অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कू क्लक्स क्लॅन

कू क्लक्स क्लॅन

कू क्लक्स क्लॅन : अमेरिकेतील अनुक्रमे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात स्थापन झालेल्या दोन गुप्त व दहशतवादी संस्थांना ही संज्ञा देण्यात येते. कू क्लक्स ही शब्दावली कक्लॉस (Kuklos) या ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे. त्याचा अर्थ वर्तुळ किंवा टोळी असा आहे. सुरुवातीचे सहाही सभासद स्कॉटिश असल्याने त्यांनी क्लॅन हा इंग्रजी शब्द 'सी' या इंग्रजी अक्षराऐवजी 'के' हे इंग्रजी अक्षर ठेवून त्यास जोडला व अनुप्रास जुळविला. पहिली संघटना यादवी युद्धानंतर दक्षिणेकडील संस्थानांत २४ डिसेंबर १८६५ रोजी पुलॅस्की या परगण्यात कॅल्व्हिन जोन्स, जॉन केनेडी, फ्रँक मॅकॉर्ड, जॉन लेस्टर, रीचर्ड आर्‌रीड व जेम्स क्रो या सहा सभासदांनी स्थापन केली. या संस्थेचा मुख्य हेतू अँग्‍लो-सॅक्सन लोकांचे निग्रोंवर वर्चस्व व श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे, हा होता. याशिवाय दुबळ्यांचे रक्षण, कायद्याचे पालन व अमेरिकन संविधानाचे संरक्षण अशी आनुषंगिक उद्दिष्टेही सांगितली जात. या प्रकारच्या उद्देशांनी स्थापन झालेल्या इतर लहान संस्था कू क्लक्स क्लॅनमध्ये समाविष्ट झाल्या.

कू क्लक्स क्लॅनच्या सभासदांचे चमत्कारिक पोशाख, शांत संचलन, मध्यरात्रीच्या वेळचे घोड्यावरील पर्यटन, गूढ सांकेतिक भाषा यांचा तत्कालीन समाजावर भीतिदायक दबाव निर्माण झाला. शिवाय चाबकाने मारणे किंवा जिवंत जाळणे यांसारख्या अघोरी कल्पनांनी निग्रो समाजासच केवळ नव्हे, तर इतरांनाही दहशत बसली. दक्षिणेचे अदृश्य साम्राज्य या नावाने ही संघटना प्रसिद्ध पावली. रात्रीच्या वेळी पेटलेल्या मशाली घेऊन, पेटत्या क्रॉसच्या समोर विशिष्ट पांढऱ्‍या पोशाखात तिच्या सभासदांचा शपथविधी व दीक्षाविधी पार पडे. १८६८ ते १८७१ च्या दरम्यान ही संस्था अत्यंत प्रबल होती व त्या सुमारास तिची सभासदसंख्या लाखाच्या आसपास होती.  १८६९ मध्ये तिने निग्रोंना सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करू दिले नाही. त्यामुळे अनेक संस्थानांतून गोऱ्यांचे राजकीय वर्चस्व वाढले. १८७०-७१ मध्ये या संस्थेविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी काँग्रेसने कायदे केले, तथापि त्यांचे कार्य गुप्तपणे काही प्रमाणात चालू होतेच.

या नावाची दुसरी संस्था पहिल्या महायुद्धाच्या काळात विल्यम सिमन्स या माजी मंत्र्याने १९१५ मध्ये स्थापन केली. या संस्थेचा पूर्वीच्या संस्थेशी काहीही संबंध नव्हता. तथापि तिची उद्दिष्टे पूर्वीच्या संस्थेसारखीच होती, परंतु निग्रो लोकांबरोबरच ज्यू व रोमन कॅथलिक यांविरुद्धही ही संस्था कारवाया करू लागली. थोड्याच दिवसांत ती एक देशव्यापी संस्था झाली.

ही संस्था अराजकीय होती; तथापि १९२२, १९२४ आणि १९२६ च्या निवडणुकांत निवडून आलेल्या तिच्या सभासदांवरून राजकारणावर तिचा किती प्रभाव होता, हे स्पष्ट होते. मेन, टेक्सस, ओक्लाहोमा, इंडियाना, ऑरेगॉन ही राज्ये म्हणजे तिचे बालेकिल्लेच होत. १९२० मध्ये तिची सभासद संख्या ४०—५० लाखांच्या आसपास होती. पण तिच्या विधिबाह्य कृत्यांमुळे व लोकशाहीविरोधी कारवायांमुळे पुढे संस्थेचे सभाससद संख्या घटली आणि १९३० मध्ये ती फक्त ३०,००० राहिली. अनेक कायद्यांनी तिच्यावर बंदी घालण्यात आली, त्यामुळे १९३७ मध्ये ती जवळजवळ संपुष्टात आली व १९४४ मध्ये तर तिचे अधिकृतपणे विसर्जन करण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धानंतर तिचे पुनरुज्जीवन करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न झाला. मात्र १९६४ मधील नागरी हक्कांच्या कायद्यामुळे त्यातील माजी सभासदांना पुन्हा स्फूर्ती आली आणि संघटनेच्या घातपाती प्रकारास जोर आला. यातूनच अध्यक्ष केनेडी यांचा खून झाला असावा, असे काहींचे मत आहे. १९६५ मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी या संघटनेची यापुढे गय केली जाणार नाही, असे जाहीर केले; तथापि तिच्या कारवाया अद्यापि गुप्तपणे चालूच आहेत. आता या संघटनेने साम्यवादविरोधी धोरण अवलंबिले आहे.

 

संदर्भ : 1. Davis, S. L. Authentic History : Ku Klux Klan, 1865—1877, New York, 1924.

2. Randel, W. P. The Ku Klux Klan, London, 1965.

लेखक - य. ज. धारूरकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate