यात झालेला यौधेय वंश उत्पन्न झाला. द्रुह्यूच्या वंशजांच्या राज्याला गांधार असे नाव पडले. त्यांपैकी काहींनी उत्तरेच्या म्लेच्छ देशात आक्रमण करून तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली.

हैहयांमध्ये कृतवीऱ्याचा पुत्र अर्जुन हा बलाढ्य निघाला. त्याने अनेक विजय प्राप्त करून हिमालयापर्यंत आपला दरारा बसविला. त्याची दातृत्व, न्यायीपणा, विद्वत्तादी सद्गुणांबद्दल ख्याती होती. त्याला सहस्रबाहू होते, असे वर्णन आहे. त्याचा अर्थ त्याची हजार वल्ह्यांची जहाजे होती असा असावा. त्याचा भृगूंशी कलह होऊन तो परशुरामाकडून मारला गेला. नंतर परशुरामाने पश्चिम किनाऱ्यावर शूर्पारकादी बंदरे स्थापून पश्चिमेचा व्यापार हस्तगत केला.

यादवांच्या विदर्भ राजाने दक्षिणेत आक्रमण करून स्वतःच्या नावे राज्य स्थापिले. त्याच्या क्रथ आणि कैशिक या दोन पुत्रांमध्ये त्याच्या राज्याची विभागणी झाली होती; पण पुढे त्यांचे ऐक्य झाल्यावर क्रथकैशिक ही संज्ञा विदर्भाची वाचक झाली.

अनूचे वंशज आनव यांनी पूर्वेकडे आपल्या राज्याचा विस्तार केला. त्यांचा राजा बली याला अंग, वंग, कलिंग, पुंड्र आणि सुहूम असे पाच पुत्र होते. अंगाचे राज्य भागलपुराजवळ, वंगाचे डाक्का आणि चितगाँग प्रदेशांत, पुंड्राचे उत्तर बंगालात, सुहूमाचे बरद्वान जिल्ह्यात आणि कलिंगाचे ओरिसात स्थापन झाले.

कान्यकुब्ज येथे कालांतराने गाधिराजा राज्य करू लागला. त्याचा पुत्र विश्वामित्र याने वसिष्ठाला मत्सराने त्रास दिला; पण शेवटी तो तपश्चर्येने ऋषिपदाला पोहोचला.

पूरूच्या वंशामध्ये दुष्यंत आणि त्याचा पुत्र भरत हे विख्यात राजे होऊन गेले. भरताने आपल्या राज्याचा विस्तार वाढवून चक्रवर्तिपद प्राप्त केले. त्याच्या नावावरून या देशाला भारतवर्ष हे नाव प्राप्त झाले. त्याच्या हस्तीन या वंशजाने हस्तिनापूर स्थापून तेथे आपली राजधानी केली. तसेच पूरूवंशात कुरू हा विख्यात राजा होऊन गेला. त्याने कुरुक्षेत्र आणि कुरुजांगल हे प्रदेश जिंकून त्यांना आपले नाव दिले. त्याच्या वंशात कौरव आणि पांडव उत्पन्न झाले.

भारतीय युद्धाच्या काळी पंचालदेशाचे उत्तर आणि दक्षिण पंचाल असे दोन विभाग झाले होते. द्रुपद उत्तर पंचालचा राजा होता. द्रोणाने आपल्या शिष्याच्या साहाय्याने त्याचा पराभव करून तो देश स्वाधीन केला; पण द्रुपदाला दक्षिण पंचालचे राज्य दिले. द्रुपदाची कन्या द्रौपदी ही पांडवांची पत्नी झाली.

यादवांनी मथुरेस काही काळ राज्य केले. त्यांच्या शूरनामक राजाला वसुदेव हा पुत्र व पृथा, श्रुतदेवा आणि श्रुतश्रवा अशा कन्या झाल्या. पृथेला कुंतिभोज राजाने दत्तक घेतल्यामुळे तिचे नाव कुंती असे पडले. श्रुतश्रवेला चेदिनृपती मघोष यापासून शिशुपाल हा पुत्र झाला. कंसाने मथुरेचे सिंहासन बळकावून वसुदेव आणि त्याची पत्नी देवकी यांना कारागृहात टाकले. नंतर वसुदेवपुत्र कृष्णाने कंसाला ठार मारून त्याचा पिता उग्रसेन याला गादीवर बसविले. पुढे जरासंधाने वारंवार मथुरेवर स्वाऱ्या केल्यामुळे यादवांना मथुरा सोडून दूर सौराष्ट्रात द्वारका येथे आपली राजधानी हलवावी लागली. भारतीय युद्धानंतर यादवांत कलह उत्पन्न होऊन त्यांत सर्वांचा नाश झाला.

ऐतिहासिक कालातील अनेक राजवंशांनी, उदा., राष्ट्रकूट, यादव, हैहय वगैरेंनी, दानपत्रांत स्वतःच्या सोमवंशाचा उल्लेख केला आहे.

 

पहा : उर्वशी; पूरुवंश; महाभारत; यदुवंश; ययाति.

संदर्भ : Majumdar, R. C. Ed. Vedic Age, Bombay, 1998.

मिराशी, वा. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate