অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुयाना - भूगोल

गुयाना

गाय्‌आन्ना; गायाना. दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावरील प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ २,१४,९६९ चौ. किमी.; लोकसंख्या ७,४०,००० (१९७१ अंदाज). याच्या उत्तरेस आणि ईशान्येस अटलांटिक महासागर, पूर्वेस सुरिनाम, दक्षिणेस ब्राझील व पश्चिमेस ब्राझील व व्हेनेझुएला आहेत. गुयाना आणि सुरिनाम यांच्या सीमेवर कॉरंटाइन नदी आहे. देशाचा समुद्रकिनारा सु. ४३२ किमी. आहे. १ उ. ते ९ उ. व ५७ प. ते ६१ प. यांदरम्यान हा देश आहे. जॉर्जटाउन ही राजधानी असून तिची लोकसंख्या ६६,०७० (१९७० अंदाज) व उपनगरांसह १,६७,०६८ आहे.

भूवर्णन

गुयानाची बहुतेक भूमी म्हणजे आर्कियन कालीन, सु. १५२ मी. उंचीचे पठार होय. हा स्फटिकी मंच तृतीयक व चतुर्थक काळांत समुद्राखाली दबला गेला. त्याच्या ग्रॅनाइटी बेटांपासून बनलेली पांढरी वाळू किनारी गाळमैदानाच्या दक्षिणेस आढळते. पुढे मंचाचे उत्थान होऊन तो समुद्राकडे कलला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सोने व हिरे यांच्या शिरा व अतिक्षरणामुळे झालेल्या जांभ्या मृदेपासून मिळणारे बॉक्साइट हे होय.

गुयानाचे तीन स्वाभाविक विभाग पडतात. पहिला किनारी गाळमैदानाचा, दुसरा त्याच्या दक्षिणेचा टेकड्यांचा, ऊर्मिल, दाट वर्षावनांचा आणि तिसरा अगदी दक्षिणेचा व पश्चिमेचा डोंगराळ व सॅव्हाना पठाराचा. पहिला किनारी विभाग सु. १६ ते ६५ किमी. रुंद असून तो देशाची ७% भूमी व्यापतो; परंतु येथेच देशातील ९०% लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. यातील बराच भाग भरतीच्या पाणीपातळीच्या सरासरी १·५ मी. खाली असून पहिल्या डच वसाहतकऱ्यांनी त्यांच्या मायदेशातल्या अनुभवाने समुद्रकाठी भिंती उभारून, कच्छ वनस्पती व दलदली काढून टाकून तो प्रदेश शेतीयोग्य केला आहे. सरासरी २०० सेंमी. हून अधिक पावसाचे वाहून येणारे पाणी काढून लावण्यासाठी चर खणून भिंतीत दारेही ठेवलेली आहेत. हाच देशाचा व्यापारी व शेतीविभाग असून राजधानी व प्रमुख शहरे याच भागात आहेत. गाळमैदानाच्या दक्षिणेचा डबरी जमिनीचा पट्टा सोडला म्हणजे १६० किमी. रुंदीचा विषुववृत्तीय वर्षावनांचा प्रदेश आहे. याने देशाचा सु. ८७% भूप्रदेश व्यापलेला आहे. देशाची बहुतेक वृक्षसंपत्ती व खनिजसंपत्ती याच भागात आहे. खाणींचे व लाकूडतोडीचे प्रदेश सोडले, तर या विभागात मूळच्या दक्षिण अमेरिकन इंडियनांची तुरळक वस्ती मोठ्या नद्यांच्या काठी आहे. तिसऱ्या पर्वतीय विभागात पश्चिमेस पाकाराइमा पर्वतराजी असून तिचे अत्युच्च शिखर रॉराइमा (२,८१० मी.) हे गुयाना, व्हेनेझुएला व ब्राझील यांच्या सीमेवर आहे. दक्षिण भागात कनूकू, मारूडी व आमूकू पर्वत असून दक्षिण सीमेवर अकाराई पर्वतश्रेणी आहे. पर्वतांच्या पायथ्याजवळच जी काही थोडी शेतीयोग्य जमीन आहे; तेथे मूळचे इंडियन लोक फिरती शेती करतात. येथील रूपुनूनी पठारी भाग सॅव्हाना गवताचा असून तेथे गुरे पाळण्याचा व्यवसाय थोडाबहुत चालतो.

खनिजे

बॉक्साइट, हिरे, सोने व मँगॅनीज ही येथील प्रमुख खनिजे होत. त्यांशिवाय शिसे, जस्त, लोखंड, निकेल, तांबे यांचेही साठे आहेत. परंतु भांडवल व वाहतुकीची साधने यांच्या अभावी ते पडून आहेत.

एसक्वीबो ही सु. १,००८ किमी. लांबीची नदी देशाच्या जवळजवळ निम्म्या प्रदेशाचा जलवाहन करते; तिला कूयूनी, मॅझरूनी, पोतारो, बुरॉ-बुरॉ, रूपुनूनी, कुयुविनी या प्रमुख उपनद्या मिळतात. पोतारोवर प्रसिद्ध काइअतुर धबधबा आहे; तो १०७ मी. रुंद असून प्रथम सरळ २२६ मी. व नंतर पुन्हा २२ मी. खाली पडतो. याशिवाय कूयूनीवर कामारिया, डेमरारावर ग्रेट व कॉरंटाइनवर फ्रेडरिक विल्यम चौथा इ. धबधबे आहेत. डेमरारा ही ३२० किमी. ची नदी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असून मुखापासून १०४ किमी, नौकासुलभ आहे. तिच्या मुखाशी जॉर्जटाउन वसलेले आहे. गुयाना-सुरिनाम सीमेवरील कॉरंटाइन नदी ७६० किमी. लांब असून तिच्या मुखाशी गुयानाचे स्प्रिंगलॅंडस् व सुरिनामचे नीऊ निकेअरीअ ही बंदरे आहेत. बर्बीसच्या मुखाशी न्यू ॲम्स्टरडॅम आहे. देशाच्या वायव्य भागात आमापुरा, बारीमा, बाराम, वाइनी, मोरूका, पॉमरून इ. नद्या आहेत. गुयानातील नद्या उंच डोंगरांतून व दाट जंगलांतून येतात आणि त्यांच्यावर धबधबे व द्रुतवाह आहेत. यामुळे त्या किनाऱ्यापासून ६०–७० किमी.पर्यंतच नौसुलभ आहेत.

हवामान

गुयानाचे हवामान उष्ण आणि दमट असून सरासरी तपमान सु. २६०-२७० से. असते. त्यात चढउतार फारसा होत नाही. पाऊस १७५ ते २२५ सेंमी. पडतो. मलेरिया निर्मूलनामुळे हवा अनारोग्यकारक नसली, तरी लवकर थकवा आणणारी आहे. अगदी किनारी भागात ईशान्य व्यापारी वाऱ्यांमुळे ती काहीशी सुसह्य होते.उष्ण हवा व ‘पाण्याचा देश’ या अर्थाचे देशाचे नाव सार्थ करण्याइतके पाऊसपाणी यांमुळे गुयानात समृद्ध विषुववृत्तीय वनश्री आहे. येथे जंगलांत जहाजे, धक्के वगैरेंसाठी लागणारे कठीण लाकूड देणारे वृक्ष, लाकडी सामानसुमानासाठी उपयोगी पडणारे विशिष्ट लाकूड देणारे वृक्ष, रबर, बलाटा इ. उपयुक्त वृक्ष भरपूर आहेत. ग्रीनहार्ट वृक्ष हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. गरुड, घुबड, कापूरपक्षी, शिंजिर, खंड्या, ढोक, आयबिस इ. विविध पक्ष्यांसाठी गुयाना प्रसिद्ध आहे. विषुववृत्तीय वर्षावनांतील समृद्ध प्राणिजीवनात मोठाली जनावरे नाहीत; पण जॅगुअर, टॅपीर, आर्मडिले, ऑपोसम, मॅनॅटी, रानमांजर, मुंगीखाऊ, विविध प्रकारचे कीटक हे प्राणी आढळतात. तापीर हा येथील जमिनीवरील सर्वांत मोठा, अ‍ॅसिलोट हा सर्वांत क्रूर आणि माकडे व हरिणे हे सर्वांत अधिक संख्येने आढळणारे प्राणी होत. सर्पांपैकी अ‍ॅनाकोंडा हा अतिशय मोठा व बुशमास्टर हा अतिभयंकर आहे. सरडे पुष्कळ असून नद्यांतून इग्वाना आढळतो. शार्क, स्टिंगरेज, स्नॅपर व ग्रूपर हे मासे विशेष प्रमाणात आहेत.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate