অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉट्सडॅम परिषद

पॉट्सडॅम परिषद

पॉट्सडॅम परिषद : दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया आणि ग्रेट ब्रिटन या दोस्त राष्ट्रांत पॉट्सडॅम येथे परिषद. ‘टर्मिनल’ही तिची सांकेतिक संज्ञा. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व त्याची मित्रराष्ट्रे यांचा पराभव झाला; पण जपान लएत असता याल्टा परिषदेत (४ – ११ फेब्रुवारी. १९४५) ठरलेल्या अटी व त्यांची कार्यवाही यांसंबंधी शत्रुराष्ट्रांबरोबर काय धोरण असावे, यासबंधी विचार करण्यासाठी पूर्व जर्मनीतील पॉट्सडॅम येथे १७ जुलै ते २ ऑगस्ट १९४५ च्या दरम्यान ती घेण्यात आली. तीत अमेरिकेने केलेल्या अणुबाँबच्या यशस्वी चाचणी स्फोटाची माहिती उघड करण्यात आली व प्रामुख्याने जर्मनीच्या भवितव्यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, तसेच जपानला बिनशर्त शरण येण्याचे आवाहन करण्यात आले; अन्यथा संपर्णू नाशास सिद्ध होण्याची धमकी देण्यात आली.

अमेरिकेच्या सल्ल्यानुसार परराष्ट्रीय मंत्र्यांचे एक मंडळ नेमण्याचे ठरले. त्यात अमेरिकेव्यतिरिक्त ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन यांचे प्रतिनिधी असावेत; या मंडळाने जर्मनीसाठी शांतता तहाचा मसुदा तयार करावा आणि इतर तत्संबंधित प्रश्नांची चर्चा करावी, असे ठरले. स्टालिन, ट्रूमन व ॲटली यांचे काही मुद्यांवर एकमत झाले. जर्मनीचे विभाजन करण्यात येऊन ग्रेट ब्रिटन, रशिया, अमेरिका, फ्रान्स या देशांनी त्या त्या विभागावर नियंत्रण ठेवावे, तसेच पोलंड, चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी या प्रदेशांतील जर्मन नागरिकांना सक्तीने जर्मनीत पाठवावे आणि पोलंडची सीमा पश्चिमेकडे ओडर व नीस ऩद्यांच्या तीरांपर्यंत वाढविण्यात यावी, असे ठरले.

जर्मनीतून नाझी पक्ष व त्याच तत्त्वज्ञान यांचे समूळ उच्चाटन करून जर्मनीचे लष्करी इतःपर नष्ट करण्यात यावे; जर्मनीस पुन्हा लष्करी दृष्ट्या बलवान होता येणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि जर्मनीत लोकशाही राज्यपद्धतीची पुनर्रचना करावी असे परिषदेने ठरविले. ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांचे काही मुद्यांबाबत रशियाशी मतभेद झाले; तथापि रशियाने लष्करी यंत्रसामग्री घेतली आणि जर्मनीचे सर्व लष्करी यंत्रसामग्रीनिर्मितीचे उद्योगधंदे बंद करण्यात आले.

जर्मनीतील युद्धगुन्हेगारांना आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे उभे करून त्यांस योग्य ते शासन करण्यात यावे, असेही ठरले. वरील सर्व प्रस्ताव व त्या अनुषंगाने उद्‍भवणारे इतर प्रश्न यांचा सांगोपांग विचार पाच राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेने करावा, असे अखेर ठरले. पॉट्सडॅम परिषदेच्या संदिग्ध तरतूदी व तिने योजलेल्या तात्पुरत्या योजना आणि निरीक्षकांनी लावलेले त्यांचे उलटसुलट अन्वयार्थ यातच परिषदेची अयशस्विता व्यक्त होते.

परिषदेने ठरविलेले धोरण पूर्णतःअंमलात येऊ शकले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट व कम्युनिस्टेतर असे दोन तट पडून शीतयुद्धास प्रारंभ झाला. ब्रिटिश व फ्रेंच विभागांचे एकीकरण होऊन पश्चिम जर्मनीचे जर्मन प्रजासत्ताक संघराज्य स्थापन झाले, तर रशियाने आपल्या नियंत्रणाखालील पूर्व जर्मनीत जर्मन लोकशाही प्रजासत्ताक हे स्वतंत्र कम्युनिस्ट राष्ट्र स्थापन केले. यामुळे एकसंध जर्मनीचे दोन स्वतंत्र देश झाले व त्यातून बर्लिन समस्या जन्मास आली आणि जागतिक तेढ अधिकच वाढली.

 

संदर्भ : 1 Truman, H.S. Memoirs,

2 Vols., New York, 1955.

लेखक - सु.र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 4/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate