অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फॅसिझम

फॅसिझम

फॅसिझम: इटलीमध्ये पहिल्या महायुद्धानंतर उदयास आलेली एक सर्वंकष सत्तावादी आधुनिक राजकीय विचारप्रणाली. इटलीत अडचणीच्या आणि गोंधळाच्या परिस्थितीत फॅसिझम निर्माण झाला. नीतोमुसोलिनीने त्या नव्याने वाढणाऱ्या चळवळीचे व संघटनेचे नेतृत्व केले. मुसोलिनी सुरुवातीला समाजवादी होता. समाजवादी पक्षाचे मुखपत्र अवंती( Avanti ) या दैनिकाचा तो संपादकही होता; परंतु नंतर त्याचे मन बदलले आणि तो समाजवादाला कडवा विरोध करणाऱ्या फॅसिस्ट पक्षाचा निर्माता आणि पुढारी झाला. हे १९२० च्या सुमारास घडले. फॅसिझम हा शब्द ‘फॅसिओ’ वरून निघालेला आहे. फॅसिओ म्हणजे लाकडांच्या जुटीमध्ये बांधलेली कुऱ्हाड.रोमन साम्राज्याचे ते चिन्ह होते. फॅसिझमचा पुढे वाढलेला साम्राज्य वाद आणि युद्धखोर वृत्ती यांचा त्या चिन्हाने चांगला बोध होतो. पहिल्या महायुद्धानंतर इटलीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता आणि बाजारभाव खूप वाढले होते. बेकारीही खूप वाढली होती. जनता संत्रस्त झाली होती व कामगारवर्गामध्ये बंडखोर प्रवृत्ती वाढली होती. त्यांनी त्या काळात अनेक संप केले. काही ठिकाणी कामगारांनी कारखानेही ताब्यात घेतले. रशियाचे उदाहरण त्यांच्यासमोर होतेच. भांडवलदारादी प्रस्थापित वर्गाला ही परिस्थिती अत्यंत भयावह वाटली. त्यांना ती काबूत आणून आपले स्वतःचे संरक्षण करावयाचे होते व प्रचलित समाजव्यवस्था कायम टिकवायची होती. कामगारांच्या संपाला उत्तर म्हणून त्यांनी अनेक वेळा टाळेबंदी पुकारली, पण तेवढ्याने भागेना, म्हणून कामगार चळवळ समूळ दडपून टाकण्याचे त्यांनी ठरवले. फॅसिस्ट पक्षाने त्या वेळी त्यांना खूप साहाय्य केले व भांडवलशाही समाजपद्धत जी कोलमडून पडत होती, तिला त्याने स्थिर पायावर उभे केले. मुसोलिनीने उभारलेल्या फॅसिस्ट पक्षात मुख्य भरणा होता, तो बेकार कामगारांचा आणि मध्यम वर्गातील दिशाहीन तरुणांचा.

सुरुवातीला हा पक्ष लहान होता. भांडवलदारांच्या व इतर श्रीमंत मंडळींच्या पाठिंब्यामुळे तो हलके हलके वाढत गेला, पण त्याची खरी वाढ झाली, ती राजकीय सत्ता हातात आल्यानंतर. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी फॅसिस्टांनी २८ ऑक्टोबर १९२२ रोजी राजधानीच्या रोम शहरावर मोर्चा काढला. या रोम शहरावरील मोर्चाचा फॅसिस्ट चळवळीत 'मोठी वीरश्रीची घटना' म्हणून उल्लेख होतो; परंतु त्या मोर्चामध्ये वीरश्री दाखविण्याचे कारणच पडले नाही. मोर्चाला कुणाचाही विरोध झाला नाही. फॅसिस्टांना रोममध्ये बिनविरोध प्रवेश मिळाला आणि राजाने आपण होऊन राजसूत्रे मुसोलिनाला बहाल केली. मुसोलिनी राजाच्या आमंत्रणावरून देशाचा मुख्यमंत्री बनला आणि तेव्हापासून इटलीमध्ये फॅशस्ट राजवट सुरू झाली. या काळात इटलीमध्ये समाजवादी, साम्यवादी व अराज्यवादी असे वाममार्गी पक्ष होते. यांखेरीज उजव्या विचारसरणीचे व मध्यममार्गाचे असे इतरही काही पक्ष होते. या सर्व पक्षांच्या सभासदांची संख्या फॅसिस्ट पक्षाच्या सभासदांपेक्षा कितीतरी अधिक होती.

सर्वांनी मिळून एकजुटीने फॅसिस्ट पक्षाला विरोध केला असता, तर त्या पक्षाचे पाऊल पुढे पडले नसते; पण ते सर्व पक्ष एकमेकांत भांडत होते, विशेषतः समाजवादी व साम्यवादी पक्षांतील भांडण अत्यंत तीव्र होते. त्यामुळे ते नामोहरम झाले आणि देशात फॅसिस्ट पक्षाची हुकूमशाही स्थापन झाली. सत्ता हाती आल्याबरोबर मुसोलिनीने विरोधकांचा छळ सुरू केला. भाषणस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य इ. नष्ट केले आणि मुसोलिनी व त्याचा पक्ष यांच्याविरूद्ध ब्र काढणेही अशक्य झाले. विरोधकांची धरपकड चालूच होती, यावेळी मुसोलिनीने विरोधकांना जबरदस्तीने एरंडेल तेल पाजण्याचे नवे तंत्र सुरू केले. अनेक विरोधक या जाचाला कंटाळून देश सोडून गेले, अनेकांना वर्षानुवर्षे तुरूंगात खितपत पडावे लागले. तरीदेखील थोडासा विरोध झालाच, पण फॅसिस्टांना पाशवी उपायांचा अवलंब करून तो चिरडून टाकला.

राज्यसत्ता हातात आली, त्या वेळी लोकसभेत फॅसिस्ट पक्ष अल्पसंख्य होता. एकदोन वर्षात मुसोलिनीने राज्यघटना बदलली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत फॅसिस्ट १०० %निवडून आले. त्या निवडणुकीची तऱ्हा मोठी वेगळी होती. फॅसिस्ट पक्षाने तयार केलेल्या उमेदवारांच्या यादीवर ‘होय किंवा नाही’ एवढेच जाहीर करण्याचा मतदारांचा हक्क होता आणि तो हक्कदेखील त्यांनी उघडपणे बजावला पाहिजे, अशी योजना होती. म्हणजेच मतदान गुप्त नव्हते, शिवाय मतदान आपल्या बाजूने व्हावे, म्हणून फॅसिस्ट गुंडांची धाकदपटशाही आणि गुंडगिरी होतीच. निकाल अर्थांतच त्यांच्या बाजूने लागला. मुसोलिनीचा लोकशाही राज्यव्यवस्था आणि लोकशाही हक्क यांवर विश्वास नव्हता. लोकशाहीमुळे देशामध्ये नाना पक्ष आणि पंथ माजतात, त्यामुळे देश विस्कळीत होतो. व त्याला कोणतेही निश्चित धोरण आखता येत नाही, असे त्याचे मत होते.

लोकशाही स्वातंत्र्यामुळेही तेच घडते, असेही त्याला वाटत होते. म्हणून देशाचा कारभार सुरळीत रीतीने चालावयाचा आणि देशाची प्रगती व्हावयाची तर देशामध्ये एकच पुढारी असला पाहिजे व देशातील सर्व कारभार त्याच्या एकट्याच्या मर्जीनुसार चालला पाहिजे, असा त्याचा आग्रह होता म्हणूनच त्याने एकतंत्री राज्यकारभार सुरू केला आणि त्या कारभाराला कुणाचाही विरोध होऊ नये, म्हणून हुकूमशाही स्थापन केली. देशामध्ये एकच पुढारी असला पाहिजे म्हणून तो राज्याचा सर्वाधिकारी व पक्षाचा एकमेव नेता बनला. फॅसिस्ट पक्षाखेरीज इतर सर्व पक्ष त्याने बेकायदा ठरवले व देशातील सर्व राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक संस्था आपल्या पक्षाच्या हुकूमतीखाली आणल्या. फॅसिझमला, फॅसिस्ट पक्षाला व मुसोलिनीला इटलीमध्ये सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला. त्याचे मुख्य कारण हे की लोक तत्कालीन दुरवस्थेला, शासनाच्या दुबळेपणाला व समाजातील गोंधळाला कंटाळले होते. त्यांना स्थिर व समर्थ सरकार हवे होते. असे सरकारच आर्थिक अरिष्टातून मार्ग काढून उद्योगधंदे वाढवू शकेल, बेकारी दूर करू शकेल व राष्ट्राचे नाव उज्जवल करू शकेल, असे त्यांना वाटत होते.

पहिल्या महायुद्धात विजयी राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेऊनही हवा असलेला मूलुख पदरात पडला नाही. म्हणून इटलीचा मोठा मानभंग झाला होता. या सर्व बाबतीत मुसोलिनीने व फॅसिस्ट पक्षाने मोठी आकर्षक आश्वासने दिली. लोक त्यामुळे भुलले व त्यांना फॅसिझमला पाठिंबा दिला. पुढे ती आश्वासने फसवी ठरली, ही गोष्ट वेगळी. शिवाय देशामध्ये लोकशाही परंपरा नव्हती. राजा, सरदार, चर्च व वरिष्ठवर्ग यांचे लोकांच्या मनावर खूप दडपण होते. त्यांनी राज्य करावे व आपण आपली परंपरागत शेती करावी किंवा कारखान्यात अगर लहान-सहान उद्योगात काम करावे, अशी लोकांची भावना होती. प्रत्येक बाबतीत त्यांना कुणीतरी पुढारी हवा असे व त्या पुढाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावे अशी त्यांची वृत्ती होती. त्यांना स्वास्थ्य व सुरक्षितता हवी होती. स्वातंत्र्याबद्दल त्यांचा विशेष आग्रह नव्हता. लोकांच्या या मनोवृत्तीचा मुसोलिनीने फायदा घेतला आणि त्यांना फॅसिझमच्या दावणीला जुंपले. आधुनिक जगात ही मनोवृत्ती अनेक समाजांत दृष्टीस पडते.उत्पादन यंत्रणा प्रचंड वाढलेली आहे, राज्यसत्ता खूप प्रबळ झालेली आहे व समाज फार विसकळीत झालेला आहे, त्यामुळे व्यक्तीला हतबल झाल्यासारखे वाटते. त्याला एकलेपणाची व स्वातंत्र्याची भीती वाटू लागेत. तो आधार शोधू लागतो. तो आधार त्याला पुष्कळ वेळा बलदंड पुढाऱ्यात आणि त्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखालील एकतंत्र राज्यव्यवस्थेत आढळतो.

अलीकडील समाजातील या समस्येचे एरिखफ्रॉम या सामाजिक तत्त्वज्ञाने आपल्या फीअरऑफफ्रीडम किंवा एस्केपफ्रॉमफ्रीडम या ग्रंथात अतिशय सुदंर विवेचन केले आहे. फॅसिझम इटलीपुरता मर्यादित राहिला नाही. इटलीमध्ये पाय रोवल्यानंतर तो जर्मनी, जपान, स्पेन, पोर्तुगाल, अर्जेटिना आदी देशांत पसरला. जर्मनीमध्ये हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी पक्षाच्या रूपाने त्याने अत्यंत विकृत व भीषण स्वरूप धारण केले. प्रत्येक देशात फॅसिझमचे स्वरूप तेथील परिस्थित्यनुसार भिन्न होते. कारण त्याला सुस्पष्ट व सुसंगत असे तत्त्वज्ञान नव्हते. उदा., जर्मनीमध्ये वंश तत्त्वावर भर होता. हिटलरच्या राजकीय तत्त्वज्ञानात आर्यवंश हाच सर्व मानवी वंशांमध्ये जन्मत: श्रेष्ठ असून तोच मानवजातीवर राज्य करण्यास समर्थ आहे, असा मूलभूत सिद्धांत गृहीत धरला आहे. तसा सिद्धांत फॅसिझमने मान्य केला नव्हता; परंतु प्राचीन रोमन साम्राज्याप्रमाणे इटलीचे साम्राज्य निर्माण करण्याचे स्वप्‍न फॅसिझम पाहू लागला. फॅसिझमचे सुसंगत असे तत्त्वज्ञान नसले, तरी काही तत्त्वे आहेत.त्यांपैकी काही तत्त्वे जुन्या जगातील प्लेटो व आधुनिक युगातील हेगेल यांसारख्या विश्वविख्यात तत्त्वज्ञांच्या ग्रंथांतही आढळतात. याखेरीज मॅकिआव्हेली, हॉब्ज, नीत्शे, पारेतो यांसारख्या विचारवंतांच्या विचारांचाही फॅसिझमच्या विचारसरणीवर परिणाम झाला आहे. तरीदेखील सर्वात अधिक परिणाम झाला आहे, तो जॉर्ज सॉरेल यांच्या हिंसक क्रांतीवादाचा.

जोव्हान्नी जेंतीले व आल्‌फ्रेदो रॉक्को हे तर फॅसिझमचे तत्त्वचिंतक म्हणून प्रसिद्ध आहेत. मुसोलिनीने १९३३ साली इटालियन विश्वकोशात फॅसिझमवर जो लेख लिहिला, त्याचा पहिला मसुदा जेंतीलेने तयार करून दिला होता असे म्हणतात. म्हणून फॅसिझमची तत्त्वे व कार्यक्रम यांचा विचार करताना तो लेख व मुसोलिनीच्या कृती यांनाच अधिक महत्त्व देणे योग्य ठरेल. तत्त्वज्ञानापेक्षाही आम्ही कृतीलाच अधिक महत्त्व देतो, हा मुसोलिनीचा सिद्धांत या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखा आहे. समाजामध्ये राज्यसंस्था ही सर्वंश्रेष्ठ संस्था व सर्वंकष राज्य आहे, असे फॅसिझम मानतो. समाज ही सावयव एकात्मक वस्तू असून व्यक्ती ह्या समाजाचे घटकांश आहेत. शरीराचे अवयव व पेशी हे जसे अंश होत, तसेच व्यक्ती हे अंश होत. अवयव वा पेशी जशा शरीराकरिता असतात, तशा व्यक्ती समाजाकरिता असतात. राष्ट्र वा राज्य हे समाजाचेच विकसित वा उन्नत रूप होय. म्हणून राज्याचे आदेश सर्वांनी बिनतक्रार मानले पाहिजेत. राज्याचे हित ते सर्वांचे हित. व्यक्तीचा विकास राज्याच्या छायाछत्राखालीच होऊ शकतो. राज्याचे संरक्षण व संवर्धन सर्वांनी मिळून केले पाहिजे आणि त्यासाठी झीज सोसण्याची वा आत्मत्याग करण्याची प्रत्येकाची तयारी हवी. राज्य, राष्ट्र आणि समाज यांमध्ये भेद नाही.

राष्ट्राचा नेता हाच राज्याचा आणि समाजाचा नेता असतो. त्याच्या हाती अनियंत्रित सत्ता हवी. राष्ट्राचे हित कशात आहे, हे तोच जाणतो. ते हित साधण्यासाठी सर्वांना त्यांच्या कुवतीनुसार कामाला लावणे, हा त्याचा अधिकार आहे. तो एक पक्ष निर्माण करतो. एक राष्ट्र, एक नेता व एक पक्ष अशी घोषणा केली जाते. राष्ट्र एकजीव असते. त्यामध्ये वर्गभेद माजवणे म्हणजे त्याची ताकत खच्ची करण्यासारखे आहे. कामगार, भांडवलदार, शेतकरी व जमीनदार यांनी एकजुटीने काम करून राष्ट्राची ताकत वाढवली पाहिजे. राष्ट्र हे वर्धिष्णू असले पाहिजे. त्याने आपले साम्राज्य निर्माण केले पाहिजे. त्यासाठी युद्ध करावे लागते. युद्धाची नेहमी तयारी हवी. युद्धामध्ये पाप नाही, त्यामुळे व्यक्तीचे शौर्य, धैर्य व त्यांच्या गुणांची कसोटी लागते. लोकशाही लोकांच्या हिताची नाही. तिने श्रीमंतांचे व धंदेवाईक राजकारण्याचे फावते व लोकांचे नुकसान होते. सर्वसामान्य लोकांना राष्ट्रहिताचे गहन प्रश्न समजत नाहीत, त्यांना त्यामध्ये रस नसतो, म्हणून ते प्रश्न जाणत्या लोकांनी हाताळणे हे उत्तम. या तत्त्वावरून फॅसिझमचा अभिजनवाद (इलिटिझम) उघड होतो; पण फॅसिस्टांना तो दोष आहे, असे वाटत नाही.

व्यक्तीचे स्वातंत्र्य व व्यक्तीची समानता फॅसिझमला मान्य नाही. विषमता निसर्गदत्त आहे, ती नाहीशी होणार नाही. काही व्यक्तींमध्ये पुढारीपणाचे गुण असतात, त्यांच्या आज्ञेनुसार काम करणे हेच इतरजनांचे कर्तव्य; त्यातच त्यांचे स्वातंत्र्य आहे व जीवनाची परिपूर्तीही आहे. इतिहास आर्थिक कारणामुळे घडत नाही. तो घडतो तो पराक्रमी पुरुषांच्या पराक्रमामुळे. त्यांना त्यांच्या मर्जीनुसार पराक्रम गाजविण्याची संधी देणे यातच समाजाचे हित आहे. राष्ट्राच्या नेत्याला मदत करण्यासाठी व त्याचे कार्यक्रम अमलांत आणण्यासाठी संघटना हवी. ती संघटना म्हणजे फॅसिस्ट पक्ष. तो पक्ष शिस्तबद्ध व लढाऊ वृत्तीचा हवा व त्याचा नेत्यावर संपूर्ण विश्वास हवा. ही झाली फॅसिझमची वा नाझीझमची सर्वसाधारण तत्त्वे. त्याच्या तत्त्वज्ञानाचा म्हणजेच विश्वविषयक कल्पनांचा मुद्दामच उल्लेख केलेला नाही, कारण त्या फार गोंधळाच्या व परस्पर विसंगत आहेत. फॅसिझम जडवादी आहे की आदर्शवादी आहे, हे सांगणेही कठीण आहे.त्याच्या कृतीमध्ये खालच्या दर्जाचा जडवाद किंवा भौतिकवाद दृष्टीस पडतो. तर त्याच्या सर्वांत महत्त्वाच्या राज्य या संकल्पनेत आदर्शवाद दृष्टीस पडतो.

फॅसिझमचा वा नाझीझमला हिंसेचे वावडे नाही, त्यांमध्ये उलट हिंसेचा पुरस्कारच आढळतो. तसेच नीती-अनितीचाही त्याला विधीनिषेध नाही. राष्ट्रीय उद्दिष्ट साधण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी त्याला चालते. फॅसिझम शांततावादी नसून उलट तो युद्धवादी आहे, तसाच तो उग्र राष्ट्रवादी आहे. उग्र राष्ट्रवाद आणि युद्ध यांचे नेहमी साहचर्य असतेच. ऐतिहासिक दृष्ट्या फॅसिझम व त्याचे जुळे भावंड नाझीझम जन्माला आले, ते पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर. व्हर्सायच्या तहामुळे जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण झाली, तिचा उच्छेद करण्याच्या हेतूने युद्धात जर्मनीचा पराभव झाला होता. त्यामुळे त्याला आपल्या वसाहतींना मुकावे लागले व अ‍ॅल्सेस-लॉरेन यांसारख्या काही भागानाही मुकावे लागले. इटलीचा पराभव झाला नव्हता, पण युद्धानंतर आपले साम्राज्य वाढविण्यासाठी दक्षिण यूरोपमध्ये व उत्तर आफ्रिकेमध्ये आपल्याला काही मुलूख मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नव्हती. म्हणून इटलीही असंतुष्ट होता. आपल्यावर अन्याय झाला आहे अशी दोन्ही देशांची भावना होती. अन्याय दूर करून घेण्यासाठी त्यांना युद्ध हवे होते. म्हणून त्यांनी उग्र राष्ट्रवादाला व युद्धखोर प्रवृतींना उत्तेजन दिले.

फॅसिस्ट व नाझी पक्षांचा तर तोच कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांना राजाश्रय मिळाला व दोन्ही पक्षांची ताकत व महत्त्व एकदम खूप वाढले. याचवेळी दुसरीही एक घटना घडत होती. ती म्हणजे पगारकाट, कामवाढ, नोकरकपात इ. स्वरूपाचा भांडवलशाहीचा कामगारांवरील हल्ला, युद्धानंतरच्या आर्थिक परिस्थितीत कामगारांना नवीन सवलती देणे, तर भांडवलशाहांना शक्य नव्हते; पण जुन्या सवलती चालू ठेवणेही अशक्य झाले होते. कारण भांडवलशाहीची वाढ थांबली होती. त्यामुळे अटळ असे तीव्र वर्गयुद्ध सुरू झाले होते. कामगार संप, निदर्शने वगैरे तर करतच होते; पण त्यांनी राजकीय लढाही सुरू केला होता. रशियात तो लढा यशस्वीही झाला होता व तिथे कामगारांचे राज्य स्थापन झाले होते. इतर देशांतील भांडवलदारांना तीच धास्ती वाटत होती. अशा वेळी त्यांना आधार दिला तो फॅसिस्ट विचारसरणीने व फॅसिस्ट पक्षाने. साम्यवादी व समाजवादी विचारांना उत्तर देणारे विचार त्यांना फॅसिझममध्ये आढळले आणि कामगारांच्या चळवळी व संघटना दडपून टाकणारी यंत्रणा त्यांना फॅसिस्ट पक्षाने पुरवली. म्हणून भांडवलशाही व फॅसिझम यांच्यामध्ये निकटचे नाते निर्माण झाले.

मार्क्सवाद्यांचा फॅसिझमबद्दलचा सिद्धांत या अनुभवावरून तयार झाला. त्यांचा सिद्धांत असा की, भांडवलशाहीला उतरती कळा लागते, त्या वेळी ती फॅसिझमला जन्म देते. चढत्या काळात तिला लोकशाही, कामगारसंघ, कामगारांचे संप वगैरे परवडत होते. पण उतरती कळा लागल्यानंतर त्या गोष्टी परवडणार नाहीत, असे दृष्टीस पडल्यामुळे त्यांच्या विनाशासाठी भांडवलशाहीने फॅसिझम निर्माण केला. या उपपत्तीतील दोष असा की फॅसिझमला भांडवलशाहीची खूप मदत झाली असली, तरी तिने तो निर्माण केला असे म्हणणे कठीण आहे. तो अगोदरच अस्तित्वात आलेला होता, त्याची उपयुक्तता ओळखून भांडवलशाहीने नंतर त्याला जोपासले. तसेच राजकीय सत्ता हस्तगत केल्यानंतर त्यानेही भांडवलशाहीला वेठीस धरले, ही गोष्टदेखील विसरता कामा नये. शिवाय फॅसिझमला मध्यम वर्गाचा जो पाठिंबा लाभला, त्याचेही स्पष्टीकरण या उपपत्तीमुळे होत नाही. केवळ भांडवलदारांचा पक्ष एवढेच त्याचे स्वरूप असते, तर मध्यम वर्गाने फॅसिझमला पाठिंबा दिला नसता; पण त्याचा उग्र राष्ट्रवाद व मध्यम वर्गाला वेगळे व स्वतंत्र स्थान देण्याची घोषणा यांनी मध्यम वर्गीयांच्या मनाला भुरळ पडली आणि त्यांनी फॅसिझमच्या जुलूमजबरदस्तीकडे दुर्लक्ष केले. त्याचे प्रायश्चित्त त्यांना अर्थातच नंतर भोगावे लागले.

फॅसिझम प्रत्यक्षात समाजवाद व साम्यवाद यांचा शत्रू म्हणून वाढला, या गोष्टीमुळे मात्र त्या उपपत्तीला पाठिंबा मिळतो. सत्तासंपादनानंतरची पहिली तीन-चार वर्षे मुसोलिनीला सत्ता सुसंघटित व स्थिर बनविण्यात घालवावी लागली. या काळात त्याने सर्व विरोधी पक्ष व विरोधी संस्था नष्ट केल्या आणि देशातील कायदेमंडळ, नोकरशाही, लष्कर, वर्तमानपत्रे, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. म्हणजेच देशामध्ये एक नेता, एक पक्ष व एक आवाज असला पाहिजे, हा जो फॅसिझमचा कार्यक्रम, तो त्याने अंमलात आणला. तो अंमलात आणताना त्याने खूप दडपशाही केली. विरोधकांवर अत्याचार केले व सर्व लोकशाही हक्क पायदळी तुडविले, पण देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली होती. ती त्याने पुनर्प्रस्थापित केली. त्याचेच पुष्कळांना कौतुक झाले. मुसोलिनीच्या राज्यात गाड्या वेळेवर सुटतात म्हणून अनेकांनी त्याची स्तुती केली, पण त्यासाठी केवढी किंमत मोजावी लागली व पुढे मोजावी लागणार आहे, याचा विसर पडला. त्यानंतर मुसोलिनीचे साम्राज्ययुग सुरू झाले आणि तेदेखील फॅसिझमच्या कार्यक्रमानुसार. साम्राज्यवाद फॅसिझमचा अविभाज्य भाग आहे. उग्र राष्ट्रवादाची परिणती नेहमी साम्राज्यवादातच होते. फॅसिझमपुढे उद्दिष्ट होते, ते जुन्या रोमन साम्राज्याचे. त्या काळात इटलीला जी प्रतिष्ठा होती, ती पुन्हा परत मिळवण्याची स्वप्‍ने फॅसिस्टांना पडत होती. त्यासाठी युद्धे करावी लागतील, हे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी लष्कर सुसज्ज करण्याकडे लक्ष दिले.

लोकांना भाकरी मिळाली नाही तरी चालेल; पण लष्कराला युद्ध साहित्य कमी पडता कामा नये, असा त्यांचा आग्रह होता. इटलीतील जनतेला उद्देशून त्यांनी जे घोषवाक्य तयार केले होते ते असे, "विश्वास ठेवा, आज्ञापालन करा, लढा." १९३९ साली केलेल्या एका भाषणात मुसोलिनी म्हणाला होता, "अधिक महत्त्वाचे व निश्चित स्वरूपाचे आहे, ते हे की आपण शस्त्रबळ वाढवले पाहिजे," माझा हूकुम आहे, "तो हा, अधिक बंदुका, अधिक जहाजे व अधिक विमाने मिळवा, कितीही किंमत द्यावी लागली तरी व कोणत्याही मार्गाने त्यासाठी आपण ज्याला सुसंस्कृत जीवन म्हणतो, त्याला तिलांजली द्यावी लागली तरी बिघडत नाही." मुसोलिनीच्या या भाषणात फॅसिझमचे युद्धविषयक धोरण चांगले प्रतिबिंबीत झाले आहे. फॅसिझमच्या धोरणानुसार इटलीचे साम्राज्य वाढविण्यासाठी मुसोलिनीने १९३५ साली अॅबिसिनियावर (आताच्या इथिओपिआवर) स्वारी करून तो पादाक्रांत केला व नंतर १९३९ साली अल्बेनिया गिळंकृत केला. संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आपण हे केले, असा त्याचा दावा होता. त्याला सुएझचा कालवा व ईजिप्त यांवरदेखील आपली सत्ता प्रस्थापित करावयाची होती; परंतु तेवढ्यात १९३९ साली दुसरे महायुद्ध पेटले आणि त्याला फॅसिझमविरोधी युद्ध असे स्वरूप येऊन त्यामध्ये इटली, जर्मनी व जपान या तिन्ही देशांतील फॅसिस्ट राजवटींची आहुती पडली. हे युद्ध सुरू झाले ते देखील नाझी-फॅसिस्ट जपानी हुकूमशाहांच्या युद्धखोर वृत्तीमुळे व साम्राज्यतृष्णेमुळे.

युद्धखोर वृत्ती व साम्राज्यतृष्णा फॅसिझममध्ये अंतर्निहित आहेत, तसाच लोकशाहीबद्दलचा तिरस्कार. लोकशाही राष्ट्रे लढतील व इतक्या निकराने लढतील असे त्यांना वाटले नव्हते. त्यामुळे ते सुलभ विजयाची स्वप्‍ने पहात होते; पण लोकशाहीने त्याचा भ्रमनिरास केला. युद्धातील पराजयामुळे हुकूमशाह तर नष्ट झालेच, पण त्यांनी उभारलेल्या संघटनाही नष्ट झाल्या. दुसऱ्या महायुद्धातील पराभवामुळे फॅसिस्ट राजवटी नष्ट झाल्या, पण फॅसिस्ट प्रवृत्ती नष्ट झाली असे म्हणता येत नाही. माणसामध्ये अधिकार गाजवण्याची हौस असते आणि संधी सापडली की काही माणसे शिरजोर बनतात. त्यांना अनुकूल संधी म्हणजे इतर मंडळीची अगतिकता. राजकीय आपत्तीमुळे किंवा आर्थिक संकटामुळे अशी अगतिकता समाजामध्ये काही वेळा पसरते; मग माणसे आधार शोधू लागतात. एखादा बलदंड मनुष्य त्यांना आधार द्यायला पुढे येतो. हे लहान प्रमाणावर घडते, त्या वेळी त्या माणसाला दादा किंव गुंड म्हणतात. देशव्यापी स्वरूपावर ते घडले म्हणजे तो मनुष्य फॅसिस्ट हुकूमशाह बनतो. हे संकट टाळण्याचा एकच उपाय आहे; तो म्हणजे माणसांना अगतिक न बनू देणे. त्यांच्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण करणे व संकटाच्या काळी त्यांना आधार देतील, अशा त्यांच्या स्वतःच्या संघटना वाढवणे. हे लोकशाहीचे कार्य ती ज्या प्रमाणात पार पाडील, त्या प्रमाणात फॅसिझमचा धोका कमी होईल.

 

संदर्भ : 1. Ebenstein, William, Today's Isms, Englewood Cliffs (N.J.), 1973.

2. Radel, J. L. The Roots of Totalitarianism, New York, 1975. 3. Woolf, S. J. Ed. The Nature of Fascism, London, 1968.

लेखक - व. भ. कर्णिक

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate