অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्‌कॅन्सॉ

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी दक्षिणेकडील, मिसिसिपी नदीच्या पश्चिमेचे एक राज्य. क्षेत्रफळ १,३६,५५७ चौ. किमी. लोकसंख्या १९,२३,२९५ (१९७०). ३३० उ. ते ३६० ३०' उ. व ८९० ४१' प. ते ९४० ४२' प. याच्या दक्षिणेस लुईझझिअ‍ॅना, नैर्ऋत्येस टेक्सस, पश्चिमेस ओक्लाहोमा, उत्तरेस व ईशान्येस मिसूरी आणि पूर्वेस मिसिसिपी नदीपलीकडील टेनेसी व मिसिसिपी ही राज्ये असून याची जास्तीत जास्त दक्षिणोत्तर व पूर्वपश्चिम लांबी अनुक्रमे ३८४ व ४४३ किमी. आहे.

भूवर्णन

वायव्येकडून आग्‍नेयीकडे वाहात गेलेल्या आर्‌कॅम्सॉ नदीने राज्याचे बरोबर दोन भाग पाडलेले आहेत. पश्चिमेकडील उंच डोंगराळ प्रदेश पूर्वेला मिसिसिपीकडे उतरता आहे. मिसिसिपीला जेथे आर्‌कॅन्सॉ मिळते, त्याच्या अलीकडेच थोड्या अंतरावर तिला व्हाइट नदी मिळते. सेंट फ्रान्सिस ही पूर्वेकडील आणखी एक प्रमुख नदी आहे. सर्व पूर्वसीमेवर मिसिसिपी नदी असून तिच्या काठी अनेक नालाकृती सरोवरे व पूरतट आहेत. या भागात मधूनमधून मोठे पूर येतात. शीको व बिग लेक ही प्रसिद्ध नालाकृती सरोवरे आहेत. नैर्ऋत्य भागात रेड व लिटल रिव्हर या प्रमुख नद्या आहेत. आर्‌कॅन्सॉ खोऱ्याच्या उत्तरेचा ओझार्क पठार हा मिसूरी राज्यातून येणाऱ्या पर्वतांचा दक्षिण भाग होय. त्यात नद्या, तळी व वनाच्छादित टेकड्या आहेत. आर्‌कॅन्सॉ खोऱ्याच्या दक्षिणेस वॉशिटॉ पर्वताच्या पूर्वपश्चिम रांगांची उंची कित्येक ठिकाणी ७७५ मी. पेक्षा जास्त आहे. आर्‌कॅन्सॉ नदीखोऱ्यात अनेक दरडी व शिखरे असून सर्वोच्च शिखराची उंची ८६८ मी. आहे. राज्यात अनेक जलाशय असून त्यांपैकी सर्वांत मोठा वॉशिटॉ नदीवर आहे. त्याचप्रमाणे व्हाइट नदीवरील धरणाने झालेला बुल शोल जलाशयही मोठा आहे. पूर्वेकडील ‘ग्रँड प्रेअरी’ सखल गवताळ प्रदेश हजारो रान-बदकांचे निवासस्थान आहे. राज्याच्या उत्तर व मध्यभागात असंख्य झरे असून सर्वांत मोठा, उत्तरेकडील मॅमथ स्प्रिंग मिनिटाला ६,९०,००० लिटर पाणी देतो. मध्यभागात हॉट स्प्रिंग्ज शहराभोवती ४७ गरम झरे आहेत. राज्याच्या उत्तरभागात चुनखडी, वालुकाप्रस्तर व शेल असून दक्षिण भागात रेताड माती व सुपीक गाळ जमीन आहे. क्रोलीज रिज भागात लोएस माती आहे.

खनिजे

देशातील ९५ टक्के बॉक्साइट (अ‍ॅल्युमिनियम धातुक) या राज्यातून निघते. त्याशिवाय बेरियम सल्फेट, मँगॅनीज, शिपिचंद (पाऱ्याचे धातुक), शिसे, जस्त, शाडू, ग्रॅनाइट, संगमरवर, स्लेट, चुनखडी ही खनिजे येथे आहेत. हिरे सापडत असलेले देशातील एकमेव क्षेत्र याच राज्यात होते.

हवामान

सरासरी वार्षिक पाऊस ११८ सेंमी. असून तो पश्चिमेकडे कमी व पूर्वेकडे जास्त आहे. तपमान ५·६० से. व २७·८० से. यांच्या दरम्यान असते. नित्यवारे नैर्ऋत्येकडून येतात. हिमपात बहुधा वायव्य भागात होतो. आर्द्रता सामान्यतः ४० टक्के ते ६० टक्के असून ती हिवाळ्यात अधिक असते.

वने

राज्यातील ५५ टक्के भूमी वनाच्छादित आहे. लघुपर्णी व लॉबलॉली पाइन, दक्षिणेत सायप्रस, टुपेलो, गम, ओक, अ‍ॅश, हिकरी इ. वृक्ष असून राज्यात वनस्पतींचे ५०० प्रकार आहेत. ऑपॉस्सम, स्कंक, सिव्हेटकॅट इ. २५ जातींचे प्राणी; टर्की , बदके वगैरे ३०८ जातींचे पक्षी व नद्यांच्या पाण्यात २०० जातींचे मासे आढळतात.

लेखक : शा. नि. ओक

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate